अघासुर वध - श्रीकृष्ण चरित्र
मागे आपण बकासुर वध ही लीळा वाचली. बकासुराचा वध झाल्यानंतर कंस अतिशय चिंतीत झाला. एका मागे एक राक्षस मरत होते. कंसाची चिंता वाढत होती. पुढे त्याने त्याच्या सैन्यात असलेला एक आघासुर नावाचा बलाढ्य राक्षसाला गोकुळात पाठवले. तो दैत्यही अतिशय आवेशाने गोकुळात आला. श्रीकृष्ण भगवंत गोकुळात आपल्या बाल-सवंगड्यांसोबत विविध प्रकारच्या बालक्रीडांचा आनंद घेत होते.
ते पाहून तो अघासुर असुर अतिशय खवळला. श्रीकृष्ण भगवंत इतके आनंदाने क्रीडा करीत असल्याचे पाहून त्याला ते सहन झाले नाही. माझ्या स्वामीची झोप उडविणारे हे बालक एवढे आनंदी कसे काय म्हणून त्याला अत्यंत राग आला. आणि तो सगळ्या मुलांना ठार मारण्याच्या उद्देशाने समोर आला. हा अघासुर इतका भयंकर होता की, स्वर्गलोकांचे रहिवासीदेखील त्याचे भय धरीत.
अर्थात, स्वर्गाचे निवासी तर आपली आयुष्य-मर्यादा वाढविण्यासाठी दररोज अमृत पीत असतात तरीही त्यांना या अघासुराचे भय वाटत असे. त्याचा अंत कधी होईल याचीच ते चिंता करीत होते. अमर होण्यासाठी स्वर्गाचे निवासी अमृतपान करीत होते; परंतु अघासुराच्या भयाने त्यांना आपल्या अमरत्वाबद्दल शंका वाटत असे. मात्र श्रीकृष्णांबरोबर क्रीडा करणाऱ्या बालकांना असुराचे कोणत्याही प्रकारचे भय असे नव्हतेच. ते भयापासून पूर्णतः मुक्त होते. स्वतःला मृत्यूपासून वाचविण्याकरिता केलेली कोणतीही लौकिक योजना सदैव अनिश्चितच असते, परंतु जर आपण श्रीकृष्णभावनेत असू तर मात्र आपल्याला अमरत्वाची निश्चित खात्री आहे.
हा अघासुर पूतनेचा आणि बकासुराचा धाकटा भाऊ होता. तो श्रीकृष्ण भगवंत आणि त्यांच्या बालमित्रांसमोर आला. त्याने विचार केला : "कृष्णाने माझ्या भावाला आणि बहिणीला ठार मारले आहे. आता मी त्याच्या मित्रांसहित आणि गोवत्सांसहित त्याला ठार करीन. जर या गोपबालकांसहित कृष्णाला ठार मारून माझ्या भावाबहिणींचे तर्पण करीन तर सगळे वृंदावनवासी आपोआपच नष्ट होतील. त्याचबरोबर कंसाने त्याला या कार्यात नियुक्त केले असल्यामुळे तो निर्धाराने समोर आला. सामान्यपणे, मुले ही गृहस्थांकरिता जीव की प्राण असतात आणि त्यांचे आपल्या मुलांवर अतिशय प्रेम असल्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे स्वाभाविकच ते देखील मृत्यूला प्राप्त होत असतात.
अखिल वृंदावनवासी जनांना ठार करण्याच्या उद्देशाने अघासुराने 'महिमा' नामक योग सिद्धीने स्वतःचा प्रचंड विस्तार केला. सामान्यतः असुर हे सर्व प्रकारच्या कुविद्या सिद्धी प्राप्त करण्यात मोठे निष्णात असत. योगप्रक्रियेतील 'महिमा सिद्धी' प्राप्त केलेला मनुष्य आपल्या इच्छेनुसार स्वतःचा विस्तार करू शकतो. या अघासुराने स्वतःचा आकार आठ मैलांपर्यंत विस्तृत केला आणि एका प्रचंड सर्पाच्या रूपात प्रकटला.
असे आश्चर्यकारक रूप घेतल्यावर त्याने प्रचंड पर्वत गुहेसारखे आपले मुख उघडून ठेवले आणि श्रीकृष्णांसहित सर्व गोपबालकांना एकदाच गिळंकृत करण्याच्या इच्छेने त्यांच्या रस्त्यावर बसला. त्या सर्प रूपातील असुराने आपले ओठ जमिनीपासून आकाशापर्यंत उघडले होते. त्याचा खालचा ओठ जमिनीवर तर वरचा मेघांना स्पर्श करीत होता. त्याचा जबडा एखाद्या मोठ्या खोल पर्वत-गुहेप्रमाणे भासत होता आणि त्याचे दात पर्वतांच्या शिखरांसारखे वाटत होते. त्याची जिह्वा एखाद्या राजमार्गासारखी भासत होती. त्याच्या श्वासोच्छ्वासाने वादळ उठत होते. त्याचे नेत्र अग्नीसारखे तप्त होते. प्रारंभी गोपबालकांना हा एक मोठा पुतळा असावा असे वाटले;
परंतु अधिक निरीक्षण केल्यावर त्यांना दिसले की, तो रस्त्यावर तोंड उघडून पसरलेला एक मोठ्या आकाराचा सर्प आहे. गोपबालक आपापसात चर्चा करू लागले "मित्रांनो, हे रूप एखाद्या विशालकाय प्राण्याचे दिसते आणि तो आपल्याला गिळून टाकण्याच्या पवित्र्यात बसला आहे असे वाटते. पाहा तर खरे! आपणा सर्वांनाच खाण्याकरिता तोंड उघडून बसलेला हा एक मोठा सर्प आहे की नाही ?"
त्यापैकी एकजण म्हणाला, "तू म्हणतोस ते अगदी खरे आहे. या प्राण्याचा वरचा ओठ सूर्य प्रकाश असल्यासारखा दिसतो आणि खालचा ओठ जमिनीवरील तांबड्या सूर्यकिरणांचे प्रतिबिंब असल्यासारखा दिसतो. मित्रांनो, या प्राण्याच्या मुखाचे डाव्या व उजव्या बाजूने जरा निरीक्षण तर करा! ते एखाद्या विशाल पर्वत-गुहेप्रमाणे दिसते. त्याची हनुवटीदेखील एखाद्या पर्वत शिखरासारखी वर उठलेली दिसते.
त्याची जिह्वा जणूकाय एखादा राजमार्गच आहे. त्याच्या तोंडात एखाद्या गुहेसारखा निबीड अंधकार दाटला आहे. वादळासारखा वाहणारा उष्ण वारा त्याचा श्वासोच्छ्वास आहे. तसेच त्याच्या मुखातून माशांसारखा जो दुर्गंध सुटला आहे, तो त्याच्या आंतड्यांचा दुर्गंध आहे." तदनंतर त्यांनी आपापसात सल्लामसलत केली: “खरोखर, आपण सर्वजण एकदम या सर्पाच्या मुखात शिरलो तर त्याला सर्वांनाच गिळून टाकणे कसे शक्य होईल ? आणि समजा कदाचित त्याने आपणा सर्वांनाच एकदम मिळून टाकले, तर त्याला श्रीकृष्णाला मात्र गिळता येणार नाही. श्रीकृष्ण तर त्याची बकासुरासारखी गती करील! त्याला ठारच मारून टाकील!"
असे बोलणे झाल्यावर सर्व गोपबालकांनी श्रीकृष्णांच्या कमळ-सदृश सुंदर मुखाकडे पाहिले आणि टाळ्या वाजवून हसू लागले. कोणतेही भय न बाळगता ते पुढे सरसावले आणि त्यांनी या प्रचंड सर्पाच्या मुखात प्रवेश केला. सर्व भूतमात्रांच्या हृदयातील परमात्मा असणारे भगवान श्रीकृष्ण, ते प्रचंड पुतळ्यासारखे दिसणारे रूप दुसरे काही नसून एक असुर होता हे स्पष्टपणे जाणून होते.
गोपबालकांना मात्र या गोष्टीची जाणीव नव्हती आणि भगवान श्रीकृष्ण भगवंत आपल्या अंतरंग सुहृदांचा विनाश कसा टाळावा याची योजना करीत असतानाच त्या सर्व गोपबालकांनी आपल्या गोवत्सांसहित त्या प्रचंड सर्पाच्या मुखात प्रवेश केला; परंतु श्रीकृष्ण मात्र बाहेरच उभे होते. ते आपल्या मुखात कधी प्रवेश करतात याची वाट पाहात तो असुर विचार करू लागला : "माझ्या बहिणीला आणि बंधूला ठार मारणाऱ्या या श्रीकृष्णाशिवाय सगळेच माझ्या मुखात प्रविष्ट झालेले आहेत."
श्रीकृष्ण खात्रीने सर्वांना अभय प्रदान करणारे आहेत; परंतु आपले मित्र पूर्वीच आपल्या हाताबाहेर गेले आहेत आणि ते त्या भयंकर असुराच्या उदरात पोहोचले आहेत हे पाहून ते क्षणभर दुःखी झाले. बहिरंगा प्राकृतशक्ती कशी अद्भुत प्रकारे कृतिशील असते याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. ते आता या असुराला ठार करून गोपबालकांना आणि वासरांना कसे वाचवावे याबद्दल विचार करू लागले. वस्तुतः तसा विचार करणे हा श्रीकृष्णांचा विषय नव्हताच; तथापि, ते विचार करू लागले.
अखेर काही विचाराअंती त्यांनीदेखील सर्पाच्या मुखात प्रवेश केला आणि तेव्हा घडणाऱ्या घटनेची मौज पाहण्याकरिता आलेल्या आणि मेघांआड दडून बसलेल्या स्वर्गीय देवदेवतांनी अतिशय भयभीत होऊन "अरेरे! हे काय झाले!" असे म्हणत हाहाकार केला. त्या वेळी रक्त-मांस खाण्याला चटावलेले अघासुराचे मित्र आणि कंसाचे अनुचर, कृष्णदेखील असुराच्या मुखात प्रविष्ट झाल्याचे पाहून आनंद व्यक्त करू लागले.
तो असुर जेव्हा श्रीकृष्णांना आणि त्यांच्या सोबत्यांना दातांखाली चिरडून नष्ट करण्याच्या बेतात होता तेव्हा श्रीकृष्णांनी देवतांमध्ये हाहाकार उडाल्याचे ऐकले आणि त्या असुराच्या घशात गेल्यावर त्यांनी आपला विस्तार करण्यास सुरुवात केली. जरी तो असुर विशालकाय होता तरी त्यामुळे त्याचा घसा बंद होत गेला आणि तो गुदमरू लागला.
त्याचे डोळे गरगर फिरू लागले आणि लवकरच त्याचा श्वास पूर्णपणे बंद झाला. त्याच्या प्राणवायूला बाहेर जाण्यास जागा सापडेना तेव्हा तो त्याच्या मस्तकावरील ब्रह्मरंध्र फोडून बाहेर निघून गेला आणि तो असुर गतप्राण झाला. तदनंतर श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य दृष्टिक्षेपाने सर्व गोपबालकांना आणि गोवत्सांना पुन्हा सचेतन केले. आणि ते सर्वांबरोबर असुराच्या मुखातून बाहेर पडले. जेव्हा श्रीकृष्ण अघासुराच्या मुखात होते तेव्हा त्याची आत्मज्योत बाहेर आली व सर्वत्र प्रकाश पसरवीत श्रीकृष्णांची वाट पाहात आकाशात स्थिर झाली.
भगवान श्रीकृष्ण गोपबालकांसमवेत आणि वासरांसमवेत जेव्हा असुराच्या मुखातून बाहेर आले तेव्हा ती दीप्तिमान आत्मज्योत सर्व देवदेवतांसमोरच त्यांच्या शरीरात प्रविष्ट झाली. देवीदेवतांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे पूजन केले. ते आनंदविभोर होऊन नृत्य करू लागले. गंधर्वांनी प्रार्थना गायिल्या. ढोल-नगारे वाजू लागले. ब्राह्मणांनी वैदिक मंत्रांचे उच्चारण केले आणि भगवद्भक्तवृंदांमधून "जय जय !” ध्वनी गरजला.
उच्च लोकांपर्यंत उमटलेला तो मंगल ध्वनी ऐकल्याबरोबर देवता, ब्रह्मा विष्णू महादेव ताबडतोब काय घडले ते पाहण्याकरिता खाली आले. असुर ठार झाला असल्याचे त्यांनी पाहिले आणि भगवंतांच्या अशा अद्भुत आणि यशस्वी लीलांचे अवलोकन करून ते आश्चर्यचकित झाले. त्या असुराचे अवाढव्य मुख अनेक दिवसपर्यंत तशा उघडलेल्या स्थितीतच राहिले आणि कालांतराने सुकून गेले.
सर्व गोपबालकांकरिता ते आनंदमय लीलांचे स्थान बनले. अघासुर मर्दन झाले तेव्हा कृष्ण आणि त्यांचे बालसवंगडी असे सर्व पाच वर्षे वयाखालीलच होते. पाच वर्षांखालील वयोगटातील मुलांना 'कुमार', पाच वर्षांपासून दहा वर्षे वयोगटातील मुलांना 'पौगंड' आणि दहा वर्षांपासून पंधरा वर्षे वयोगटातील मुलांना 'किशोर' संबोधण्यात येते. पंधरा वर्षांच्या पुढे मुलांना तरुण म्हटले जाते. अघासुराचा वध झाल्यानंतर एक वर्षापर्यंत या घटनेची वृंदावनाच्या खेड्यांत कोणतीही चर्चा झाली नाही. परंतु गोपबालकांनी पौगंडावस्था प्राप्त केल्यानंतर त्यांनी या अघासुर वधाच्या