देवधर्म की फोटोसेशन?
महानुभाव पंथातील सर्व भिक्षुक वासनिक धर्म बंधू-भगिनींना दंडवत प्रणाम
धर्म बंधुनो ! आज एका नवीन विषयावर हा लेखन प्रपंच मी रचत आहे. विषय तसा नवीन नाही आपल्या सगळ्यांनाच परिचित असा विषय आहे. आपण स्थान नमस्कार करण्यासाठी एखाद्या स्थानावर जातो तिथे कसे स्थान नमस्कार केले पाहिजे त्याच्या विधि आपल्या पूर्वजांनी शास्त्रात सांगितलेला आहे. तो पुढील प्रमाणे-
स्थानावर गेल्याबरोबर आधी दोन साष्टांग दंडवत घातले पाहिजे. त्यामुळे त्या स्थानाची मान्यता होते. नंतर हात सोहळे करून भावपूर्वक स्थान नमस्कार केले पाहिजे. नंतर विडा अवसर इत्यादी पूजन करून उपहार दाखवला पाहिजे. नंतर पुन्हा पाच दंडवत घालून एक किंवा आपल्या वेळेनुसार पाच गाठ्या स्मरण करण्यासाठी चित्त स्थिर करून बसले पाहिजे. व निघताना पुन्हा स्थान नमस्कार करून दोन दंडवत घालून मगच निघावे.
हा झाला पूर्वजांनी सांगितलेला विधि. आता आपण काय करतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे.
साधारण एक महिन्यापूर्वी मी आणि माझे मित्र एका महान स्थानावर म्हणजेच डोमेग्रामला स्थान नमस्कार करण्यासाठी गेलो. येताना आमच्या सोबत आमच्या मित्रमंडळात नसलेले एक सद्गृहस्थही बरोबर होते. एरवी ते कधी आमच्यासोबत येत नाहीत पण त्या दिवशी ते आम्हाला म्हणाले, “अरे तुम्ही लोक दर रविवारी कुठे जाता?”
मी म्हणालो “एखादे स्थान किंवा आश्रमाला भेट देतो”
“अरे मला पण या रविवारी घेऊन चला” आणि म्हणूनच ते आमच्या सोबत आले होते. आमचे एक धार्मिक मित्र मंडळ आहे सगळे एकाच गावी राहतात असं नाही पण आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी आम्ही एखाद्या स्थानावर जाऊन किंवा एखाद्या आश्रमाला भेट देऊन आपला वेळ सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करीत असतो.
डोमेग्रामला गेल्यानंतर सर्वात आधी राजमठ या महा स्थानावर आम्ही स्थान नमस्कार करण्यासाठी गेलो. तिथे गेल्याबरोबर हात सोवळे केले आणि स्थान नमस्कार करू लागलो. आमच्या सोबत आलेल्या सद्गृहस्थांनी घाईघाईतच कसेबसे स्थान नमस्कार केले आणि खिशातून मोबाईल काढला आणि फोटोसेशन सुरु केले. आणि ते सारखे फोटो काढू लागले सर्वात आधी सेल्फी काढून प्रत्येक स्थानावर ओट्याजवळ आणि लगेच ग्रुपवर सेंड करत होते. फोटोखाली कॅप्शन “आज मी डोमेग्रामला स्थान करत आहे”
त्यांच्या त्यांचे ते फोटो सेशन पाहून माझ्या मित्रांनी आपले आपले मोबाईल काढले आणि फोटो काढण सुरु केले. त्यात मीही सामील झालो. फोटो काढण्यासाठी भावपूर्वक स्थान नमस्करणाऱ्या भाविक भक्तांना बाजुला करू लागलो, “दादा एक मिनिट बाजूला व्हा जरा आम्हाला फोटो काढू द्या” आमच्या फोटो काढण्यापेक्षा त्यांचे स्थान नमस करणे ते नगण्य आहे. आमचे फोटो काढणे व फेसबुक किंवा व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावर पोस्ट करणे हेच आम्हाला एखादा ईश्वर आज्ञापीत विधी सारखे वाटू लागले. आणि अप्रत्यक्षरीत्या आम्ही स्थान नमस करण्यासाठी आड येत होतो, हे कळलेच नाही. याआधीही आम्ही अनेक वेळा अशा प्रकारे स्थाने नमस्कार केलेली आहेत.
आमच्या सगळ्या या माकडचेष्टा कोपऱ्यात बसून स्मरण करणारे एक बाबा पाहत होते व स्मित हास्य करीत होते. माझे त्यांच्याकडे लक्ष गेले. साधारण ४५-५०शी चे वय, गौरवर्ण, पाणीदार डोळे, राखाडी रंगाचे संन्यास धर्माचे वस्त्र, त्यांच्या शांत व प्रफुल्लित चेहऱ्यावर बोधाची स्वस्थता आणि वैराग्याचे तेज झळकत होते. मी त्यांना तिथूनच फेकून मारल्यासारखा दंडवत केला. अर्थात फक्त शब्दानेच मोठ्याने “दंडवत” म्हटले अनुकार तो काहीच नाही. त्यांनीही मोठ्याने “देव रक्षो” बसले. व गंभीर झाले.
मला त्यांचे आमच्याकडे पाहून हसणे खटकले होते. ते जणू काही उपहासानेच हसत होते असे प्रकर्षाने जाणवू लागले. मी तसाच त्या बाबांजवळ गेलो आणि पुन्हा दंडवत केला. व विचारले, “बाबा आपण आमच्याकडे पाहून का हसत होते?”
“ तसं काही नाही, सहज” ते म्हणाले.
मी आग्रहाने विचारले, “नाही बाबा सांगा, आपले हसणे निरर्थक नव्हते. त्यात काहीतरी रहस्यमय हेतू होता. आणि आपल्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून अजिबात वाटत नाही की आपण सहज कुणाकडेही पाहून हसणार म्हणून मला सांगा आपण का हसत होते? आणि आपण उपहासाने हसत होते हे मला प्रकर्षाने जाणवत होतं”
“भाऊ, ऐकून काय करणार !! तुम्हाला वाईटच वाटेल. त्यापेक्षा तुम्ही तुमचं काम चालू ठेवा आता मी हसणार नाही.” ते गंभीरतेने म्हणाले.
आता मात्र माझ्या अहंकारालाच आव्हान होते. कारण रोज व्हाट्सअप ज्ञान वाचून मी स्वतःला बऱ्यापैकी पंथीय जाणीव असलेला जाणता समजत होतोच. त्यामुळेच मनातही तो अहंकार जागृत होताच की, 'मी एवढ्या आग्रहाने विचारतोय आणि हे बाबा सांगत नाहीत? मी इतक्या आश्रमात गेलो इतके महानुभाव माझ्या ओळखीचे आहेत सगळे मला मान देतात आणि हे सहज उडवून लावत आहेत' याचा मला मनातूनच राग आला. व मी थोडे आवाज चढवूनच म्हणालो, “ सांगा ना, बाबा एवढं काय रहस्यमय ज्ञान सांगणार आहात तुम्ही, मी कोण आहे आपल्याला माहित आहे का? म्हणून मी माझे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले नाव सांगितले. व पुन्हा म्हणालो, “मला सगळे महानुभाव ओळखतात.”
यावर ते बाबा पुन्हा स्मित हास्य करीत म्हणाले, “बाबा रे तू कोण आहेस मला माहित नाही कारण मी व्हाट्सअप फेसबुक इत्यादी सोशल मीडियावर नाही. पण आता मला सांगणे भागच आहे कि, मी का हसलो, कारण तुझा आवाज वाढलेला आहे, जर मी आता तुला सांगितले नाही तर तू नक्कीच माझ्यावर विपरीत होशील म्हणून सांगतो ते ऐक आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे ही दे”
“हो विचारा!”
“तुम्ही स्थानावर कशासाठी येता?” बाबांनी विचारले.
“बाबा हा काय प्रश्न आहे का? स्थान नमस्कार करण्यासाठी येतो, तुम्ही ज्याच्यासाठी आले आहात, त्यासाठीच आम्हीही येतो.” मी म्हणालो.
“बरं मग स्थान नमस्कार करण्याचा सगळा विधी तुम्हाला माहितीच असेल?” त्यांचा प्रश्न.
“हो आम्ही बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे, मी अमक्या तमक्या बाबांचा शिष्य आहे.” म्हणून मी माझ्या गुरूंचेही नाव मोठ्या अभिमानाने सांगितले.
“ मग हे फोटो काढणे, सेल्फी काढणे हे प्रसाद वंदनाच्या विधी मध्ये कुठे लिहिलेले आहे. बरं स्थान पाठवण्यासाठी स्थानाचा फोटो काढणे गैर नाही ते उचितच आहे. पण फक्त स्थानाचा फोटो काढलं तर ठीक, त्यात आपलं फोटो काढून सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करणे आणि सर्वांना गाजावाजा करून सांगणे की, 'मी आज स्थान नमस करत आहे' हे कुठेतरी कीर्तीपर होत आहे असे तुम्हाला वाटत नाही का. तुमचे ते फोटोसेशन पाहून मला, 'किर्तीपरायण होउनि दत्ता मी वाहत गेलो' ही प्रायश्चित्तातली ओळ आठवली. वास्तविक पाहता माझे तसे हसणे ही चुकीचेच होते. कारण कोण काय करते? हे पाहण्याचे मला अजिबात प्रयोजन नाही. आणि तशी माझा देवही मला आज्ञा देत नाही. म्हणून भाऊ तुम्ही काही मनात आणू नका.”
“पण बाबा फोटो काढून व्हाट्सअप फेसबुकवर टाकणे, यात किर्तिपरायणता ती कशी? आम्ही टाकलेले फोटो अनेक लोक पाहतात, त्यांनाही स्थानाचे दर्शन होते. ते त्या फोटोंना लाईक करून दंडवत प्रणाम ही करतात.”
“भाऊ तुम्ही फक्त स्थानाचे फोटो काढून पाठवत असाल तर ठीक आहे. पण सोबत आपला स्वतःचाही फोटोही काढून तुम्हाला सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊन लाईक मिळवायचे असतात, हे खरे आहे की नाही? व्यवस्थित सिंहावलोकन करून उत्तर द्या. तुमच्या मनात खरंच आपले स्थान सर्वांना दिसावे हाच हेतू असतो का? की मीही सर्वांना दिसावा, लोकांनी म्हणावे, 'भाऊ फारच छान! तुम्ही भाग्यवान आहात.' हा हेतू नसतो का? आणि हे कठीये हो निके करीत असा, बरवे करीत असा, हे कठीयाच्या दृष्टांतात सांगितल्याप्रमाणेच किर्तीपर नाही का? आणि आपल्या अशा आचरणाने आपणही कीर्ती कठीया होत नाही का? याचा तुम्ही विचार करा”
त्यांच्या बोलण्यावर मी विचार करू लागलो, हा विषय मला वाटत होता तितका साधारण नव्हता. आतापर्यंत माझे मित्र ही माझ्या जवळ येऊन थांबले होते व तेही आमच्यातले बोलणे ऐकत होते. मी म्हणालो “बाबा आपण म्हणता ते खरं आहे”
पुढे ते म्हणाले, “दुसरे तुम्ही, फोटो काढण्यासाठी इतर भाविक भक्तांना बाजूला करीत आहात म्हणजे त्यांचे स्थान नमस्कार करण्यापेक्षा तुमचे फोटो काढणे श्रेष्ठ आहे का? हे एकप्रकारे अव्हेरणच झाले. कारण आपण तर भावपूर्वक स्थान नमस्कार केले नाही आणि दुसरा करीत होता त्यालाही बाजूला केले हा दोष नाही का?”
ते जसे जसे बोलत होते तसे तसे माझ्या सहित सगळ्या मित्रांनी मोबाईल खिशात घातले होते.
पुढे ते म्हणाले, “भाई, कीर्ती हेतू असलेली कोणतीही क्रिया देवाच्या लेखी लागत नाही. या फोटोसेशनमुळे तुमचे स्थान नमस करणेही देव स्वीकारत असेल की नाही ते देवच जाणे. कारण कीर्तीपर क्रिया पूर्णपणे वाया जाते असे ब्रह्मविद्या शास्त्र सांगते. सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंतांच्या सन्निधानात असलेले नाथोबास, देव शाबासकी देतील म्हणून दुसऱ्याही दिवशीही त्यांनी तांदुळजा आणला होता. पण देवाने तो स्वीकारला नाही उलट त्यांना शिक्षापण केले आणि कीर्ती कठीयाचा दृष्टांत निरूपण केला ही लीळा तुम्हाला माहीत असेलच.
आपण स्थान नमस्कार करायला येतो ते 'देव प्रसन्न व्हावे, देवाने आपल्याला लाईक(like) करावे' यासाठी आणि इथे येऊन आपण जीवांचे लाईक मिळवण्यासाठी धडपडतो आणि फोटो काढून सोशल मीडिया वर पोस्ट करतो. हे सर्वज्ञ परमेश्वर जाणत नाहीत का? 'किर्तीसाठी विधी आचरले, किर्ती कठीया मी' हे प्रायश्चित स्तोत्रात म्हटलेले आहे. सांगण्याचे तात्पर्य असे आहे की, जो जीवांचे लाईक(like) मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, त्याला देवाकडून लाईक(like) कधीही मिळणार नाहीत हे शास्त्र सांगते. नाथोबास सन्निधानात होते, म्हणून त्यांना परमेश्वर वेळोवेळी सावध करत होते आता आपल्याला घडणाऱ्या अवधींविषयी सावध करणारे कोणीच नाही. म्हणून देवच जाणे आपले काय होईल? आपला उद्धार कसा होईल?”
त्यांचे हे बोलणे ऐकून माझा 'मी ज्ञानी असल्याचा अहंकार कधीच गळून पडला होता.' इतक्या सूक्ष्म अविधीने आपली विधीरूप क्रिया वाया जाऊन, आपल्या किर्तीपर क्रियेने परमेश्वराला फार खंती ती येऊ शकते, याचा मी कधीही विचार केलेला नव्हता. आमच्या सोबतचे गृहस्थ बंधु अजुनही सेल्फी फोटो काढण्यात मग्न होते. माझे तिकडे लक्ष गेले. मित्रांनी तिकडे पाहिले. त्यांचे ते सेल्फीचाळे पाहून मित्रही हसायला लागले. मलाही हसु आले. थोड्याच वेळापूर्वी त्याच माकडचेष्टा करणारे आम्ही, त्यांच्याकडे पाहून हसत होतो. कारण आता आम्ही त्या वैरागी बाबांच्या दृष्टीकोनाने त्यांच्याकडे पाहत होतो. आम्हाला आमच्या मघाशी केलेल्या चेष्टांचे हसू येत होते.
बाबा हसून म्हणाले, “त्यांना हसू नका....”
“बाबा चुक दाखवल्याबद्दल फार फार धन्यवाद” म्हणून त्या बाबांना आम्ही सर्वांनी भावपूर्वक दंडवत केला. आज नवीन आचार ऐकायला मिळाला होता. आतापर्यंत कळत नकळत केलेल्या किर्तीसाठी, प्रसिद्धीसाठी, केलेल्या विधीरूप क्रिया, वायाच गेल्या असतील असे भयही वाटत होते. कारण देव किर्तीपर क्रिया स्वीकारत नाही, हे ऐकले होते, व्हाट्अँपवर वाचले होते, पण उमटले नव्हते. “गुरुशिवाय यथार्थ ज्ञानाचा उमट होणे नाही” हे आजच कळले होते.
सोशल मीडियावर शास्त्र वाचून आपण फक्त कोरडे शब्द जाणणारा पोपटपंची करणारा पंडित बनू शकतो पण ज्ञान जाणणारा ज्ञानी तत्त्वविद कधीच बनू शकत नाही. हे प्रकर्षाने जाणवले. कारण ते शब्द फक्त कानातून डोक्यात जातात, हृदयात ठसत नाही, त्यानुसार आचरण करावेसे वाटत नाही हा कोरडेपणा हृदयात साद्रवता निर्माण करत नाही. आणि साद्रवता फक्त निर्हेतूक क्रियेनेच येते. आणि परमेश्वर फक्त निर्हेतूक क्रिया स्वीकारतात. असा विचार करत करत. छिन्नस्थळीकडे स्थान नमस्कार करण्यासाठी निघालो.
हा माझा अनुभव मी सर्वांसोबत शेअर केला. पण माझे नाव मात्र लिहित नाही. कारण नाव लिहिल्यानेही निर्हेतूकता भंगून प्रसिध्दीपरायणता येईल. आणि पुन्हा तेच होईल म्हणून आता स्वतःचे नाव कुठेही न येऊ देताच, सर्व विधी, सर्व लेखन करण्याची इच्छा आहे, ती आपल्या सर्वांच्या शुभचिंतनाने सिद्धीस जाईलच.
सर्वांना या लेखाची लिंक पाठवा. वाचायला द्या.