श्रीकृष्ण चरित्र भाग 03 - पूतना वध महानुभाव पंथिय ज्ञान सरिता

श्रीकृष्ण चरित्र भाग 03 - पूतना वध महानुभाव पंथिय ज्ञान सरिता

 श्रीकृष्ण चरित्र भाग 03 - पूतना वध 

सर्वप्रथम वाचकांना हे आवर्जुन सांगावेसे वाटत की श्रीकृष्ण भगवंत हे परब्रम्ह परमेश्वराचे अवतार आहेत. विष्णु देवतेचे अवतार नाहीत. श्रीकृष्ण भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत आपला परिचय दिला आहे. ते सर्वांच्या पलिकडे असलेला जो परमेश्वर त्याचे अवतार आहेत. मी विष्णुचा अवतार आहे असे भगवंतांनी कुठेही म्हटलेले नाही. हे श्रीकृष्ण चरित्र महानुभाव पंथिय तत्त्वज्ञानाला धरूनच लिहिले गेले आहे. 

गोकुळात आनंदोत्सव आणि पुतना वध

गोकुळात गवळ्यांचा राजा असलेल्या नंदराजाला एकही अपत्य नव्हते. अनेक नवस सायास करूनही त्यांना पुत्र मुख पाहायला मिळालेले नव्हते. पण भगवंताच्या कृपेने मागील जन्मीच्या पुण्याईने प्रौढावस्थेत जेव्हा यशोदेला अपत्य होण्याची आशा निर्माण झाली तेव्हा सगळ्या व्रजात आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला. श्रावण महिन्यातील कृष्णपक्षाच्या अष्टमीच्या रात्रीच यशोदेला पण मूल झाले. 

परंतू त्यावेळी तर गोकुळातले सर्व लोकं एवढेच नव्हे तर यशोदा माता पण भगवंताच्या मायेने खुप गाढ निद्रेत होती. वसुदेवराजे यशोदा मातेच्या मुलीला घेऊन गेले आणि श्रीकृष्णचंद्र भगवंताला यशोदेजवळ ठेवून गेले. वसुदेवराजे गेल्यानंतर सर्वजण निद्रेतून जागे झाले. त्या सर्वांना असेच वाटले की यशोदा मातेलाच पुत्र झाला आहे. गोकुळात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला, वाजंत्री वाजू लागली. मोठा उत्सव झाला. स्वयं परब्रह्म गोकुळात अवतरले होते. म्हणून गोकुळातले वातावरण किती प्रसन्न, प्रफुल्लित असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. 

उदार सत्शील अशा नंदराजांना आपल्याला सुंदर अतिशय तेजस्वी असा पुत्र झाला आहे, हे समजताच अतिशय परमोच्च आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्यांनी सुशोभित सुवर्णाचे शृंग असलेल्या अशा दोन लक्ष दुभत्या गायी दान केल्या. नाना प्रकारची रत्ने आणि सुंदर रेशमी वस्त्रांनी झाकलेले उत्तम प्रतीच्या तिळांचे सात ढीग दान दिले. परब्रह्म परमेश्वराच्या प्राकट्यापूर्वीच चैतन्य मायेने परमेश्वराच्या लीलास्थळाला त्यांच्या प्रवृत्तीनुसारच संपन्न सुशोभित केले होते. 

ऋषि व्यासांनी भागवतात म्हटले आहे की, श्रीकृष्ण भगवंतांचा जन्मोत्सव गोकुळात मोठ्या हर्षाने साजरा झाला. स्तुतीपाठक भाट भगवंताची स्तुती करू लागले, मंगळवाद्ये भेरी आणि दुंदुभी मोठ्याने वारंवार वाजू लागल्या. गोकुळ नगरीतील सर्व घरांची दारे, उंबरठे अंगणे आणि अंतरबाह्य भाग झाडून पूसून स्वच्छ करण्यात आले. घरे, वाडे रंगीबेरंगी ध्वज, पताका, फुलांच्या माळा, नानाप्रकारची रंगीबेरंगी वस्त्रे आणि अशोक, आंबे, तुळशी इत्यादि झाडांच्या पानांच्या तोरणांनी सजविली गेली. 

गोकुळातील सर्व गाई, बैल आणि वासरे असं सगळ्या पशुधनाच्या आंगाला हळदी - तेलाचा लेप देण्यात आला व त्यांच्या शिंगांना गेरुने रंगवण्यात आले. त्यांना मोरपंखे, सुंगधी फुलांचे हार, रंगीत सुंदर वस्त्रे आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजविले गेले. गोकुळातील सर्व गोप-गवळी बहुमूल्य रेशमी वस्त्रे, सुवर्णालंकार, अंगरखे, रेशमी पगड्यांनी नटून-थटून हातात नजराणांची ताटे घेऊन नंदाच्या घरी आले. 

गोपीही सुंदर रसुंदर वस्त्रे, अलंकार आणि सुंदर डोळ्यांमध्ये काजळ घालून, विविध प्रकारच्या भेटवस्तू घेऊन लगबगीने नंदाच्या घरी निघाल्या. ‘बाळाचे परमेश्वर दीर्घकाळ रक्षण करो’ असे म्हणून हळद-तेलमिश्रित जल त्या आसपासच्या सर्व लोकांवर शिंपडीत उच्चस्वरात सुमधूर गीत गात निघाल्या होत्या. त्यांनी वेणीत गुंफलेली सुगंधी फुले वाटेत एक एक गळून पडत होती, त्याचेही त्या गोपिकांना भान नव्हते. संपूर्ण गोकुळात तुतारी इत्यादी निरनिराळी मंगलवाद्ये वाजत होती. 

आनंदभरित होऊन गोपगण एकमेकांवर दही, दूध, तूप आणि पाणी उडवू लागले. शिंपणे खेळु लागले. एकमेकांच्या तोंडाला लोणी माखू लागले आणि एकमेकांवर लोणी फेकून उत्साहात आनंदोत्सव साजरा करू लागले. नंदराजांनीही गोपांना पुष्कळ रेशमी वस्त्रे, सुवर्णालंकार आणि गायी दान दिल्या. सूत, मागध, भाट, बंदीजन तसेच नृत्य, वाद्य, गाणे, इत्यादी लोककलांवर उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.

जेव्हा श्रीकृष्णचंद्र भगवंत सहा दिवसांचे झाले. तेव्हा त्यांचा षष्ठीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला गेला. त्या दिवशी भगवंताला बाहेर अंगणात आणण्यात आले. नंतर त्या दिवशी नंदराजा काही लोकांना गोकुळ नगरीच्या संरक्षणार्थ सोडून जेष्ठ व वृद्ध गोपांच्या बरोबर घेऊन कंसाचा वार्षिक कर भरण्यासाठी याच दिवशी पहाटे बैलगाडीत दूध, दही, तुप इत्यादी भरून मथुरेला निघून गेला. गुप्तचरांनी ही बातमी कंसाला सांगितली. लगेचच कंसाने गोकुळातील लहान मुलांना मारण्यासाठी पूतना नावाच्या राक्षसीणीला बोलावले. ती कंसाची सावत्र बहीण होती. ती दुर्मल्ल राक्षसाचीच मुलगी होती. 

श्रीकृष्ण भगवंताना विष पाजण्यासाठी पुतना एका सुंदर स्त्रीच्या रूपात वृंदावनात पोहोचली होती. ती अत्यंत क्रूर राक्षसीण होता.  तिचे एकच काम होते - लहान मुलांना मारणे.  कंसाच्या आज्ञेने ती लहान मुलांना मारण्यासाठी शहरे, गावे आणि गवळ्यांच्या वस्तीत फिरत असे.  दैनंदिन व्यवहारात राक्षसांचे भय दूर करणाऱ्या भक्तवत्सल भगवंताचे नाम, गुण आणि कीर्तन स्मरण जिथे लोक ऐकत नाहीत, नाम जप करत नाहीत आणि स्मरण करत नाहीत, तिथे अशा राक्षसांचे सामर्थ्य प्रबळ होते.

ती पूतना आकाशातून फिरू शकत होती आणि तिच्या इच्छेनुसार रूप धारण करत असे.  एके दिवशी ती नंदबाबाच्या गोकुळात आली, स्वतःला मोहाने सुंदर मुलगी बनवून गोकुळात शिरली. ती राक्षसीण मायेने हवे तसे रूप घेऊ शकत होती. त्यावेळी तिने देवीप्रमाणे अतिशय सुंदर रूप धारण केले.  तिच्या वेण्यांमध्ये मोगऱ्याची फुले गुंफलेली होती.  तिने सुंदर रेशमी तलम वस्त्र परिधान केले होते. तिने बहुमोल आभूषणे परिधान केली होती. आणि एका हातात कमळ घेऊन ती फिरत होती. 

तिला बघून लोकांना असेच वाटले की साक्षात् लक्ष्मीच आली आहे. कोणीही तिला थांबविले नाही. सर्व तिच्या रुपाला मोहीत झाले.  जेव्हा तिचे कानातले कर्णफुल हलायचे तेव्हा चेहऱ्यावर येणाऱ्या सुंदर केसांची बट चमकून आणखी सुंदर दिसत होत्या. तिचे नितंब गोलाकार होते. आणि तिची कंबर रेखिव होती.  ती आपल्या मधुर हास्याने आणि राजस हावाभावांनी व्रजवासियांची मने चोरत होती.

इकडे तिकडे मुले शोधत ती अचानक नंदबाबांच्या घरात शिरली.  तिथे तिने पाहिले की बालक श्रीकृष्ण भगवंत हेच दुष्टांचा-राक्षसांचा काळ आहे.  पण अग्नी जसा राखेच्या ढिगाऱ्यात लोपला जातो, तसेच यावेळी याने आपले उग्र तेज लपवले आहे. श्रीकृष्णचंद्राला माता यशोदेने एका पाळण्यात निजविले होते. त्यांनी पुतनेला पाहिले आणि सर्वज्ञपणे जाणले की मुलांना मारणारी ही पुतण्या राक्षसीन आहे आणि त्यांनी अशातऱ्हेने डोळे मिटून घेतले की जशी त्यांना झोपच येत आहे. 

पुतनेने आपल्या स्तनांना कुणालाही पचू शकत नाही असे फार जालीम विष लावले होते. तिला वाटले होते की मुलांनी माझ्या स्तनाला तोंड लावताच ती मरून जातील. श्रीकृष्णचंद्राला ओखटे करण्याच्या विचाराने ती त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना मांडीवर घेऊन दूध पाजण्याच्या बहाण्याने त्यांच्या श्रीमुखात तिने आपला स्तन दिला. मखमली म्यानात लपलेल्या धारदार तलवारीप्रमाणे, पुतणेचे हृदय अतिशय कुटील धारदार होते, परंतु वरवर ती अतिशय गोड आणि सुंदर दिसणारी पवित्र स्त्री भासत होती. ती एका सभ्य कुलीन स्त्रीसारखी दिसत होती. आणि म्हणूनच रोहिणी आणि यशोदा, तिला घरात येताना पाहून, तिच्या सौंदर्याने मोहित होऊन थांबल्या. आणि शांतपणे पाहत राहिल्या.

सर्वज्ञ भगवान श्रीकृष्णाने पूतनेची दुष्टता ओळखली. आणि क्रोध स्वीकारला. त्यांनी तिच्या दुधाबरोबरच तिचा प्राण पण सोखण्यास सुरुवात केली. त्यामुळे पूतनेचे सारे शरीर आक्रसू लागले. वेदनांनी ती रडू लागली. तडफडू लागले. “अरे सोड, सोड” म्हणून तिने श्रीकृष्णाला सोडवू पाहिले, परंतु भगवंत तर असे चिकटून दूध पीत होते की तिचे सर्व प्रयास व्यर्थ गेले. वेदनांनी त्रस्त पूतना ओरडत तिथून निघून सैरावैरा धावू लागली. तिची सर्व माया नष्ट झाली. तिचे भयंकर रूप प्रकट झाले. तिचे डोळे बाहेर आले. 

तिचे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. तिच्या ओरडण्याची तीव्रता खूप भयंकर होती. तिच्या कर्कश ध्वनीमुळे सर्व पर्वतांसह पृथ्वी आणि ग्रहांसह अवकाश हादरले.  सातही पाताळ आणि दिशा प्रतिध्वनी मेघगर्जनेच्या भीतीने अनेक लोक आकाश कोसळले की काय या भीतीने पृथ्वीवर घाबरून पडले. अशाप्रकारे, निशाचरी पूतनेचे स्तनांमध्ये इतकी पिडा झाली की ती स्वतःला लपवू शकली नाही, आणि ती मुळ राक्षसी रूपात प्रकट झाली. आणि गोकुळाबाहेर काही अंतरावर जाऊन ती मरून पडली. 

पुतनेचे प्राणपाखरु उडून गेले. तोंड फुटले, केस विखुरले आणि हातपाय पसरले. मरतांना ती विशाल रूपात आली होती. तिच्या नाकपुड्या डोंगराच्या गुहेसारख्या खोल होत्या आणि तिचे स्तन डोंगरावर असलेल्या खडकांसारखे मोठे होते.  लाल-लाल केस सगळीकडे विखुरले होते. काळ्या अंधाऱ्या विहिरीसारखे खोल डोळे, हात, मांड्या आणि पाय नदीवरील पुलासारखे दिसत होते आणि पोट सुकलेल्या तलावासारखे दिसत होते. 

पूतनेचे ते अवाढव्य शरीर पाहून सर्व गोप मुले आणि गोपीका घाबरले. तिच्या भयंकर किंकाळ्या ऐकून आधीच ते खुप घाबरले होते. जेव्हा सर्वांनी पाहिले की बाळ श्रीकृष्ण पूतनेच्या छातीवर निर्भयपणे खेळत आहे, तेव्हा त्यांची भिती थोडी कमी झाली. व त्यातील एकाने घाईघाईने तेथे पोहोचून श्रीकृष्ण भगवंताला उचलले. व यशोदा मातेकडे सुपूर्द केले. इकडे नंदराजे मथुरेत कंसाला कर देऊन वसुदेव राजांना भेटले. वसुदेव राजांनी त्यांना सांगितले, "बंधू! गोकुळात उत्पात होण्याची भीती जास्त आहे. तुम्ही लवकर परतावे.” वसुदेव राजांची सदिच्छा भेट घेऊन नंदराजे जेव्हा गोपांबरोबर परतत होता, तेव्हा रस्त्यात त्यांनी कोसभर लांब रुंद भयंकर राक्षसीण पूतनेचा आक्राड विक्राड प्राणहीन देह पाहिला. 

. इतक्या मोठ्या राक्षसिणीला उचलणार तरी कोण? आणि तिच्या अंतिम संस्कार कसा करायचा असा प्रश्न नंदराजांना पडला. मग कुणीतरी सुचवले हिचे तुकडे तुकडे करून हिचा अंतिम संस्कार करू. मग लोकांनी कुऱ्हाडीने तिच्या देहाचे तुकडे- तुकडे करून अनेक चितांवर तिला जाळले. परब्रह्म भगवंत पूतनेचे दूध प्यायले होते, त्यामुळे ती पापिणी राक्षसीण असूनही पूतना मुक्त झाली आणि भगवंताच्या स्पर्शाने तिचे शरीर इतके पवित्र झाले होते की जळतांना तिच्या शरीरातून खूप सुगंध येत होता. त्यामुळे वृंदावनातले गोकुळातले वातावरण अशुद्ध झाले नाही. 

नंदबाबा सोबत्यांना घेऊन गोकुळात परतले तेव्हा त्याला पूतनेच्या येण्याची सर्व बातमी कळली. आणि त्यांना खूप आश्चर्य वाटले की एवढी मोठी राक्षसीन एकाएकी कशी काय मरून पडली. पण परमेश्वराने माझ्या मुलाचे रक्षण केले म्हणून त्याने देवाचे आभार मानले. असे ते भाग्यवान नंदराजे त्यांच्या घरी परमेश्वर अवतरला आहे त्याला कुणाच्या रक्षणाची गरज नाही हे जाणत नव्हते.

आधील भाग  वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇👇

भाग 01👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/shreekrishna-charitra-marathi.html

भाग 02 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/02.html

श्रीकृष्ण चरित्र भाग 04 शकटासुर वध👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/shreekrishna-lila-marathi.html

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post