महानुभावपंथ संवर्धनासाठी प्रत्येकाने करावयाची १०१ पवित्र कर्तव्ये
माझ्या धर्म बांधवानो! आज आपले सर्वांचे लक्ष एका महत्वाच्या विषयाकडे वेधू इच्छितो.
कै. परमपूजनीय ज्ञानसूर्य आचार्यप्रवर श्रीदर्यापूरकरबाबाजी (श्रीऋषिराजबाबा) (अमरावती-दिल्ली) यांच्या तेजस्वी जीवनातील अखेरच्या काही दिवसात मला त्यांचे पवित्र सान्निध्य लाभले होते. त्यांनी अखेरच्या क्षणापर्यत पंथाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी जी महत्वपूर्ण कर्तव्ये मला सांगितली. ती लिहून घेतली. आपल्या संप्रदायातील प्रत्येकाने ही कर्तव्ये पार पाडावीत अशी पू.पू. श्री. बाबांची आंतरिक तळमळ होती. ही पवित्र धम्र कर्तव्ये आम्हास निश्चितच मार्गदर्शक व प्रेरक आहेत. म्हणून ती कर्तव्ये खाली देत आहे. आपणा सर्वांनी या पैकी होतील तेवढी कर्तव्ये करीत रहावे, ही विनंती.
- दिनकर भास्करराव बोरकुटे (नागपूर) (विचारमंथन १९९१ पुस्तकातील लेख)
१) महानुभाव धर्म संप्रदायातील संपूर्ण तीर्थस्थानांचा जिर्णोद्धार डागडुजी व रंगरंगोटी क्रमाक्रमाने व आकर्षक आणि प्रभावी पद्धतीने व दूरदृष्टी ठेवून घडवून आणणे.
२) या प्रत्येक तीर्थस्थळी येणाऱ्या लोकांना सोयीच्या दृष्टीने येण्याजाण्यासाठी चांगले रस्ते व दळणवळणाची साधनेउपलब्ध व्हावेत यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न करणे, तेथे पिण्याच्या पाण्याची, हातपाय धुण्याची व रहाण्याची सोय (धर्मशाळा) करणे.
३) तीर्थस्थळांवर वापरासाठी जागा कमी असल्यास तिचा विस्तार वाढविण्याचा प्रयत्न करणे व तीर्थस्थानांच्या आजुबाजूस सरकारी जागा उपलबध असल्यास ती मिळविण्याचा प्रयत्न करणे.
४) तीर्थस्थळी वृक्षारोपण घडवून आणणे व जागा असल्यास तेथे शासकीय माध्यमातून उद्यान करवून घेणे.
५) तीर्थस्थळाच्या आसपास सार्वजनिक संडास, मुत्र्या किंवा गंदा नाला वा शवचिकित्सालय (पोस्टमार्टम हॉल) वा खाटिकखाना मद्यमांसाचे 'दुकान, कंपोस्ट यार्ड वा गुरेढोरे बांधणे, गोदरी किंवा जुगाऱ्यांचा अड्डा अशा तऱ्हेचा घाणेरड्या बाबींचा प्रादुर्भाव झाला असल्यास तो दूर करणे व पुनरपि तसे होऊन देणे.
६) एखाद्या तीर्थस्थळी देवळावर कळस बसवायचा राहीला असल्यास तेथे समारंभपूर्वक कळस बसवणे.
७) तीर्थ स्थानांवरिल पूजाऱ्यांसाठी, धरणेकरूंसाठी वा दर्शनार्थीसाठी आदर्श अशी आचारसंहिता निर्माण करणे. जिथे पूजारी नसेल तेथे पूजारी नेमल्या जाण्याची व्यवस्था करणे.
९) तीर्थस्थळांची यादी करणे. (गाव, पोस्ट, मौजे, परगणा तालुका, जिल्हा यासह)
१०) काळाच्या ओघात नष्ट झालेल्या तीर्थस्थानांचा शोध घेणे.
११) प्रत्येक तीर्थस्थळी तेथील लीळांचा बोध करून देणारा निर्देश असलेला संगमरवरी शिलालेख बसवणे.
(१२) तीर्थस्थळांची माहिती देणारे पुस्तक व नकाशे उपलब्ध करून देणे.
१३) त्या त्या तीर्थस्थळाचा महिमा (लोकांना आलेलया साक्षात्कारी अनुभवासह) प्रकाशित करणे. (जेणे करून समाजात तीर्थस्थानांची प्रतिष्ठा वाढेल.)
१४) तीर्थस्थळी ज्या यात्रा भरत असत त्या विस्कळीत झाल्या असल्यास अथवा त्या यात्रेस ओहोटी आली असल्यास त्या यात्रेचे पुनरूज्जीवन घडून येण्यासाठी त्या यात्रेच्या ठराविक दिवशी साधु संतांचे व भक्तगणांचे मेळे भरविणे. पालखी काढणे, दिंडी जागरण, भजनी मंडळे निर्माण करणे.
१५) तीर्थस्थळाच्या जंगम वा स्थावर संपत्तीचे नोंदणीकरण (रजिस्ट्रेशन) झाले नसल्यास करणे.
१६) तीर्थस्थळांची सरकार दप्तरी (नझूल, गामपंचायत पटवारी इ. क्षेत्रात) नोंद घेणे. ( संपत्तीसह).
१७) तीर्थस्थळाच्या कुठल्याही संपत्तीचे रक्षण करणे त्यावर झालेले आक्रमण वा अतिक्रमण हटवणे. १८) तीर्थस्थळ कुणाच्या घरात, जागेत वा शेतात असतील तर ते घर, जागा व शेत मिळविण्याचा यशस्वी प्रयत्न करणे.
१९) वरील सर्व कर्तव्यांच्या पूर्तीसाठी कुठल्याही अडचणी निर्माण होऊ नये म्हणून शासनाकडून विशेष कायदा तयार करवून घेणे. ज्याप्रमाणे शासनाकडून पंढरपूर टेम्पल अॅक्ट निर्माण झाला व त्याची व्याप्ती वाढवून महाराष्ट्रातील विठोबा रूक्माई किंवा विष्णु लक्ष्मीच्या प्रत्येक देवळास तो कायदा लागू करण्यात आला.
२०) त्या त्या तीर्थस्थळी दर्शनार्थीची व पूजा- अभिषेक करणाऱ्यांची रीघ चालू रहावी यासाठी नियमबद्धता व सुसूत्रता निर्माण करणे. उदा. त्या त्या भागातील खेडेगावातील वा शहरातील लोकांत जाणीव करून देऊन उटी उपहाराचे दिवस वाटून देणे, वार्षिक उत्सव नेमून देणे.
२१) एखाद्या शासकीय योजनेने (धरण, कालवा, मुरूम, फाडी खणणे, उत्खनन वगैरे किंवा नैसर्गिक आपत्तीने वा समाजकंटकी उपद्रवाने) तीर्थस्थानांचा विनाश होत असलयास रक्षण करणे.
२२) तीर्थस्थानांवरील देवळांना बऱ्याच ठिकाणी असंबद्ध नावे पडली आहेत. त्यासाठी सुसंगत सर्व संमत व सर्वसमावेशक अशी नामाभिधाने रूढ करण्याचा प्रयत्न करणे. उदाहरणार्थ- श्रीदत्त मंदीर, श्रीकृष्ण मंदीर, श्रीदत्त संस्थान इत्यादी.
(२३) महत्वाच्या तीर्थस्थानांना राज्य शासनाकडून वा केन्द्र शासनाकडून पर्यटन केंद्र म्हणून घोषित करणे.
२४) तीर्थस्थानांवर प्राचीन परंपरेस अनुसरून नगारखाने, दीपस्तंभ इत्यादी उभे करणे.
२५) जीर्णोद्धार कसा व्हावा ? ओट्याची मांडणी व रचना कशी असावी? या दृष्टीने शास्त्रीय व तात्विक अनुबंध तयार करणे व ते संप्रदायात सर्वत्र स्वीकारल्या जातील असे तंत्र राबवणे.
२६) महत्वाच्या तीर्थ स्थळांपासून जवळ असणाऱ्या रेल्वे स्थानकांवर वा मोठ्या बसस्थानकांवर ते तीर्थस्थान तेथून जवळच असल्याचा निर्देश करवून घेणे.
२७) सांप्रदायिकांना प्रसादवंदन म्हणजे काय हे समजावून सांगणे.
२८) प्रसादवंदन कसे करावे? याची माहिती पुरवणे
२९) प्रसाद बांधणी अलीकडे चुकीच्या व विनाशकारी पद्धतीने होत आहे तिचे निराकरण करणे.
३०) कोणता प्रसाद कुठला आहे? याचे ज्ञान मावळत चालले आहे. ते ज्ञान मिळवणे. त्या ज्ञानाचे रक्षण व प्रसारण करणे.
(३१) अनेक ठिकाणी नकली प्रसादांचे निर्मितीकरता व प्रसारण चालले आहे ते थांबवण.
(३२) नकली प्रसाद व विशेष विकत घेऊ नका, त्यात फसवणुक आहे असे सर्वांच्या लक्षात आणून देणे.
३३) प्रसाद सेवा या विषयावर प्राचीन आचार्यांनी जे अनेक निबंध व प्रमेय लिहिले आहेत ते प्रकाशित करणे.
३४) आबाबांमध्ये व कुठे कुठे पोथ्यांमध्ये प्रसादाचे व विशेषांचे वर्णन मिळते ते प्रकाशित करणे.
३५) पंथात कोणकडे कुठला प्रसाद व महत्वाचा विशेष आहे त्याची माहीती करून देणारे पुस्तक छापणे.. ३६) अज्ञानत्वामुळे जिथे कुठे प्रसादाची दुरावस्था होत असेल तर ती दूर करणे.
३७) गृहस्थाश्रमी अनुयायी मंडळीत प्रचार व्हावा त्यांच्या धर्माचे रक्षण व्हावे यासाठी पदयात्रांचे आयोजन करणे.
३८) नामधारक, उपदेशी किंवा वासनिक म्हणजे काय? हे अनुयायांच्या लक्षात आणून देणे.
३९) सध्या अनुयायी मंडळीत एक प्रकारची मरगळ (अनास्था) आली आहे ती दूर करून जागृती निर्माण करणे व अनुयायी मंडळीत आपण कोण्या संप्रदायाचे? या संप्रदायासाठी आपले कर्तव्य ते कोणते? याची जाणीव करून देणे.
४०) आपल्या धर्माचे महत्व व ईश्वरप्राप्तीचा खराखुरा मार्ग तो हाच हे प्रत्येक अनुयायाच्या लक्षात आणुन देणे.
४१) प्रत्येक अनुयायाने प्रतिवर्षी नियमितपणे एका तरी तीर्थस्थळी किंवा मार्गात जाऊन दर्शन वंदन उटी- उपहार भजन-पूजन या पैकी जे शक्य असेल ते केले पाहिजे. हे अनुयायी मंडळीस समजावून सांगणे.
४२) प्रत्येक अनुयायाने वर्षातून एकदा तरी कोण्यातरी आश्रमात जावून साधुसेवेचा व पोथी ऐकण्याचा लाभ घेतला पाहिजे, याची अनुयायी मंडळीस जाणीव करून देणे.
४३) प्रत्येक गावात पौर्णिमेस वा अमावस्येस व पर्वकाळी सार्वजनिक देवपूजा, आरती भजनी मंडळ व्हावे यासाठी अनुयायी मंडळीस उत्साहित करणे.
४४) गावातून प्रत्येक पौर्णिमेस एक खेट श्रीक्षेत्र ऋद्धिपूर, माहूर, जाळीचादेव, फलटण या सारख्या महातीर्थी घरपरत्वे आळी पाळीने गेली पाहिजे यासाठी प्रयत्न करणे.
(४५) मागणी (कोरडी भिक्षा) यामुळे अनुयायी मंडळी संत्रस्त होते, त्याकरिता योग्य तो मार्ग काढणे. पोथी लागली पाहिजे व
४६) प्रत्येक गावात प्रतिवर्षी एखादा वार्षिक उत्सव घडून यावा असा दंडक निर्माण करणे.
४७) आदर्श अनुयायी कसा असावा? यासाठी यासाठी एक नियमावली तयार करून ती प्रकाशित करणे.
४८) पंथात सध्या ढोबळमानाने जे नियम उपदेशी वर्गासाठी चालू आहेत किंवा जी नियमावली तयार होईल त्याचे उद्देश व एखाद्या प्रसंगी त्यातील नियमांशी कशी तडजोड निर्माण करता येते ते अनुयायी मंडळीस समजावून सांगणे.
४९) कुठला धार्मिक विधि कसा करावा ? याची माहिती देणारे पुस्तक निर्माण करणे.
५०) ज्ञान कुणाकडून व कसे मिळवावे? याचे अनुयायांना ज्ञान करून देणे.
५१) जातीयवादामुळे किंवा पक्षपातामुळे कुठल्यातरी व्यक्तिच्या कच्छपि लोक लागतात. त्याचाच उदो उदो करतात, सध्या असे सर्रास चालू आहे हा प्रकार मोडून काढणे "देवाचा तो आपला' ही भावना निर्माण करणे.
५२) अनुयायांची खानेसुमारी (जनगणना) (वेगवेगळ्या निकषांवर) करणे.
५३) अनुयायी मंडळींची कधी कधी फसवणुक व लुबाडणूक होते ती दूर करणे.
५४) अनुयायी मंडळीस गाठी/पुस्तके आरती- पारायणाचे इ. योग्य भावात उपलब्ध करून देणे.
५५) गुरूघर प्रत्येक घराचे एक असावे, याची जाणीव करून द्यावी (एका घरात अनेक गुरू नसावे).
५६) वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य वा मानाचे स्थान मिळविणाऱ्या अनुयायी मंडळींचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करणे.
५७) अनुयायी महिलांचे मंडळे स्थापन करणे.
५८) अनुयायी मंडळीत जे प्रचार करू शकतात अशा व्यक्तिंचा संच निर्माण करणे.
५९) पूर्वी जन्माष्टमी व श्रीदत्त अवतार दिन उत्साहात साजरा व्हायचा त्यामुळे अन्य लोक मोठ्या उत्साहाने त्यात सहभागी व्हायचे. आता तिकडे दुर्लक्ष करून श्रीचक्रधर अवतार दिनावर खूप भर दिल्या जातो. त्यामुळे अन्य लोकांचा संपर्क बराच कमी झाला ही उणीव दूर करणे व श्रीचक्रधर अवतार दिना प्रमाणेच दोन्ही अवतार दिन थाटात साजऱ्या करण्याची प्रेरणा देणे.
६०) मुलांना लहानपणीच धर्माचे वळण लावावे. उपदेश द्यावा? तसे करणे श्रेयस्कर असते. याची जाणीव करून देणे.
६१) मुलांना मिळणारे खाऊचे पैसे त्यांनी धर्मसेवेकडे सत्कारणी लावावे अशी शिकवण देणे. ६२) मुलींना उपदेश देऊनये असा जो गैरसमज आहे तो दूर करणे.
६३) पंथीय प्रकाशित व अप्रकाशित साहित्य प्रकाशित करणे (टीपा, प्रस्तावना त्यांचे महत्व, कोश, पाठभेद, छायाचित्रे ई. संदर्भासह व शक्यतो आधुनिक भाषेतील अनुवादासह).
६४) आरत्या, भजने, स्तोत्र यांचे शुद्ध व सार्थ प्रकाशन करणे.
६५) जुन्या व रसभरीत आरत्यांचा, भजनांचास्तोत्रांचा लोप होऊन नव्या व निरस रचनेकडे (तयातील आधुनिक चालींमुळे) भर दिल्या जात आहे, ही प्रवृत्ती दूर करणे.
६६) "ना नफा ना तोटा' या तत्वांवर ग्रंथ प्रकाशन योजना आखणे.
६७) ग्रंथ प्रकाशन व ग्राहक योजना निर्माण करणे व राबविणे.
६८) पंथाविषयी असलेले गैरसमज व भ्रम दूर करणारे साहित्य प्रकाशित करणे.
६९) पंथप्रचारासाठी सोप्या भाषेत सहज समजणारे प्रभावी व रसदार आणि चटकदार तसेच अंतःकरणाचा ठाव घेणारे असे साहित्य निर्माण व्हावे व प्रकाशित व्हावे याकडे लक्ष पुरवावे.
(७०) पंथीय अभ्यासक्रम निर्माण करणे.
(७१) संतांची चरित्रे प्रकाशित करणे.
७२) सर्वांग सुंदर व विशुद्ध असे लीळाचरित्र प्रकाशित करावे.
७३) पंथाचा प्रचार व प्रसार व्हावा जागृती व्हावी यासाठी नियतकालिक चालवणे.
७४) पंथीय प्राचीन व अर्वाचीन साहित्याचे अद्यावत असे ग्रंथ संग्रहालय निर्माण करणे. त्यासाठी ठिकठिकाणकडून पोथ्या गोळा करणे.
७५) ठिकठिकाणच्या ग्रंथ संग्रहातील पोथ्यांची सूची प्रकाशित करणे.
७६) ठिकठिकाणी प्राचीन साहित्य वाया जात आहे तिकडे लक्ष पुरवणे.
(७७) पंथीय पुस्तकांचे व मासिकांचे वाचनालय निर्माण करणे.
७८) आपल्या पंथाशी संबंधित लेखनिरनिराळ्या वर्तमान पत्रात वा मासिकात येत राहतील असे करणे.
७९) महानुभाव संप्रदायास मिळालेल्या सनदा व ताम्रपट किंवा जय-पत्र गोळा करून प्रकाशित करणे.
८०) धर्मबंधु मंडळींनी निर्माण केलेल्या संस्थांची सूचि निर्माण करणे.
८१) पंथीय मंडळींकडून जे कार्य ठिकठिकाणी चालू आहे त्यातील विस्कळीतपणा मोडणे व सुसुत्रता निर्माण करणे.
८२) अनुयायी मंडळीतील प्रत्येक धर्मबंधुने आपल्या जीवनात एका तरी तीथींचा जीर्णोद्धार किंवा एका तरी ग्रंथाचे प्रकाशन केले पाहिजे, अशी सक्रिय भावना निर्माण करणे.
८३) अनुयायी मंडळींचे संघटन घडवून आणणे व त्यांच्यात पंथाविषयी आपुलकी, निष्ठा व बांधिलकी निर्माण करणे.
८४) आपल्या पूर्वजांनी ज्या संस्था निर्माण केल्या होत्या अशा संस्था चालू राहातील याची दखल घेणे.
८५) सरकारी गॅझेटमध्ये पंथाविषयी ज्या चुकीच्या व अर्धवट नोंदी आहेत त्या दुरूस्त करणे व त्यास पुर्णत्व आणणे.
८६) पंथाविषयी गैरसमज पसरविणाऱ्या पुस्तकांचे सविस्तर व सुव्यवस्थित उत्तरे देणारी पुस्तके प्रकाशित करणे.
८७) संप्रदायावर होणारे साहित्यिक व बौद्धिक आक्रमण थोपविण्यासाठी संशोधक, अभ्यासक, लेखक, प्रवचक व व्याख्याते यांची फळी निर्माण करणे.
८८) थोर व्यक्तिंनी संप्रदायाची प्रशंसा करणारे जे उद्गार वेळोवेळी काढले असतील ते एकत्रित करून प्रकाशित करणे.
८९) पंथाविषयी समाजात जे नेणतेपण (अज्ञानत्व) वा अनास्था आहे दूर करून त्यांच्यात पंथाविषयी जिव्हाळा निर्माण करणे.
९०) संप्रदायाची प्रतिष्ठा वाढीस लागेल असा प्रयत्न चालू ठेवणे.
९१) भिक्षु मंडळीस याचक बनून फिरावे लागते, कोरडी भीक्षा मागावी लागते यासाठी काही उपाय शोधून काढणे.
९२) पंथीय भिक्षुकांची संघटना निर्माण करणे, त्यांची सूचि निर्माण करणे.
९३) भिक्षुकांमधील कार्यकत्यांमध्ये नियोजन घडवून आणणे.
९४) भिक्षुकांमध्ये (विशेष करून तरूण भिक्षुकांमध्ये) अध्ययनाची व निष्काम सेवेची प्रवृत्ती मावळली आहे ती निर्माण करण्यासाठी उपाय शोधणे..
९५) भिक्षुकांना व ब्रम्हचारी मुलांना संस्कृत भाषेचे व मराठी भाषेचे अध्ययन देण्यासाठी संस्था काढणे, (मुलांसाठी वेगळी मुलींसाठी वेगळी.)
९६) कीर्तन व प्रवचन शाळा उभारणे.
९७) भिक्षु मंडळीत आश्रम निर्माण करण्याची चढाओढ आहे त्यांनी आपला आश्रम तीर्थस्थळी उभारण्याकडे त्यांचे लक्ष वेधावे याकरिता प्रयत्न करणे.
९८) आश्रम व मठांसाठी योग्य अशी नियमावली तयार करणे.
९९) पंथात ज्या संस्था आहेत त्यांच्या प्रतिनिधींचे संमेलन बोलावणे.
१००) पंथीय संत भक्तांचे संमेलन (अधिवेशन) बोलावणे.
१०१) धार्मिक शिकवणुकीद्वारे स्प्तव्यसन (मद्यमांस इत्यादि) विवर्जित व काटकुसरयुक्त आहार विहाराचे वळण लावून समाजातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या कमी करणे.