आपले दुःख पाहून भगवंताला कृपा उत्पन्न का होत नाही?
एकदा परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामी जी आपल्या
आसनावर बसले होते. तेवढ्यात समोरून एक बैल हळू हळू चालला होता. त्याचा मालक त्याला
हळू चालण्यामुळे काठीने मारत होता. ते एका बाईने पाहिले.
स्त्रियांच्या मनात लवकरच दया येते. त्या बाईनी भगवंतांना विचारले कि ‘‘आपण दयाळू, कृपाळू असूनसुद्धा ह्या बैलावर दया का करत नाही?’’ तेव्हा सर्व जीवांची पापकर्मे जाणणारे सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामीजी म्हणाले ‘‘बाई तुम्हाला याच्या मागील जन्मातल्या कर्मांची ओळख नाही. मागील जन्मात हा किती वाईट पाप करून हा जीव
आलेला आहे. हे आम्ही जाणतो. आम्हाला प्रत्येक
जीवाचे मागील अनेक जन्माचे चांगले आणि वाईट कर्म माहिती आहे म्हणूनच आम्हाला त्या बैलाची दया आली नाही.’’
आताही चांगली
माणसे या समाजात आहेत. त्यातलाच एक अनुभव :-
काही दिवसांपूर्वी आम्ही एका उपदेशी बंधूंच्या घरी गेलो होतो. रिक्षातून उतरतांना
मजजवळची बॅग त्या रिक्षेत राहिली. त्या बॅगमध्ये माझ्या संन्यास दिक्षेच्या फोटांचा एक अलबम व काही धार्मिक पुस्तके तसेच एक-दोन तोळ्याचे
सोन्याचे मेडल होते. जे राष्ट्रपतिंनी मला पुरस्कृत केले
तेव्हा दिले होते. हे सर्व त्या बॅगेत होते
ती रिक्षामध्ये राहिली. ५/१० मिनिटानंतर आम्हाला बॅगची आठवण आली. आणि खूप चिंता
वाटली. आता कसे करावे सुचेना. आणि त्या रिक्षावाल्याला शोधणे
ही काही साधी गोष्ट नव्हती. शेकडो
रिक्षा रस्त्यावरून धावत असतात.
तरीही आम्ही शोधाशोध सुरू केली. पण निराश होऊन मंदिरात परतलो.
माझ्या बंधूंनो आणि बहिणींनो! तुम्हाला
वाचून आश्चर्य वाटेल की, जेव्हा आम्ही २ तासानंतर पुन्हा मंदिरात
पोहोचलो तेव्हा समजले की रिक्षावाला आमची पिशवी मंदिरात देऊन गेला होता. अशा प्रकारचे
अनेक चांगली माणसे आजही या समाजात वावरत आहेत. म्हणून सामाजिक संतुलन आहे.
मनुष्य हा स्वार्थी असतो. बऱ्याचदा साध्या साध्या वस्तूमुळे त्याचे
मन बेईमानी होऊ शकते. परंतु एक गोष्ट आठवण ठेवा
- जरी तुम्हाला पाप करताना कोणी मनुष्य
पाहत नसेल परंतु देव हा सतत आपल्याकडे पाहत असतो. देवाचा CCTVचे आपल्याकडे सदैव लक्ष असते. लहान-लहान पाप सुद्धा क्षमा
होत नाही. त्याची शिक्षा ही भोगावीच लागते. नंतर रडण्यात ओरडण्यात
काहीही अर्थ नाही. म्हणूनच आताच खऱ्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा.
बरेच लोक तक्रार आमचे दुःख रोग आणि चिन्ता का सतावते? संपत्तीची कमतरता
का भासते? तसेच दैनंदिन अडचणी त्वरीत का बरं मिटत नाही? आम्ही पूजापाठ करीत
असूनही आमचे मन अशांत आणि दुःखी का राहते?
इत्यादि तक्रारी करून काहीही फायदा नाही. आपल्या सुखदुःखाला आपणच कारण आहोत. सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता । आपल्याला कोणीही सुखदुःख
देत नाही. ते आपल्या कर्मांमुळेच आपल्याला मिळते. याचा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे.
‘‘देवपूजा कशा प्रकारे करावी? देवपूजा करण्याची पद्धत काय?’’ परमेश्वर काय सांगितले आहे आणि आम्ही काय करीत आहोत?
या प्रश्नांची उत्तरे आपल्याआपणच शोधली पाहिजे. आपल्या अधर्माचरणामुळे आपण परमेश्वराचे पूर्ण प्रेम,
आनंद,
कृपा, प्रसन्नता प्राप्त
करु शकत नाही आहोत.
देवपूजा करण्याचा यथोक्त विधी :-
जर श्रीचक्रधर स्वामीजींचा विशेष हातात असेल तर पाचव्या नाममंत्राचा उच्चार करीत नमस्कार करून प्रेमाने विशेष पुढे द्या व श्रीदत्तात्रेयप्रभुचा विशेष हातात असेल तर दुसऱ्या नाममंत्राचा उच्चार करावा. श्रीदत्तात्रेय प्रभु आपल्या पवित्र सेवा संबंधांना माझे विनम्र दंडवत प्रणाम तसेच दुसऱ्या नामाचा उच्चार करावा. परंतु पूजा सुरु झाल्यापासून समाप्त होईपर्यंत आपण भजन स्तोत्र, पारायण वर किंवा गप्पा गोष्टीवर जोर देतो. हे आम्ही अनेक ठिकाणी स्वतः पाहिले आहे. ‘‘त्याचे आम्हाला अत्यंत दुःख होते. देवपूजेच्या वेळी मोठ्याने बोलू नका ज्या मुळे मुखातील दुर्गन्धी परमेश्वराच्या पवित्र विशेषावर व प्रसादावर पडते. त्यामुळे फायदा, इष्ट, योग्यता होण्याऐवजी अनिष्ट, अविधी, मोठे पाप वाढवित जातो.
बरेच लोक देवपूजा करते वेळी काहीही बोलत नाही. जलद गाडीप्रमाणे विशेष कपाळाला लावतात आणि लवकर लवकर देवपूजा आरती करून केंव्हा एकदा घरी जातो असे त्यांना होते. एवढंच काय काही लोक विशेष नमस्कार करताना वाकत सुद्धा खाली करत नाही. काही बन्धू भगिनी विशेष नमस्कार करताना इतकेच बोलतात की ‘‘परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधास माझा दंडवत’’ तर बंधूनों हे नाम नाही. ही प्रसादसेवा करण्याची योग्य पद्धत नाही. हे सांगण्याचे तात्पर्य एवढंच की, हे विशेष म्हणजे बाहेर रस्त्यावर पडलेले पाषाण नाहीत. यांना परमेश्वराच्या श्रीचरणाचा संबंध झाला आहे.
देवाने नामस्मरणाचे
१० लाभ सांगितले आहे. भजन स्तोत्राचे,
गप्पा गोष्टीचे नाही सांगितले. कोण काय बोलते? कोण काय करते? याकडे आपण लक्ष देऊ नका. मंदिरात
आल्यावर शक्यतो मौन राहूनच स्मरण करा. नाहीतर साधुसंतांशी धर्मवार्ता करा. अन्यवार्ता
करू नका. आपण स्वामींच्या आज्ञेनुसार वागून आपलं
स्वतःचं कल्याण करायचं आहे. घरात कोणाचा मृत्यू झाला तरी आपण घरात आपला देवधर्म करु शकतो. स्त्री जातीला मासिक धर्मात पण देवधर्म
करण्याची पूर्णपणे देवाने आज्ञा दिली आहे. त्या काळात देवधर्म
सोडून देणे ही चुकीची गोष्ट आहे.
विशेष, प्रसाद
नमस्कार करताना जर नाममंत्राचा उच्चार केला नाही.
तर ती देवपूजा करण्याचा काहीच फायदा होणार
नाही. आपले जीवन व्यर्थ होऊ नये म्हणून आपल्या गुरुंनी जे पाच
नाममंत्र दिले आहेत. त्यांचे स्मरण करणे खुप आवश्यक आहे.
जे जीवन फुकट गेले त्याबद्दल दुःख करुन, पुन्हा
निरर्थक वेळ वाया न घालवण्याची प्रतिज्ञा करून येथून पुढे निश्चय करावा
की, जो विशेष आपण नमस्कार करतो त्या अवताराच्या नाममंत्राचे भावपूर्वक,
श्रद्धापूर्वक उच्चारण
करावे.
तरूणांनीही लक्षात
घ्या ! तरुणपणातच मनुष्य चांगला देवधर्म करू शकतो. म्हातारपणी तर माणसाला नानाप्रकारच्या
आजारांनी घेरलेले असते. दुःखामुळे देव आठवत नाही. आणि हा चौऱ्यांशी नरकांचा फेरा चुकत
नाही.
आधुनिक सूनांचेही फार वाईट वागणे.
काही दिवसांपूर्वी आम्हाला एका माताजीने आपली कर्मकहाणी सांगितली की, माझ्या लग्नाच्या पाच वर्षानंतर माझ्या पतीचा मृत्यु झाला. त्यावेळी मला एक वर्षाचा एकच मुलगा होता. माझे आई-वडिल खूपच गरीब होते. काही दिवसानंतर वडिलांचाही मृत्यु झाला. माझे पती वारल्यानंतर सासु सासरे, दीर-भाये यांनी मला काहीही मदत केली नाही. मी माझीच माझ्या पायावर उभी राहिली. लोकांचे कपडे शिवून, धूणी-भांडी करून आपले जीवन चालवित आले. खुप कष्ट करून मुलाला शिकवले, नोकरीला लावले आणि लग्न करून दिले.
माझा मुलगा
चांगला आज्ञाधारक होता. मला खूप अपेक्षा होती की, माझे मातारपणीचे दिवस तरी चांगले
जातील. मुलगाही आज्ञाधारक आहे माझी पूर्णपणे सेवा करील. परंतु बाईजी जेंव्हापासून माझी सून आली तीने असा काही चक्कर चालविला की, मला दोघेही घराबाहेर काढण्यासाठी तयार झाले. मला सतत
म्हणतात की, ‘‘इथे जागा कमी आहे आपण
सर्व एका घरामध्ये राहू शकत नाही. आमचे मित्र,
नातेवाईक येतात त्यामुळे खूपच त्रास होतो. आपण दुसरीकडे भाड्याने
घर घेऊ तिथे तू रहा. किंवा वृद्धाश्रमात रहा’’
मी नाही म्हणते
तर मुलगा सून प्रत्येक वेळी भांडतात. शिवीगाळ करतात.
शेवटी नालाइलाजाने मी शहराच्या बाहेर एक घर भाड्याने घेतले कारण
शहरामध्ये रूमचे भाडे खुप जास्त आहे. बाईजी
माझ्या मनाला खूप त्रास झाला. मी खुप डिप्रेशन मध्ये आहे. या
दिवसांसाठी का मी माझ्या मुलाला शिकविले, वाढविले का? पत्नीच्या मागे लागून त्याने माझी थोडीसुद्धा काळजी केली नाही. बाईजी मी खूपच
दुःखी आहे. असे म्हणून ती रडू लागली.
अशा आई बापाला त्रास देणाऱ्या माणसांना त्यांची पापांची क्षमा
कसे बरे होईल !!
अशांची दुःखे पाहून देवाला काबरं किव येईल!!
तीच बाई पुढे सांगते - बाईजी पंधरा दिवसापूर्वी ते दोघेही रिक्षात जात होते तेंव्हा
एक ट्रकबरोबर त्यांची टक्कर झाली. माझ्या सूनेची पाच-सहा हाडे मोडली. जरी मुलाचे प्रेम
माझ्यावर नसले परंतू आईचे प्रेम मुलावर असतेच म्हणून पंधरा दिवसांपासून त्यांची हॉस्पिटलमध्ये सेवा करीत आहे मी. सांगू शकत नाही
आणखी किती दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवतील.
म्हणून माझ्या बहिण - भावांनो !!
सून-मुलगी, सासु-सासरे पती-पत्नी सर्व जण स्वार्थी असतात. केवळ एक परमेश्वरच असा आहे की तो निःस्वार्थी आहे. तोच
आपला भाऊ आहे. म्हणूनच श्रीचक्रधर स्वामीजी पुन्हा पुन्हा सावधान करतात की, कोणाचेही मन दुखवू नका, कोणाचा तळतळाट घेऊ नका. कारण त्याची क्षमा होत नाही. त्याची
शिक्षा ताबडतोब किंवा म्हातारपणी ही भोगावीच लागते. आणि मग तेव्हा रडण्याचा किंवा पश्चाताप करण्याचा काहीही फायदा होत नाही. देवालाही कृपा उत्पन्न होत नाही. देवधर्म करूनही
आपले दुःख कमी होत नाही.
एक भाजी विक्रेता
आम्ही एके दिवशी रात्री नऊ वाजता एका सद्भक्ताला भेटून परत येत होतो. मंदीरात
जाता जाता थोडाफार भाजीपाला घेऊन जाण्याचा विचार मनात आला. एका
भाजी विक्रेत्याकडे भाजी घेतांना पहाण्यात आले की, त्याच्या टोपलीमध्ये ४-५ किलो वांगी सडलेल्या व कुजलल्या स्थितीत
होते.
मी त्या भाजी विक्रेत्याला विचारले की, ‘‘दादा ही सडलेली वांगी तु कां ठेवली आहेत?
त्याने उत्तर दिले की, ‘‘बाईजी या मालाला
सुद्धा घेणारे आहेत.’’ हे ऐकून मी आश्चर्यचकीतच
झाले की ‘‘या किडे पडलेल्या वांग्याना कोण घेत असणार? व कोण खाणार?’’ मी भाजी विक्रेत्याला विचारले असता त्याने उत्तर दिले, ‘‘बाईजी तुम्ही
तुम्हाला घ्यायचे ते घ्या, बाकी चौकश्या काय करायच्या आहेत?’’ : परंतु मी
पुन्हा पुन्हा विचारत हट्टालाच पेटले तेव्हा त्याने
सांगितले की, ‘‘एक हॉटेलवाला माझा ग्राहक आहे तो रोज उरलेला सर्व माल घेऊन जातो.
’’
माझ्या सर्व बंधू-भगिनींनो आता आपणच विचार करा की,
हाच भाजीपाला आपल्याला तेल, मिठ, मिर्ची, मसाले
टाकून खाऊ घातला जातो व त्यामुळे आपणास रोग उत्पन्न होऊन अनेक व्याधींना सामोरे जावे
लागते. असेच आहे आमचे भाग्य.
कोणी जगो अथवा मरो, कोणत्याही प्रकारे धन संपत्ती कमविणे हेच जीवनातील ध्येय (Aim) ठरवून ठेवले आहे असे वाटते. अशा प्रकारे धनार्जनाचे लोभी जे अनेक पापकर्मे करतात त्यांना परमेश्वर कशी क्षमा करणार?
अनेकांचे पत्र आम्हाला येतात ते लिहितात की, बाईजी आम्ही पुजा करतो, मंदीरात जातो तरीही आमचे जीवन कष्टमय कां? परमेश्वराला आमची दया का येत नाही? त्यामुळे तर आम्हाला आता भक्ती सुद्धा करावीशी वाटत नाही.
अशा अनितीने वागणाऱ्यांनी कितीही देवधर्म केला अथवा पूजापाठ
केले तरी परमेश्वर त्यांना कधी क्षमा करणार हे आपणच ठरवावे,
अनेक व्यक्ती कितीही दु:खी कष्टी असल्या तरीही पापकर्मे करीतच
राहतात. त्यांना थोडेही काही वाटत नाही. आणि उलट देवालाच दोष देतात. चांगले केले तर मी केले
आणि वाईट झाले तर देवाने केले. असे अज्ञान लोक देवालाच दोषी ठरवतात.
सर्वांनी या गोष्टींचा विचार अवश्य करावा.
रूपाबाई गीताबाई पंजाबी