परमेश्वरभक्ती कराल तरच संसार दुःखापासून मुक्ती मिळेल !!
बंधुनो आणि माझ्या
भगिणींनो ! संसारात रात्रंदिवस येणारे दुःख, दुःखदायी
विचार, ‘कसे होईल? काय होईल?’ अशी वाटणारी चिंता
व अडचणी यापासून मुक्तता
मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजेच ईश्वरभक्ति. जोपर्यंत आपण परमेश्वराच्या भक्तीत रममाण होत नाही. तोपर्यंत
कर्मे आपला पिच्छा सोडणार नाहीत. मग तुम्ही म्हणाल की, जे भक्ती करतात त्यांनाही तर
दुःखे आहेतच? तर तुमचे म्हणणे हे पूर्ण सत्य आहे. पण भक्ती करणाऱ्याना दुःखांची छळ
कमी पोहचते. भाल्याचा घाव काट्यावर निमानला जातो. जे कर्म भोगण्यासाठी सिद्ध
आहेत. ते तर भोगावेच लागतात. पण ते भोगतांना भक्ताला दुःख कमी दिले जाते. दुःखाची तीव्रता
कमी होते. आणि पुढे अनंत जन्मांमध्ये भोगाव्या लागणाऱ्या दुःखांपासून मुक्तता होते.
बरेच लोकं असे
म्हणतात की, ‘‘कोणी पाहिले नरक? हे धर्मशास्त्र काहीही सांगतात. नरक वगैरे काही नसते,
ही अंधश्रद्धा आहे’’ असे बोलून स्वतःची व इतरांचीही प्रतारणा करतात.
त्यांचा १ला प्रश्न हा की, कोणी पाहिले नरक? नरक वगैरे काही
नाही? तर त्या मित्रांना मला सांगावेसे वाटते की, नरक पाहण्यासाठी तुम्हाला इतरत्र
जाण्याची गरज नाही. इथेच तुम्ही गाई, म्हैसी, बैल, कुत्रे इत्यादि प्राण्यांकडे पहा.
तेही आपल्या सारखे जीवच आहेत. किंवा गटारीतले किडे, अळ्या हेही तुमच्या आमच्यासारखे
जीवच आहेत. ते पापामुळे त्या जन्मात गेलेले आहेत. त्यातही खूप दुःख असते. एखाद्याने
गटार साफ केली, त्यातील अळ्या, किडे तो बाहेर काढून ठेवतो. आणि त्या अळ्या उन्हाने
तडपून मरतात तर हे नरक नाहीत का?
एखादे मोकाट कुत्रे
एका भाकरीसाठी घरोघरी फिरते, त्याला दगड मारून हाकलले जाते हे नरक नाही का?
आपण बऱ्याच ठिकाणी पाहिले असेल एखाद्या कुत्र्याला खरुज खाजेसारखा
आजार होतो, त्याचे सर्व केस गळून जातात. आणि त्याची कातडी सडत जाते. ते खाजवत जाते
आणि पिसाळते आणि खुप हालहाल होऊन मरण पावते हे नरक नाहीत का?
एकदा एक महात्मा सकाळी सकाळी फिरायला गेले. रस्त्यात एक कुत्र्याचे
लहान पिल्लु दोन-तीन दिवसाचे असेल. ते एकटेच इकडे तिकडे भटकत जोरजोराने भुंकत होते.
डिसेंबर महिण्याची गुलाबी थंडीत कुडकुडत होते. त्याच्या आईला शोधत भटकत होते. रात्रभर
भुंकून भुंकून त्याचा गळा पार सोखला होता. दुसऱ्या दिवशी तिकडे गेल्यावर त्या पिलाचे
प्रेत पडलेले दिसले. ते भुकेने ओरडून ओरडून मरण पावले होते. हे नरक नाहीत का?
आणखी अशीच एक घटना, एका कुत्रीने चार पिलांना जन्म दिला व काहीतरी
प्लॅस्टीकसारखे खाल्ल्यामुळे ती मरण पावली व तीन चार दिवसात ती पिल्लेही भुकेने मेली.
हे नरक नाहीत का?
बंधुंनो ! अशा असंख्य घटना आपल्याला अनुभवाला येतात पण आपण मुद्दामहून
त्याकडे दुर्लक्ष्य करतो. कळते पण वळत नाही अशी आपली अवस्था आहे. म्हणून नरक वगैरे
शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी पुर्णसत्य आहेत. त्याला अंधश्रद्धा मानून स्वतःला आपण
नरकांच्या खाईत लोटत आहोत.
बंधुनो! आपणास दहावी पास होण्यास कमीत कमी दहा वर्षे,
बी.ए. होण्यासुद्धा १४ वर्षे घालवावे लागतात. संसारामध्ये तर वेगवेगळ्या कामामध्ये आपण आपले सर्व
जीवन व्यतीत करत चाललो आहे. या दुःखाने धगधगत्या जीवनात आपणास
आपल्या जीवास मोक्षमार्गची वाट कोणती आहे हे समजत नाही. परमार्थ म्हणजे काय आहे? याचीही जाणीव नाही, कमीत कमी एवढा तरी विचार करावा की, आपण कोणाच्या सान्निध्याने किंवा सहवासाने संसार सागरातील दु:खापासून सुटू शकतो. याचा विचार आपण
जरूर करणे आज प्रत्येक जीवास गरजेचं झालेलं आहे.
यासाठी भगवान श्रीकृष्ण महाराजांनी १५ व्या अध्यायाच्या ४ थ्या
श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की, आपणास जर जीवन मरणाच्या फेऱ्यातून सुटायचे असेल तर आपणांस मोक्षमार्गाची
वाट (Research)
शोधावी लागेल ती शोधण्यास आपणांस आपण काय करत आहोत यासाठी आपण
आपणासच तपासून घेण्याची गरज आहे आपणास मोक्षमार्ग मिळवायचा असेल तर आपणांस परमेश्वरीय
सहवासाशिवाय गत्यंतर नाही. परंतु आपण परमेश्वरीय सहवास तर सोडा.
परमेश्वराच्या भक्तिमार्गालाच जाण्यास का कु करत
आहोत. भक्ती मार्गासच आपण (Third Class) कमी दर्जाचे मानण्यासही मागेपुढे पाहात नाही याचे मोठे दु:ख वाटते. परमार्थ
करणाऱ्याची बऱ्याच ठिकाणी खिल्ली उडवली जाते. म्हणूनच भावांनो आपणांस
सांगणे आहे की, वेळीच सावध व्हा व आत्मपरिक्षण करून भक्तिमार्गाकडे आपण किती ओढ ठेवत
आहे हे तपासा.
आपण जर बाजारात गेलो, तर भाजी घेण्यासाठी चार - दोन ठिकाणी चौकशी करतो परंतु ‘भक्तिमार्गाबद्दल’ कोणांस कधी विचारतो का? जर आम्ही एखाद्यास याबद्दल विचारणा केली तर आम्हास उत्तर मिळते
की,
आमचे आई-वडिल आमुक एखादी पुजा करत असत तशी,
आम्ही पुजा करत असतो.
परंतु भक्तजन हो, आपल्या आई-वडिलांनी योग्य भक्तिमार्ग शोधण्याचा प्रयत्न केला
नाही, कारणे काहीही असो परंतु त्या जीवांना संसारामधून
खाली हातानेच पुढील योनीत जावे लागले ना? याचा विचार करा.
आपला जन्म झाल्यावर आपणांस जेंव्हा समज येते तेंव्हा आपणांस
वाटते की,
‘‘आपला या भुतलावर पहिल्यांदाच जन्म
झाला आहे’’. प्रत्यक्षात मात्र तसे नसून आपण अनेक लाखो
योनींचे जन्म भोगून या पवित्र मनुष्य जन्माला
आलो आहोत. युगायुगी आपण वेगवेगळ्या जीवांचे जन्म घेऊन जगत-मरत या मनुष्य जन्मापर्यंत
आलो आहोत. प्रत्येक जन्मात अनेक प्रकारचे दुःख भोगत आलो आहोत. अनेक प्रकारच्या चिन्ता
करत आलो आहोत. प्रथम आपली चिन्ता व नंतर आपल्या मुलाबाळांची चिंता करत आलो आहोत. एखाद्या
६०-७० वर्षाच्या (म्हाताऱ्यास) त्याच्या दुःखाविषयी विचारले तर तो अनेक दुःख आपणांस
सांगून व्यथित होतो व स्वतःच्या कर्माला रडत बसतो. एवढे दुःख भोगून सुद्धा आपणांस काहीच
वाटत नाही. तेवढ्यापुरते भावनाविवश आपण होत असतो व पहिल्यासारखेच वागणे सुरू ठेवतो. जसे नालीमध्ये असंख्य किडे दिवस रात्र वळवळ करतात तसेच आपले वागणे नव्हे काय?
यातून
आपणांस बाहेर व्हावे असे वाटत नाही का?
म्हणून नीट समजून घ्या व आजच
योग्य वर्तन सुरू करा.
ईश्वराने आपणांस संसारामध्ये कशासाठी जन्म दिला याची
माहिती आपणांस असणे आवश्यक आहे.
भगिनींनो आपण अनेक जन्मांत, अनेक प्रकारच्या चिंता करत या सृष्टीत जन्मास आलो आहोत. या जीवांच्या
दु:खभोगाच्या चक्रातून सुटण्यासाठी परमेश्वराची अनन्य भक्ति करून ईश्वरचरणी सेवा मिळावी म्हणजेच आपल्या जीवांस
वेगवेगळ्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळावी यासाठी हा जन्म आपणास मिळाला आहे.
श्रीकृष्ण भगवंतांनी आपल्या अमृतमय
वाणीने श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमाद्वारे आपणास सांगितले आहे. परंतु लोक आपल्या मनाप्रमाणेच
मनमानी करून वागत आहेत व आपल्या पापांचा घडा विनाकारण भरत आहेत. यामुळे आपल्या भगवतांना
दु:ख वाटून खंती येते. अपूर्ण ज्ञानाने भक्तिमार्गात मनमानी केल्याने आपणांस ‘मोक्ष मार्ग’ची वाट कदापीही सापडणार नाही.
भगवंतांनी भगवद्गीतेतील अध्याय क्र. १८ श्लोक क्र. ६२
ते ६६ मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व धर्माचा त्याग करून
केवळ मला शरण या व लीन व्हा. आपल्या सर्व पूर्व जन्मांची पापकर्मांचा नाश करून जीवन
मरणाच्या चक्रातून आपली मी सुटका करून आपणांस आनंद प्राप्त करून देईल.
याप्रमाणेच अध्याय ९ श्लोक २५, अध्याय ८ वा श्लोक क्र. १४, १५, १६ मध्येही वरीलप्रमाणेच स्पष्टपणे शरण येण्यास सांगितले आहे. यापेक्षा आणखी आपणांस
मुक्तीची कोणती गॅरंटी पाहिजे. भगवंतांनी ७ वा अध्याय श्लोक १५ वा व २१ ते २५ श्लोकामध्ये
देवता भक्ति करणाऱ्यांना अल्प बुद्धीचे किंवा बुद्धिहीन संबोधले आहे.
अध्याय ११ मध्ये ५२ व्या श्लोकाच्या आधारे भगवंत सांगतात
की, ‘खुद्द देवतांच माझ्या रात्रंदिवस आकांक्षा करतात.’ आणि अज्ञान लोक देवता
व माझ्या (परमेश्वर) सामर्थ्याची तुलना एकसारखी करतात. दोघांना
समान समजतात. म्हणुन भगवंत आपल्या बुद्धिची किव करतात व आपणांस वरीलप्रमाणे बुद्धिहीन
समजतात. म्हणूनच भगिनींनो !! आपण हे आता तरी लक्षात घ्या की,
परमेश्वर व देवता एक नसून परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे. ईश्वर सर्वश्रेष्ठ नसते तर देवता त्यांच्या दर्शनासाठी
त्रासल्या असत्या का? ईश्वर दर्शनासाठी देवता अती आतुर असतात. ११ व्या अध्यायामध्ये
१५ ते ३९ व्या श्लोकांमध्ये ब्रह्मा, विष्णु व महादेव यांचा निर्माताही मीच आहे असे सांगितले आहे.
थोडक्यात बन्धु आणि भगिनींनो ईश्वर भक्तिपासूनच आपल्या जीवांस
मुक्ती लाभते. देवता भक्तिपासून मुक्ती लाभत नाही. जर आपण एवढे सागून डोळे झाकून गप्प
बसाल तर आपले अद्यापही डोळे उघडले नाहीत तर मात्र आपले कर्मभोग आपणांस संसाराचा व इतर
दुःखाच्या खाईतून बाहेर पडून देत नाहीत. आपल्या नशीबांत हेच दुःख लिहलेले असून मुक्ति
मात्र लिहीली नाही.
आपले मन ईश्वर भक्तिस मानत असेल किंवा नाही परंतु भगवान श्रीकृष्णांच्या अमृतमय वाणीतून निघालेले श्लोक श्रीमद्भगवद्गीताच्या
माध्यमातून वाचा आपल्या जाणकर मित्राच्या माध्यमाने समजून घ्या.
या संसारात कोणत्याही वेदांत, शास्त्रात, ग्रंथात, पुराणांत रामायणांत असे काही सांगितले नाही की मुक्ती यापासून
मिळते. मात्र भगवान श्रीकृष्ण महाराज आपण सर्वांना भेदभाव न करता मुक्ती देण्याचं आश्वासन
देतात अट मात्र एकच, ‘मनोभावे माझ्या चरणी शरण या’
एवढेच. तेंव्हा जागे व्हा व योग्य निर्णय घ्या. परमेश्वर चरणी
शरण जा !
८४ लाख योनीतील भयानक मोठमोठ्या नरक यातना
व त्यावरी तरणोपाय मुक्तीमार्ग
आपल्या पूर्वकर्मानुसार व सद्य कर्मानुसार आपणांस देह त्याग
म्हणजे मरण येते. हे अटळ आहे. आपण ज्या वेळेस मृत्युच्या दारात म्हणजे उंबरठ्यात
पाय ठेवतो त्यावेळी आपणास हजारो विंचू - चावून ज्या वेदना होतात तशा वेदना होतात व
मग आपणांस त्या असहाय्य वेदनातून शरीर त्याग करावा लागतो आणि नंतर आपणांस आपल्या गेलेल्या
जन्मातील पापांच्या बदल्यात अनेक प्रकारचे दुःख भोग भोगावे लागतात.
काही लोक उगीचच फुशारीकीने आपल्या पापांवर झाकण टाकण्यास जाणीवपूर्वक
म्हणतात,
‘कशाचे नरक आणि कशाचे काय?
कोणी पाहिले आहे नरक?’ हे आपणांसही योग्य वाटते का? प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण भगवंतांनी आपणांस गीतेतून उपदेश
केला तो काय खोटा आहे काय? अविश्वसनीय आहे काय? सर्व पुरातन ग्रंथ व शास्त्र खोटे आहे काय? की ज्यामध्ये नरकांमधील हालाखीच्या गोष्टींचे विवरण केलेले आहे.
हे आपणांस सत्य वाटत नाही काय? आपणांस रस्त्यावर दोन दोन मन सिमेंट किंवा लोखंड ओढत असणारे
बैल दिसत नाही काय? एवढे ओझे ओढूनही वरून त्यांना चाबुकाचा मार मिळतो, गल्लीमध्ये रस्त्यांवर मोकाट, तहानलेले भुकेलेले कुत्रे, गाढव, डुक्कर तुकड्यांसाठी कायम फिरतांना दिसतात. हे त्यांचे पूर्व
जन्माचे कर्म असून ते एक प्रकारे पाप कर्मांची फेडच आहे या प्रकारच्या योनीत येऊन फेडत आहेत याची जरा जाणीव करून घ्या
- या सर्व पशु योनी त्यांनी मनुष्य जन्मात पाप करूनच जोडलेल्या आहेत. आणि त्या पापांची
फळे भोगत आहेत.
झोपडपट्टीमध्ये अनेक दुःखी माणसे, तसेच फुटपाथवरही अनेक माणसे आपले दुःखी जीवन कंठत आहे. अन्नावाचून मरमर,
शरीरांस झाकण्यांस कपड्याची उणीव,
ऊन-वारा-पाऊस यापासून वाचण्याची म्हणजेच निवाऱ्याची मरमर, असे हे दुःखी जीव आपण पहात नाहीत काय?
अशा अनेक घटना वर्तमान पत्रात वाचल्या की आपले डोळे उघडल्यावाचून
राहणार नाही. जरा तसदी घ्या व वाचण्याचे कष्ट करा व ज्ञान मिळवा. तेंव्हा अद्यापही
वेळ गेलेली नाही इतर देवी-देवतांची भक्ती सोडून परमेश्वराची भक्तीस तात्काळ लागा व आपला प्रत्येक क्षण ईश्वरचरणी लावा. आणि आपले नरक चुकवा. आपल्या जीवाचे
कल्याण करा.
श्रीकृष्णभगवंत गीतेत सहाव्या अध्यायात म्हणतात -
आत्मैव ही आत्मनो बन्धु आत्मैव रिपुः आत्मनः
आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रु आहोत. म्हणून स्वतःच
स्वतःचे मित्र बना आणि आपल्या मनाला परमेश्वरभक्तीत लावा. स्वतःचे शत्रु बनून स्वतःला
नरकाच्या अग्नित जाळू नका.