श्रीकृष्ण चरित्र वत्सासुर आणि बकासुर वध

श्रीकृष्ण चरित्र वत्सासुर आणि बकासुर वध

 वत्सासुर आणि बकासुर वध

एकदा श्रीकृष्ण आणि बलराम यमुनेच्या तीरावर क्रीडा करीत असताना वत्सासुर नावाचा असुर त्या दोघा बधूंना ठार मारण्याच्या उद्देशाने वासराचे रूप घेऊन तेथे आला. वासराच्या रूपातील तो असुर इतर वासरांत मिसळून गेला. तथापि, विशेषतः श्रीकृष्ण भगवंतांनी ते सर्वज्ञपणे जाणले आणि त्यांनी ताबडतोब वत्सासुराचा तेथे प्रवेश झाल्याचे बलरामांच्या निदर्शनास आणून दिले. 

दोघे बंधू हळूहळू त्याच्याजवळ गेले. तेथे गेल्याबरोबर श्रीकृष्ण भगवंतांनी त्या गोवत्सरूपी असुराचे मागील पाय व शेपटी पकडली आणि मोठ्या जोराने गरगर फिरवून एका झाडावर फेकून दिले. त्याबरोबर असुर गतप्राण होऊन झाडावरून जमिनीवर पडला. जेव्हा तो असुर जमिनीवर मरून पडला तेव्हा श्रीकृष्णांच्या सवंगड्यांनी "छान, छान!" म्हणत त्यांचे अभिनंदन केले आणि देवीदेवतांनी मोठ्या प्रसन्नतेने आकाशातून पुष्पवृष्टी केली. अशा रीतीने, अखिल सृष्टीचे पोषणकर्ते कृष्ण बलराम प्रतिदिन सकाळपासून वासरांचे राखण करीत असत. या प्रकारे त्यांनी वृंदावनात गोपबालक म्हणून आपल्या बाललीलांचे आस्वादन केले.

एके दिवशी सगळे गोपबालक आपल्या वासरांना पाणी पाजण्याकरिता यमुना नदीच्या काठी गेले. वासरे यमुनेवर पाणी प्याली तेव्हा गोपबालकही पाणी प्याले आणि यमुनेच्या काठावर बसले. त्या वेळी त्यांचे लक्ष एका प्रचंड प्राण्याकडे गेले. तो एखाद्या पर्वताकार बगळ्याप्रमाणे दिसत होता. त्याचा शिरोभाग वज्रासारखा कठोर भासत होता. 

जेव्हा त्यांनी तो अद्भुत प्राणी पाहिला तेव्हा त्यांना त्याचे मोठे भय वाटले. या प्राण्याचे नाव होते बकासुर आणि तो होता कंसाचा अनुचर. तो अचानक समोर आला आणि त्याने एकदम आपल्या अणकुचीदार तीक्ष्ण चोचीने श्रीकृष्ण भगवंतांवर झडप घातली आणि त्यांना गिळून टाकले. 

त्या महाभयंकर पशूने श्रीकृष्णांना गिळून टाकल्याचे पाहून सर्व गोप बालक भितीने मृतवत होऊन खाली पडले. त्यांचा श्वासोच्छ्वास थांबला. तथापि, जेव्हा बकासुर श्रीकृष्णांना गिळीत होता तेव्हा त्याच्या घशात अग्नी गिळावा त्याप्रमाणे प्रचंड दाह होऊ लागला. याचे कारण म्हणजे श्रीकृष्णांचे धगधगीत तेज होय. 

तो दाह असा झाल्यामुळे त्या असुराने श्रीकृष्णांना ताबडतोब घशातून बाहेर फेकून दिले आणि तो आपल्या तीक्ष्ण चोचीने त्यांना टोचून मारण्याचा प्रयत्न करू लागला. बिचाऱ्या बकासुराला याची काय कल्पना की, श्रीकृष्ण जरी नंदराजांच्या बालकाची भूमिका करीत होते तरी ते सर्व देवि देवतांचे स्वामी आहेत. ब्रम्हा विष्णु महादेव इत्यादि सर्व देवता त्यांच्या सेवक आहेत. हे त्या मुढ असुराला काय कळणार! 

आता देवतांचे आनंद-भांडार, साधुसंतांचे रक्षक अशा यशोदानंदनाने त्या विशालकाय बकासुराच्या चोचीचा खालचा आणि वरचा भाग घट्ट पकडला आणि आपल्या सवंगड्यांसमक्ष, एखादे लहान मूल गवताच्या पात्याचे सहजपणे दोन तुकडे करून टाकते त्याप्रमाणे त्याचे मुख फाडून दोन तुकडे केले. हे पाहून स्वर्गीय लोकांच्या रहिवाशांनी श्रीकृष्णांच्या अभिनंदनार्थ आकाशातून मल्लिकासदृश सुगंधी पुष्पांची वृष्टी केली आणि त्याचबरोबर शिंगे, नगारे, शंख वाजविले.

आकाशातून होत असलेली पुष्पवृष्टी पाहून आणि शंख नगाऱ्यांचा अलौकिक ध्वनी श्रवण करून गोपबालक आश्चर्यचकित झाले आणि जेव्हा त्यांनी श्रीकृष्ण सुखरूप असल्याचे पाहिले, तेव्हा बलरामांसहित सर्व गोपबालकांना इतका आनंद झाला की त्यांना आपला प्राणच परत आल्यासारखे वाटले. श्रीकृष्ण त्यांच्याकडे आलेले पाहताच त्यांनी त्या नंदकुमाराला आलिंगन करून छातीशी धरले. तदोपरांत त्यांनी सर्व वासरे एकत्र गोळा केली आणि ते घरी निघाले.

गोपबालक जेव्हा घरी पोहोचले तेव्हा त्यांनी व्रजवासी जनांना नंदतनय श्रीकृष्णांच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करून सांगितले. जेव्हा गोप-गोपिकांनी मुलांच्या तोंडून घडलेला वृत्तांत ऐकला तेव्हा त्यांना अत्यानंद झाला, कारण त्यांचे श्रीकृष्णांवर स्वाभाविक प्रेम होते आणि त्यांचे यश आणि विजयी कृत्ये ऐकून त्यांचा स्नेह अधिकाधिक वृद्धिंगत झाला. बाळकृष्णांची मृत्यूच्या मुखातून सुटका झालेली असल्याचे पाहून व्रजजन मोठ्या प्रेमाने आणि स्नेहाने त्यांचे मुख न्याहाळू लागले. 

खरोखरच, बाळकृष्णांच्या दर्शनापासून ते आपले नेत्र दूर करण्यात असमर्थ झाले होते. ते श्रीकृष्णांबाबत आपापसात चर्चा करू लागले. या लहान मुलाला श्रीकृष्णाला ठार मारण्यासाठी अनेक मोठमोठ्या भयावह विशालकाय असुरांनी अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे कशी आक्रमणे केली होती आणि तरीही  परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने कृष्णाला इजा पोहोचविण्यात असमर्थ होऊन असे असुरच अग्नीत मृत्युमुखी पडणाऱ्या पतंगांप्रमाणे कसे विनष्ट झाले होते व हे बालक अशा संकटांतून कसे सुखरूपपणे सुटले होते, हाच त्यांच्या संभाषणाचा विषय होता. 

त्यांना या वेळी गर्ग मुनींच्या शब्दांची आठवण होत होती. त्यांनी आपल्या ज्योतिषशास्त्राच्या आणि वेदांच्या सखोल ज्ञानाने 'या मुलावर अनेक असुरांची आक्रमणे होतील' अशी भविष्यवाणी केलेली होती आणि त्यांचा शब्दन्-शब्द प्रत्यक्ष होत असल्याचे ते वस्तुतः पाहात होते.

नंदराजांसहित सर्वच गोपगोपिका श्रीकृष्ण आणि बलरामांच्या अद्भुत कृत्यांविषयी सदैव चर्चा करीत असत आणि अशा संभाषणात ते इतके तन्मय होऊन जात की त्यांना या भौतिक अस्तित्वाच्या त्रितापांचा पूर्णतः विसर पडे. हाच श्रीकृष्णभावनेचा परिणाम आहे. नंदराजांनी आणि गोपगोपिकांनी पाच हजार वर्षांपूर्वी ज्या सुखाचे आस्वादन केले, केवळ श्रीकृष्णांच्या आणि त्यांच्या पार्षदांच्या दिव्य लीलांच्या चर्चेतून कृष्णभावनेतील व्यक्ती आजही त्याच सुखाची अनुभूती करू शकतात.


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post