श्रीकृष्ण चरित्र भाग 02
भगवान श्रीकृष्णांचा मथुरेत अवतार आणि गोकुळात जाणे
वसुदेव राजांच्या एकूण १३ पत्नी होत्या. असं म्हणतात. त्यांना वसुदेवाने कंसाच्या भयाने मथुरा सोडून दुसऱ्या ठिकाणी पाठवून दिले होते. फक्त देवकी माता वसुदेवराजांजवळ होत्या. वसुदेव राजांचा एक जवळचा मित्र होता, त्याचे नाव नंद. तो गोपांचा राजा होता आणि मथुरा नगरीच्या समोर यमुनेच्या दुसऱ्या काठावर गोकुळात राहात होता. वसुदेव राजांची एक पत्नी रोहिणी माता, तिला कंसाच्या नकळत वसुदेव राजांनी तिला मथुरेहून नंदाकडे गोकुळात पाठवून दिले होते.
जेव्हा देवकीला सातवे अपत्य होणार होते, परमेश्वराच्या प्रवृत्तीने सातव्या मुलाच्या रूपात स्वतः चैतन्य माया विग्रह धारण करणार होती. तेव्हा भगवंतांनी चैतन्य मायेला आज्ञा केली की, “देवकी मातेच्या गर्भात जो तुमचा निग्रह आहे. त्याला रोहिणीच्या गर्भात पोहोचवावे. त्यानंतर मी माता देवकीच्या गर्भात प्रकट होईन. आणि तू पुन्हा नंदाची पत्नी यशोदेची कन्या म्हणून प्रकट हो.
भगवंताच्या आज्ञे प्रमाणे मायेने देवकीचा सातवा गर्भ रोहिणीच्या गर्भात पोहोचवला. (पुढे बलरामाचा जन्म झाला. तो वसुदेवाचा सर्वात मोठा पुत्र.) सातवा गर्भ अचानक नाहिसा झाल्याने सर्वांना असेच वाटले की कंसाच्या भयामुळे देवकीचा गर्भपात झाला. देवकी मातेलाही तसेच वाटले. पुन्हा खुप दुःख झाले. पुढे त्यानंतर स्वतः परमेश्वर देवकी - मातेपोटी जन्म घेणार होते. परमेश्वराने गर्भात प्रवेश केला तेव्हा देवकी मातेच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज पसरले. इतके की कोणी तिच्याकडे पाहू देखील शकत नसे. वसुदेव राजांनाही खूप आश्चर्य वाटत होते.
आठव्या गर्भधारणेची बातमी ऐकून कंसाने कारागृह बंद केले आणि बरेचसे पहिलवान पहारेकरी तेथे नेमले. वेताळ, तृणावर्त, कागासुर, बक, धेनुका इत्यादी राक्षसही पहारेकरी म्हणून नेमले. श्रावण महिन्यात बुधवारी कृष्णपक्षात अष्टमीच्या मध्यरात्री कंसाच्या कारागृहात भगवंतांनी अवतार स्वीकारला. आणि लगेच वसुदेव-देवकीसमोर भगवंतांनी थोर रूप धारण केले. भगवंताच्या श्रीमुर्तीचा रंग निळ्या कमळाप्रमाणे सुंदर नीलश्याम होता. त्यांनी विजेप्रमाणे चमकणारा पीतांबर नेसला होता, चतुर्भुज श्रीमूर्तिने शंख, चक्र, गदा तसेच पद्म ही आयुधे स्वीकारली होती. भगवंताने रत्नजड़ित मुकूट, कुंडले कंकण, बाजूबंद इत्यादी बहुमोल आभूषणे परिधान होती आणि त्यांच्या श्रीमूर्तितून इतका दिव्य प्रकाश स्फारत होता की संपूर्ण कारागृह प्रकाशित झाले होते.
वसुदेव देवकीने भगवंताची स्तुती केली. असा त्यांच्यासाठी फार मोठा मंगळकाळ वर्तवला. देवतांनी पुष्पवर्षाव केला. साडेतीन घटिका पर्यंत हा सोहळा सुरू होता. भगवंत अवतरल्याच्या आनंदात पाऊस मंद वर्षत होता. नंतर वसुदेव व देवकी मातेने भगवंतांना प्रार्थना केली, "आपण आपले हे चतुर्भुज रूप लपवावे. आपल्या अवतारणाची बातमी ऐकून कंस ताबडतोब धावत येथे येईल. कंसाची मला खूप भीती वाटते.” वसुदेव राजे म्हणाले, भगवंता आता आपण मला आज्ञा करावी पुढे मी काय करू?”
भगवंताने वसुदेवाला सांगितले होते की, "तू मला गोकुळात पोहोचवावे आणि तेथून यशोदेच्या कन्येला घेऊन जावे." वसुदेव राजांनी विचारले, पण महाराज, मी गोकुळात जाऊ कसा?” भगवंतांनी म्हटले, “जिथे जिथे कवाडे आहेत तिथे तिथे आमचा श्रीचरण लावा. कवाडे आपोआप उघडतील. व भगवंतांनी आपले चतुर्भुज रूप लपवले आणि ते द्वीभूज असलेले लहानसे मूल बनले. भगवंताची आज्ञा ऐकून वसुदेवाने बाळरूपी परमेश्वराला एका सुपात वस्त्र टाकून निजवले. भगवंताच्या प्रवृत्तीने मायेच्या सामर्थ्याने वसुदेवाच्या हाताच्या हातकड्या त्याचप्रमाणे पायाच्या बेड्या आपोआप उघडल्या. सर्व दरवाजे देखील आपोआप उघडले गेले आणि सर्व पहारेकऱ्यांना राक्षसांना गाढ झोप लागली.
त्यावेळी आकाशात प्रचंड विजा चमकत होत्या. जोराचा मुसळधार पाऊस पडत होता. वसुदेव जेव्हा कारागृहातून निघाले तेव्हा भगवंतांच्या सेवेसाठी शेषनाग चुपचाप वसुदेवाच्या मागून गेला आणि आपले सहस्र फणे उभारून भगवान श्रीकृष्ण तसेच वसुदेवाच्या वर छत्र धरून पावसापासून त्यांना वाचवू लागला. त्यावेळी मुसळधार पावसामुळे यमुनेला पूर आला होता. वसुदेव पाण्यात उतरले. व नदी पार करू लागले. पाणी वाढत वाढत कमरेपर्यंत छातीपर्यंत आले. तरीही भगवंतांना डोक्यावर ठेवून वसुदेव चालत राहिले. पुढे नाकापर्यंत पाणी वाढले. व भगवंतांचा श्रीचरणाचा स्पर्श यमुनेच्या पाण्याला झाला आणि यमुना तत्काळ इतकी आटली की गुडघ्यापेक्षाही कमी पाणी राहिले.
वसुदेव राजे गोकुळात पोहोचले. तेव्हा भगवंताच्या मायेने तेथील लोकही गाढ झोपेत होते. त्याचवेळी यशोदेला देखील मुलगी झाली होती. परंतु यशोदा देखील भगवंताच्या इच्छेप्रमाणे गाढ निद्रेत होती. तिला हे देखील माहिती नव्हते की तिला मुलगी झाली आहे की मुलगा. वसुदेवराजे सरळ नंदाच्या घरात गेलाये. त्यांनी यशोदेची आताच जन्मलेली मुलगी उचलली आणि तेथे भगवंत श्रीकृष्णांना ठेवले आणि ते मथुरेला परतले.
वसुदेव कारागृहात येताच दरवाजे आपोआप परत बंद झाले. वसुदेवाने हातकडी व बेड्या देखील घातल्या. आणि त्याचवेळी ती गोकुळातून आणलेली मुलगी रडू लागली. तिने टाहो फोडला. आणि सर्व मोहिनी आकर्षली. तिचे रडणे ऐकून पहारेकऱ्यांची झोप उडाली. ते कंसाकडे धावत पोहोचले आणि त्याला देवकीला आठवे मूल झाल्याची बातमी दिली.
कंस तर भीतीने देवकीला पुत्र होण्याचीच वाट पाहात होता. त्याला झोप येतच नव्हती. बातमी मिळताच तलवार घेऊन उघड्या डोक्यानिशीच तो कारागृहाकडे धावू लागला. देवकीने कंसाला येताना पाहून त्या मुलीला पदरात लपवले. रडत-रडत देवकीने कंसाला प्रार्थना केली, “दादा ! ही तर मुलगी आहे. तू हिला मारू नकोस." पण पापी कंस देवकीवर ओरडला आणि मुलीला हिसकावून तिचे पाय पकडून दगडावर आपटणार तेव्हढ्यात एक आश्चर्य वर्तले.
ती कोणी साधारण मुलगी तर नव्हतीच, ती योगमाया होती. कंसाच्या हातून निसटून ती आकाशात निघून गेली. तिथे ती अष्टभुजारूप धारण करून कंसाला म्हणाली, “दुष्ट कंसा ! नराधमा ! तुला मारणारा तुझा काळ या भूतलावर अवतरला आहे. तू आता उगाचच निरपराध लोकांना त्रास देऊ नकोस. तुझे मरण निश्चित आहे." तेजोमयी अष्टभुजा देवी कंसाला ही बातमी देऊन अदृश्य झाली. कंस कावराबावरा होऊन पाहतच राहिला.
तिची बातमी ऐकून कंसाला खूप भीती वाटली आणि दुःखदेखील झाले. त्याने विचार केला की वसुदेव-देवकीच्या सहा पुत्रांना उगाचच मारले. नंतर पश्चातापाने त्याने त्याचा मेव्हणा वसुदेव त्याचप्रमाणे बहीण देवकीच्या हातकड्या बेड्या काढल्या. आपल्या अपराधाबद्दल क्षमा मागून कंसाने त्यांना त्यांच्या राजवाड्यांत पाठवले. पण तरीही तो दुष्ट माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.
कारागृहातून परतल्यावर सकाळ होताच कंसाने आपल्या सर्व राक्षस मंत्र्यांना बोलावून अष्टभुजा देवीची बातमी ऐकवली. कंसाचे राक्षस मंत्री देखील अतिशय पापी दुराचारी आणि खुनशी होते. त्यांनी कंसाला सल्ला दिला की आपल्या राज्यात दहा पंधरा दिवसात जितकी मुले झाली असतील, ती सर्व मारून टाकावी. म्हणजे तुझा शत्रुचा नाश आपोआप होईल. क्रुर कंसाला ती कल्पना आवडली. कंसाने पूतना, शकटासुर, व्योमासुर इत्यादी राक्षसांना सर्व ठिकाणी फिरून मुलांना मारण्याची आज्ञा दिली.
इकडे गोकुळात काय झालं? ते आपण पुढच्या भागात पाहू
क्रमशः
पुढील भाग वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇
पुतना वध लीळा
https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/03.html
तृणावर्त राक्षसाचा वध 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/05-shreekrishna-lila-marathi.html
महाबळ ब्राम्हणाची फजिती ही लीळा वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/06-shreekrishna-charitra-marathi.html