फलटण आबासाहेब, बाबासाहेब मंदिर इतिहास
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड गावाच्या काही अंतरावर कासारसिरंबे नावाचे गाव आहे. या गावात अनेक महानुभावपंथाची उपदेशी मंडळी राहतात. त्यांच्यापेकी एका कासार पाटील घराण्यात महानुभाव पंथाचा वारसा कित्येक वर्षापासून चालत आलेला आहे. पूर्वी या घराण्यात सकुबाई नावाची कट्टर उपदेशी बाई होऊन गेली.
तीचे वय होत आले होते. ती ८५ वर्षांची झाल्यानंतर तिला अशी इच्छा निर्माण झाली की, आयुष्यभर आपण संसार नेटका केला. आता शेवट हा परमेश्वराजवळ व्हावा असे वाटू लागले. तिने आपल्या कुटूंबात तसे बोलूनही दाखविले. “आता माझे वय झाले आहे, माझं म्हातारपण व शेवट हा फलटण या पवित्र काशीक्षेत्रात श्रीचक्रपाणी राऊळांच्या श्रीचरणी व्हावा. अशी सकुबाईंची इच्छा जाणून तिच्या आप्तवर्गाने तिला फलटण येथे देवाजवळ आणून सोडले. यामुळे तिला फार आनंद झाला. ती वयाने जास्त असली तरी शरीराने काटक होती. स्वतःचे सर्व काम स्वतःच करत असे.
अशी ती भक्तीभावाने देवाला आळवीत असे. त्यांच्या जवळ असलेली इतर भक्तमंडळीही त्यांच्याप्रमाणेच आबासाहेब, बाबासाहेब हे नाव आवडीने घेऊ लागली. असेच पुढे एकमेकाचे ऐकून आबासाहेब, बाबासाहेब या नावाने श्रीचक्रपाणी राऊळांना संबोधू लागले. पुढे असेच नाव घेण्याची प्रथा पडली. ती प्रथा आजपर्यंत चालू आहे. यासंबंधीत रंभाईसाच्या आवारातील स्थान मंदिरास आबासाहेब मंदिर तर पानपेखने तथा श्रीकृष्ण मंदिरास बाबासाहेब मंदिर या नावाने आजही ओळखले जाते.
(परंपरेने आलेल्या आख्यायिकेवरून)
घोड्याची यात्रा
प्रत्येक वर्षी चैत्र वद्य पंचमीच्या दिवशी फलटण येथे सर्वज्ञ श्री चक्रपाणी राऊळाच्या माहातिर्थाची यात्रा भरत असते. या यात्रेची परंपरा फार फार वर्षापासून चालत आली आहे. यात्रेच्या दिवशी श्रीकृष्णाची मुर्ती पालखीत बसवून थाटामाटाने महंत आणि भक्त समुदायांसह व संस्थानिक अधिपतींनी पाठविलेल्या हत्ती, घोडे, वाद्य इत्यादी लवाजम्यासह मिरवणूक छबिना निघण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे.
नंतर काही वर्षांनी भगवान श्रीकृष्ण महाराजांनी अशी एक लीळा केली की, मोगराळ्याच्या घाटाने खाली उतरून जेजूरीच्या चैत्र पोर्णिमेच्या यात्रेला चाललेली खंडोबाची भाविक भक्त मंडळी फलटण येथील बाबासाहेब मंदिराचे पाठीमागे बाणगंगेच्या वाळवंटात मुक्कामास थांबली होती. तेव्हा या मंडळीजवळ पितळेचा दीड फूट लांब व एक फूट उंचीचा खंडोबाच्या नवसाचा घोडा होता.
जमलेल्या गर्दीतील फलटणमधील एक श्रीकृष्णाचा भक्त म्हणाला, "येथील श्रीकृष्ण महाराजांची या घोड्यावर मर्जी फिरली आहे. म्हणून श्रीकृष्ण महाराजांचा अंगारा या पितळेच्या घोड्याला लावा आणि जयघोष करून उचला". असे तो भक्त म्हणताच जवळ असलेल्या श्रीकृष्ण मंदिरातून अंगारा आणला व घोड्याला लावला आणि श्रीकृष्ण महाराज की जय असा जय घोष केला.
असा जय घोष चालू असतांनाच एका मुलाने तो घोडा सहज उचलला व श्रीकृष्ण मंदिरात आणून ठेवला. तेव्हा त्या खंडोबाच्या यात्रेकरूंनी असा विचार केला की, आपल्याला साक्षात खंडोबाने येथेच भेट दिली आहे. आता जेजूरीला जाण्याचे काहीच कारण नाही. फलटणहूनच खंडोबाची यात्रा जेजूरीला न जाताच परत फिरली. या घटनेचे नवल फलटणकरांनाही वाटले.
वरील घटनेमुळे आजही फलटणच्या यात्रेतील मिरवणूकीत पालखी समोर हा घोडा डोक्यावर घेऊन चालण्याची प्रथा आजपर्यंत चालू आहे. म्हणून फलटण व आसपासच्या प्रदेशातील लोक या यात्रेला घोड्याची यात्रा म्हणतात. या घटनेपूर्वी या यात्रेला श्री चक्रपाणी महाराज, श्रीकृष्ण महाराजांची यात्रा म्हणत असत.