भाग 019
विराटपर्व कथासार मराठी
(Virat parva marathi katha
mahabharat kahani)
मागिल भागात आपण वाचले की, अर्जुनाने कर्णाचा दुसऱ्यांदा पराजय केला. आता या भागात महारथी अर्जुनाचे अंधपूत्र दुःशासनादिकांशी युद्ध
अर्जुन विराटपुत्र उत्तराला म्हणाला, “तो सुवर्णमय नीलध्वज दिसत अहे त्या सैन्याकडे आतां आपला रथ वळव. देवाप्रमाणे दिसत असलेले आमचे आजोबा शांतनव भीष्म हे माझ्याशी युद्ध करण्याकरता तिथे रथावर उभे राहिले आहेत ! "
अर्जुनाचें हें भाषण ऐकून रथ, गज, अश्व यांनीं चिकार भरून गेलेल्या त्या सेनेकडे पाहून, बाणांनीं घायाळ झाल्यामुळे आधीच घाबरून गेलेला तो उत्तर अर्जुनाला म्हणाला, “हे शूरा, हे तुझे वेगवान् घोडे आवरून धरण्याची आता माझ्यात शक्ति उरली नाहीं ! माझे प्राण कसे अगदी कासावीस होत आहेत; आणि माझे मनही कसे अगदी विव्हळ होऊन गेले आहे!
हे पहा- तुझ्या आणि कौरवांच्या दिव्य अस्त्रांचा प्रभाव नुकताच माझ्या अनुभवास आला आहे; आणि त्यांनीं दाही दिशा जणू भरून काढल्या आहेत ! वसा, रक्त व मेद यांच्या वासाने माझे मस्तक फिरून गेले असून माझें काळीज अगदी फाटून गेले आहे ! रण भूमीवर शूरांचा हा असला सामना मी कधीच पाहिला नव्हता. भयंकर गदापात, तसाच शंखांचा शब्द, शूरांचा सिंहनाद हत्तींचे ओरडणें आणि विजेच्या कडकडाटाप्रमाणे तुझ्या गांडीव धनुष्याचा भयंकर शब्द यामुळे माझे मन खुप गोंधळून गेले आहे. आणि माझे कान बहिरे होऊन गेले आहेत आणि स्मरणशक्ति नष्ट झाली आहे !
तू एक सारखे चक्राप्रमाणे मंडल घेत आणि आपलें गांडीव धनुष्य ताणीत फिरत आहेस, आणि त्यामुळे माझी नजर ठरत नसून काळीज तर जसें काही उलून जात आहे ! क्रुद्ध झालेल्या शंकराप्रमाणें रणभूमीचे ठिकाणी तुझें उप्र रूप आणि तू युद्ध करीत असतां तो तुझा पराक्रम पाहून माझी भीतीने अगदी गाळण उडून गेली आहे! मला डोळे असूनही भान नाहीसे झाल्यामुळे, तू भात्यांतून बाण काढतोस केव्हां, ते धनुष्याला जोडतोस केव्हां, आणि ते उत्कृष्ट बाण सोडतोस केव्हां हे मला काहीच समजेनासे झाले आहे ! माझा जीव अगदी रडकुंडीस आला असून मला गरगर फिरायला लागले आहे ! आणि चाबुक व घोड्यांचे लगाम धरण्याची शक्ति मला आता मुळीच उरली नाही ! काय करू ? "
उत्तराचे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला :- हे राजकुमारा, असा भीतोस काबलं? अरे, धीर धर ! तुही या युद्धामध्ये अतिअद्भुत अशी कामं केली आहेस ! हे राजपुत्रा, तुझे कल्याण असो. अरे, शत्रूंना खडे चारण्याविषयी प्रसिद्ध असलेल्या मत्स्य कुलामध्ये तू जन्मला आहेस, तेव्हा ऐन प्रसंगी हे असले हातपाय गाळणे तुला शोभत नाही ! राजपुत्रा, मी रणामध्ये युद्ध करू लागलो म्हणजे तु छातीचा कोट करून रथावर बसून घोडे आवरून घर.
इत्यादी बोलून तो महाबाहु नरसत्तम रथिक्षेत्र अर्जुन उत्तराला पुढे म्हणाला, या भीष्मसेनेच्या समोर मला घेऊन चल, आणि लढाईत मी दिव्यास्त्रांचा प्रयोग करून भीष्मांचे धनुष्य आणि प्रत्यंचाही तोडून टाकतो ते पहा.
सोन्याच्या मढवलेले हे माझे गांडीव धनुष्य अंतरिक्षांत मेघातून निघणाऱ्या विजेप्रमाणे आज सर्व कौरवाच्या दृष्टीस पडेल ! आज माझे शरसंधान पाहून, अर्जुन डाव्या हाताने बाण सोडतो का उजव्या हाताने बाण सोडतो! हे त्यांना कळणार नाही. आणि हे येथे जमलेले सर्व शत्रु माझ्याविषयी शरसंधानाविषयी तर्क करत राहतील !
मी अशी दुस्तर नदी निर्माण करतो की, जिच्यात रक्त हेच पाणी. भोवरे हेच रथ आणि हत्ती हेच मगरी अशी परलोकात नेणारी दुस्तर नदी मी आज निर्माण करतो. हात, पाय, शिर आणि पृष्ठभाग त्यांनी गर्द झालेले हे कौरवारण्य मी आज सन्नतपर्व बाणांनी छाटून टाकतों ! माझ्या बाणरूपी अग्निच्या योगाने ही कौरवी सेना अरण्यात लागलेल्या वणव्याप्रमाणे शेकडो बाजूंनी जळू लागेल !
माझ्या प्रहारांनी विद्ध झालेले हे सैन्य तेथल्या तेथेच गिरक्या खात असलेले तुझ्या दृष्टीस पडेल. आणि बाणांचा प्रयोग करण्याविषयी माझ्या ठिकाणी काय अद्भुत कौशल्य आहे तेही मी तुला दाखवीन सपाट प्रदेशांवर आणि खाचखळगे असलेल्या प्रदेशांवरूनही जात असता तू न गडबडत स्थावर बैस, म्हणजे आकाशाला टेकलेला पर्वत जरी आड आला असला तरी तो मी आपल्या बाणांनी फोडून टाकीन! मी पूर्वी इंद्राच्या सांगण्यावरून शेकडो हजारों कालखंजांना आणि पौलोमांना लोळवले आहे.
मला इंद्रापासून दृढमुष्टि, ब्रह्म देवापासून हस्तकौशल्य व त्याच प्रजापतीपासून संकटकाळी कर्म अद्भुत युद्ध करावे ते माहीत झाले आहे, समजलास ! समुद्राच्या पलीकडे हिरण्यपुरात राहणाऱ्या उग्रधनुर्धारी साठ हजार महारथी राक्षसांचा मी पराजय केलेला आहे. पुराने वाढलेल्या पाण्याच्या योगाने नदीचे काठ ढासळतात, त्याप्रमाणे माझ्या वाढलेल्या क्रोधाच्या योगाने हा कौरव समुदाय भुमीवर कोसळलेला तुझ्या दृष्टीस पडेल ! ध्वज हेच वृक्ष, पताका हेच तृण, रथी हेच सिंहांचे कळप, अशा ह्यया कौरववनाला मी आज अस्त्ररूप अग्निनें आग लावून देईन !
वज्रपाणि इंद्र असुरांचे धुडके धुडके उडवून देतो त्याप्रमाणे मी एकटा आज युद्धाकरता धैर्याने सज्ज होऊन उभ्या राहिलेल्या ह्या बलाढ्य कौरवांचे धुडके धुडके उडवून देईन ! अग्नी पासून आग्नेयास्त्र, रुद्रापासून रौद्रास्त्र, वरुणापासून वारुणास्त्र, वायूपासून वायव्यास्त्र, आणि तशीच इंद्रापासून वज्रादि अनेक अस्त्रे मला मिळालेली आहेत. उत्तरा, तु भिऊं नकोस. भिष्माने रक्षण केलेले हे धार्तराष्ट्रांचे घोर वन मी आज समूळ उध्वस्त करून टाकतों ! "
याप्रमाणे अर्जुनानें उत्तराला आश्वासन दिले, तेव्हां भीष्माच्या रक्षणाखाली असलेल्या प्रचंड सैन्यांत तो शिरला. याप्रमाणे तो महाबाहु अर्जुन रणांत कौरवांची धूळधाण उडवून देण्याच्या इच्छेने येत आहे. पाहून दक्ष व क्रूरकर्मी भीष्म त्याला आडवे आले. तेव्हा अर्जुनाने त्यांच्या जवळ जाऊन आणि आपले धनुष्य खेचून सोनेरी फळांच्या बाणांनी त्यांचा ध्वज मुळापासून उपटून खाली पाडिला. तेव्हां तऱ्हेतऱ्हेचे पोषाख घातलेले दुःशासन, विकर्ण, दुःसह आणि विविंशति हे चार योद्धे त्या महाधनुर्धर अर्जुनाजवळ आले; आणि त्यांनी त्या गांडीव धनुष्यधारी बीभत्सूचें निवारण केले. दुःशासनाने एका भल्ल बाणानें विराटपुत्र उत्तराला जखमी करून दुसऱ्या एका बाणाने अर्जुनाला छातीत घाव केला ! तेव्हां अर्जुनाने त्याच्याकडे मोर्चा फिरवला; आणि तीक्ष्ण धारेच्या व गिधाडांच्या पंखांच्या एका बाणानें त्याचे धनुष्य तोडले; आणि लगोलग पांच बाणांनी त्याच्या उरःस्थली घाव केला ! तेव्हां पार्थाच्या त्या बाणांनी घायाळ झालेला तो दु:शासन रण सोडून पळून गेला !
नंतर धृत राष्ट्रपुत्र विकर्णाने तीक्ष्ण व सरळ जाणाऱ्या व गिधाडाची पिसे लाविलेल्या बाणाने त्या परमवीर अर्जुनाला वेध केला. तेव्हां त्यालाही अर्जुनाने एका नतपर्व बाणाने कपाळावर जखम केली. त्यामुळे तो तात्काळ घायाळ होऊन रथातून उलथून पडला ! नंतर आपल्या भावाची पाठ राखण्याच्या इच्छेने दुःसह विविंशतीसह अर्जुनावर धावून आला आणि त्यांनी त्याला तीक्ष्ण बाणांनी छावून सोडले. परंतु अर्जुनाने दोन गृधपिच्छ तीक्ष्ण बाणांनी त्या दोघांना एकदम वेध करून त्यांचे घोडे मारून टाकले. तेव्हां त्या दोघा धृतराष्ट्रपुत्रांजवळ रथ्यांसह सर्व पायदळ धावून आले आणि त्यांनी त्यांना रथात घालून लांब नेले ! तेव्हां तो महाचपल, अपराजित, बीभत्सु कौन्तेय सर्व बाजूंनी कौरवसैन्यावर तुटून पडला !
तेव्हा कौरवांचे ते सर्व महारथी एकत्र आणि सज्ज होऊन अर्जुनाशी तोंड देऊ लागले असतां, धुक्याने पर्वत झांकून जावे त्याप्रमाणे त्या अतर्क्यस्वरूप अर्जुनाने त्या सर्व महारथ्यांना बाणजालांनी सर्व बाजूंनीं झाकून सोडलें. तेव्हां मोठमोठे हत्ती ओरडूं लागले, घोडे खिंकाळू लागले, आणि शंख व भेरी ह्यांचाही शब्द सुरू झाल्यामुळे फारच मोठा आवाज होऊं लागला. अर्जुनाचे शेंकडो हजारो बाण लोखंडी कवचें फोडून आणि नर व अश्व यांचीं शरीरें भेदून जाऊ लागले. याप्रमाणे तो अर्जुन त्या रणांत अत्यंत त्वरेनें एकसारखा बाण सोडत असतां शरदऋतुत मध्यान्हसमयी निर्मल किरणांनी शोभणाऱ्या सूर्याप्रमाणे शोभू लागला.
अर्जुनाच्या बाणांनी जेर झालेले रथी रथांतून उतरून आणि घोड्यांवरून उतरून सैरावैरा धावू लागले; आणि पदातींचीही तीच गत झाली. मोठमोठ्या योद्ध्यांची तांब्याची, लोखंडाची व रुपाची कवचें बाणांनी फुटून जाऊं लागल्यामुळे मोठाच आवाज होऊ लागला. तीक्ष्ण बाणांनी गतप्राण झालेल्या अश्वारोह्यांच्या व गजांरोह्याच्या शरीरांनी ती सर्व रणभूमि झाकून गेली; आणि तशीच रथावरून पडणाऱ्या वीरांच्या योगेही ती झाकून जात असतां तो चापधारी धनंजय संग्रामात जणु थयथय नाचु लागला.
विजांच्या कडकडाटाप्रमाणे गांडीवाचा घोष ऐकुन सर्व सैन्ये त्रस्त झाली आणि त्यांनी त्या महारणांतून पाय काढला. कुंडलें व शिरस्त्राण घातलेली शिर कमले आणि सोन्याच्या माळा त्या रणभूमीवर जिकडे तिकडे विखुरलेल्या दिसू लागल्या. बाणांनी छिन्नभिन्न झालेली गात्रे, तसेच धनुष्यांसकट आणि कित्येक भूषणांसकट बाहु ह्यांच्या योगानें पृथ्वी आच्छादित झाल्यासारखी दिसू लागली. तीक्ष्ण बाणांनी त्या रणभूमीवर मस्तके तटाट तुटुन पडू लागली. तेव्हां जणू आकाशांतून दगडांचा पाऊसच पडत आहे असे वाटलें !
१३ वर्षपर्यंत जखडून पडलेला तो रुद्रपराक्रम अर्जुन आपले स्वरूप प्रकट करून कौरवांवर आपला क्रोधाग्नि पाखडण्याकरतां रणांत स्वैर संचार करू लागला. अशा प्रकारे सैन्य मारत सुटलेल्या त्या अर्जुनाचा पराक्रम पाहून ते सर्व योद्धे दुर्योधनाच्या देखत हात पाय गाळून स्वस्थ उभ राहिले. त्याप्रमाणे ते सर्व सैन्य त्रस्त करून व महारथ्यांना उधळून लावून तो विजयश्रेष्ठ अर्जुन रणभूमीवर संचार करू लागला; आणि युगांती काळाने उत्पन्न केलेल्या नदीप्रमाणे त्याने एक घोर रक्तनदी उत्पन्न केली. त्या नदीत अस्थि हेच शेवाळ, धनुबाण ही होळगी, योग्या मस्तकांवरील केस हेच तीरांवरील हिरवे गवत व शेवाल असून कवचे आणि शिरस्त्राणे यांची त्या नदीमध्ये अगदी गर्दी झाली होती.
लहान लहान हत्ती हींच ज्या नदीतील कासवें, मोठमोठे हत्ती हे ज्या नदीतील बेटे, भेद, रक्त व मांस हा जिचा प्रवाह, अशा त्या महाभयंकर उग्र नदीकडे पाहून कौरवांच्या अंगावर कांटाच उभा राहिला. तीक्ष्ण शस्त्रे हेच मोठाले मगर होते, आणि तीरावर वसलेल्या मांसभक्षक श्वापदांच्या कळपांनी ती निनादित झालेली होती.
असा अर्जन युद्ध करीत असता सर्व सेना खंडून गेली. पुढे समोर पितामह भीष्म दिसले आणि अर्जुनाने त्यांना प्रणाम करून युद्ध आरंभ केले. शिळेवर घासलेले अनेक तीक्ष्ण बाण भीष्मावर टाकले ; आणि त्या भीष्मानेही उलटून अर्जुनावर बाण सोडले. या प्रमाणे ते दिव्यास्त्रकोविद वीर तीक्ष्ण बाण सोडू लागले असता त्यामध्ये श्रेष्ठ कोण हे मुळाच उमगेना. नंतर अतिरथी किरीटमाळी अर्जुनाने भीष्माचा रथ बाणांनी भरून काढला. त्याचप्रमाणे शूर भीष्मांनीही बाणांनी दाही दिशा भरून काढल्या.
भीष्मांने त्या सग्रामात अर्जुनावर बाण वृष्टी, उलट अर्जुनानेही भीष्मांवर कडी केली; तेव्हा तिथे एक गंमतच झाली ! अर्जुनाने जे भीष्मांचे शर रथरक्षक मारले, त्यांनी अर्जुनाच्याच रथाभोवती शयन केले ! नंतर श्वेतवाहन अर्जुनाने गांडीव धनुष्यापासून सोडलेले पुच्छयुक्त आणि रणभूमि शत्रुरहित करून सोडण्याची इच्छा करणारे बाण उसळू लागले असता, त्याच्या रथांतून सुटणारे ते सुवर्णपिच्छ बाण आकाशांत हंसांच्या ओळीप्रमाणे शोभुं लागले तेव्हां अद्भुत प्रकारें बाणप्रक्षेप करणाऱ्या अर्जुनानें सोडलेले ते दिव्य अस्त्र युद्ध पहाण्याकरता आकाशात जमलेल्या सर्व देवतांच्या व इंद्राच्या दृष्टीस पडले.
ते अद्भुत चित्र पाहून संतुष्ट झालेला प्रतापवान् चित्रसेन गंधर्व इंद्राजवळ त्याची प्रशंसा करीत म्हणाला. " पार्थाने सोडलेले हे एकमेकांस जणू चिकटून जात असलेले बाण पहा ! दिव्यास्त्र प्रयोग करणाऱ्या त्या जिष्णुचें हें चित्र रूप अस्त्र होय. या अस्त्रांचा प्रयोग मानव करीत नाहीत; कारण त्यांना हे ठाऊक नाही. हा पुराणप्रसिद्ध महास्त्रांचा विचित्र समागम येथे झाला आहे. अर्जुन भात्यातून बाण घेतो. ते धनुष्याला जोडतो, आणि आपले गांडीव खेचून ते सोडतो, या त्याच्या क्रियांमध्ये मुळीच अंतर दिसत नाहीं !
आकाशांत तपणाऱ्या भर दुपारच्या सूर्याप्रमाणे या अर्जुनाकडे वर डोळा करून बघण्यासही हीं सैन्यें समर्थ होत नाहीत ! तसेच गांगेय भीष्माकडेही पाहण्याचे धाडस कोणी करीत नाहीं. हे दोघेही महा पराक्रमी आहेत, दोघांचाही पराक्रम लोकविख्यात आहे, दोघेही एकमेकाच्या तोहीचे आहेत, आणि दोघे युद्धामध्ये दुर्जय आहेत ! "
चित्रसेन गंधर्वाचे हे भाषण ऐकून घेतल्यानंतर देवराज इंद्राने त्या पार्थ भीष्मावर दिव्यपुष्पवृष्टि करून प्रशंसा केली ! नंतर सव्यसाची अर्जुन प्रतिसंधान करून वेध करीत असताही तिकडे लक्ष न देता भीष्मांनी त्याच्या डाव्या बरगडींत प्रहार केला, तेव्हां त्या बीभत्सूनें किंचित् हसून एका रुंद धारेच्या गृध्रपिच्छ बाणाने सूर्यासमान तेजस्वी भीष्मांचे धनुष्य छेदून टाकले ; आणि त्या कुंतीपुत्र धनंजयाने शत्रूला पराजित करण्याविषयी प्रयत्न करणाऱ्या त्या भीष्मांच्या उरावर दहा बाण मारून जखम केली. तेव्हा ते महाबाहू गांगेय त्या जखमेने अतिशय पीडित होऊन रथाच्या दांडीचा आधार घेऊन बराच वेळ उभे राहिले ! ते पाहून त्यांच्या सारथ्याने रथाचे घोडे थोपवून धरले आणि रथी मूर्छित झाला असतां त्याला रणांतून बाजूला घेऊन जावे हा उपदेश लक्षांत आणून त्याने त्या भीष्मांचे रक्षण व्हावें एतदर्थ त्यांना रणांतून काढून दूर नेलें ! अशा प्रकारे भीष्मही अर्जुनासमोर टीकले नाही. म्हणून या सर्व वर्णनावरून हेच लक्षात येते की अर्जुनासारखा योद्धा कुणीच नव्हता.
अंधपूत्र दुर्योधनाचा पराभव पुढील भागात
क्रमशः
पुढची कथा पुढिल विसाव्या भागात
भाग 20👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/020-virat-parva-marathi-katha.html
आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भाग एक 001 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html
भाग दोन 002
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html
भाग तीन 003 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html
भाग एक 004 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html
भाग पाच 005
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html
भाग सात 006👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html
भाग 007 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html
भाग 011 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/011-virat-parva-marathi-katha.html
भाग 012 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/012-virat-parva-marathi-katha.html
भाग 13👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/012-virat-parva-marathi-katha_28.html
भाग 14👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/013-virat-parva-marathi-katha.html
भाग 15👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/015-virat-parva-marathi-katha.html
भाग 16👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/016-virat-parva-marathi-katha.html
भाग 17 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/017-virat-parva-marathi-katha.html
भाग 18👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/018-virat-parva-marathi-katha.html
भाग 19👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/019-virat-parva-marathi-katha.html
भाग 20 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/020-virat-parva-marathi-katha.html
भाग 21👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/021-virat-parva-marathi-katha.html