परमेश्वराची भक्ती ! महानुभाव पंथिय ज्ञान सरिता

परमेश्वराची भक्ती ! महानुभाव पंथिय ज्ञान सरिता

 महानुभाव पंथीय ज्ञानसरिता 

परमेश्वराची भक्ती !

बंधूंनो एक नेहमी लक्षात ठेवा...

ज्ञानापेक्षा भक्ती ही कधी ही श्रेष्ठच...

कारण...

भक्ती म्हणजे परमेश्वराची आवड असणे ! तथा परमेश्वराचे ध्यान-चिंतन करणे हे भक्तीचे लक्षण होय...

या भक्तीला 'प्रेम' हे दुसरे नाव आहे...

दुसऱ्या नावाचा अर्थ 'भक्ती' या 'पदा' प्रमाणे होतो. भक्ती आणि प्रेम ही दोन्ही पदे, एकाच अर्थाची होत. परंतु 'प्रेम' या पदाचा वापर अधिक झाला असल्याने 'भक्ती' हे पद मागे पडले ! आणि 'प्रेम' हे पद, महानुभाव पंथीय साधकाच्या बोलण्यात नेहमीच येत असल्याने, तेच पुढे आले... 

म्हणून...

ही दोन्ही पदे वेगवेगळी वाटतात ! परंतु तसे नाही. यात एकाचा पूर्वकाळ ! • तर एकाचा 'उत्तरकाळ' ! होय मात्र यासही मूळ आहे. प्रेमाचे मूळ त्यास प्रीति आहे. आणि प्रीतीचे मूळ आवड असते. आवड म्हणजे अधिक सहवास झाल्यावरही त्या मनुष्याचा तिरस्कार वाटत नाही, हे आवडीचे लक्षण होय. आणि प्रीती म्हणजे त्या मनुष्याला सोडून जाऊ वाटत नाही. हे प्रीतीचे लक्षण असते ! ज्याने परमेश्वरावताराला भोजन घातले, परमेश्वरावताराची आवड निर्माण होते. आवड निर्माण झाल्यानंतर, त्यास त्यांच्या विषयी प्रिती निर्माण होते. आणि प्रितीचा उत्तरकाळ ते प्रेम ! आणि 'प्रेमाचा' उत्तरकाळ ती 'भक्ती' होय उलट भक्तीचा पूर्वकाळ प्रेम ! प्रेमाचा पूर्वकाळ प्रिती ! आणि प्रितीचा पूर्वकाळ 'आवड'  होय !...

उपरोक्त निर्णयास लीळाचरित्रातील उदाहरण: सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी कसे आहेत ते पहावे ! अशाप्रकारे नागुबाइसांना प्रथम आवड निर्माण झाली. मग 'सर्वज्ञ' भेटल्यावर ते आपल्या आश्रमातून जाऊ नये, येथेच रहावे ! असे बाइसांना वाटत होते ! तद्नंतर सर्वज्ञ हे त्र्यंबकेश्वराला जाण्यास निघाले, तेव्हा बाइसा ह्या गंगेपर्यंत, सर्वज्ञांना वाटेला लावण्यास गेल्या! त्यावेळेस त्र्यंबकेश्वराला न जाण्याविषयी, बाइसा ह्या सर्वज्ञांना आग्रह करू लागल्या ! आग्रह करून त्यांनी सर्वज्ञांना परत आपल्या आश्रमात घेऊन आल्या! अशा प्रकारची प्रिती होय. प्रितीचा उत्तरकाळ तेप्रेम म्हणजे सर्वज्ञ बाइसाच्या आश्रमात आल्यानंतर त्यांनी बाइसांना 'प्रेमशक्ती' प्रदान केली. प्रेमाचा उत्तरकाळ ती भक्ती ! म्हणजे बाइसांना प्रेमशक्ती मिळाल्या नंतर, सर्वज्ञांची भक्ती करण्यात त्या गढून कळेल ! गेल्या. या लीळाचरित्रा वरून प्रेम व भक्ती ही दोन्ही पदे एकाच अर्थाची होत, असे...

उपरोक्त व्यतिरिक्त आणखी एक अर्थ संपूर्ण प्रेमशक्ती पैकी पाव हिस्सा प्रेमशक्ती :- ज्यास झाली असेल तो प्रेमी ! आणि ज्याला अर्धा हिस्सा प्रेमशक्ती झाली असेल तो भक्त ! आणि अर्धा हिस्सा इतका तो प्रेमी ! व पाऊण हिस्या इतका तो भक्त । पाऊण हिस्या इतका तो प्रेमी आणि संपूर्ण प्रेमशक्ती प्राप्त करणारा तो भक्त! पाव हिस्सा (पंचवीस पैसे) म्हणजे एक कळिकेचे प्रेम ! अर्धा हिस्सा म्हणजे (पन्नास पैसे) दोन कळिकेचे प्रेम ! पाऊस हिस्सा म्हणजे तीन कळिकेचे प्रेम ! संपूर्ण प्रेम (शंभर पैसे) म्हणजे चार कळिकेचे प्रेम !

प्रेमाच्या मनुष्याने सहवास तोडला, अथवा तो सोडून गेला असेल ! अथवा त्याचा मृत्यू झाला असेल ! तर प्रेमीक हा मृतप्राय होतो. हे प्रेमाचे लक्षण होय ! या प्रेमाप्रमाणे भक्तीचे ही लक्षण असते. अर्थात प्रेम आणि भक्ती ! यांची एकच जात आहे. याविषयी सर्वज्ञांनी 'प्रेम बोलिजे, 'भक्ती बोलिजे' असे म्हटले आहे...

प्रेम शक्ती ही ज्ञान शक्तीच्या समुहातील होय. म्हणूनच परमेश्वर प्राप्त करण्यासाठी, ही दोन साधने (प्रेम व ज्ञान) पुरक होत. मात्र या दोन साधनातून प्रेमशक्ती ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असते. ही श्रेष्ठ शक्ती जीवांना प्रथमच देणे ! महत्वाचे होते. परंतु ते परमेश्वरावताराने दिले नाही. कारण जीव स्वरूप, हे श्रेष्ठ शक्ती ग्रहण करण्यास योग्य नव्हते! म्हणून सृष्टिच्या आरंभी जीवांना प्रेमशक्ती दिली नाही आणि ज्ञानशक्ती घेण्याइतके जीव स्वरूप योग्य असल्यामुळे तेच परमेश्वरावताराने जीवांना प्रदान केले. तद्नंतर कालांतराने काही जीवाचे, जीव स्वरूप थोडे थोडे योग्य होत गेले ! आणि चौथ्या सृष्टिरचनेत ज्या जीवांचे जीव स्वरूप, प्रेम घेण्यास योग्य झाले असेल ! त्या जीवांना प्रेमशक्ती प्रदान करण्यात आली...

प्रेमशक्ती ही परमेश्वरावताराला, भोजन घातल्या शिवाय प्राप्त होणारी नव्हे ! असे असलेतरी ती प्राप्त होण्याचे प्रयत्न केले पाहिजे प्रयत्न केल्यास प्राप्त न होणारे ते प्राप्त होते. या विषयी सर्वज्ञानी 'उपाय न पाविजे ऐसे काही असेः । विचार सूत्र २७८ ।। असे म्हटले आहे. यावरून कळते. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर परमेश्वराचे चिंतन करत करत 'परमेश्वर तो आपणास भेटला पाहिजे' अशा प्रकारची तळमळ, आयुष्य पर्यंत केली, अथवा परमेश्वरावतार भेटल्यावर, त्यांना प्रेम शक्ती मिळण्याविषयी 'आग्रह' केला तर त्या ज्ञानी मनुष्याला परमेश्वरावतार प्रेमशक्ती प्रदान करतो. अशा प्रकारचे प्रयत्न केले तर, परमेश्वरावताराला भोजन घालण्याची आवश्यकता नाही. उपरोक्त क्रियेमुळे भोजन न घालता प्रेमशक्ती प्राप्त होण्याचे, अधिकार क्षेत्र जिवस्वरूपाचे होत असते. एवं 'तळमळ' व 'आग्रह' हे दोन प्रकार वगळता, आणखी बारी उपाय | प्रेमशक्ती प्राप्त करण्याचे आहेत. याची माहिती मागील प्रकरणात आलेलीच आहे. ती पहावी...!

ज्यांनी ज्ञानानंतर आपला अमोल मनुष्यदेह, परमेश्वरा प्रति समर्पित करून, जो सेवक झालेला आहे. त्यांनी प्रेमशक्ती प्राप्त होण्याचे साधन जोडलेच पाहिजे ! परमेश्वरावताराच्या पश्चात, त्यांना भोजन घालने शक्यच नाही. म्हणून प्रेमशक्ती प्राप्त होण्याचे 'चौदा उपाय सांगितलेले आहेत. त्यातून जे आपणास जे शक्य होते ते आवश्य करावे. हे उपाय थोडेच आहेत. शिवाय ते अवघड ही आहेत. या व्यतिरिक्त ज्ञान प्राप्त करण्यास प्रेमोपाया पेक्षा पुष्कळ उपाय असतात आणि देहविद्या प्राप्त करण्यास ज्ञानापेक्षा अधिक उपाय असतात. चैतन्य विद्या प्रप्त होण्यास देहविद्ये पेक्षा अधिक उपाय असतात त्याच्यापेक्षा देहविद्या होण्यास अधिक उपाय आहेत. कारण हे हलके आणि दुःखमय मिश्रित सुख, असल्याने सोपे व अधिक उपाय असतात. तसे प्रेमशक्तीचे नव्हे ! प्रेमशक्ती श्रेष्ठ अव्यभिचारी साधन ते परमेश्वराचा परमानंद प्राप्त करून देणारे असल्याने थोडेच व अवघड उपाय असतात...

या विषयी उदाहरणे :- जी वस्तू उत्तम मौल्यवान असेल ! ती कमीच असते. जसे रत्न वस्तु ही कमीच त्यापेक्षा सोने अधिक सोन्यापेक्षा लोखंड हे अधीक या प्रमाणेच बुद्धिमंत मनुष्ये कमी ! आणि बुद्धिहीन अधिक असतात. बुद्धिमंतामध्ये परमेश्वराचे ज्ञानी, 'वैरागी, भिक्षुक' हे कमीच असतात आणि ज्ञानहीन व वैराग्यहीन, मुक्त वर्तन करणारे अधीक असतात. या प्रमाणेच देवताचे ज्ञानी, तथा वैरागी भिक्षुक हे अधिक असतात. एवं उत्तम गुण किंवा उत्तम वस्तु तथा द्रव्य प्राप्त करण्यास अल्पच उपाय असतात...

या व्यतिरिक्त एखाद्याचा देह नासला ! अथवा रोग झाला ! किंवा एखादा पदार्थ हरवला ! तर प्राप्त करण्यास पुष्कळ उपाय असतात. मात्र प्रेमशक्ती ही श्रेष्ठ असल्याने प्राप्त करण्यास फारच थोडे व अवघड उपाय आहेत. तरीपण साधकाने, ती प्राप्त करण्याचा उपाय केला पाहिजे ! आपणास ज्ञान असून (समजत असून) जर प्रयत्न केला नाही तर आपलीनागवणूक होते. यास एक दृष्टांत आहे तो असा :- एक कुमार तो रात्री झोपलेला असतो ! अशा वेळात त्या कुंभाराचे गाढव, कोणी तरी 'चोर' घेऊन जात आहे ! तो भुंकत आहे! ही घटना घडत असलेली, त्या कुंभारास सर्व समजते. 'गाढवाच्या' भुंकण्याचा आवाज त्याच्या कानी पडतो ! तरी हा झोपलेलाच असतो. (अंथरूणावर पडलेला असतो) त्यास आळसामुळे उठू वाटत नाही ! परंतु "आता उठून, चोराला धरू ! थोड्या वेळानंतर उठून धरू !" असा विचार करीतच तो विसावलेलाच असतो, तो पर्यंत इकडे, चोर हा गाढवाला घेऊन जातो. तद्नंतर हा कुंभार अंथरूणावरून उठून जेथे गाढव बांधलेले होते, तिकडे जातो. परंतु तेथे गाढव नाही ! आणि चोरही नाही ! या दृष्टांताप्रमाणे प्रेमशक्ती प्राप्त करण्याचा उपाय आता करू ! नंतर करू ! आणखी पुष्कळ आयुष्य आहे करता येईल ! असा विचार करत करता, ज्ञानी साधकाचे उभे आयुष्य निघून जाते. मात्र त्याच्याकडून उपाय करणे होत नाही ! मग एके दिवशी हा, रोगाने पिडीत होऊन, शय्येवर पहुडलेला असतो. त्यावेळेस त्याच्या मनात प्रयत्न करण्याचे विचार येतात, परंतू वेळ निघून गेलेली असते ! 

(आयुष्य निघून गेलेले असते) 

हा मृत्यू पथावर उभा असतो, आता त्याचा काय उपयोग ! अशा प्रकारचे होऊ नये, म्हणून ज्ञानी मनुष्याने, प्रेमशक्ती प्राप्त करण्याचा उपाय करावा! ज्यांना ज्ञानदेही उपाय करणे शक्य झाले नाही. त्यांना अज्ञानदेही उपाय करण्यासारखा, काही क्रिया आहेत...

उपरोक्त निर्णय सांगण्याचे कारण असे की.., 

प्रेम शक्ती प्राप्त केल्याने विशेष प्रकारचा लाभ होतो. म्हणजे प्रेम शक्ती प्राप्त झाल्यावर, कर्माचे नष्टत्व ते विनाकष्टाचे होते ! त्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत आणि परमेश्वरावताराच्या सान्निध्यात समग्र कर्माचे नष्टत्व होते. आणि त्यांच्या जीवस्वरूपा वरील यमपुरीचे अस्पष्ट चिन्ह पडलेले ते मोडून जाते. या शिवाय प्रेमी भक्ताला, विकार, विकल्प, हिंसा हे तिन्हीही दोष घडत नाहीत आणि प्रेम शक्तीचा आनंद प्राप्त होतो आणि परमेश्वर स्वरूपाचे दर्शन होत असून, त्यास अत्यंत आवड निर्माण होत असते...

यावेगळे प्रेमशक्ती ही ज्ञानशक्तीतील असल्याने ज्ञान हे अंतर्भूत येते...

ज्ञान म्हणजे पहाणे पहाणे दोन प्रकारचे ! एक अस्तित्वाने पहाणे ! आणि दुसरे प्रत्यक्ष रित्या पहाणे ! यात प्रेम शक्तीचे प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूपाचे दर्शन होते आणि ज्ञानाने अस्तित्वे परमेश्वर स्वरूपाचे दर्शन होते. हे अस्तित्वे दर्शन फक्त शाब्दज्ञानातच! आपरोक्ष ज्ञान झाल्यावर प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूपाचे दर्शन होते. तसे शब्द ज्ञान ज्ञानाने होत नाही...

'आत्मज्ञाने मोक्ष' आत्मा म्हणजे परमेश्वर ! त्याचे ज्ञान म्हणजे अस्तित्वे ज्ञान झाल्याने ! मोक्ष म्हणजे अर्जकत्व केलेल्या कर्म बंधना पासुन मुक्त होतो. (दुसरे) आत्मा म्हणजे भक्ताचा आत्मा परमेश्वर ! त्याचे ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूप पाहणे. त्यामुळे ! मोक्ष म्हणजे आनंद प्राप्त होतो. एवं प्रेमशक्तीत आनंद प्राप्त होतो. आणि 'एकविद्या ते ब्रह्मविद्या' या सूत्रात प्रेमशक्तीला ब्रह्मविद्या म्हटले आहे. अर्थात प्रेमशक्तीत ज्ञान हे अंतर्भूत असते. तसे ज्ञानात प्रेम नाही म्हणजे आवड नाही. एवं ज्ञानाने, ज्ञानी मनुष्याला प्रेमी भक्ताइतकी आवड नसते, म्हणूनच ज्ञानशक्तीपेक्षा प्रेमशक्ती ही श्रेष्ठ ठरते, म्हणजेच भक्ती श्रेष्ठ होय. (ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम आहे। विचार मालिका सूत्र ३१ ।।)

कारण...

यावर कवी म्हणतात...

भक्ती भाव नसे ह्रदयात...!

त्यासी भेटेल का भगवंत...!

देवाचे कधी नामच नाही...!

शुद्ध आचरण काहीच नाही...!

बोले तैसा चालत नाही...!

जरी तो असो किती मोठा संत...!

त्यासी भेटेल का भगवंत...!!!

म्हणून सांगतो बंधूंनो...

भक्ती ही खूप अंतर मनातून करायची असते...

त्या भक्तीतून आपला प्रवास हा त्या कैवल्य गडाचे दिशेने सुरू होणार आहे...

म्हणून...

निष्काम भावनेने भक्ती करा...

त्या प्रभूच्या वचनावर चालत रहा...

टीप वरील लेखन हे काल अखिल भारतीय महानुभाव वासनिक परिषद या समूहात सुरू असलेल्या चर्चेतील प्रश्न होता की... ज्ञान किती प्रकारचे असते व ते कोणते यावर केलेला हा अल्पसा प्रयत्न ...

दंडवत माझा देव श्रीचक्रधर...sd

आपलाच... प से सुरेश डोळसे नाशिक

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post