आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 24 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 24 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit Sahitya 

आदिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला प्रश्न - 24

उपस्थिते प्राणहरे कृतान्ते ।

किमाशु कार्यं सुधिया प्रयत्नात् ।

वाक्कायचित्तैः सुखदं यमघ्नं ।

मुरारिपादांबुज चिंतनं च ।।

आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी..२४

अर्थ...

प्रश्न :- प्राण हरण करणारा यमदेव साक्षात समोर उपस्थित असताना सद्बुद्धि असलेल्यानं लगेच.. त्वरेने काय करावं?/ करायला हवं?

उत्तर :- सुखानंद देणाऱ्या व यमाला, मृत्यूला मारणाऱ्या श्रीकृष्णांच्या चरणकमलांचं वाणी मन व शरीरासह चिंतन करावं....

चिंतन.. परीक्षितालासुद्धा प्रश्न पडला होता..

पुरुषस्येह  यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा ।

यच्छ्रोतव्यमथो जप्यं यत्कर्तव्यं नृभिः प्रभो ।

स्मर्तव्यं भजनीयं वा ब्रूहि यद्वा विपर्ययम् ।। भाग.१/१९/३७-३८

          मरणोन्मुख.. मरणासन्न माणसाने जे करायला हवं, ऐकायला हवं किंवा जपलं पाहिजे, केलं पाहिजे ते सगळं किंवा अन्य काही पर्याय असेल तर तो सांगा. आणि त्याला शुकमहामुनींनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं होतं..

तस्मात् भारत सर्वात्मा भगवानीश्वरो हरिः।

श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छताभयम् ।।

तेव्हा भारतवीरा, परीक्षिता, ज्याला मृत्यूपासून अभय हवंय त्या प्रत्येकानं.. सर्वांनीच.. सर्वांचाच आत्मा असलेल्या सर्वांतर्यामी भगवंताच्या... ईश्वराच्या.. हरीच्या गुणांचं श्रवण, कीर्तन, स्मरण करावं! आचार्यांनी इथं तसाच प्रश्न उपस्थित करून त्याचं तसंच उत्तर दिलंय.. प्रत्येकाला मृत्यूचं भय असतं.. तो प्रत्येकालाच येतो.. मरणाचा कुणालाही पूर्वानुभव नसूनही प्रत्येकाला मरणाचं भय आहेच आहे!.. पण प्रश्न येतो तो मृत्यु कुणाचा? शरीराचा की त्याला धारण करणाऱ्या, चालवणाऱ्या, हलवणाऱ्या,

बोलवणाऱ्या आतल्या चैतन्याचा, शक्तीचा, ऊर्जेचा, जीवाचा? देह पंच महाभूतांच्या मिश्रणानं बनलेला असल्यामुळे आतील प्राणतत्त्व निघून गेल्यावर.. ज्या एका ऊर्जेमुळे ही पंच महाभूतं परस्पर विरोध असूनही काही काळ एकत्र बांधून ठेवली गेली.. ती सुटी, वेगळी, विभक्त, विघटित होऊन आपापल्या मूळ ठिकाणी जातात... यालाच जड देहाचा लय म्हणतात... फक्त तो ज्याचा त्याला करता येत नाही व लय वेळीच केला गेला नाही तर अनर्थ उद्भवेल म्हणून दुसर्या कोणी करावा लागतो...

म्हणून दहन, दफन वा अन्य प्रकारे अचेतन देहाची विल्हेवाट लावावी लागते! न्यूटनच्या जडसंबंधी पहिल्या नियमानुसार जड वस्तु स्थिर राहते।

चल स्थिर गतीने चालत राहते ।

बाह्य प्रेरक न जोवरी ।

न स्थितिपालट तिच्यात घडतसे ।।

देहातील चैतन्य निघून गेल्यावर त्याचं विघटन होऊन त्यातील पंचमहाभूतांचे अंश आपापल्या ठिकाणी जातात.. पण निघून गेलेल्या त्या चैतन्याची.. जीवाची.. शक्ति ऊर्जेची काय अवस्था होते? त्याचं तर्कशुद्ध उत्तर अजूनही आधुनिक विज्ञानाला देता आलेलं नाही! कारण.. जीव, आत्मा, चैतन्य, ऊर्जा, शक्ति यांचं स्वरूपच कळलेलं नाही.. ते सावयव आहे की निरवयव आहे हेच मुळात आधुनिक विज्ञानाला कळलेलं नाही..

त्यामुळे त्याची पुढची गति त्याला सांगता येत नाही. गीता तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात भगवंतांनी सांगितलं.. जीव अर्थात आत्मा हा स्वतंत्र पदार्थ आहे. त्याला १५ व्या अध्यायात पुरुष म्हटलेलं आहे.

जीव देह सोडल्यावर नाना योनीत भटकत असतो पुन्हा पुण्य कर्मांनी मनुष्य योनीत येतो. मनुष्यादि योनींमधे जन्म घेतो! मिळालेल्या त्या देहाशी जीव इतका अनन्य होतो की कर्तृत्व भोक्तृत्वादि अहंकार घेऊन विविध भोगात रममाण होतो... भोगे रोगभयं या न्यायानं देह जेव्हा जीवाला रहायला अपात्र ठरतो तेव्हा ते घर सोडणं भाग पडतं. आणि कर्माचं गाठोडं घेऊन पुन्हा संसारचक्रात भटकतो.

जिथे जन्म आहे तिथे मृत्युभय जन्माला येतं! मनुष्येतर प्राणी विचारपूर्वक मृत्युभय टाळू शकत नाहीत, जरी मृत्यु टाळण्याचा वा पुढे ढकलण्याचा.. आत्मसंरक्षणाचा प्रयत्न करू शकले तरी! पण माणसाला मृत्युभय टाळणं सुलभ, सोपं नसलं तरी अशक्यही नाही! त्यासाठी संतसत्पुरुषांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणं हाच उपाय आहे. ज्या आसक्तीनं जीव देहाला चिकटून असतो...

सर्व देहभर चैतन्याला खेळवत ठेवतो.. ती आसक्ति जर दूर करता आली, नष्ट करता आली तर हे मृत्युभय जाणं शक्य आहे! त्या साठी संसार विचारानं बाधित करता आला पाहिजे.. आपला देह या सृष्ट संसाराचाच भाग आहे हे कळलं की जसा मी म्हणजे संसार नाही हे कळेल तसंच मी म्हणजे देह नाही हेही कळेल.. संसारातील प्रत्येक वस्तु पदार्थ विषय व्यक्ति परिस्थिति ही जशी प्रत्येकाला प्रत्येक क्षणी, प्रसंगी उपयुक्त.. आवश्यक..

अपरिहार्य असू शकत नाही तसंच देहाचंही आहे हे ध्यानात घेतल्यावर देहाबद्दलची आसक्ति कमी होत होत प्रयत्नानं नाहीशी करता येईल! या प्रयत्नांचं एक स्वरूप तत्त्वविचार व दुसरं स्वरूप भक्ति होय. ज्यानं हा संसाराचा पसारा ज्या क्रमानं निर्माण केला तोच हा पसारा त्याच्या उलट्या क्रमानं आवरूही शकतो हा विषय ध्यानात घेतला तर त्या आवरण्यात आपलाही केव्हा ना केव्हा तरी क्रम लागेलच हे स्वीकारायला अडचण येणार नाही व मृत्यूचं भयही उरणार नाही!

कोणत्याही गोष्टीचा, घटनाप्रसंगाचा.. अनुकूल असो वा प्रतिकूल असो.. अस्वीकार हा दुःखाला कारणीभूत होतो.. पण ती ईश्वरेच्छा, ईश्वराज्ञा, ईश्वरकार्य म्हणून स्वीकारली तर दुःख होणार नाही... तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे

"वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ ।

 भोगणे ते फळ संचिताचे ।।"..

म्हणून

"ठेविले अनंते तैसेचि रहावे।चित्तीं असो द्यावे समाधान ।।"

"जैशी स्थिति आहे तैशापरी राहे । कौतुक तू पाहे संचिताचे ।।"

हे साधण्यासाठी भगवंताची भक्ति, उपासना अधिकाधिक तीव्र होत गेली पाहिजे, कारण नुसता शास्त्रविचार, नुसती बुद्धि कधीच सुस्थिर राहू शकत नाही.. त्याच्यावर अहंकाराचं दडपण पडून त्याच्या भाराखाली तो विचार.. ती बुद्धि दबली जाऊ शकते.. नष्टही होऊ शकते! पण त्यांना भक्तीच्या उबेत ठेवलं.. वेष्टणात गुंडाळून ठेवलं तर त्यांच सबलीकरण.. वर्धन होईल व मृत्युभय नाहीसं होईल.. येणारा मृत्यु सुचवून जरी आला तरी ठराविक काळवेळ सांगून येत नाही..

तो केव्हाही आला तरी आपण देह सोडायला विचारानं सतत सिद्ध, सज्ज असलो की त्रासही होणार नाही! त्यासाठी देहापेक्षाही अधिक प्रिय भगवंत वाटला पाहिजे.. म्हणजेच भगवद्भक्ति अंतःकरणात दृढ झाली पाहिजे.. ती काया वाचा मनानं निरंतर घडली पाहिजे.. तरच सुखरूप, आनंदरूप भगवंताकडून देह मनाच्या भांड्यात सुख भरलं जाईल व त्याचवेळी मृत्यूचं दुःख, भय आपोआप बाहेर पडेल..

नाहीसं होईल! माणसाची कर्मसाधनं तीनच.. काया, वाचा, मन! चौथं उपलब्धच नाही. भक्तीचीही साधनं तीच. लौकिक जीवनातही कोणतीही भावना या तीनच प्रकारातून व्यक्त होते.. अन्य प्रकारे व्यक्त करता येत नाही! जीवनावश्यक कर्मंच जर कर्तव्यबुद्धीनं व भगवदर्पण बुद्धीनं केली तर तीच भगवंताची स्वकर्मकुसुमांनी केलेली सेवा, पूजा ठरेल!

स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः

या न्यायानं त्या पूजासेवेनंच भगवत्प्राप्ति होईल व मग मृत्यु हा भयविषय न राहता आनंदसोहळा ठरेल! शुकाचार्यांनी संपूर्ण भागवत सांगितल्या नंतर परीक्षिताच्या मनस्थितीची चाचपणी केली तेव्हा त्यानं उत्तर दिलं की

भगवंस्तक्षकादिभ्यो मृत्युभ्यो न बिभेम्यहम् ।

प्रविष्टो ब्रह्म निर्वाणमभयं दर्शितं त्वया ।।

भाग.स्कं.१२अ.६.श्लो.५

शुकदेवा, मला तक्षकाकडून वा इतरांकडून मृत्यूचं कोणतंच भय आता उरलं नाही! कारण आपण केलेल्या ब्रह्मोपदेशामुळे मी परब्रह्मात प्रवेश केला असून आपणच मला माझं निर्वाण दाखवून अभय दिलं आहे. मिळालेल्या देहासंबंधीच्या प्रबळ मोहापायी येणारं मृत्युभय घालवण्याचा उपाय एकच.. षोडषकलायुक्त, लीलापुरुषोत्तम अशा भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची भक्तिभावे सेवा!

अन्य देवता माणसाला हव्या असणार्‍या अनेक गोष्टी देतील पण अकाम, सर्वकाम, मोक्षकाम अशा कुणाही जीवानं तीव्रतम अशा भक्तियोगानं परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची भक्ति करावी असं विशालबुद्धि व्यासांचंही सांगणं आहे! तेच शंकराचार्यांनी या श्लोकात पुनरुच्चारित केलंय!

श्री. श्रीपादजी केळकर कल्याण

 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post