भाग 020 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

भाग 020 विराटपर्व कथासार मराठी (Virat parva marathi katha mahabharat kahani)

 भाग 020

विराटपर्व कथासार मराठी

(Virat parva marathi katha

mahabharat kahani) 



 मागिल भागात आपण वाचले की, अर्जुनाने कर्णाचा पितामह भीष्म, द्रोण, अश्वत्थामा इत्यादी महायोद्ध्यांचा पराजय केला. आता या भागात महारथी अर्जुनाचे अंधपूत्र दुर्योधन व पितामह भीष्मासह संपूर्ण कौरव सैन्य पराजित झाले. व पळून गेले ती कथा पुढीलप्रमाणे.

लढाई सोडून अर्जुनासमोर भीष्मांनी पलायन केलेले पाहतांच दुरात्मा दुर्योधन धनुष्य घेऊन पताका फडकावीत व मोठमोठ्याने आरोळ्या देत अर्जुनावर येऊन पडला ; आणि शत्रुगणांत खुशाल संचार करीत असलेल्या त्या भयंकर धनुष्य धारण करणाऱ्या  अर्जुनाला त्याने आकर्ण धनुष्य खेचून सोडलेल्या एका भट्ट बाणाने कपाळाचे मधोमध जखम केली ! राजा. ते सुवर्णपिच्छांचा अतिशय बळकट बाण कपाळात रुतून बसला, तेव्हां तो महानुभाव अर्जुन एका सुंदर शिखराच्या किंवा त्याहीवर एक लांबच लांब कळक उभा आहे. अशा पर्वता प्रमाणे शोभूं लागला.

बाणानें कपाळ फुटून गेल्यामुळे त्यांतून सारखे उष्ण उष्ण रक्त निथळू लागले ; आणि अर्जुनाच्या कपाळांत रुतून बसलेला तो सुवर्णपिच्छ बाणही त्याने फार सुंदर दिसूं लागला. नंतर तो उग्रतेजस्वी अर्जुन , आणि अस्त्र दुनियेत त्याच्या तोडीचा कोणी वीर नाही असा तो अर्जुन दुर्योधनावर चालून गेला. 

मग पर्वतासारख्या धिप्पाड मस्त हत्तीवर बसलेला विकर्णही हत्तीच्या पावलांचे रक्षण करणाऱ्या चार रथांसह कुंतीपुत्र अर्जुनावर धावून आला. ते पाहून अतिशय वेगाने येऊन पडणाऱ्या त्या हत्तीला अर्जुनाने धनुष्य खेचून एका महावेगवान अशा भव्य मोठ्या लोखंडी फळाच्या बाणाने गंडस्थळाच्या बरोबर मध्यावर प्रहार केला ! तेव्हां पर्वत फोडून टाकणाऱ्या इंद्राने सोडलेल्या वज्राप्रमाणे तो अर्जुनाने सोडलेला गृपिच्छ बाण हत्तीचे गंडस्थळ फोडून पार आंत घुसला त्या जबर घालाने जखमी झाल्यामुळे तो गजराज अतिशय व्यथित होऊन धरथर कापायला लागला; आणि अगदी गलितधैर्य होऊन, वज्राच्या तडाख्यानें पडणाऱ्या पर्वतशिखराप्रमाणें भुईवर कोसळला! 

याप्रमाणे हत्ती जमीनीवर लोळवलेला पाहतांच विकर्ण भिऊन जाऊन घाईघाईने त्यावरून उतरून ; आणि आठशे पावले धावत जाऊन विविंशतिच्या रथावर चढला. अशा प्रकारे त्या मेघतुल्य व पर्वतप्राय धिप्पाड हत्तीचा बाणाने वध करून अर्जुनाने तशाच एका बाणाने दुर्योधनांचेही छाताड फोडले. याप्रमाणे हत्ती ठार झाला. त्याच्या छातीत जबर जखम झाली. आणि पादरक्षकांसह विकर्णाचाही मोड झाला, असे पाहून गांडीवनिर्मुक्त बाणांनी पीडित झालेल्या त्या प्रमुख प्रमुख वीरांनीही रणांतून पळ काढला; 

आणि पार्थाने मारलेला तो हत्ती आणि पळत सुटलेले योद्धे पाहून दुर्योधनाने आपला रथ थांबवला; व अर्जुन नव्हता तिकडे तो पळून गेला. तो पराजित झालेला उग्ररूपी दुरात्मा दुर्योधन बाणाने जखमी झाल्यामुळे रक्ताच्या गुळण्या टाकीत त्वरेने पळ काढत आहे असे पाहून अर्जुनाने युद्धाच्या इच्छेने दंड ठोकले; आणि म्हटले, “अरे ! कीर्ति आणि विपुल यश यांची मुळीच पर्वा न बाळगतां तू पापात्मा रणातून तोंड काळं करून पळ काढीत आहेस हे काय? अरे तुझी जयवाद्ये कोठे वाजत नाहीत. ती राज्यभ्रष्ट केलेल्या युधिष्ठिराने सांगितलेले काम बजाविणारा मी तृतिय पृथापुत्र रणांत दंड टोकून उभा आहे; 

तेव्हा हे धार्तराष्ट्रा दुर्योधना! एकदा मागे मागे वळून मला तुझे तोंड दाखव आणि आपल्या द्युतादि पूर्वकृत्यांचे स्मरण कर. अरे. पूर्वी तुझे ठेवलेले नाव दुर्योधन आज या जगात खोटे ठरले ! कारण, युद्ध टाकून पळ काढणाच्या बेतात आहेस. तुझ्या ठिकाणी दुर्योधनता तर कोठेच दिसतच नाहीं ! आता, दुर्योधना, तुझे रक्षण करील असा कोणी तुझ्यापुढे किंवा तुझ्या मागे तरी आहे मला दिसत नाही ; तेव्हां, हे पापिष्टा ! आता या युद्धांतून पलायन करून अर्जुनापासून आपल्या प्रिय प्राणांचे रक्षण कर  ! "

याप्रमाणे त्या महात्म्या अर्जुनाने धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाची निर्भर्त्सना करून त्यास युद्धार्थ आव्हान केले तेव्हां मदोन्मत्त हत्ती अंकुशप्रहाराने जसा मागे वळतो, तसा तो दुर्योधन अर्जुना वाक्प्रहाराने मागे वळला; आणि  ताडन केलेला सर्प ज्याप्रमाणे प्रक्षुब्ध होऊन मोठ्या वेगाने धावून येतो. त्याप्रमाणे आपल्या रथासहित मोठ्या वेगाने अर्जुनावर धावून आला. याप्रमाणे दुर्योधन माघारा फिरला असे पाहून कर्णही माघारा फिरला, व काही वेळ स्तब्ध राहून दुर्योधनाच्या उत्तरेकडून त्याच्या मदतीकरता पुढे सरला. 

नंतर भीष्म त्वरेने मागे परतला, व त्या प्रतापशाली महावीराने धनुष्यास प्रत्यंचा चढवून, दुर्योधनाच्या पाठीमागून त्यावर अर्जुनाचे बाण येणार नाहीत अशी व्यवस्था ठेवली; आणि तदनंतर द्रोणाचार्य, कृपाचार्य, विविंशति व दुःशासन हे तात्काळ मागे फिरले; व ते सर्व आपली प्रचंड धनुष्ये ताणून दुर्योधनाच्या पुढे उभे राहिले. 

याप्रमाणे तुडुंब भरून चाललेल्या पाण्याच्या लोंढ्यासारखी तीं सर्व सैन्ये परत वळलेली पाहून एकट्या अर्जुनाने त्यांना ताप देण्यास आरंभ केला; व सूर्य जसा एकटा आपणावर चालून येणाऱ्या मेघपटलाला संतप्त करून सोडतो, तसे त्या वेगवान् धनंजयाने आपणावर चालून येणाऱ्या सैन्याला संतप्त करून सोडले त्या समयी तुंबळ युद्ध सुरु झाले. ते सर्व कौरववीर दिव्य अस्त्रांनी चहूकडून अर्जुनावर तुटून पडले ; आणि मेघ जसे पर्वतावर जलधारांची वृष्टी करतात, तशी त्या योद्ध्यांनी अर्जुनावर बाणांची वृष्टी सुरू केली.  

अर्जुनावर शरवृष्टि चालविली तरी त्या गांडीवधारी कुंतीपुत्राच्या मनाला लवलेश भीति शिवली नाही. त्याने आपल्या अस्त्राने प्रतिपक्षीयांच्या सर्व अस्त्रांचा नाश केला व अखेरीस संमोहन नामक अनिवार्य अस्त्राचा प्रयोग केला. नंतर महाबली अर्जुनाने आपले ते पाजवलेले मुपुंख बाण सर्व दिशांनी व उपदिशांच्या ठिकाणी भरून टाकले ; आणि गांडीवाच्या टणःकारानें शत्रूचें मन व्यथित करून सोडलें. मग अर्जुनाने आपला तो प्रचंड शंख हातांत घेऊन वाजवण्यास प्रारंभ केला. तेव्हां त्याचा तो गंभीर व भयंकर ध्वनि दशदिशा भरून जाऊन पृथ्वी व आकाश हीं दणाणून गेली ; 

आणि कौरवांची अशी काही गाळण उडाली की, ते आपल्या हातांदली ती प्रचंड धनुष्यें टाकून देऊन निचेष्ट होऊन मूर्च्छीत पडले ! सर्व बेशुद्ध पडले अशी कौरवांची अवस्था पाहतच अर्जुनाला राजकुमारी उत्तरेच्या शब्दांची आठवण झाली व तो उत्तराला म्हणाला, "आतां शत्रुसैन्यांत जा, व कौरव मुर्छित पडले आहेत त्यांचे द्रोणाचार्य व कृपाचार्य ह्यांची ती पांढरी शुभ्र वस्त्रे, तसेच कर्णाचे ते सुंदर पिवळें वस्त्र, आणि अश्वत्थामा व दुर्योधन यांची ती निळी वस्त्रे सैन्यांतून घेऊन ये ! 

उत्तरा, शत्रूच्या या सैन्यांत एक भीष्म मात्र पूर्ववत् शुद्धीवर आहेत ; कारण या अस्त्राचा प्रतीकार कसा करावा हे त्यांना माहीत आहे. ह्यास्तव भीष्मांचे अश्वांना डावे घालून तू भीष्मांच्या समोरूनच जा. "

नंतर तो विराट पुत्र उत्तर अश्वांच्या रश्मि हातातून खाली ठेवून रथांतून खाली उतरला; आणि त्या द्रोणादिक महारथांची वस्त्रे आणून करून पुनः ताबडतोब आपल्या रथावर येऊन बसला. नंतर त्याने सुवर्णालंकारांनी गुंगारलेल्या आपल्या चारही उत्कृष्ट अश्वांना चालण्याविषयी इशारा करतांच ते श्वेतवर्ण अश्व कौरवांच्या सैन्याच्या मध्यांतून अर्जुनाचा रथ घेऊन पुढे चालते झाले. याप्रमाणे तो नरवीर अर्जुन सर्व सैन्य मूर्च्छीत करून निघून चालला असता ते भीष्माला सहन झाले नाही. 

त्याने लागलेच मोठ्या आवेशाने अर्जुनाचर बाण टाकले, परंतु त्यामुळे काहीच उपयोग न होता उलट अर्जुनाने भीष्माच्या घोड्यांवर बाण सोडून ते मारले व दहा बाणांनी प्रत्यक्ष भीमालाही विद्ध केले ! याप्रमाणे या रणभूमीवर अर्जुनाने भीष्माचे निवारण केले. त्याने गांडीवाच्या साहाय्याने भीमाच्या सारथ्यालाही विद्ध केले ; व मेघ समुदायाचे विदारण करून बाहेर पडणाऱ्या सूर्याच्या किरणांप्रमाणे रथ समुदायाचे विदारण करून बाहेर पडलेला तो अद्वितीय वीर अर्जुन संग्रामामध्ये उभा राहिला ! 

पुढे ते कौरवांचे सैन्य शुद्धीवर आले व त्यांतील वीरांनी तो महेंद्रतुल्य अर्जुन पाहिला. त्या समयीं, शत्रुच्या कचाट्यातून मुक्त झालेला तो एकटा अर्जुन अवलोकन करून दुर्योधन मोठ्या लगबगीनें म्हणाला, वीरहो... हा असा कसा सोडलात ! हा सुटणे योग्य नाही; यास्तव त्याचा पक्का समाचार घ्या !" ह्याप्रमाणे दुर्योधनाचे बोलणे ऐकून भीष्म हसून त्यास म्हणाला. अरे दुर्योधना तू आपले ते विचित्र धनुष्य व बाण टाकून देऊन व पराकाष्ठेची  शांति न बसला होता, तेव्हां तुझे ते वीर्य व ज्ञान कोठे गेले होते? दुर्योधना, हा अर्जुन घातक कर्म करणारा नव्हे; त्याचे मन पापकर्म करण्यास केव्हाही उद्युक्त होणार नाही. 

अरे, त्रैलोक्याच्या प्राप्तीकरता देखील हा स्वधर्म टाकणार नाही; आणि म्हणूनच या समयी हे सर्व वीर जिवंत राहिले आहेत ! नाहीतर त्याने तुम्हा सर्वांना बेशुद्ध अवस्थेतच यमलोकी धाडले असते. म्हणून हे दुर्योधना आतां त्याचा अंत पाहू नका; लवकर कुरु देशाची वाट धरा ; आणि अर्जुनाला गाई जिंकुन परत जाऊ द्या बाबानो या प्रसंगी दूरदृष्टीने विचार करा ; व वेडेपणाने निरर्थक अहंकाराने विचार करून स्वतःचा मृत्यू वोढवून घेऊ नका.” 

पितामह भीष्माचे हितकारक भाषण श्रवण करून दुर्योधनाने अर्जुनाला जिंकण्याची इच्छा सोडून दिली ; व बाह्य संताप कमी करून सुस्कारा टाकीत तो स्वस्थ बसला ! नंतर दुर्योधनाचे रक्षण करण्यास उद्युक्त असलेल्या त्या सर्व कौरव वीरांनी भीष्माचं वचन श्रेयस्कर मानून व धनंजयरूप अग्नि भडकत चालला आहे असे पाहून त्या रणभूमीतून माघार घेऊन परत जाण्याचा विचार केला !

नंतर ते कौरववीर परत चालले असता त्यांच्याकडे मोठ्या प्रसन्न मुद्रेने अर्जुनाने अवलोकन केले व क्षणभर निमूटपणे उभे राहून त्यांजकडे वळून शांतपणाने पुनः त्यांच्याशी बोलणे केले. त्या समयीं त्याने प्रथम वृद्ध पितामह भीष्म व द्रोण गुरु यांना मस्तकानें वंदन केले; आणि अश्वत्थामा, कृपाचार्य व मोठमोठे सम्मान्य कौरववीर यांना चित्रविचित्र बाणांनी अभिवंदन केले! नंतर त्या धनंजयाने दुर्योधनाचा रत्नखचित मुकुट बाणाने विद्ध केला, आणि प्रमाणे मान्य वीरांची अनुज्ञा घेऊन गांडीव घोषानें त्रैलोक्य दणाणून टाकले; 

त्याने एकाएकी देवदत्त वाजवला असतां शत्रूची अंतःकरणे एकदम विदीर्ण झाली; आणि सर्वत्र हाहाकार होऊन शत्रुसैन्याने पळ काढला! व ह्याप्रमाणे शत्रूंचा पूर्ण पराभव करून सुवर्ण माळेने युक्त असलेल्या तो अर्जुन आपल्या दैदीप्यमान् तेजाने झळकू लागला ! राजा, त्या प्रसंगी अजुन त्या पळत असलेल्या कौरवसैन्याकडे अवलोकन करून प्रसन्न मुद्रेनें उत्तरास म्हणाला, " उत्तरा, आतां अश्वांना परत फिरव ; तुझ्या गाई जिंकल्या: शत्रु पळून गेले; आतां मोठ्या आनंदानें नगरात चल !

या प्रमाणे त्या कौरवांचे व अर्जुनाचे मोठे अद्भुत युद्ध झाले, ते पाहून देवांनाही मोठा आनंद झाला व ते अर्जुनाच्या त्या पराक्रमाची प्रशंसा करीत आपआपल्या भुवनी निघून गेले !

पुढे विराट नगरात गेल्यावर काय झाले ती कथा वाचा पुढील भागात

 क्रमशः 

पुढची कथा पुढिल एकविसाव्या भागात

भाग 21👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/021-virat-parva-marathi-katha.html

आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

भाग एक 001 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/virat-parva-marathi-katha-mahabharat.html


भाग दोन 002 

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/002-virat-parva-marathi-katha.html

भाग तीन 003 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/003-virat-parva-marathi-katha.html


भाग एक 004 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/004-mahanubhav-panth-dnyansarita.html


भाग पाच 005

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/005-virat-parva-marathi-katha.html


भाग सात 006👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/006-virat-parva-marathi-katha.html

भाग 007 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/02/007-virat-parva-marathi-katha.html


भाग 008👇

भाग 009 👇

भाग 17 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/017-virat-parva-marathi-katha.html

भाग 18👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/018-virat-parva-marathi-katha.html

भाग 19👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/019-virat-parva-marathi-katha.html


भाग 20 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/020-virat-parva-marathi-katha.html

भाग 21👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/021-virat-parva-marathi-katha.html

भाग 22👇 शेवटचा भाग 

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/03/021-virat-parva-marathi-katha_19.html

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post