कर्ण श्रेष्ठ की अर्जुन श्रेष्ठ? - विद्वानांची मते - महाभारत शोध - mahabharat search
एक कादंबरीकार म्हणतात की, कर्ण हा अधर्माच्या बाजूने जरूर लढला, पण लढताना अधर्म त्याच्या मनाला शिवू शकला नाही, प्रत्यक्ष इंद्र त्याच्या समोर याचक म्हणून उभा राहिला तेव्हा कवच कुंडलांच्या रुपात अप्रत्यक्षरीत्या स्वतःचे प्राण देतानाही त्याची दानी वृत्ती ढळली नाही, जिच्यामुळे जन्मापासून फक्त अवहेलनाच पदरी पडली त्या प्रत्यक्ष कुंती मातेला स्वपुत्रांच्या प्राणाचे दान देताना त्याच्या मनात कोणताही संदेह निर्माण झाला नाही. विश्वाचा पालनकर्ता श्रीकृष्ण भगवंत त्याच्या समोर युद्धाचा तहनामा घेऊन आला त्याने देऊ केलेलं इंद्रप्रस्थच्या राज्याचं आमिष त्याच्या मनात लालसा निर्माण करू शकलं नाही,
पांचाली द्रौपदीचे अद्वितीय सौंदर्य त्याला भुरळ पाडू शकलं नाही, सदोदित पदोपदी ज्यांनी त्याचा अपमान केला त्या भीष्म पितामहांच्या बद्दलचा आदर त्याच्या मनात यत्किंचितही कमी झाला नाही, महाभारत युद्धात मनात भ्रम निर्माण होऊन हतवीर्य झालेल्या अर्जुनाला युद्धप्रवृत्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाणांना गीता सांगावी लागली परंतु परशुरामांचा आणि ब्राम्हणाचा शाप कपाळी असतानाही त्याने स्थीर बुद्धी ठेवली, जन्मतःच मिळालेल्या आपल्या कवच कुंडलांचे काहीही संरक्षण नसतानाही त्याने आधीच पराजय ठरलेल्या युद्धातून माघार घेतली नाही, नकुल सहदेवाचा मामा असलेल्या शल्याने वारंवार केलेला तेजोभंग सहन करताना तो स्थीर राहिला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या रहस्यामुळे आयुष्यभर अपमानाचे ओझे वहावे लागले त्या आपल्या स्वतःच्या जन्माचे रहस्य कळल्यावरही जो स्थिर बुद्धी ठेऊन युद्ध करू शकतो तो निश्चितच मोठा ठरतो.
स्वतः भगवान श्रीकृष्णांना कालयवन वध प्रसंगी रणछोड, पळपुटा म्हणून हिणवलं गेलं पण कर्णाचे तसे नाही, युद्धारंभी जर यदाकदाचित कर्णाने बाजू बदलली असती आणि पांडवांकडे आला असता तर आज त्याला मित्रद्रोही, स्वार्थी, विश्वासघातकी, राज्यलालसी ठरवलं गेलं असतं, इतक्या गुणांचा समुच्चय असलेल्या धीरवीर कर्णाला आपल्या पक्षाचा पराभव निश्चित होणार हे समजले नसेल का? कुटील शकुनी आणि अहंकारी दुर्योधनाची अधर्मी बाजू त्याला समजली नसेल का? तर नक्कीच समजली असेल.
परंतु तरीही तो स्वतःच्या तत्वांवर, विश्वास ठेवून लढला. मित्रद्रोहाचे, प्रतिज्ञाभंगाचे पातक आपला माथी नको हा विचार त्याने केला. आल्या जन्माधित मूल्यांवर ठाम कधीही न ढळणारा विश्वास ठेऊन पांडवांना दिलेला पराक्रमी लढाच त्याला अतिशय उच्च पातळीवर नेऊन ठेवतो. म्हणूनच हा दानशूर सुतपुत्र मला जास्त भावतो आणि तोच श्रेष्ठ वाटतो.. वेणीसंहार नाटकात नाटककर्त्याने कर्णाच्या मुखी एक श्लोक घातला आहे. तो असा
सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम् ।
दैवायतं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ||
दुसरी गोष्ट अशी की, याचे उत्तर श्रीकृष्ण भगवंतांनीच अर्जुनाला दिले आहे. युद्ध संपल्यानंतर अर्जुनाने आपणच कर्णापेक्षा श्रेष्ठ कसे ठरलो हे सांगताना आपल्या बाणाने कर्णाचा रथ चार पावले मागे जात होता आणि त्याने बाण मारल्यावर आपला रथ एक उंगली (उंगली म्हणजे बोट) मागे जात होता . पण श्रीकृष्ण भगवंत म्हणाले कि, तू कर्णाचा वध केला असला तरी कर्णच तुझ्यापेक्षा बलशाली आणि श्रेष्ठ होता. यामुळे अर्जुन गोंधळला आणि कसे काय असे त्याने श्रीकृष्ण भगवंतांना विचारले. तेव्हा श्रीकृष्ण भगवंत म्हणाले कि, कर्णाच्या रथावर फक्त शल्य हाच एक सारथी होता आणि तुझ्या रथावर जो तिन्ही लोकांचा स्वामी आहे असा मी आणि रथाच्या ध्वजावर महाबली हनुमान होता.
एखादा सामान्य योद्धा असता तर रथ जागेवरून हललाही नसता. पण आपला रथ एक उंगली का होईना मागे गेला. म्हणून कर्ण श्रेष्ठ ठरतो. पण तरीही अर्जुनाचे समाधान झाले नाही. यावर श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सर्वात आधी रथातून उतरण्यास सांगितले आणि हनुमानाला देखिल रथ सोडण्याची आज्ञा दिली. सगळयात शेवटी श्रीकृष्ण भगवंतांनी रथ सोडला. त्यानंतर ताबडतोब रथाचा स्फोट होऊन तुकडेच झाले. अर्जुनाला काय झाले ते कळलेच नाही. तेव्हा श्रीकृष्ण भगवंत म्हणाले “तुझा रथ तर युद्धात जी मोठी अस्त्रे वापरली गेली तेव्हाच नष्ट झाला होता. पण आमचे अस्तित्व असल्याने तो नष्ट होऊ शकला नाही. आम्ही रथ सोडला म्हणजे आमचे रथातील अस्तित्व नष्ट झाले म्हणून रथ देखिल नष्ट झाला. हा आमचे अस्तित्व नसल्याचा परिणाम आहे. पण कर्णाने आमचे अस्तित्व असतांनाही रथ मागे नेला. म्हणून तो बलशाली आणि श्रेष्ठ आहे.” श्रीकृष्ण भगवंतांच्या ह्या उत्तराने अर्जुनाचा गर्व हरण झाला.
कर्णाला स्वतंत्र इच्छा नव्हती. आपणा कोणालाच स्वतंत्र इच्छा नाही. आपले निर्णय हे मागील घटनाक्रम ठरवतो. महाभारतातील बाकीच्या व्यक्तींच्या आयुष्यात घडलेल्या घटना सुद्धा कर्णाच्या निर्णयावर प्रभाव टाकतात. सृष्टी निर्मितीपासून टाईम, स्पेस यांच्या घडामोडी अशा घडत गेल्या की कर्णाकडून आपोआप तो निर्णय घेतला गेला. त्याला दुसरा पर्यायच नव्हता. निर्णय हा निसर्गचक्राने घेतला. कर्ण फक्त माध्यम होता. काय घडणार? हे ठरवणारी शक्ती आपल्यापासून अज्ञात आहे. त्यामुळे निर्णय हा फक्त निर्णय असतो.
आता कर्णाचे अवगुण बारकाईने पाहिले तर बरेच अवगुण त्याच्या ठिकाणी होते. तेव्हा गेला होता कोठे "राधासुता!! तुझा धर्म?" म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी विचारलेल्या प्रश्नांची कर्णाकडे त्याक्षणी उत्तरे नव्हती? भगवंतांनी कर्णाच्या सगळ्या पापांचा पाढा वाचला तेव्हा कर्ण गप्प झाला काहीही बोलू शकला नाही. कर्णाला श्रेष्ठ मानणे म्हणजे एका कादंबरीकाराचा मनो विलास आहे. त्यामुळे नुकसान असे होते की चुकीचा इतिहास सत्य वाटायला लागतो.
कर्ण ही अत्यंत मत्सरी व्यक्ती होती. अर्जुन त्याच्यापेक्षा कितीतरी लहान होता तरीही तो अर्जुनाशी नेहमी मत्सर भोगत असे. यासंदर्भात एक श्लोक महाभारतात येतो. स्पर्धमानस्तु पार्थेन सूतपुत्रोSत्यमर्षण: । दुर्योधनं समाश्रित्य सोSवमन्यत् पांडवान !!१२!! (आदिपर्व १३२/भांडारकर संशोधित आवृत्ती १-१२२-४७) या श्लोकाचा अर्थ : मनाने अत्यंत मत्सरी असा कर्ण अर्जुनाशी नेहमी स्पर्धा करू लागला आणि दुर्योधनाच्या आश्रयाने उन्मत्त झाला व पांडवाना तुच्छ लेखू लागला.
आणि युद्ध पराक्रम याविषयी जर विचार केला तर करण्यापेक्षा अर्जुन कितीतरी पटीने श्रेष्ठ योद्धा होता. हे आपल्याला महाभारत वाचल्यावर लक्षात येईल. विराट युद्ध झाले तेव्हा कौरव सैन्यात भीष्म द्रोण कर्ण दुर्योधन दुशासन अश्वत्थामा असे अनेक महारथी होते आणि दुसऱ्या बाजूने एकटा अर्जुन होता तरीही एकट्या अर्जुनाने समस्त कौरव सैन्याचा पराभव केला व त्यांना पळवून लावले. त्या युद्धात दोन वेळा कर्ण रणभूमीतून पळून गेला होता.
पांडव वनवासात असतांना पांडवांना शिजवण्यासाठी दुर्योधन आदी मंडळी करण्यात आली व तिथे आजच्या भाषेत म्हणाल तर पार्टी करू लागली. मदिरा पानामुळे दुर्योधनाची बुद्धी भ्रष्ट झाली व त्याने एका गंधर्वकन्येला छेडले. गंधर्वकन्येने चित्ररथ गंधर्वाकडे तक्रार केली. गंधर्वांनी कौरवांच्या छावणीवर आक्रमण करून कौरव सैन्याचा पराभव केला अर्थात त्यात कर्णही होताच. पण कर्ण गंधर्वांचा युद्धात असलेला आवेश पाहून पळून गेला. गंधर्वांनी दुर्योधनाला कैद केले. ही गोष्ट पांडवांना कोणीतरी येऊन सांगितली तेव्हा युधिष्ठिर राजाने भीमाला आणि अर्जुनाला गंधर्वांशी युद्ध करण्यास पाठवले तेव्हा दोघांनी मिळून गंधर्वांचा युद्धात पराभव केला आणि दुर्योधनाला कैदेतून मुक्त केले. या युद्धातही हेच निश्चित होते की अर्जुन कर्णापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ योद्धा होता.
अभिमन्यु वध हे महाभारतात ते सर्वात गाजलेले प्रकरण आहे. सहा महारथी यांनी मिळून अभिमन्यूचा वध केला. त्या सहा महारथ्यांमध्ये कर्णाचेही नाव आहे. अर्जुनाचा मुलगा अभिमन्युचा वध करण्यासाठी द्रोणाचार्य, दुर्योधन, दुशासन, कर्ण, जयद्रथ, अश्वत्थामा या सहा महारथ्यांना एकत्र यावे लागले. तर त्या अभिमन्यूचा बाप किती पराक्रमी असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
पांडव हे श्रीकृष्ण भगवंतांचे भक्त होते आणि परमेश्वराच्या भक्तांचा जो द्वेष करतो त्याचा नेहमी सत्यानाशच होतो. परमेश्वर त्याच्यावर कधीही प्रसन्न होत नाहीत. पण तरीही भगवंतांचे माऊली पण असे की त्याला युद्धाच्या आधी त्याचा जन्म वृत्तांत सांगून एक चान्स देऊन पाहिला. पण जन्मभर अधर्मच करत आलेला करणं शेवटी धर्माचरण करील तर नवलच!
स्त्रियांचा अपमान कुठेही सहन केला जात नाही. जो स्त्रीचा अपमान करतो तो समाजात कधीही प्रतिष्ठेला पावत नाही. कर्णाने भरसभेत जो द्रौपदीचा अपमान केला तो अक्षम्य अपराध होता. जर कर्ण धर्मवान् पुरुष असता तर त्याने कधीही द्रौपदीचा अपमान केला नसता. कारण संपूर्ण महाभारत अथवा अठरा पुराणे पाहून घ्या कोणतीही धर्मवान व्यक्ती स्त्रीचा अपमान करताना दिसत नाही. आणि ज्या धर्मियांनी स्त्रियांचा अपमान केला त्यांचा कुळासंकट नाश झाला असा इतिहास आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल.
कवच कुंडले यांच्या आड लपणारा कर्ण अर्जुनाच्या पराक्रमा समोर कोण्याही अर्थी श्रेष्ठ म्हणता येत नाही. कारण कवच-कुंडल ही एक प्रकारची दैवी शक्ती होती. दैवी शक्तीच्या जोरावर जर कोणी स्वतःला श्रेष्ठ योद्धा मानत असेल तर समाजाला त्याचे श्रेष्ठ पण कधीही मान्य होत नाही. स्वतःच्या बाहुबळावर युद्ध करून जिंकतो तोच खरा योद्धा मानला जातो. अर्जुन स्वतःच्या बाहुबळावर जिंकणारा योद्धा होता. गंधर्वांची युद्ध करणारा अर्जुन वेळप्रसंगी महादेवालाही आवाहन द्यायला कमी करत नाही. करून आले तर गंधर्वांसमोर पळ काढला.