महानुभावपंथ आचारधर्मज्ञान - mahanubhavpanth dharm dnyan
ईश्वरधर्मासंबंधी अन्य लोकांच्या मनातील प्रश्नांना प्रमाणासह उत्तरे देण्याचे ज्ञान सांगितले पाहिजे
आज लीळा, ब्रह्मविद्या, सूत्र वचने यावर समाज माध्यमावर पब्लीकली प्रचार होत आहे. आपल्या सभोवती आपले नातेवाईक, मित्र मंडळी, शेजारी पाजारी परिचित देवता कर्मकांडे, व्रतवैकल्ये, उपास तापास, देवी देवतांची भक्ती, सप्त व्यसने यात लिप्त झालेले आहेत. या लोकांच्या प्रश्नांना, शंका कुशंकांना, जिज्ञासेला, आक्षेपाला या लोकांना माहित असलेल्या शास्त्र ग्रंथांच्या प्रमाणासह समर्पक उत्तरे देणे व महानुभाव पंथाची ईश्वर विषयक भूमिका समाजासमोर मांडणे आजच्या काळात समाज माध्यमातून काम करणाऱ्या महानुभाव पंथाच्या प्रचारकांकडून अपेक्षित आहे.
पूर्वीच्या काळी जसे आमचे महानुभाव धडाडीने अन्य लोकांच्या प्रश्नांना उत्तरे
देत असत. त्यामुळे साहजिकच अन्य लोक महानुभाव
पंथाकडे वळत व अनुयायी होत असत.आज अन्य लोकांच्या मनातील प्रश्नांना त्यांना माहित
असलेल्या भग्वद्गीता, भागवत, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, गाथा, पुराणे इ. ग्रंथातील पुराव्यासह उत्तरे
दिली जात नाहीत. त्यामुळे लोकांच्या मनातील प्रश्ने तशीच कायम राहतात. कै.बाळकृष्ण
शास्त्री माहूरकर लिखित "महानुभाव पंथ" , "मिश्र भक्ती खंडण-अर्थात अनन्य भक्ती" हे ग्रंथ समजात प्रसारित करणे गरजेचे आहे.
महानुभाव पंथाविषयी समाजाच्या मनातील प्रश्ने -
1) श्री दत्तात्रेय प्रभू एकमुखी की त्रीमुखी ?
2) श्रीकृष्ण हे विष्णूच्या 10 अवतारामधील अवतार मग महानुभाव विष्णूची भक्ती का करीत नाहीत ?
3) राम व श्रीकृष्ण हे विष्णुचे अवतार आहेत. मग
महानुभाव लोक रामाची भक्ती का करीत नाहीत ?
4) नवरात्रात घट स्थापना केलेल्या घरचे अन्न
महानुभाव का सेवन करीत नाहीत ?
5) महानुभाव लोक गणपती का बसवित नाहीत ?
6) महानुभाव पंथीय लोक प्रेताला का जाळत नाहीत ? प्रेताला का पुरतात ?
7) महानुभाव लोक देवी देवतेचा प्रसाद का खात
नाहीत ?
8) महानुभाव लोक देवतेच्या मंदीरात का जात नाहीत ?
9) महानुभाव लोक तेरवी का करीत नाहीत ?
10) महानुभाव लोक दिवाळीला लक्ष्मीपूजन का करीत
नाहीत
?
11) महानुभाव लोक तुळशीची पूजा का करीत नाहीत ?
12) महानुभाव लोक श्राद्ध का घालीत नाहीत ?
13) महानुभाव लोक देवता क्षेत्राला का जात नाहीत ?
14) महानुभाव लोक वट सावित्री का करीत नाहीत ?
15) साक्षात भगवान श्री कृष्ण पंढरपूरला आले
असताना श्री कृष्णभक्त महानुभाव लोक पंढरपूरला का जात नाहीत ? इत्यादी अनेक प्रश्न अन्य लोकांच्या मनात आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे
देण्याची आपली जबाबदारी आहे.
पूर्वीचे महानुभाव साधू, उपदेशी, वासनिकाकडे या प्रश्नांची उत्तरे देण्याची ताकद होती. लीळाचरित्र, सूत्र वचने, ब्रह्मविद्या या बहूमोल धनातून खर्च न करता म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्र ग्रंथाचे रहस्य राखूनश्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्भागवत, एकादशस्कंद, उद्धवगीता, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, इत्यादी शास्त्र ग्रंथातील प्रमाणाच्या आधाराने उत्तरे देत असत.
देवता
भक्ती करणाऱ्या लोकांना त्यांना माहित असलेल्या
शास्त्र-ग्रंथातील प्रमाणोक्त उत्तरे मिळाल्यामुळे त्यांच्या मनातील संदेह दूर
होई. अशाप्रकारे आमचे पूर्वज महानुभाव अन्य लोकांना धडाडीने उत्तरे देऊन त्यांचे
समाधान करीत. शास्त्र चर्चेचा त्यांचा तो जोश, ती धडाडी, तो आवेश, तो स्पष्ट वक्तेपणा खरोखरच तेजस्वी
होता.
25 वर्षापूर्वीचे
भानुकवींचे एक उदाहरण येथे पुरेशे आहे. त्यांनी रचलेले एक भजन पाहा...
(भजनाची चाल -
अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान....)
अंजनीचा पुत्र त्याने दाविला अभिमान ।
म्हणून अर्जुनाच्या वचनात हनुमान ।।धृ०।।
तुझा सेतू मोडीतो मी म्हणे अर्जुनासी ।
नाही तर तुझा दास बोली केली ऐसी ।
गर्वाचे घर खाली झाला रूद्राचा अपमान ।
म्हणून अर्जुनाच्या वचनात हनुमान ।।1।।
तेव्हापासूनिया रूद्र राहे ध्वजस्तंभी ।
गर्जना भयंकर करी खुप लंबी ।
बलवीर असता केवढा झाला तो हैराण ।
म्हणून अर्जुनाच्या वचनात हनुमान ।।2।।
डांगवीच्या समयी धरूनी पक्ष अर्जुनाचा ।
वायूपुत्र पाळी आपुल्या नेम प्रतिज्ञेचा ।
त्या भारत ग्रंथी ऐसे व्यासाने कथीले जाण
म्हणून अर्जुनाच्या वचनात हनुमान ।।3।।
भानुकविश्वर सांगे सोडीरे अहंता ।
मग त्यासी नाही नाही काही भयचिंता ।
वैर्याचा तो वैरी लीन होईल दुष्मान ।
म्हणून अर्जुनाच्या वचनात हनुमान ।।4।।
वरील भजनातील जोश, आवेश, शास्त्र ग्रंथाचा पुरावा, पाहण्याजोगा आहे. ऐकणाऱ्याची शंका व प्रश्न आपोआपच सुटून तो ईश्वर
धर्माकडे आकर्षित न झाला तरच नवल..
आज समाजाच्या मनातील अनेक प्रश्नाची उत्तरे दिली पाहिजेत. लीळा व ब्रह्मविद्येचे निरोपण आपल्या भोवतीच्या अन्य समाजाला कळत नाही. त्यांना त्यांच्या ज्ञात शास्त्र ग्रंथातील पुरावेच त्यांचे समाधान करू शकतात.
म्हणूनच गीता, भागवत, उपनिषदे, गाथा, भागवत आदी त्यांना माहित असलेल्या ग्रंथातील प्रमाणे देऊन त्यांच्या
मनातील प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत. लीळाचरित्र, ब्रह्मविद्या, सूत्रवचने त्यांना माहित नाही. यातील प्रमाणे त्यांचे समाधान करू शकत
नाही. प्रथम त्यांचे मनातील अन्याची व्यावृत्ती केली पाहिजे. मगच पराची प्रतिष्ठा
होते
म्हणून
आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधरांनी आधी अन्यव्यावृत्ती सांगितली. आपण आज अन्य
लोकांच्या मनातील प्रश्न तसेच शाबूत ठेऊन त्यांना लीळा व ब्रह्मविद्या सांगत आहोत.
हे चुकीचे आहे.जन सामान्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी पूर्वज महानुभावांनी
ब्रह्मविद्या लीळा अथवा श्री चक्रधर स्वामीच्या सूत्र वचनाचे पुरावे अन्य कथनाचा
दोष जोडून न घेता, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा याचे प्रमाण देऊन समाजाला
ईश्वर भक्तीचा मार्ग दाखविला आहे.
संत तुकाराम
बाबांच्या व्यवहारिक भाषेत सांगायचे झाले तर -
पाया जाला नारू, तेथे बांधिला कापूरू ।
तेथे बिबव्याचे काम, अधमासि तो अधम ।।1।।
रूसला गुलाम, धनी करीतो सलाम
तेथे चाकराचे काम, अधमासि तो अधम ।।2।।
रूसली घरची दासी, धनी समजावी तियेशी
तेथे बटकीचे काम, अधमासी तो अधम ।।3।।
देव्हार्यावरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला
तेथे पैजाराचे काम, अधमाशी तो अधम ।।4।।
आज पावला पावलावरलीळा, वचने, ब्रह्मविद्या, सांगणे बरोबर नाही. पायाला नारू झाला
म्हणजे लगेच तिथे कापूर लावायचा नसतो. तिथे बिबाच लावायचा असतो. तसे आमचे पूर्वज
अन्य लोकांच्या मनातील शंकागीता, भागवत, उपनिषदे, गाथा, ज्ञानेश्वरी, उपनिषदे आदी ग्रंथांचे प्रमाण देऊन प्रथम समजावित असत. सहज कुणालाही
अविधीपूर्वक ब्रह्मविद्या सांगत नसत. याबद्दल आज आम्हाला आत्मचिंतन करणे आवश्यक
आहे
-- महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव