संस्कृत सुभाषित रसग्रहण -Sunskrit Subhashit Sahitya
पुरा कवीनां गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासा!
अद्यापि तत्तुल्यकवेरभावादनामिका सार्थवती
बभूव!!
पुरा (पूर्वी)
कवीनां (कवींच्या)
गणनाप्रसंगे ( मोजणीच्या वेळी)
कनिष्ठिका ( करंगळीवर) -
अधिष्ठितकालिदासा ( कालिदास विराजमान झाला.
अद्यापि ( अजूनही)
तत्तुल्य (त्याच्या तोडीच्या)
कवे: ( कवींच्या)
अभावात् ( अभावामुळे)
अनामिका (अंगठीचे बोट)
सार्थवती (अर्थपूर्ण)
बभूव (झाली).
कालिदास हाच श्रेष्ठ कवी आहे हे सांगण्यासाठी छान कल्पनेच्या उपयोग केला
आहे. हाताच्या बोटांचा उपयोग संख्या
मोजण्यासाठी सहजपणे होतो. किती बरं कवी
झाले असं मोजताना प्रथम करंगळी दुमडली जाते आणि पहिलं नाव
येतं ते कालिदासाचं.
हाताच्या बोटांना संस्कृतमध्येही विशिष्ट नावं दिली आहेत. कनिष्ठिका
(करंगळी), अनामिका (करंगळीच्या शेजारचं बोट, बडबडगीतातली मरंगळी, ring finger) मध्यमा ( मधलं बोट) तर्जनी (index finger) आणि अंगुष्ठ. कवींची नावं मोजताना करंगळी वर कालिदासाच्या
नाव घेतलं आणि पुढे गणनाच थांबली. त्यामुळे अनामिका हे पुढच्या बोटांचं नाव सार्थ
( अर्थसहित, योग्य
अर्थ असलेलं) ठरलं. अनामिका म्हणजे जिला
नाव नाही अशी. कालिदासाच्या तोडीचा कवी न झाल्यामुळे अनामिकेवर कुणाचंच नाव घेतलं
गेलं नाही, ती
अनामच राहिली.
उदाहरणार्थ एक श्लोक :-
वासन्तं कुसुमं फलं च युगपद् ग्रीष्मस्य सर्वं च
यद्!
यच्चान्यन्मनसो रसायनमतः सन्तर्पणं मोहनम्!
एकीभूतमभूतपूर्वमथवा स्वर्लोकभूलोकयोः!
ऐश्वर्यं यदि वाञ्छसि प्रियसखे शाकुन्तलं सेव्यताम्!!
वसंत ऋतूतला मोहोर आणि ग्रीष्म ऋतूतलं फळ हे सर्व एकाचवेळी (युगपद्) ज्यात
आहे, जे
( एकाच वेळी) मनाला शांत करणारे ( संतर्पणम्) आणि मोहितही करणारे आहे. किंवा
स्वर्ग आणि पृथ्वी यांचं ऐश्वर्य जर एकाच वेळी एकत्र हवं असेल तर प्रियमित्रा,
तू शाकुंतलाचा आस्वाद घे. कालिदास हे भारतीय
साहित्यविश्वाला पडलेलं एक स्वप्न होतं. दोन महाकाव्य लिहिल्यामुळे कविकुलगुरु असं
बिरुद गीतगोविंदकार जयदेव (१२ वं शतक) यानं त्याला लावलं. जयदेवानंच त्याला 'कविताकामिनीचा विलास' असं सार्थ विशेषण बहाल केलं.
अठराव्या शतकात युरोपीयन लोकांचा संस्कृत भाषेशी परिचय झाला. कलकत्ता येथे
न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले सर विल्यम जोन्स हे रीतसर संस्कृत शिकणारे पहिले
विद्वान. त्यांनी त्यांचे गुरु रामलोचन यांच्या मदतीनं कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलाचं
प्रथम लॅटिन भाषेत आणि नंतर इंग्रजी भाषेत अनुवाद केला. त्यांनी तो प्रसिद्ध
निसर्गवादी ( naturalist) शास्त्रज्ञ फॉर्स्टर यांना त्यांचे मित्र हुम्बोल्ट यांच्यामार्फत दिला. फॉर्स्टर यांनी त्याचा जर्मन भाषेत अनुवाद केला आणि तो जर्मन कवी Goethe
( मराठीत गटे) यांच्या हातात पडला.
तो वाचल्यावर ते अक्षरशः तो ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचले. पाश्चात्य देशात नुकताच
मूळ धरू लागलेला सौंदर्यवाद (romanticism) कालिदासाच्या निसर्गकन्या शकुंतलेच्या मोहक चित्रणानं बहरून
आला. कालिदासाच्या शाकुंतलानं वेडा झालेल्या या कवीनं शाकुंतलासंबंधी जे उद्गार
काढले त्याचा संस्कृत अनुवाद वरील श्लोकात आहे. तो कुणी केला हे माहित नाही.
प्रा. डॉ. निर्मला कुलकर्णी पुणे