शान्त विलास संस्कृत सुभाषित रसग्रहण -sunskrit-subhashit
शान्त विलास - सुभाषित
वाचा निर्मलया सुधामधुरया यां नाथ शिक्षामदा-
स्तां स्वप्नेऽपि न संस्मराम्यहमहंभावावृतो निस्त्रपः!
इत्यागःशतशालिनं पुनरपि स्वीयेषु मां बिभ्रत-
स्त्वत्तो नास्ति दयानिधिर्यदुपते मत्तो न मत्तोऽपरः!!
शान्तविलास, पंडितराज जगन्नाथ
हे नाथ ( हे कृष्णा),
(त्वं), सुधामधुरया ( अमृताप्रमाणे गोड)
निर्मलया ( स्वच्छ)
वाचा ( वाणीने)
यां ( जी)
शिक्षाम् ( शिकवणं)
अदाः ( दिलीस)
ताम् (ती)
अहंभावावृतो (अहंभाव + आवृतः, अहंकाराने झाकोळून गेल्यामुळे)
निस्त्रपः ( निर्लज्ज अशा)
अहं ( मला)
स्वप्नेऽपि ( स्वप्नातही) न
संस्मरामि( आठवत नाही)!
हे यदुपते हे यदुनायका,
इति ( अशाप्रकारे)
आगःशतशालिनं ( आगस् = पाप, आगसां शतेन शालते शोभते, शंभर अपराध केलेल्या )
मां ( मला)
पुनरपि (पुनः + अपि, पुन्हा)
स्वीयेषु ( आपल्या भक्तांमध्ये)
बिभ्रतः ( धारण करणाऱ्यांमध्ये, सामावून घेणाऱ्या मध्ये)
त्वत्तो ( तुझ्याहून श्रेष्ठ)
दयानिधिः ( करुणासागर)
नास्ति (नाही आणि)
मत्तः अपरः.(माझ्याहून दुसरा)
मत्तः (नास्ति) (उन्मत्त नाही. ).
भामिनीविलासाचा चौथा विलास म्हणजे शान्तविलास. अन्योक्तिविलासामध्ये धर्म्य जीवनाचे नियम विविध अन्योक्तींच्या द्वारे सांगितले, शृंगारविलासामध्ये धर्म- अविरोधी कामाचं लालित्यपूर्ण वर्णन केलं, करुणाविलासामध्ये उत्तम सहजीवन जगलेल्या प्रेमिकेची ताटातूट झाल्यानंतरच्या चिरंतन विरहाचं हृद्य वर्णन केलं. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात वैचारिक परिपक्वता आल्यावर माणूस विहंगावलोकन करतो आणि त्याला आपल्या पूर्वायुष्यामध्ये केलेल्या चुकांची जाणीव होते, आपल्याच स्वभावातले बोचरे कंगोरे टोचू लागतात आणि तो परमेश्वर चरणी मनापासून लीन होतो.
तारुण्यातला खळाळता स्वभाव आता गंभीर झाला आहे. खोल डोहाच्या पाण्यात अगदी तरल लाटा उमटाव्यात त्याप्रमाणे अत्यंत शांत आणि प्रासादिक भाषेतून जगन्नाथ आपले मनोगत श्रीकृष्णाला सांगत आहे. मुलानं आईला सांगावं त्याप्रमाणे तो श्रीकृष्णाशी जवळीक साधतो आहे. श्रीकृष्णानं सांगितलेलं भगवद्गीतारूपी उपनिषदाची शिकवण मी विसरून गेलो. अहंकाराच्या दर्पात झाकोळून गेलो. असं असूनही शेवटी श्रीकृष्णानं त्याचे अपराध पोटात घातले.
शंकराचार्यांच्या अपराधक्षमापनामध्ये जी भावना आहे तशीच भावना या शान्तविलासाच्या अनेक श्लोकांमध्ये आहे.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी
(पुणे)