भाग 021 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

भाग 021 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

 भाग 021

विराटपर्व कथासार मराठी

(Virat parva marathi katha

mahabharat kahani) 

मागील भागात आपण वाचले की अद्भुत पराक्रम करून त्या महा पराक्रमी एकट्या अर्जुनाने युद्धामध्ये समस्त कौरव सैन्याला जिंकून विराट राजाकडे पुष्कळ धन आणले. इकडे कौरवांची दाणादाण होऊन परत हस्तिनापुरास निघून गेल्यावर, कौरवांकडील जे सैनिक चोहीकडे वनात पळून गेले होते, ते वनातून परत आले; आणि भीतीने गांगरून जाऊन अर्जुनापुढे हात जोडून उभे राहिले ! त्यांची ती दुर्दशा काय वर्णावी? त्यांचे केश मोकळे सुटले असून ते क्षुधेने व तृषेने अगदी व्याकुळ झाले होते ; आणि ते परदेशात अशा विपन्न अवस्थेत असल्यामुळे त्यांची चित्तवृत्ति अगदी दीन माणसासारखी झाली होती !

नंतर त्यांनी अर्जुनास प्रणाम करून म्हटले, "अर्जुना, आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो, आम्हाला अभय दे व आम्हाला तुझी काय आज्ञा असेल ती सांग !' "

अर्जुन म्हणाला :- “योद्धे हो, तुमचे कल्याण असो. तुम्ही खुशाल परत जा. अजिबात भिऊ नका. बाबांनो, मी शरण आलेल्याचा वध करत नाही. “क्षमा वीरस्य भुषणम्” क्षमा हा वीर पुरूषाचा अलंकार आहे. मी तुम्हाला पूर्ण आश्वासन देतो. तुम्ही अजिबात घाबरू नका.”

याप्रमाणे या अर्जुनाचे अभय वचन श्रवण करून त्याच्यासमोर हात जोडून उसे असलेले ते सर्व योद्धे एकत्र होऊन अर्जुनाच्या उदारतेची प्रशंसा करून त्यांनी, “अर्जुना, तुझे आयुष्य यशवंत कीर्ति ही वृद्धिंगत व्हावी” म्हणून आशीर्वाद दिले; आणि  हस्तिनापुराचा मार्ग धरला. या प्रमाणे शत्रुस सोडून देऊन पुढे अर्जुन विराटनगराकडे जाण्यास वळला. तेव्हां, जणू काय तो मदोन्मत्त गजच निर्धास्तपणे चालला आहे असे त्या कौरवसैनिकांना वाटले आणि त्याच्याजवळ जाण्याची त्यांना हिम्मत झाली नाहीं ! 

अशा प्रकारे मेघपटलाप्रमाणे चाल करून आलेल्या त्या कौरव सैन्याचे निर्दलन करून टाकल्यानंतर अर्जुनाने राजकुमार उत्तरास घट्ट कवटाळून म्हटले, "बा उत्तरा, तुझ्या पित्याजवळ सर्व पांडव वास करीत आहेत ही गोष्ट तुला आता माहीतच झाली आहे ; तरीही तुला सांगतो की, तूं नगरात परत गेल्यावर ह्या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नकोस ; तुझ्या पित्याला ही गोष्ट समजल्यास तो अगदी भयभीत होऊन जाईल आणि भयाने त्याचे स्वास्थ्य बीघडेल ! 

उत्तरा, कौरवांचें ते अफाट सैन्य मीच जिंकले ; शत्रूपासून गाईही मीच सोडवल्या ! ' असे तू नगरात प्रवेश केल्यावर पित्याजवळ सांग. माझे सांगण्याचे तात्पर्य असे की हे राजपुत्रा, येथे जे काही घडले ते सर्व तुझेच कृत्य म्हणून निवेदन कर.

उत्तर म्हणाला: - अर्जुना, तू जे कृत्य केलेस, ते अलौकीक अपूर्व होय. तें दुसऱ्या कोणाच्याही हातून होण्यासारखे नाही ; मला तर ते करण्याची शक्ति नाहीच. मी तर सुरूवातीलाच भिऊन पळत सुटलो होतो, पण तरीही जोपर्यंत तुझी आज्ञा झाली नाही, तोपर्यंत पित्या जवळ मी या गोष्टीची वाच्यता करणार नाही, पण तुम्ही सर्व लवकरात लवकर प्रकट व्हा, कारण जास्त दिवस मी हे रहस्य राखून ठेवू शकत नाही.” 


या प्रमाणे कौरवसैन्याचा पराभव करून त्यांच्यापासून गाई व इतर धन हिसकावून घेतल्यावर, बाणादिकांनीं क्षत झालेला तो विजयशाली अर्जुन श्मशानाजवळ गेला. व पुन्हा शमी वृक्षाजवळ जाऊन उभा राहिला. तेव्हा तात्काळ तो रथावर बसलेला अग्नितुल्य महाकपि भूतगणांसह अंतरिक्षांत उड्डाण करून निघून गेला व त्याचप्रमाणे इतर सर्व मायाही नष्ट झाली व पुन:

नंतर विराटपुत्राने युद्धात यशोवर्धन करणारे ते गांडीव धनुष्य, भाते व बाण त्या शर्मावृक्षावर जेथल्या तेथें ठेवले व पुन्हा त्या महापराक्रमी अर्जुनाने सारथ्याची सांभाळली. व राजकुमार उत्तर तो मोठ्या उल्हासाने आपल्या नगरास येण्यास सिद्ध झाला. इकडे ते लोकोत्तर कर्म करून शत्रुसंहारक अर्जुनाने सारथ्यकर्म स्वीकारण्यापूर्वी पुन्हा आपल्या केशांची वेणी बांधली, आणि ते पूर्वीचे बृहन्नला रूप धारण करून त्या महात्म्याने अश्वांच्या रश्मि हातात घेतल्या ! अशा प्रकारे, तो विराटपुत्र उत्तर व कुंतीपुत्र अर्जुन हे पूर्वी विराटनगरीतून जसे बाहेर परले होते, तसेच पुनः त्या नगरींत प्रविष्ट झाले !

पराभव पाहून शत्रूच्या अधीन झालेले ते सर्व कौरव दीन होऊन युद्धापासून निवृत्त होऊन हस्तिनापुराकडे चालते झाले. इकडे विराटनगराला जात असतां मार्गात अर्जुन उत्तराला म्हणाला, “हे महाबाहो वीरा राजकुमार उत्तरा, हे गाईचे सर्व कळप गोपाळासह परत आलेले पाहिलेस का ? आपण आता अश्वांना विसावा देऊ आणि त्यांना पाणी पाजून व पाण्याने धूवून तिसऱ्या प्रहरी नगरांत जाऊ तूं आता ह्या गोपालांना त्वरित नगरांत पाठव, व प्रिय वार्ता कळवून आपल्या विजयाची प्रसिद्धी होऊ दे."

नंतर अर्जुनाने सांगितल्या उत्तराने मोठ्या त्वरेने दूतांना आज्ञा केली; आणि 'विराट राजाचा विजय झाला, शत्रुची दाणादाण उडाली, व गाई जिंकून आणल्या!' म्हणून सर्वत्र जयघोष करण्याविषयी त्यांना आज्ञा केली. याप्रमाणे अर्जुन व उत्तर यांची मसलत करून त्यांनी मोठ्या आनंदाने पूर्वी टाकलले अलंकार वगैरे फिरून आपल्या रथावर ठेवले; आणि मग ते उभयतां वीर तिसरे प्रहरीं विराटनगरीत मोठ्या उल्लासित चित्तवृत्तीने प्रविष्ट झाले !


इकडे विराट राजा दक्षिण दिशेकडच्या गाई जिंकून परत आणण्यासाठी मोठे सैन्य घेऊन गेला होता, तो तिकडे थोडक्याच काळात विजयी होऊन चारही पांडवांसह मोठ्या आनंदाने परत मस्यपुरास आला. युद्धामध्ये त्रिगर्तांना जिंकून व सर्व गोधने परत आणून राजधानीस आल्यावर पांडवांसह त्या विराट भूपतीचे तेज अधिकच झळकू लागले. त्याला विश्वासच होत नव्हता की आपण किचक व त्याचे भाऊ नसतानाही त्रिगर्तांचा पराभव केला आहे. 

त्याची ती तेजकांति पाहून आप्तसुहृदांना मोठा हर्ष झाला; व तो सिंहासनावर अधिष्ठित असतां ४ पांडवांसह सर्व पराक्रमी वीर त्याच्याजवळ बसले. राजा, त्या वेळी सर्व प्रधानमंडळ व ब्राह्मणसमुदाय राजा सन्निध उभे राहिले आणि त्यांनी राजाचा व सैन्याचा मोठा गौरव करून त्यांचा जयजयकार केला !  

नंतर मत्स्यराजाने सभेचे विसर्जन केले; आणि प्रधानमडंळी व ब्राह्मणवर्ग यांना जाण्यास आज्ञा देऊन उत्तर कोठे गेला? म्हणून विचारिले. तेव्हा राजवाड्यांतील स्त्रिया, मुली व अंतःपुरातील लोक यांनी सर्व वर्तमान निवेदन केले. त्यांनी राजाला कळवले की, " आपण सर्व सैन्य बरोबर नेले आणि दुसऱ्या दिवशी इकडे कौरवांनी गाई हरण केल्यामुळे राजपुत्राला मोठा संताप उत्पन्न झाला; आणि गाई हरण करण्यास आलेल्या भीष्म, कृप, कर्ण, इत्यादी महारथ्यांना जिंकण्याकरता बृहन्नलेला बरोबर घेऊन तो मोठ्या साहसानें कौरवसैन्यावर चालू न गेला आहे ! "

विराट राजाने ते वर्तमान ऐकले तेव्हा त्याला मोठी काळजी उत्पन्न झाली. आपला पुत्र एक रथ बरोबर घेऊन व बृहन्नलेला सारथी करून कौरवसैन्यावर चालून गेला, हे ऐकल्याबरोबर त्याला पुर्ण विश्वास पटला की पुत्र आता जिवंत परत येत नाही. आपला पुत्र पराक्रमी असला तरी व्याघ्र रूपी कौरवसैन्यासमोर तो एखाद्या बकरीच्या पिलासारखा आहे. असे त्याला वाटले, त्याने तत्काळ सर्व प्रमुख मंत्र्यांना म्हटले, "अमात्य हो, कौरव व तत्पक्षीय राजे त्रिगर्ताच्या समूळ पराभवाची वार्ता ऐकून कधीही स्वस्थ बसणार नाहीत ; या करता, त्रिगर्तांच्या युद्धांत ज्यांना काही इजा झाली नसेल, अशा योद्ध्यांनी मोठ्या सैन्यानिशीं उत्तराच्या रक्षणार्थ तिकडे जावे.

राजा, नंतर विराटाधिपतीनें चित्रविचित्र शस्त्रे व आभरणे यासह मोठमोठे योद्धे अश्व, गज, रथ व पदाति बरोबर देऊन आपल्या पुत्राच्या रक्षणार्थ ताबडतोब रवाना केले. ते चतुरंग सैन्य तिकडे जाऊ लागले तेव्हां विराट राजा त्यास मोठ्या लगबगीने म्हणाला, वीरहो, राजपुत्र जिवंत आहे की नाही याचा लवकर शोध काढा. अहो, ज्याचा सारथी षंढ, तो जिवंत असेल असे मला वाटत नाहीं ! "

संतप्त झालेल्या विराट राजाचे ते उद्गार ऐकून धर्मराजा त्याला हसून म्हणाला, 'हे नरेंद्रा, बृहन्नलानें तुझ्या पुत्राचें सारथ्य पत्करले असल्यास आज शत्रु तुझ्या गाई हरण करण्यास समर्थ होणार नाहीत ! अरे, बृहन्नला सारथ्य करीत असतांसर्व राजे, कौरव, तसेच देव, लढण्यास सिद्ध झाले, तरी त्यांचा पराभव करण्यास तुझा पुत्र समर्थ होईल ! 

असे बोलणे होत नाही तितक्यात, उत्तराने विजयवार्ता कळविण्याकरतां दूत पाठविले होते ते त्वरेने विराटनगरीत आले व त्यांनी उत्तराचा विजय झाल्याबद्दल जाहीर केले ! नंतर मंत्र्याने राजाला सर्व कळवले. तो म्हणाला, “आपणास उत्कृष्ट विजय मिळाला, कौरवांची दाणादाण झाली, राजकुमार उत्तर नगरासमीप आला आहे ! तसाच तो सारथ्यासह खुशाल असून त्याने गाईही जिंकून परत आणल्या आहेत ! "

युधिष्टिर म्हणालाः– विराट राजा, तुझ्या पुत्राने गाई जिंकून परत आणल्या व कौरवांना पळवून लावले हे उत्तम झाले; पण तुझ्या पुत्राने कौरवांना जिंकले यात मला अद्भुत मात्र काही वाटत नाही ! कारण, ज्याचा सारथि बृहन्नला, त्याला विजय हा मिळालाच पाहिजे !

आपल्या पराक्रमी पुत्राच्या विजयाची वार्ता श्रवण करून विराट गजाला अत्यंत आनंद होऊन त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले ! ते आनंदाचे वर्तमान सांगणाऱ्या दूतांना वस्त्र अर्पण करून त्याने मंत्र्याला म्हटले, “नगरांतील राजमार्ग पताकांनी अलंकृत करा. सर्व देवतांचे पुष्पोपहारांनी अर्चन करा. वारांगना, कुमार व मुख्यमुख्य योद्धे हे सर्व प्रकारच्या वाद्यांसह माझ्या पुत्राचे स्वागत करण्यासाठी सामोरे पाठवा. मत्त गजावर आरूढ होऊन एका मनुष्यास घंटा वाजवीत लवकर सर्व चवाठ्यांवर माझा विजय घोष करण्यास आज्ञा करा; आणि मनोहर वस्त्र भूषणांनीं मंडित अशा उत्तरेला पुष्कळ मुलींसह राजपुत्रास सामोरे जाण्यास सांगा." 

विराटराजाला स्वप्नातही वाटले नव्हते की आपला पुत्र इतका पराक्रमी आहे. आणि तो अजिंक्य अशा कौरव सैन्याचा पराभव करू शकतो. 

विराटची अशी आज्ञा होतांच नगरातील सर्व लोकांनी आरत्या, दहीं, दूर्वा वगैरे मांगलिक पदार्थ हातांत घेतले. त्याप्रमाणेच नौबदी, तुताऱ्या शंख, उत्कृष्ठ अलंकार व वेष धारण केलेल्या शुभ लक्षणी स्त्रिया, आणि सूत व मागध यांच्यासह य मंगलवाद्ये , पणवसंज्ञक वाद्ये, विजय सूचक वाद्ये इत्यादिकांसमवेत ते सर्व ढोक नगरांतून त्या विजयशाली महापराक्रमी विराट पुत्राला सामोरे गेले !

या प्रमाणे तो महाबुद्धिमान् विराट राजा सैन्य, कन्या व शृंगार आभरणांनी युक्त अशा गणिका पुत्राला सामोऱ्या पाठविल्यावर मोठ्या आनंदाने म्हणाला, सैरंध्री, फासे घेऊन ये; कंका, आतां द्युत सुरू कर.' 

ते भाषण ऐकून पंडुपुत्र युधिष्ठिर विराट राजास म्हणाला, "राजा, हर्षित झालेल्या जुगाऱ्याबरोबर द्यूत खेळू नये, असे मी ऐकले आहे ; तू तर आज खुप आनंदात आहे त्यामुळे तुझ्याबरोबर घृत खेळण्यास आज मला उल्हास वाटत नाही. आता, तुझे मन मोडावे अशी मात्र माझी इच्छा नाही; पण तरीही द्युत खेळण्याची तुझी इच्छा असल्यास सांग; मग माझी तयारी आहे. "

विराट राजा म्हणाला :- कंका, या द्यूतांत मी हरेन व त्यामुळे माझा आनंद नाहीसा होईल, हाच तुझा हेतु आहे ना? पण स्त्रिया, गाई, सुवर्ण इत्यादी जी काही धनदौलत मजपाशी आहे, ती सर्व तुला देण्यास पात्र अशीच आहे. जे तुला देऊ नये, असे मजपाशी सांप्रत काहीच नाही ; त्यामुळे घृत खेळण्यापासून अमुक एक अपाय होईल असे मला वाटत नाही! 

कंक म्हणालाः – हे मानदा राजेंद्रा, मग द्यूतच खेळणेच कशाला हवें ? त्यापासून तुला काय लाभ ? त्यात भरपूर दोष आहेत, त्यामुळे के वर्ज्य करावे अरे, पंडुपुत्र, युधिष्ठिराची द्युताने कशी दुर्दशा झाली हे तू ऐकले किंवा पाहिलें असशीलच ! त्यात ते मोठे समृद्ध राष्ट्र व देवतुल्य भ्राते आणि राज्य ही सर्व द्यूतांतच घालवले ना? या करता मला तर द्यूत आवडत नाही ; पण तरीही तुला ते आवडत असेल तर खेळू या !

नंतर कंक व विराट ह्यांचे द्यूत सुरू झाले. खेळतांना विराट राजा युधिष्ठिराला म्हणाला, पहा माझ्या पुत्राने युद्धांत त्या महा भयंकर कौरवांनाही जिंकून टाकलें !' तेव्हा तो महात्मा युधिष्ठिर विराट राजाला म्हणाला, 'अरे, ज्याचा सारथी बृहन्नला, त्याला युद्धांत कसा बरे जय मिळणार नाहीं ? "

धर्मराजाचे हे उद्गार ऐकून मत्स्यराज संतापला व तो युधिष्ठिराला म्हणाला, हे अधमा, माझ्या पुत्राबरोबर त्या षंढाची प्रतिष्ठा सांगतोस काय ? अरे, काय बोलावे व काय बोलू नये याचे तुला मुळीच ज्ञान नाही ; तू मुद्दाम माझा उपमर्द, अपमान करीत आहेस ! अरे, त्या भीष्मद्रोणादि सर्व वीरांना माझा पुत्र का बरं जिंकणार नाही ! हे ब्राह्मणा, तू माझा मित्र आहेस त्यामुळे हा तुझा अपराध मी सहन करीत आहे; पण जर तुला जीविताची आशा असेल, पुन्हा तर असले बोलू नको !"

राजा विराटा, ज्या सैन्यात द्रोण, तसाच भीष्म, अश्वत्थामा, कर्ण, कृप, दुर्योधन भूपति व दुसरे अनेक महारथी आहेत, त्या सैन्याशी युद्ध करण्यास प्रत्यक्ष देवेंद्र मरुद्गणांसह आला असतां त्याचाही त्या एकत्र जुळलेल्या कौरवसैन्यासमोर टिकाव लागणार नाही. राजा, त्या सैन्याशीं लढण्यास एक बृहन्नलाच समर्थ आहे. अरे, त्या बृहन्नलाचे सामर्थ्य काय वर्णावे ! त्याच्या बाहुबळाची बरोबरी करील असा वीर मागेही झाला नाही व पुढेही होणार नाहीं ! 

अरे, समरांगण दृष्टीस पडले म्हणजे त्याला अतिशय आनंद होतो ! त्याने देव, दैत्य, मनुष्ये यांचे मोठमोठे समुदाय कैक वेळां जिंकले आहेत; तेव्हां अशा त्या बृहन्नलाच्या साहाय्याने तुझा पुत्र कौरवांना कसा बरें जिंकल्याशिवाय राहील” 


ते ऐकून विराट राजा अत्यंत रागाने म्हणाला: - अरे ब्राह्मणा, असे बोलू नको म्हणून मी तुला पुन्हापुन्हा सांगत असतानाही अजून तू असले बोलणे बंद करीत नाहीस, पण नियंता नसल्यास बेबंदशाही माजून कोणीही धर्माप्रमाणे वागणार नाहीं ; आणि एकच अनर्थ उद्भवेल! म्हणून असे पुन्हा बोलशील तर खबरदार !' असे ह्मणून निर्भर्त्सना करीत विराटराजाने युधिष्ठिराच्या मुखावर मोठ्या जोराने फांसा हाणला; आणि त्याबरोबर त्याच्या नाकांतून रक्ताची धार लागली ! परंतु ते रक्त भूमीवर पडण्याच्या आधीच युधिष्ठिराने ते आपल्या ओंजळीत धरून जवळच उभ्या असलेल्या द्रौपदीकडे पाहिले. तेव्हां धर्मराजाचा अभिप्राय जाणून त्या महासाध्वी द्रौपदीने पाण्याने भरलेले तस्त हाती घेऊन त्यात ते रक्त धरले ! जमिनीवर पडू दिले नाही. 

इकडे विजयशाली उत्तरास नगरांत आणण्याकरितां मंडळी सामोरी गेली होती ती परत येऊन पोहचली. ज्याच्यावर नाना प्रकारचीं सुंगधी द्रव्ये व पुष्पे लोक उधळीत आहेत, असा तो उत्तर मोठ्या आनंदाने मिरवत मिरवत नगराच्या समीप आला. मार्गात पौरजनांनी, स्त्रियांनी व देशांतील लोकांनी त्याचा मोठा जयजयकार चालवला होता. अशा प्रकारें तो राजपुत्र राजवाड्याच्या द्वाराजवल येताच त्यानें पित्याकडे द्वारपाल पाठवला, व त्या द्वारपालाने लगेच तें वर्तमान विराट राजाला वर्तमान निवेदन केले. तो राजाला म्हणाला, महाराज, बृहन्नलेसह राजपुत्राची स्वारी द्वारासमीप उभी आहे ! '

ते ऐकून मत्स्याधिपतीला मोठा आनंद झाला व तो आपल्या सारथ्याला म्हणाला, "अरे, त्या दोघांना लवकर आंत घेऊन ये ; मी त्यांच्या भेटीची इच्छा करीत आहे!" नंतर कुरुश्रेष्ठ युधिष्ठिर त्या सारथ्याच्या कानास लागून हळुच म्हणाला, " हे महाबाहो, फक्त त्या उत्तराला आंत आण, बृहन्नलाला इकडे आणू नको; कारण, जो माझ्या शरीरावर संग्रामाशिवाय व्रण करील किंवा रक्त काढून दाखवील, त्यास कधीही जिवंत ठेवणार नाही, असा त्याने मोठा कडक नियम केलेला आहे ! त्याकरता, त्याने मला याप्रमाणे रक्तयुक्त अवलोकन केले म्हणजे तो अतिशय संतापेल , आणि अमात्य , सैन्य व वाहने यासह विराट राजाला येथच्या येथे ठार करून टाकील !” 

सारथ्याला कंकाच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले. पण तरीही त्याने कंकाने सांगितल्याप्रमाणेच केले. 


नंतर विराट राजाचा ज्येष्ठ पुत्र भूमिजय राजवाड्यांत प्रविष्ट झाला व त्याने पितृचरण अभिवंदन करून कंकालाही नमस्कार केला. राजा, त्या समयी तो निरपराधी कंक मनामध्ये अस्वस्थ असून 'एकीकडे भूमीवर बसलेला होता व त्याच्या नासिकेतून रुधिराचा ओघ चालला असून तो भूमीवर पडू नये ह्मणून सैरंध्री जपत होती. ते पाहून उत्तराने मोठ्या लगबगीने पित्यास विचारले, “पिताश्री यांना कोणी ताडन केले ? हे पापकर्म करणारा कोण आहे? "

विराट राजा म्हणालाः - उत्तरा, कुटिल ब्राम्हणाला मीच ताडन केलें. ह्याला ही शिक्षा खुप अपुरी आहे. कारण तुझ्या शौर्याची प्रशंसा चालू असतो हा त्या षंढाची प्रशंसा करतो !

ते ऐकून उत्तर म्हणाला :- “पिताश्री आपण हे फार अयोग्य कर्म केले लवकर याला प्रसन्न कर, नाहीतर हे घोर ब्रह्मविष तुम्हाला समूळ जाळून भस्म करून टाकील !”

क्रमशः 

पुढची कथा शेवटच्या बाविसाव्या भागात

भाग 22👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/021-virat-parva-marathi-katha_19.html

आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

भाग एक 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html


भाग दोन 002 

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html

भाग तीन 003 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html


भाग एक 004 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html


भाग पाच 005

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html


भाग सात 006👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html

भाग 007 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html


भाग 008👇

भाग 009 👇

भाग 17 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/017-virat-parva-marathi-katha.html

भाग 18👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/018-virat-parva-marathi-katha.html

भाग 19👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/019-virat-parva-marathi-katha.html


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post