नश्वर मनुष्य शरीराचा फायदा आणि तोटा
हे मनुष्य देह आपल्याला मिळाले आहे याचे फायदेही आहेत आणि तोटाही आहे. पैकी नुकसान तोटे खूप आहेत आणि फायदा मात्र एकच आहे. आधी आपण याचे तोटे पाहू? या शरीरात जर असती धरली तर हे शरीर अनेक नरकांचे साधन बनते. आणि हे शरीर असती न ठेवता संसाराचा त्याग करून परमेश्वराला अर्पण केले तर परमेश्वराचे अतिंद्रीय सुख प्राप्त करण्यासाठी साधनही बनते.
असं समजा की, मी तुमच्या घरी आलो दोन चार दिवस राहून परत निघालो, पण जाता जाता माझी काहीतरी वस्तू तुमच्या येथे राहून गेली. मग मला एक सांगा किती वस्तू परत घेण्यासाठी मला तुमच्या घरी पुन्हा यावे लागेल की नाही? अर्थातच वस्तू घेण्यासाठी पुन्हा यावे लागेल. याच न्यायाप्रमाणे जो जन्मभर देहावर, संपत्तीवर, बायका-मुलांवर प्रेम करतो, परमेश्वराची आठवण करत नाही, परमेश्वरावर प्रेम करत नाही. त्याला पुन्हा या संसारात यावे लागते. कारण येथे त्याची काहीतरी वस्तू राहिलेली असते. अर्थात कोणावर तरी ऋण केलेले असते किंवा कोणाचे तरी ऋण घेतलेले असते ते परत करण्यासाठी अथवा घेण्यासाठी पुन्हा या संसारात जन्म घ्यावा लागतो. आणि जी काही संत असंत कर्म केली असतील त्यांचे भोग भोगण्यासाठी पुन्हा यावेच लागते.
जन्मभर आपण ज्याचे चिंतन करतो मरण समयीही तेच आठवते. जन्मभर जर आपण विषयाचे चिंतन केले असेल नाना पदार्थांचे, विषयभोगाचे चिंतन केले असेल संबंधीयांमध्ये, नातेवाईकांमध्ये बायका मुलांमध्ये आसक्ती, ममता ठेवली असेल तर मरतानाही तेच आठवतील. परमेश्वर आठवणार नाही. आणि श्रीकृष्णदेवाने गीतेमध्येही म्हटलेले आहे अंतसमयी जो माझी आठवण करतो तो मलाच पावतो होतो. आणि जो इतरांची सांसारिक कर्मांची आठवण करतो तो मेल्यानंतर त्यांनाच प्राप्त होतो. अर्थात पुन्हा जन्म घेण्यासाठी कधी ना कधी त्याचा योग या मनुष्यदेहात येतोच.
जीवनभर ज्याचे चिंतन केले जे प्राप्त करण्यासाठी झटला तेच मरणसमयी आठवते. एका सोनाराने शंभरच्या भावाने सोने खरेदी केले होते. नंतर त्याचा मृत्यू समिप आला व त्याला ताप आला. डॉक्टरांना बोलावले गेले डॉक्टरांनी तापमापकाने तपासणी केली व म्हटले, ओहो यांना तर १०५° ताप आहे, ते ऐकून तो थोड्या शुद्ध आणि थोड्या बेशुद्ध अवस्थेत असलेला सोनार म्हणतो “विकून टाका विकून टाका” चांगला भाव आहे. तात्पर्य तेव्हा तो त्या विकत घेतलेल्या सुवर्णाचे चिंतन करत होता.
माझ्या धर्मबंधूंनो! हे देह तुम्हाला परमेश्वराने विषय भोगांमध्ये आसक्त राहून संसारामध्ये खर्च करण्यासाठी दिलेले नाही, तर परमेश्वराचे स्मरण करून हळूहळू संन्यासासाठी प्रयत्न करून संन्यास घेऊन या संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी दिलेले आहे. पण आपण आपले ध्येय विसरलेले आहोत. आणि प्रत्येक जन्मात परमेश्वराचा आज्ञाभंग करीत आहोत. या मनुष्य देहाच्या आधारे आपण विषय भोगांमध्ये सुख शोधत आहोत. आणि मनुष्य देहाद्वारे सुख अनुभवण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण हे हाडा मांसाने बनलेले मनुष्यदेह आपल्याला सुख कसे काय देणार!! मनुष्य देहच मुळात दुःखरूप आहे. नाना प्रकारच्या आजारांनी ग्रासलेले आहे. त्याद्वारे आपल्याला सुख कसे बरं मिळेल? याचा विचार आपण करीत नाही.
ज्या शरीराविषयी आपल्याला एवढी ममता आहे असती आहे ते शरीरही शुद्ध नाही कारण मुळातूनच जे अशुद्धेतून जन्मलेले आहे ते शुद्ध कसे असेल? घाम असो वा लघवी, मल असो, वा द्रव असो, वा वायू असे, शरीराच्या प्रत्येक छिद्रातून जे काही बाहेर पडते ते सर्व दुर्गंधीयुक्त असते. सकाळी कितीही स्वच्छ पांढरे कपडे घातले तरी ते संध्याकाळपर्यंत घाण होतात. शरीर असे आहे की शरीराच्या संसर्गात अगदी सोने-चांदीचेही काळे होते. हे देह आयुष्यभर कुजत राहते, आणि मेल्यानंतर स्मशानभूमीत जळत असतानाही दुर्गंधी येते.
म्हणून या देहाच्या प्रेमात पडू नका, देहाविषयी ममता धरू नका. या देहाचा फक्त सत्कर्मासाठी वापर करा. हे देह कितीही घाण असले तरी याचा एक फायदा मात्र नक्कीच आहे? तो कोणता? ना हे शरीर स्वतः नाशवंत असले तरी ते अविनाशी अशा परमेश्वराची प्राप्ती देऊ शकते. या देहाला निर्वाहापुरते खायला द्या, शरीर यात्रा चालेल इतकेच प्यायला द्या, या देहाचा फक्त साधन म्हणून विचार करा. या देहापासून कायमची सुटका हवी असेल, किंवा पुढे जन्मांतराच्या देहांपासून कायमची सुटका हवी असेल तर या देहाची आसक्त होऊ नका. प्रेम फक्त परमेश्वराशी करा.
पहा बरं ! मधमाशी मध चाखते, पण उडताना ते घेते, पुन्हा मधावर बसत नाही. आणि जर चुकून मध चाखून बसली तर तिचा जीव जातो आणि ती त्या मधाला चिकटून मरते. म्हणून आपणही फक्त या देहाचा उपयोग करायचा आहे या देहाची चिपकायचे नाहीये. या देहाला चिपकले या देहाची आसक्ती धरली तर समजा पुन्हा जन्ममरणाच्या फेरा आहेच.
एक काम करा, तुमची दहाही इंद्रिये देवाला द्या, अर्थात संन्यास घ्या. त्या इंद्रियांचा उपयोग देवाच्या आज्ञेप्रमाणे करा. त्यालाच संन्यास असे म्हणतात. इंद्रिय देवाला दिले म्हणजे तो त्यांची काळजी घेईल. या इंद्रियांचे गुराखी व्हा. गो शब्दाचा अर्थ इंद्रिये असा आहे. आणि जर इंद्रिये भगवंताकडे जात नसतील तर प्रथम मन भगवंतात घालावे. मन गेले तर इंद्रिये आपोआप भगवंताला अनुसरतात. मन हे वासरू आहे, इंद्रिये गाय आहेत. वासरू जिथे जाईल तिथे गाय स्वतःच जाते. देवानेही आधी वासरांना चारले, मग गाई चरायला सुरुवात केली. जेव्हा मनासह इंद्रिये भगवंताशी जोडली जातील, तेव्हा तुमचे प्रेमही भगवंताशी जोडले जाईल आणि त्यामुळे शरीराशी ममता आसक्ती राहणार नाही.