महानुभाव पंथिय इतिहास श्रृंखला
पंडित श्रीकेशिराजव्यास
mahanubhav history
पंडित श्रीकेशिराजव्यास
पंडित श्रीकेशिराजव्यास हे पापदंड रामपुरीचे राहणारे होते. महेश्वरव्याकरणाचे जाणते व प्रकांड पंडित म्हणून त्यांची ख्याती होती. एकदा श्रीकेशिराजव्यासांना श्रीनागदेवआचार्यांचे दर्शन झाले. आपसात काही शास्त्र चर्चा झाली. त्या शास्त्र चर्चेत केशव पंडित निरुत्तर झाले. व त्यांना आचार्यांविषयी आवडी निर्माण झाली, वेधले.
श्रीनागदेवआचार्यांनी त्यांना महानुभाव पंथाचे महत्त्व पटवून दिले. आचार्यांच्या मुखे त्यांना बोध झाला. खरा परमेश्वर कळला. वेद, पुराणादिक शास्त्रे देवतांची ज्ञाने आहेत. त्यामुळे जीव संसारबंधनापासून मुक्त होत नाही. परमेश्वराचे ज्ञानच जीवाला संसारचक्रापासून मुक्त करते असे यथार्थ ज्ञान झाल्यावर त्यांनी संन्यास घेतला.
श्रीकेशिराजव्यास असामान्य प्रज्ञावंत होते. संन्यासानंतर काही दिवसातच त्यांनी आचार्याजवळून ब्रह्मविद्या शस्त्राचा संपूर्ण अभ्यास केला. पूर्वाश्रमात (गृहस्थाश्रमातय केशिराजांना संस्कृतचा गाढ अभ्यास असल्याने, महानुभाव पंथात प्रवेश केल्यानंतर त्यांना ब्रह्मविद्या शास्त्र चांगल्या प्रकारे अवगत झाले होते. ते नेहमी पंडित श्रीदामोदरव्यास व श्रीराघवभट यांच्याशी चर्चा करीत असत. पंडित दामोदरव्यास, राघव भट आणि केशिराज व्यास हे तिघे मित्र होते. तिघांचे एकत्र उठणे, बसणे व आचरण सारखेच होते. म्हणूनच एकदा आचार्यांनी "केशव, पंडित, रामाते शास्त्र संवादेविन जो उठिता बैसता रिकामेया दाखविल तयासी होड सारीन " असे प्रशंसेचे उद्धार काढले. (म्हणजे या तिघांना शास्त्र संवादात शिवाय कालक्रमण करताना जर कोणी दाखवेल तर मी तो म्हणेल ते करीन)
श्रीकेशिराजव्यासांनी संन्यास घेतल्याची वार्ता त्यांच्या सासऱ्याच्या कानावर गेली. व ते केशिराजांना परत घरी नेण्यासाठी आले व त्यांना जबरदस्तीने घरी घेवून गेले. घरी घेऊन गेल्यानंतर सासऱ्याने केशराजव्यासांचे तरूण वयात संन्यास घेणे कसे अनुचित आहे? हे सिद्ध करण्यासाठी मोठमोठे शास्त्र जाणते विद्वान ब्राह्मण बोलावले व त्यांच्याशी चर्चा करायला भाग पाडले. त्या मोठमोठ्या वेद शास्त्रे जाणणाऱ्या विद्वांनाशी त्यांची सहा महिनेपर्यंत चर्चा चालली. पण केशराजबास “संन्यास घेणे किती महत्त्वाचे आहे व मी केले ते योग्यच केले” हे नाना प्रकारची शास्त्र-प्रमाणे देऊन त्यांना निरुत्तर करत राहिले शेवटी ते ब्राह्मण विद्वान पराजय स्वीकारून निघून गेले. ते विद्वान ब्राह्मण जाताना म्हणाले, हे आमच्याकडून काय पण कुणाकडून कधीही हरणार नाहीत आता यांची पत्नीच यांना संन्यास सोडायला भाग पाडू शकते, त्या दोघांना रात्री एका घरात कोंडा.
सासऱ्याने तसेच केले श्रीकेशिराजव्यासांना व त्यांच्या पत्नीला एका घरात कोंडले. बाहेरून कडी लावून घेतली. रात्री पत्नी पलंगावर निद्रा करायची तर श्रीकेशिराजव्यास खाली चादर अंथरून निजायचे. ती खाली येऊन झोपायची तर श्रीकेशिराजव्यास लगेच उठून पलंगावर निद्रा करण्यासाठी जायचे. ती पलंगावर आली की केशराजबास लगेच उठून खाली झोपायचे अशा प्रकारे संपूर्ण रात्र यातच जायची. असे बरेच दिवसपर्यंत चालले. पण श्रीकेशिराजव्यासांनी आपला संन्यास धर्म भंगू दिला नाही. परमेश्वराला अर्पण केलेल्या देहाला विषय भोगांचा विटाळ होऊ दिला नाही. असे ते महापुरषार्थी विषयवीर होते.
काही केले तरी पतिदेव आपला स्वीकार करत नाहीत असे पाहून त्या सतीला पश्चाताप झाला. की अरे आपण केवढे मोठे पाप करीत आहोत. येथपर्यंत संन्यस्त वृत्ती आपल्या पतीने स्वीकारली आहे आणि आपण त्यांना त्या धर्मापासून ढाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. म्हणून तिला खूप पश्चाताप झाला आणि तिने ती त्याला म्हणजेच केशिराजव्यासांच्या सासऱ्याला जाऊन सांगितले, “आता हे खरोखर महान योगी झालेले आहेत, यांच्याशी वाईट वासना धरल्याचे मला थोर पाप लागत आहे. यांना परत आचार्यांकडे जाऊद्या आता हे संन्यस्त झालेले आहेत.” असे म्हणून तिने श्री केशिराजव्यासांची क्षमा मागितली. सासऱ्यानेही क्षमा मागितली. आचार्यांकडे जाण्याची अनुज्ञा दिली.
अशा प्रकारे सासऱ्याने व त्यांच्या पत्नीने श्रीकेशिराजव्यासांना संसारात ओढण्याचे महान् प्रयत्न केले. परंतु त्याचे कडकडीत वैराग्य आणि प्रगाढ विद्वत्ता यामुळे त्यांच्या पत्नीचे व सर्व विद्वान पंडिताचे प्रयत्न व्यर्थ गेले. ते पापदंड रामपुरीला असताना गावात भिक्षा मागून गंगाकाठावर भोजन करायचे आणि पूर्ण दिवस गावाबाहेर झाडाखाली किंवा गंगेच्या काठावर असलेल्या कपारीसारख्या ठिकाणी विजन करायचे. त्या काळात त्यांनी स्वामींच्या लीळा विषयक रत्नमाला स्तोत्र आणि 'मुर्ति प्रकाश' हे दोन महाकाव्य ग्रंथ रचले.
पत्नीने व गावातील प्रमुख मंडळींनी त्यांना परवानगी दिली. त्यानंतर ते ग्रंथ घेऊन श्रीआचार्यांजवळ आले. आणि मागील सर्व वृत्तांत सांगितला. ते सर्व ऐकून आचार्य खूप प्रसन्न झाले आणि तेव्हा आचार्यांच्या तोंडून “माझा शुकयोगिंद्र किंगा" असे प्रशंसोद्गार बाहेर पडले. (व्यासपुत्र शुकदेवाचे ब्रह्मचर्य जसे रंभा नावाच्या अप्सरेकडूनही भंग झाले नाही तसा हा माझा केशवदेव शुकयोगिंद्र आहे.) पुढेहि संपूर्ण आयुष्यात त्यांनी कडकडीत उच्च पराकोटीचे वैराग्य कायमचे पाळले.
श्रीकेशिराजव्यास दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे त्यांच्यावर ब्रह्मचर्य भंग होण्याचा प्रसंग पुढेही आला. परंतु त्यांनी आपल्या बुद्धि चातुर्याने आपले ब्रह्मचर्य टिकविले. धर्म सांभाळला. सुंदर पुरुष पाहून काही अपवादात्मक स्त्रिया वगळता बाकी कोणत्याही स्त्रीला कामवासना झाल्याशिवाय रहात नाही.
असेच एकदा श्रीकेशिराजव्यास अटन करीत असताना एके गावी भिक्षेला गेले. भिक्षा करत करत एका श्रीमंत सावकाराचे घर लागले. ओळीत पडलेले घर डावलू नये. म्हणून श्रीकेशिराजव्यासांनी 'भिक्षाsss' शब्द उच्चारला. घरातून त्या सावकाराची मुलगी भिक्षा वाढायला आली. भिक्षा वाढतांना तिने श्रीकेशिराजव्यासांकडे पाहिले. आणि त्यांच्या सौंदर्याकडे मोहित झाली. व तीने वाईट भावनेनेच त्यांना विचारले, “आपण कोठे असता?” श्री केशिराजव्यासांनी काहीच मौन न भंगता उदासीनतेच पुढे अटनानुक्रमे जाण्याच्या दिशेकडे मान हलवली व निघाले.
त्या सावकाराच्या मुलीने सेवकाला सांगून श्रीकेशिराज व्यासांवर पाळत ठेवली. त्या रात्री पाऊस पडू लागला म्हणून एका देवळात मुक्कामासाठी थांबले. तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या मुलीला सेवकाने ते कोठे मुक्कामाला थांबले आहेत याची माहिती दिली. व ती अपरात्री उठून श्रीकेशिराजव्यास ज्या देवळात उतरले होते तेथे आली. व अचानकच येऊन त्यांच्या मांडीवर बसली. व तिने काही लज्जा न बाळगता आपली कुचित इच्छा प्रदर्शित केली.
तेव्हा श्रीकेशिराजव्यासांनी “तुम्ही म्हणाल ते करू, पण त्याआधी मी लघुशंकेला जाऊन येतो तो पर्यंत तुम्ही येथे बसा ! " असे म्हणून त्या मुलीला त्यांनी खाली बसवले. श्रीकेशिराजव्यासांजवळिल पोथी पान, झोळी, उपर्णे इत्यादी साहित्य तिथेच ती ठेवले होते म्हणून तिला विश्वास वाटला व ती बाजूला बसली.
आणि श्रीकेशिराजव्यास “श्रीचक्रधरss ” नामाचा उच्चार करीत देवळाबाहेर पडले. व रात्रीच्या अंधारात पाय जिकडे जातील तिकडे जाऊ लागले. पुढे जावून त्यांनी रानातच एका ठिकाणी झोप काढली आणि सकाळीच उठून पुन्हा चालू लागले. इकडे आचार्यांना ज्ञानसामर्थ्याने ही घटना दिसली व आचार्य जवळील शिष्यांना म्हणाले “माझा केशवदेव काळाला पाठीमोरे करून येत आहे, काळाला जिंकून येत आहे” ते मुक्काम करीत करीत आचार्यांजवळ आले. व त्यांना मागील सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर संतुष्ट होऊन आचार्य म्हणाले “केशवदेनी मार्गाते राखिले गा.” याने फक्त स्वतःचेच धर्म रक्षण केले नाही तर संपूर्ण मार्गाचे रक्षण केले आहे असे म्हणून आचार्य खूप प्रसन्न झाले.
यानंतर आचार्य श्रीकेशिराजव्यासाना म्हनाले की, “तुझी सुंदर देहयष्टी पाहून तिच्या मनात कामवासणा उत्पन्न झाली. आता तू पुन्हा व अटन आणि देहदमन करून देहावरील सुंदरता लोपून टाक. आणि पुन्हा एकदा त्या मुलीच्या गावी जा ! त्या मुलीचे मन तुझ्यावर बसलेले आहे ते काढून टाक.” असे आचार्यानी सांगताच ते तेथून निघाले.
त्यांनी इंद्रियाचे स्वभाव धर्म न पाळता देह अतिशय कृष केले. व त्या गावी जाऊन पुन्हा त्या मुलीच्या दारात 'भिक्षा' सवाल घातला. तोच ती मुलगी बाहेर आली व त्यांच्या घाणेरड्या शरिराकडे पाहून 'भनंग' असे म्हणून पचकन थुंकली. आणि घरांत पळून गेली. तेव्हा श्रीकेशिराजव्यास, मांडी थोपटून म्हणाले 'हा नव्हे मी श्री चक्रधराचा केशव द्या' असे म्हणून ते तेथून निघून गेले. मग काही दिवसानंतर केशिराजव्यास आचार्याच्या भेटीस आले. मागील वृत्तांत सांगितला तो ऐकून आचार्यांना अत्यंत आनंद झाला.
श्रीकेशिराज जसे ब्रह्मचर्य पाळण्यात कडक होते तसेच इतर आचरणानेहि ते कडक वृत्तीचे होते. कोणाचे धर्मबाह्य वर्तन दिसल्यास ते ताबडतोब त्यांना प्रतिबंध करीत असत. व शिक्षापण करीत असत. अशी ही त्यागशील आणि पावित्र्याची मूर्ती! त्यांना ब्रह्मविद्या शास्त्राची अत्यंत आवड होती ! एकदा त्यांना शास्त्र स्फूर्ति होईना म्हणून त्यांनी आचार्यांना विचारले तेव्हा आचार्य म्हणाले ' “तुम्ही झोळीत पात्र न घालता तिसऱ्या प्रहरी भिक्षा मागून गंगेकाठी भोजन करा व खांड देवळीत निद्रा घ्या. असे एक महिनाभर केल्यास तुम्हांला शास्त्रस्फूर्ति होईल.” असा विधी त्यांना सांगितला. त्याप्रमाणे त्यांनी केले. तेव्हा त्यांना शास्त्र स्फूर्ती झाली. त्यामुळे त्यांना अत्यंत समाधान वाटले.
श्रीकेशिराजव्यासांची आचार्यांवर असीम श्रद्धा होती एकदा श्रीकविश्वरव्यास आचार्यांबरोबर वादविवाद करू लागले. तेव्हा केशिराज कविश्वरांना म्हणाले “कविश्वर हो ! अशी चर्चा करणे म्हणजे दोष आहे. यामुळे गुरु प्रसन्नता रहात नाही आणि अर्थ सिद्धीही होत नाही. गुरू जे सांगतील ते ईश्वरवाणी समजून मान्य करावे.” त्यांचे म्हणणे श्रीकविश्वरव्यासांनी मान्य केले. अशी श्रीकेशिराजव्यासांची श्रीगुरुंवर श्रद्धा होती.
श्रीकेशिराजव्यासांच्या जीवनातील महत्त्वाचे कार्य म्हणजे सूत्रपाठाचा अन्वय त्यांनी आचार्यांच्या आज्ञेने लावला. आणि दृष्टांत अन्वयी लावले हे होय. लापनिक प्रकरण त्यांनी केले. या ब्रह्मविद्याशास्त्राच्या व्यवस्थित मांडणीमुळे आचार्यानी त्यांच्याविषयी आनंद व्यक्त केला.
त्यांनी ज्ञानकलानिधी स्तोत्र, दृष्टांत स्तोत्र, रत्नमाला स्तोत्र, मुर्ति प्रकाश ओवीबद्ध ग्रंथ, अवस्थाभूत गीत, इत्यादी संस्कृत मराठी महाकाव्य रचली.
अशा कर्तृत्वशाली ग्रंथकार श्रीकेशिराजव्यासाचे देहावसान आचार्याच्या पश्चात अटनानुक्रमे विचरत असताना झाले.