विद्यारत्नं महद्धनम् संस्कृत सुभाषित रसग्रहण - vidyaratna sunskrit Subhashit knowledgepandit

विद्यारत्नं महद्धनम् संस्कृत सुभाषित रसग्रहण - vidyaratna sunskrit Subhashit knowledgepandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit Subhashit knowledgepandit

विद्यारत्नं महद्धनम्।

           विद्या हेच धन

ज्ञातिभिर्वण्ट्यते नैव चोरेणापि न नीयते।

दाने नैव क्षयं याति विद्यारत्नं महाधनम्॥

अर्थ :- हे विद्यारुपी रत्न असे महान धन आहे, जे ज्ञातीजनांमध्ये (आप्तस्वकींयांमध्ये, म्हणजेच वारश्याने) वाटले जाऊ शकत नाही. ज्याला चोरही चोरून नेऊ शकत नाहीत. आणि जे दान केल्याने क्षय पावत नाही (कमी होत नाही, उलट वाढतच जाते.)

टीप -  याच सुभाषितापासून विद्या हेच धन ही उक्ती मराठीत प्रचलित झाली असावी. अगदी याच अर्थाचे अजून एक सुभाषित संस्कृत मध्ये आहे.

न चोरहार्यं न च राजहार्यं

न भ्रातृभाज्यं न च भारकारी।

व्यये कृते वर्धते एव नित्यं

विद्याधनं सर्वधन प्रधानम्॥

जे चोरले जाऊ शकत नाही, राजाही कररूपाने ज्याचं हरण करून नेऊ शकत नाही, जे भावांमध्ये वाटलं जाऊ  शकत नाही, ज्याचा भार होत नाही, जे खर्च केले असता वाढतच जाते असे विद्याधन हेच सर्वश्रेष्ठ धन होय. विद्येचे महत्त्व विशद करणार्या अनेक श्लोकांनी संस्कृत भाषेला वैभव समृद्ध केले आहे. त्यातील ज्या श्लोकांमध्ये विद्या हे धन आहे असे सांगितले आहे असे काही निवडक श्लोक आपण पाहूया.

नास्ति विद्यासमो बन्धुर्नास्ति विद्यासमः सुहृत्।

नास्ति विद्यासमं वित्तं नास्ति विद्यासमं सुखम्॥

        विद्येसमान बंधू नाही, विद्येसमान मित्र नाही, विद्येसमान कोणतंही धन नाही व विद्येसमान सुख कशातच नाही.

सर्वद्रव्येषु विद्यैव द्रव्यमाहुरनुत्तमम्।

अहार्यत्वादनर्घ्यत्वादक्षयत्वाच्च सर्वदा॥   हितोपदेशः १.४

        सर्व प्रकारच्या द्रव्यांमध्ये (धनामध्ये) विद्यारुपी द्रव्य (धन) सर्वोत्तम आहे, कारण ते कोणाकडून हरण केले (चोरले) जाऊ शकत नाही, कोणी त्याची किंमत करू शकत नाही (विकत घेऊ शकत नाही) आणि कोणी त्याचा नाशही करू शकत नाही.  हे मात्र खरेच की, ज्याच्याकडे कोणतीही एक विद्या आहे तो कधीही एकटा पडत नाही. कधीही संपू न शकणारं विद्या हेच सर्वश्रेष्ठ धन होय.

विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम्

विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः।

विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतम्

विद्या राजसु पूज्यते न हि धनं विद्याविहीनः पशुः॥

        विद्या हे मनुष्याचे वैशिष्ट्यपूर्ण असे रुप आहे, विद्या गुप्त धनासमान आहे. विद्या मनुष्याला विविध विषयांचा उपभोग देणारी, यशदायी आणि सुखकारक आहे. विद्या गुरुंचाही गुरु आहे, परदेशामध्ये विद्या हीच मनुष्याच्या बंधवाप्रमाणे होय. विद्या हेच परमदैवत आहे. प्राचीन व अर्वाचीन भारतीय महान नृपतींनी देखील ज्ञान व विद्येला पूजनीय मानले, म्हणूनच त्यांच्या राजसभेत ज्ञानवंत व विद्यासंपन्न पंडीत, विद्वान व कविंना सन्माना दिला जात असे धनाला नव्हे. ज्याच्याकडे कोणतीही विद्या नाही तो पशूच होय.

अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम्।

अधनस्य कुतो मित्रममित्रस्य कुतः सुखम्॥

       आळशी मनुष्याकडे विद्या कुठून येणार ? विद्या नसणार्या मनुष्याकडे धन कुठलं ? धनहीनाला मित्र कुठून असणार ? आणि मित्र नसणार्याला सुख कुठलं मिळायला?

विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रताम् ।

पात्रत्वाद्धनमाप्नोति धनाद्धर्मं ततः सुखम् ॥

      विद्येने विनय (नम्रता) येते, विनयाने पात्रता (सज्जनता) येते, पात्रता आल्यावर मनुष्य धनाची प्राप्ती करू शकतो, धन आल्याने मनुष्य धर्माचरण (कर्तव्य कर्म) करू शकतो आणि सुधर्माचरणातून (कर्तव्यपूर्तीतून) सुख समाधान प्राप्त होते.

        अशाप्रकारे विद्या हेच ते सर्वश्रेष्ठ धन आहे जे मनुष्याला सुखी करू शकते. विद्यारत्नं महद्धनम्।


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post