श्रीकृष्ण चरित्र
धान्याच्या बदल्यात टोपलीभर रत्नादिक देणारा भगवंत
सुदाम देवाला मूठभर पोह्याच्या बदल्यात हेमनगरी देणाऱ्या श्रीकृष्ण भगवंतांची आणखी एक मधुर लीळा आहे. फळे विकणाऱ्या माळीनीला त्यांनी टोपलीभर माणिक मोती दिले.
तेव्हा श्रीकृष्ण भगवंत गोकुळ नगरीत राज्य करीत होत. भगवंतांची श्रीमूर्ती कोट्यावधी मदन ओवाळून टाकावेत इतकी सुंदर होती. आपल्या बाललीळांनी त्यांनी गोकुळ वासियांनाच नव्हे तर समग्र देवता चक्राला वेड लावले होते. गोकुळातील त्या भाग्यवान जणांनी त्या भगवंतांच्या अमृतवर्षणी लीळा अनुभवल्या. आणि त्या आठवत आठवत संसार सागरातून मुक्त झाले.
एक दिवस एक फळवाली माळीन फळे विकत विकत नंदराजांच्या भवनासमोर आली. "फळे घ्या फळेऽऽ कोणाला फळे हवी असतील तर घेऊन जा!" अशी फळवालीची हाक भगवंतांनी ऐकली. आणि भगवंतांना तिच्याकडून फळे घेऊन तिला अनेक पटीने दान देण्याची प्रवृत्ती झाली.
बाळरूपी भगवंत आत गेले आणि तात्काळ मूठ भरून धान्य घेतले आणि त्या बदल्यात फळे घेण्याकरिता ते बाहेर आले. त्या काळी धान्याने देवाणघेवाण होत असे. आपले मातापिता धान्याच्या बदल्यात वस्तू घेताना भगवंतांनी पाहिले होते. आणि म्हणून त्यांनी तसेच अनुकरण केले.
बाळरूपी भगवंताच्या लहान लहान मुठीत कितीसे धान्य असणार! आणि तशात मुठी पुर्ण बंद नसल्याने बरेचसे धान्य जमिनीवर पडत चालले होते. फळवालीची नजर अशा अवस्थेतील बाळकृष्णांकडे गेली आणि त्यांच्या अनुपम सौंदर्याने ती मोहित झाली. सुंदर बाळ तिने आपल्या हयातीत कधी पाहिले नव्हते.
तिने तात्काळ बाळकृष्णांच्या मुठीतील शिल्लक राहिलेले काही धान्याचे दाणे स्वीकारले आणि त्यांचे दोन्ही हात फळांनी भरून दिले. आणि समाधानाने निघून गेली. घरी गेल्यानंतर त्या फळवालीला आपली टोपली रत्नांनी, सुवर्ण अलंकारांनी पूर्ण भरलेली असल्याचे दिसले. आणि तिचे जन्माचे दारिद्र्य फिटले.
परब्रम्ह परमेश्वर श्रीकृष्ण भगवंत सर्व प्रकारचे वर प्रदान करणारे दाते आहेत. जेव्हा कोणी भगवंतांना काही उपहार अर्पण करतो तेव्हा त्याचा अनंत पटीने लाभच होत असतो. देवता जीवाच्या भाग्यात असल्याशिवाय काहीच देत नाही. आणि भगवंत भाग्यात नसेल तरी देतात. आणि भाग्यात असेल तर त्यापेक्षा अधिक वाढवून देतात. पण जीव दृष्ट पर अभिलाषाने देवतांनाच शरण जातो.
जो देवाला दृष्ट पर मागतो, पैसा अडका मागतो. सहस्रार्जुनासारखा एखादा राज्य ही मागतो. त्यालाही भगवंत अनेक पटीने देतात. मग विचार करा जो अनन्य गतीने भगवंताला शरण जाईल, फक्त भगवंतांचाच आश्रय घेईल. त्याला देव किती देतील! त्याला आपले प्रेम देऊन कायमचा संसार बंधनातून मुक्त करतील यात शंका नाही