मनुष्यजन्म का मिळाला? सुखोपभोगांसाठी मिळाला आहे का??
मनुष्य जन्म जो आम्हाला प्राप्त झाले आहे. तो फक्त परमेश्वराचे तत्त्वज्ञान जाणण्यासाठी आणि परमेश्वराच्या दुर्लभ प्रेमाच्या प्राप्तीसाठीच मिळाले आहे. या जन्म-मरण रूप संसार सागरातून सुटणे आणि मोक्ष प्राप्त करून घेणे हेच मनुष्य जीवनाचे परम साध्य होय. या साध्याच्या प्राप्तीसाठी निरंतर दक्ष राहून प्रयत्न करणे हेच मनुष्याचे परम कर्तव्य आहे. कारण की पशुपक्षी, कीडे, मुंगी इ. अनंत नरक योनिंमध्ये भटकून नंतर माणसाचा जन्म मिळतो म्हणून ‘जन्तूनां नरजन्म दुर्लभम्' असे म्हटले आहे.
सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी अत्यंत मार्मिक आणि प्रेमपूर्ण शब्दांमध्ये फक्त एक जन्म ईश्वरार्पण करण्याची भिक्षा आम्हा सर्वांना मागितली आहे..
“युष्माभिः सांसारिक कृत्येषु मुधैवानन्त जन्मानि यापितानि ।
परं मदर्थे एकमपि जन्म समर्पय अवलोकयतच तत्फलम् ।”
(ब्रह्मविद्याशास्त्र, आचार व. २८४)
तुमचे अनंत जन्म सांसारिक कर्मांमध्ये वाया गेले आहेत परंतु आमच्यासाठी एक तरी जन्म अर्पण करा आणि त्याचे फळ पहा! (कसा अनिर्वचनीय आनंद मिळतो, ते पहा) अनंत ब्रह्मांडाच्या निर्मात्याला, चराचर विश्वाच्या स्वामीला काय उणे आहे, की आम्हाला एक जन्म मागतो आहे? निजानंद, निजसुखात सदैव रममाण असणाऱ्या त्या आनंदघन पूर्ण परब्रह्म परमेश्वरावताराला आम्ही एक जन्म दिल्याने काय लाभ होणार किंवा न दिल्याने काय हानि होणार? तो तर आमच्या कल्याणासाठी, आमच्या उध्दारासाठी आम्हाला जन्म मागत आहे.
ज्याप्रकारे आई आपल्या लेकराला पोळीचा घास घेऊन त्याच्या मागे मागे धावते व तो अज्ञान बालक पुढे पुढे पळत असतो त्याचप्रमाणे परमपिता परमेश्वर मुक्तिचा घास हातात घेऊन 'श्रध्दालुं गृहे गृहेऽन्विष्यति' - श्रध्दाळु भक्तांना, लेकरांना घरोघरी शोधत फिरतो. हा दुर्भागी जीव मात्र असंभवनीय कार्य कठोर तप ई. करतो ईश्वराज्ञेप्रमाणे एक जीवन ईश्वरार्पण करून मुक्ति प्राप्त करून घेत नाही.
असं का होतं? ज्याला बुद्धी आहे, जाणीव आहे त्याला आपले बरे-वाईट कळायलाच पाहिजे. पण हा बुद्धिमान माणूस स्वतःचे हित ओळखून ईश्वराप्रमाणे ते कार्य कां करीत नाही. ज्यात त्याचे कल्याण आहे? याचे कारण फार पुरातन आहे, गहन आहे. ते म्हणजे 'अनादि अविद्या', जी या जीवात्मा सोबत अनादिकाळापासून चालत आली आहे. जसा जीव अनादि तशीच अविद्याही अनादि अनादि म्हणजे ज्याला प्रारंभ नाही. या अनादि अविद्यामुळे अधमति, अधगति, व अधरति, हे तीन दोष जीवस्वरुपांत अनादिकाळापासून लागलेले आहेत. याचा परिणाम असा की जीवात्माची अध म्हणजे खाली (निच) पतनशील मती (बुध्दी) पतनशील गति (चाल) आणि पतशील रति (रुचि) असते.
याला आपण असेही समजू शकतो. नीच कर्म करण्याची इच्छा उत्पन्न हो म्हणजे अधमति, नीच कर्म प्रत्यक्ष करणे ही अधगति व त्यात रस रस घेणे. सुखाचा अनुभव घेणे ही अधरति होय. ज्याप्रमाणे पाणी त्याच्या धर्माप्रमाणे उताराकडे, खोलगट भागाकडे वाहते त्याचप्रमाणे जीवाचा स्वभाव आहे. जीव अधोमुख असतात म्हणजे नीच पतनाकडे मुख असणे, हा त्याचा स्वभाव आहे. पाण्याला वर नेण्याकरिता ज्याप्रमाणे विशेष प्रयत्न आणि परिश्रम करावे लागतात त्याचप्रमाणे जीवाला उर्ध्वगति देण्यासाठी, भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे 'अभ्यासेन तू कौन्तेय वैराग्येणच गृह्यते ।' अभ्यासरुपी प्रयत्न आणि वैराग्यरूपी परिश्रम आवश्यक आहेत.
आता तुम्ही विचारात पडले असाल की, आम्हाला वर उठण्याकरिता न जाणे किती कठिण प्रयत्न आणि भारी कष्ट घ्यावे लागतील! पण तसे काही नाही! सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी म्हणतात "ईश्वराला भेटण्यासाठी आर्तपूर्वक त्याच्या पदराची दशी धरून दुःख कातर होऊन अनन्य श्रद्धेने त्याच्याकडे वर पाहणे आवश्यक आहे. तो जीवाचा अनिमित्त बंधु, परमसखा, परमात्मा सर्वत्र बघत असतो की, अनंत दुःखाने ग्रासलेला जीवात्मा माझ्याकडे वर दृष्टीकरून पाहील तर मी त्या जीवाला दुःखरूपी दलदलीतून काढून उद्धरीन.
भगवान श्रीकृष्णाच्या अर्जुनाला दिलेल्या आज्ञेनुसार 'निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् आम्हाला फक्त निमित्त म्हणून त्याचेकडे पाहायचे कारण उध्दरणाचे त्याचे व्यसनच आहे. जीव उध्दरणाचा ठेकाच घेतला आहे. या उभयदृश्यावताराने जेवढे कन्सेशन्स, सवलती घ्यायच्या संभवतात त्या सर्व या चांपे गौरवर्ण, लंबकर्ण, कृपानिधान विशाल नेत्रधारी परब्रह्म परमेश्वर श्रीचक्रधर स्वामींनी सर्व देऊन टाकल्या आणि सोबत सावध ही केले की हे मुर्ख अज्ञानी जीवा! जर या काळात तुमचा उध्दार झाला नाही तर तो कधीच होणार नाही.
अनंत सृष्टीत अनंत जन्मात भटकावे लागेल म्हणून आमच्या आज्ञेचे पालन कर आणि आपला उध्दार करून घे! आम्ही फार भाग्यवान आहोत की आम्ही अशा प्रभूंच्या अवतारकाळात जन्म घेतला ज्यांनी जीवांचा उध्दार करण्याचेच कार्य स्वीकार केले. ज्यांच्या अवतारकाळातील प्रत्येक क्षण जीवाच्या कल्याणासाठी असतो. पदोपदी त्याच्या करुणेचे पाऊल आमच्या पापांचे क्षालन करण्याच्या दिशेने उचलेले असते आणि प्रत्येक अमृतमय शब्द त्याच्या परावाणीतून आम्हाला ज्ञान देण्यासाठी निघत असतो.
पण त्याचसोबत आमचे हे दुर्भाग्य ही आहे की आम्ही असे शुभकर्म केले नाहीत की ज्यामुळे त्या दयाघन परमात्म्याच्या सान्निध्यानात राहून सेवा करण्याचा सुअवसर मिळावा किंवा क त्यांचे समोर बसून त्यांच्या श्रीमुखातून स्त्रवित होणारे ज्ञानामृत श्रवण ग्रहण करू शकू. यास्तव ज्ञान प्राप्त करण्यासाठी, आणि त्या परमेश्वराच्या आज्ञा समजण्यासाठी आम्हाला कोणी एका परमज्ञाता किंवा कोणी एका साधु महात्म्यापासून मंत्रोपदेश घ्यावा लागेल. आमच्यासारख्या अज्ञानी जीवांना गुरुविणज्ञान कसे मिळेल? परंतु सावधान! गुरू तोच धरावा,
मानावा जो खरा गुरू आहे. ज्याची दृष्टी तुमचे अज्ञान दूर करण्याकडे असेल, तुमचे खिसे व त्यातील अर्थभारावर, साधन संपन्नतेवर नसेल. तसेच ढोंगी किंवा पाखंड रचणाऱ्या पासूनही सावध राहावे. अशांना मुळी गुरू करू नये. हेमाद्रि पंडिताने त्याच्या ग्रंथामध्ये अडीच हजार व्रत करण्याविषयीची माहिती दिली. अहो! एका वर्षाचे दिवस ३६५, तर एका वर्षात २५०० व्रत कशी करणार?
जेव्हा आपण गुरुमंत्र घेऊन गुरु धारण कराल. तेव्हाच तुमचा खरा जन्म झाला असे समजावे. कारण गुरुमंत्र घेते वेळीच तुम्ही आपल्या बऱ्या वाईट कर्माच्या दोषांची क्षमा मागून भविष्यात सदैव सप्तव्यसनादि सर्व वाईट कर्मापासून दूर राहण्याचा श्रीगुरुच्या हातावर संकल्प सोडलेला असतो आणि वचन दिलेले असते की गुरु आज्ञेप्रमाणे एकमेव ईश्वराचीच भक्ती करीन. अज्ञान बालकाने जर अपराध केला तर त्याला दंड होत नाही या न्यायाने त्याचे पूर्व आयुष्यातील अज्ञान अवस्थेतील सर्व अपराधांची त्याला क्षमा मिळते परंतु श्री गुरूने बऱ्या वाईटाची ओळख करून दिल्यानंतर आणि कर्तव्य-कर्माचे ज्ञान करून दिल्यानंतर जर तुम्ही अपराध कराल तर तुम्हाला क्षमादान कसे बरे होईल?
कारण
“अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति ।
पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्र लेपं भविष्यति ।। "
इतर ठिकाणी केलेले पाप पुण्यक्षेत्र म्हणजे मठा-मंदिरात जाऊन प्रायश्चित करून शुभकर्माचे धर्माचरण करून क्षालन केल्या जाऊ शकते. परंतु ज्याने पवित्र स्थानावरच पापकर्म केले त्याचा नाश कुठे होईल ? अर्थात् होणार नाही.
"यथान्यकृतानां वाराणस्या, तत्र कृतानांतू न क्वापि।"
(सुत्रपाठ वि २५२)
अन्य स्थानावर केलेल्या पापांचा नाश वाराणसी म्हणजे काशीला होतो परंतू काशीतच रांहून पापकर्म केले तर त्या पापांचा नाश होत नाही. म्हणून सदा दक्षतापूर्वक असा प्रयत्न करावा की आपले हातून वाईट कर्म घडणार नाही, चांगलेच शुभकर्म घडावे.
या जीवनांत बहुधा असे दिसून येते की, आम्ही एखाद्या कार्यपूर्तिसाठी अथक प्रयत्न करतो. धावपळ, परिश्रम करूनही ते कार्य सफल होत नाही. एकीकडे असेही अनुभव येतात की अल्प प्रयत्नातच काही एक परिश्रम न करता महत्त्वाचे कार्य अचानक सफल होतात असं कां घडतं? अज्ञान जीवात्मा याचे कारण शोधत असतो. अंदाज बांधत असतो, पण हे विसरून जातो की,
"साईया नजरां टेढियां, दुष्मन सकल जहान।
जरा सहारा मेहेरदाँ, सब जग करे सलाम।।"
सर्व शक्तिमान परमात्म्याच्या कृपेचा आधार न मिळाल्याने सर्व प्रयत्न विफल झाले आणि आपणाला यश आले नाही. गोष्ट निश्चयपूर्वक लक्षात ठेवा की परमेश्वराच्या इच्छेशिवाय या जगात पान ही हलत नाही.. जेवढेही सत्कर्म आहेत, त्यांत ईश्वराचे अधिष्ठान असते. म्हणून जर आयुष्यांत तुम्हाला यश, सफलता प्राप्त करावयाची असेल तर त्या सर्वान्तर्यामि सर्व शक्तिमान परमेश्वराची कृपा प्राप्त करा. कृपा प्राप्त करण्यासाठी भक्ति करा. अर्थात् तन, मन, धनाने त्या जगदात्याच्या, परमेश्वराच्या श्रीचरणावर अनन्य भावे स्व-समर्पण करा आणि फक्त निष्काम भावनेने त्या परमात्म्याची पूजा-प्रार्थना करा तुम्हाला सर्वप्रकारे यश मिळेलच. इतकेच काय, श्री गीता अध्याय-११ मध्ये भगवंताच्या अभिवचनानुसार स्वयंपरमात्मा प्राप्त होऊ शकतो.
"भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप" (गी.अ.११-५४)
हे परतंप, वीर अर्जुना! मला जाणणे, पाहणे आणि माझ्यात प्रवेश करणे हे फक्त अनन्य भक्तिनेच शक्य आहे.
अनन्य भक्ति: परमेश्वरधर्म श्रीगुरुपासून प्राप्त झाल्यानंतर परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी अनन्य भक्तिच एकमात्र साधन आहे. म्हणून या अनन्य भक्तिला समजणे आवश्यक आहे.
सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींचे ब्रह्मविद्येचे पहिले वचन आहे “परमात्मनैकेन विना सृष्टौ न केनचिदपि करणेन जीवा मुञ्चन्ति यद्यपि स निराकारः परं कृपा परतन्त्रः साकार: सन्नात्मानं सृजति, तत्वन्निहिताश्च जीवास्तद्दास्येनैव मुञ्चन्ति।”
सृष्टी मध्ये एका परमेश्वराशिवाय इतर कोणत्याही साधनाने जीवाचा उध्दार होऊ शकत नाही. तो परमेश्वर निरवयव निराकार जरी असला तरी कृपावशे सावयव साकार होतो त्याचे ज्ञान, भजन, सेवा-दास्य केल्याने जीव संसार भ्रमणातून मुक्त होतो. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ।। (गी. ८-१४)
हे अर्जुना! जो पुरुष माझ्यात अनन्य चित्ताने स्थित होऊन सदैव माझेच निरंतर स्मरण करीत असतो, अशा निरंतर स्थित माझ्यात युक्त असलेल्या योग्याला मी प्राप्तीस सुलभ आहे, अर्थात सहज प्राप्त होतो. शांडिल्य सुत्रामध्ये भक्तिचे लक्षण या प्रकारे दिले आहे -
“सा परानुरक्तिरीश्वरे” (सुत्र २)
म्हणजे ईश्वराचे ठायी निरतिशय प्रेम असणे म्हणजेच भक्ति होय आणि त्याचे व्यतिरिक्त इतरत्र कुठे ही प्रेम नसणे (प्रेमाचा लवलेशही नसणे) म्हणजे अनन्य भक्ति होय.
फक्त परमेश्वरावतारांतच आपल्या चित्तवृत्तींना पूर्णपणे सर्वप्रकारे समर्पित करून तन, मन, धनाने आजन्म 'अनन्य भक्ति करणे' हाच महानुभाव पंथाचा परमश्रेष्ठ सिद्धांत आहे.
पूजा कां करावी ? - कल्पनेपासून कामना, कामनेपासून वासना, वासनेपासून तृष्णा आणि तृष्णेपासून अजून उंच उंच भरारी मारण्याचा मनाचा कल असा आहे की त्यामुळे माणसाला सुख, स्थैर्य आणि शांति प्राप्त होत नाही कारण दुःख, अस्थिरता आणि अशांतीचे मूळ उगमस्थान म्हणजे मानव-मनाच्या मिथ्या कल्पना. ह्या मिथ्या कल्पनेची पहिली लहर आदि सृष्टीच्या रचनेसमयी परमेश्वराने दिलेल्या ब्रह्मविद्या ज्ञानाचेवेळी मानवाच्या मनात उठली आणि त्याला अनंत सृष्टीच्या कालप्रवाहात आपले सोबत प्रवाहित करत गेली.
ईश्वराची ज्ञान-ज्योती अधून-मधून एका दीपस्तंभाप्रमाणे त्याला उचित मार्गाचा प्रकाश देत असते पण आशा तृष्णांच्या प्रचंड लहरांनी त्याला विषयोपभोगरूपी समुद्रातील प्रवाहात ढकलून त्याचे जीवन अंध:कारमय केले आहे. इथे खरी आवश्यकता आहे की अनन्य भक्तिरूपी नौकेची जिच्यांत बसून ईश्वरपूजा आणि प्रार्थनेच्या बलशाली वल्हयांनी आपल्या जीवनाला त्या सर्व नियंता सर्वान्तर्यामि सर्वज्ञाकडे वल्हवून नेण्याची आणि आपले सर्वस्व त्याचे चरणी अर्पण करण्याची!
हे लक्षात असू द्या की, पुजेमुळे मनाची शक्ति जागृत होते आणि प्रार्थनेमुळे प्रभुकृपेने बळ प्राप्त होते. पुजेमुळे अंतर्मनात ज्ञान-ज्योतिचा उदय होतो आणि प्रार्थनेमुळे परमेश्वराची कृपा जीवनाला प्रकाशमय करते. पुजेमुळे सद्बुध्दि विकसित होते आणि प्रार्थनेमुळे ईश्वराची दया जीवनाला नीती आणि सदाचाराकडे प्रवृत्त करते. याचा परिणाम असा की मनुष्य सर्व पापा-तापांपासून मुक्त होतो. संकट, क्लेष, संताप, चिंता, दुःख जेव्हा माणसाला संत्रस्त-संतप्त करतात तेव्हा पुजा आणि
प्रार्थना यांच्या आधारानेच मनुष्य सुखी, निकोप आणि बलवान होऊ शकतो. याकरिता अशा तन्मयतेने पूजा करा की ज्यामुळे परमेश्वराची प्रसन्नता प्राप्त होईल परमात्म्याची कृपा-वृष्टि होईल. हे कधीही विसरू नका की परमेश्वराची प्रसन्नता आणि कृपादृष्टि होईल. हे कधीही विसरू नका की परमेश्वराची प्रसन्नता आणि कृपादृष्टि नसेल तर जीवनांत कोणत्याही प्रकारे यश, सफलता प्राप्त होणे दुरापास्त आहे तर मोक्ष कसा मिळणार?
'पुजा' ह्या मुळ धातूचा अर्थ आदर करणे. सत्कार करणे सेवा करणे आहे. अर्थात् परमेश्वराप्रति स्नेहाभिव्यक्ती, सन्मान प्रदर्शन, पूर्णतेचे गुणानुवाद किंवा त्याच्या अपरिमित विशाल शक्तिचे स्मरण, त्याच्या दर्शनाची उत्कट अभिलाषा, हे सारं काही 'पूजा' किंवा 'उपासना' होय. ही पुजा किंवा उपासना पूजक किंवा उपासकाच्या मनोवृत्ती आणि त्याच्या बौध्दिक विकासानुसार अनेक प्रकारची असू शकते. तो एक साधारण गृहस्थ असो किंवा परमज्ञानी संत, त्यांत प्रभूभक्तिची जेवढी अधिक प्रबळ भावना असेल तितकी त्याची पूजा अधिक सार्थक होईल. कारण प्रभूची कृपा प्राप्त करण्यासाठी ज्ञानाची जितकी आवश्यकता आहे. तितकीच प्रेममय भक्तिची आणि त्यागपूर्ण वैराग्याची ही गरज आहे.
सहवास आणि नित्यसंबंधांने ज्याप्रमाणे माणसा-माणसांत परस्पर ओळखी, प्रेम, सौहार्द्र वाढीस लागते आणि व्यवहारात माणूस माणसाची सेवा-साहाय्य करीत असतो. तसेच पुजेचे ही आहे. आपल्या इष्ट देवाच्या परमेश्वर अवताराच्या निरंतर नामस्मरण, ध्यान केल्याने, त्याच्या लीळांचे अखंड श्रवण, मनन केल्याने देवाप्रति श्रद्धा, आस्था, प्रिती वाढीस लागते.
देव माझा, मी देवाचा असा आपुलकीचा प्रेमभाव वाढीस लागतो. चित्तवृत्ति आपल्या आराध्य देवाच्या ठायी स्थिरावतात. तो त्याचे ठायी होतो आणि शेवटी 'वासुदेवः सर्वमिती' अशी स्थिती प्राप्त होते. या स्थितीप्रत पोहचण्याकरिता मनुष्याला खऱ्या सच्च्या अंतःकरणाने तन्मय होऊन पूजापाठ, धर्म-कर्म, नित्य, प्रतिदिनी करावा. यामुळे त्या अचित्यानंत ईश्वरी शक्तिशी त्याचा सहवास व नित्य संबंध वाढल्याने त्यांच्या जीवनात सुख, समाधान, समृध्दि, शांति आणि अक्षर मुक्ति, आनंद प्राप्त होतो. भगवान श्रीकृष्णाची ही हीच आज्ञा आहे -
“मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ।। (गी.अ.९-३४)
अर्जुना! तू आपले मन माझ्यातच लाव, माझा भक्त बन माझी पूजा कर मला वंदन कर. याप्रकारे स्वतःला माझ्यातच स्थित केल्याने माझा परायण होऊन शेवटी माझ्या स्वरुपालाच प्राप्त होशील.
पूजा कुठे करावी ? वास्तविकतः देवाच्या पूजेकरिता शुध्द मनासारखे मंदिर आणि प्रेम परिपूर्ण श्रध्दा युक्त अंतःकरणासारखे उत्तम स्थान दुसरे नाहीच तरी पण लौकिक पूजाविधीकरिता काही सामुग्री, वस्तुंची गरज असते आणि एक स्वतंत्र पुजा-गृह असणेही आवश्यक आहे.
मंदिर अथवा पूजागृह दररोज देवाजी पूजा करण्यासाठी आपल्या घेऊ - घरातील एका खोलीस मंदिर किंवा पूजागृहाच्या रूपाने सजविता येते. झ इथे फक्त पूजा-पाठ, पारायण, ध्यान, भजन धर्म-कर्मच होत राहावे. पूजागृहात इतर साहित्य, घरातील वस्तू नको. पूजागृह खुले, स्वच्छ दे प्रकाशयुक्त हवेशीर असावे. तिथे प्रवेश केल्यानंतर मन प्रफुल्लित प्रसन्न पृ असणे आवश्यक आहे. मंदिर पवित्र आणि दिव्य शक्ति उत्पन्न होण्याचे अ एक साधन आहे म्हणून त्याचे जवळपास कोणत्याही प्रकारे गडबड किंवा गोंगाट, आरडा-ओरड नको. निदान पुजा करते वेळी तरी तेथील वातावरण निवांत, शांत आणि पवित्र असावे. जेणेकरून साधकाचे मन ध्यान, स्मरण साधनेत एकाग्र आणि स्थिर होऊ शकेल.
पूजेचे साहित्य - पूजागृहात आपल्या शक्तिनुसार लाकडी देवघर, सिंहासन किंवा चौक असावा. देवाचे आसन भक्ताच्या बसण्याच्या किंवा झोपण्याच्या (पलंग, दिवाण इ.) जागे पेक्षा थोडे उंच असावे. पूजा गृहातच अतिथींना बसण्याकरिता असणारे कोच, खुर्च्या किंवा पलंग दीवाण देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे, ह्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. देवघरात सिंहासन किंवा चौकीवर सुंदर स्वच्छ रेशमी तलम वस्त्र किंवा सुती वस्त्र आथरावे.
डोक्यावर झुलणारे छत्र असावे. समोर कापूरदानी (कापूर जाळण्याकरिता) धुपदानी (धुपदाखविण्यासाठी) अगरबत्तीचे ( घर, आरतीची थाळी, निरांजन किंवा पंचारती ठेवली असावी. हे सर्व साहित्य, भक्त आपल्या सामर्थ्यानुरुप पितळ, स्टिल, किंवा चांदीचे घेऊ शकतो. आसनावर देवाची मूर्ती किंवा विशेष श्रीगुरुकडून प्राप्त झालेला चांगला फुलांनी सजवून ठेवावा.
त्यावर उन्हाळा असेल तर पातळ मुख वस्त्र झाकण्यासाठी आणि हिवाळा असेल तर जाड वस्त्र देवपुजेवर आच्छादून घ्यावे म्हणजे धुळ वगैरे पूजेला लागणार नाही. पूजा करतेवेळी आपले दोन्ही हात कपाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि स्वच्छ कपड्याने (परिमार्जन) तो कपडा याच उद्देशाने ठेवला असावा) पूसन टाकावे. त्यानंतर आपले हात इतरत्र कुठेही लावू नये. कशाला स्पर्श करू नये. देवाला हाताने, कपाळाने स्पर्श करून वंदन करावे. त्याचप्रमाणे पूजेचे साहित्य प्रतिदिनी स्वच्छ करून घ्यावे व ते इतर कामात उपयोगात आणू नये.
पूजा कशी करावी? - जर आपण देवाचे नामस्मरण करता करता झोपाल तर सकाळी आपली झोप देवाचे नामस्मरण करताच उघडेल. आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न राहतील व मनात कोणतीही दुश्चिता राहणार नाही.
प्रातःकाळची पूजा आपण सकाळी स्नान इ. प्रातर्विधी आटोपून पूजागृहात जावे. दोन्ही हात व कपाळ स्वच्छ धुवून परिमार्जन वस्त्राने पुसून घ्यावे. उद्बत्ती, दीप लावून सुगंधित वातावरणांत देवाला (पूजेला) निद्रेतून उठवावे. दुध, दही, उटणे इ. पदार्थाने मर्दना करावी व हलक्या गरम पाण्याने सर्व विशेषांना (संबंधीत स्थानाचे) स्नान घालावे. पूजेतील (संबंधीत) काष्ठ आणि वस्त्र प्रसाद यांना पाणी अजिबात लागू देऊ नये.
स्नान केल्यावर स्वच्छ शुध्द वस्त्राने पुसून काढावे हे वस्त्र फक्त देवाचे स्नान झाल्यानंतर पुसण्याकरिताच असावे. क इतरत्र वापर करू नये. स्नान झाल्यानंतर दर्शन - श्रध्दायुक्त होऊन प पाहणे, वंदन कपाळाने स्पर्श करून वंदन करावे. वंदन करते वेळी १) 'माझ्या स्वामीच्या पवित्र सेवा संबंधास माझे दण्डवत' असे २) श्रद्धायुक्त होऊन म्हणावे. यानंतर अगरबत्ती, धुप इत्यादी दाखवावा.
आपल्या शक्तिनुसार फल-फूल अर्पण करावे आणि परमेश्वरावताराच्या परावाणीतून निघालेले सूत्र संग्रहित केलेल सूत्रपाठ किंवा श्रीमद्भगवद्गीता यांचे प्रतिदिनी जेवढे शक्य असेल तेवढे पारायण करावे. याचसोबत शास्त्र पठन- रूक्मिणी स्वयंवर श्रीदत्तात्रेय कवच इ. अवतारांचे प्रबंध, कवच, स्तोत्र इ. चे पारायण करावे. यानंतर तुपाची फुलवात लावून आरती करावी, आरती म्हणावी.
घरी भोजनाचे, नाश्ता इ. जे काही पदार्थ असतील त्यांचा देवाला भोग (उपहार) लावावा, उपहार दाखवावा. उपहाराची आरती म्हणावी. स्तोत्र म्हणावे. म्हणून प्रार्थना करावी. यानंतर देवासमोर कमीत कमी पाच दण्डवत घालावे. देवासमोर किंवा साधू महात्मा यांचे समोर आपल्याकडून घडलेल्या अपराधांची दोषांची क्षमा मागून प्रसव मोडावा, प्रायश्चित करावे आणि भविष्यांत तशा दोषांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आपलेकडून कोणतेही दुष्कर्म घडू नये, प्रभूची कृपा असावी. सदोदित शुभ कर्म घडावे. यातच पुजेची सफलता आहे.
दुपारची पूजा साधक भक्ताने जीवननिर्वाहाच्या कार्यातून कामधंद्यातून दुपारी वेळ काढावा. हात-पाय व कपाळ स्वच्छ धुवून परिमार्जनाने पुसुन घ्यावे. यावेळी सकाळच्या वेळी देवाला निद्रेतून उठविणे आणि स्नान विधी सोडून इतर विधी सकाळप्रमाणेच करावा. जेवणाकरिता बनविलेले पदार्थ सर्वात अगोदर देवाच्या ताटांत वाढावे. इतर पात्र नंतर करावे.
देवपुजेसमोर देवास उपहार दाखवावा, भोग लावावा व उपहाराची व मध्यान्ह काळाची आरती म्हणावी करावी नंतर स्तोत्र, प्रार्थना पंचक म्हणून नंतर पाच ही अवताराचा जयजयकार करावा. शेवटी ५ दंडवत घालून पूजेची सांगता करावी. शक्ति, स्वास्थ्य आणि अवस्थेनुसार अधिकाधिक दण्डवत घालणे सर्वप्रकारे हिताचेच आहे. यावेळी प्रायाश्चित करून दण्डवत घालावे.
संध्याकाळची पूजा - या संसारात नाना संकट, शारिरीक रोग मनाच्या व्यथा, चिंता, माणसाला सतवत असतात. चिंता सन्ताप आणि कलुषित विचारांमुळे त्याचे जीवन फार दुःखी झालेले असते. यातून सुटका करून घेण्यासाठी परमपिता परमात्म्याच्या श्रीचरणी शरण जाऊन आश्रय घेणे हाच एक उपाय आहे. फक्त प्रभूची पूजा आणि प्रार्थनाच मनुष्याला सुखी, बलवान आणि निकोप करू शकते म्हणून साधक भक्ताला प्रतिदिवशी सायंकाळी मंदिर, पूजागृहात ईश्वराच्या सेवेत नतमस्तक होणे अगत्याचे आहे. तन, मन, धनाने आपले सर्वस्व अर्पण करून एकाग्रचित्ताने पुजा केली पाहिजे. देवाला निद्रेतून उठविण्याचा व स्नानविधी किं वगळता इतर विधी प्रातःकाल प्रमाणेच करावे. संध्याकाळचे वेळी समयोचित सं सायंकालीन आरती म्हणावी.
निद्रा आरती - रात्री झोपण्याअगोदर पुजागृहात देवाचा शयनविधी करावा, सेवा करावी, शयनासन लावून त्यावर देव झोपवावे व निद्रा आरती करावी. दण्डवत घालावे यानंतर देवाचे नामस्मरण, लीळा स्मरण, प चिंतन मनन करीत झोपी जावे. याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहावा की रात्री झोप किती शांत सुंदर, सुखद होईल आणि सकाळचा सुर्योदय किती पवित्र, निर्मळ आणि प्रफुल्लित करणारा असेल.
सामुदायिक पूजा - इथे हे स्पष्टीकरण योग्यच होईल की वरील सर्व विधी, पूजा प्रार्थना एकट्या गृहस्थ भक्त साधकासाठी, वासनिकासाठी उ आहेत. पण सामुदायिक पूजा-प्रार्थना थोडी वेगळी असते आणि संत महात्म्यांची पूजा विधी मध्ये बराच वेगळेपणा, मोठी देवपूजा, अधिक स वेळ लागणारी असते. याचे कारण त्यांचे जीवनच पूजा आणि प्रार्थनेकरीता समर्पित झालेले असते. ही सर्व शिक्षा-दीक्षा त्यांना त्यांचे श्रीगुरू कडून त प्राप्त झालेली असते. इथे सामुदायिक पूजा म्हणजे अनेक ठिकाणचे अनेक प्रकारचे एकापेक्षा अधिक साधक, भक्त, संत महंतांनी एकत्र दे येऊन केलेल्या पूजा-प्रार्थनेचा विचार मांडला आहे.
जिथे साधुसंतांचे समुदाय म्हणजे 'मार्ग' आहे. 'आश्रम' आहेत वि तिथे सर्व एकत्र येऊन पूजा-प्रार्थना करतात सर्व मठ, मंदिर आश्रमात किंवा विभिन्न उत्सवात देखील सामुदायिक प्रार्थना होते. जिथे चहुकडून संत समुदाय, साधक भक्त, वासनिक येतात याचे फार मोठे माहात्म्य असल्याचे शास्त्रात वर्णन केले आहे.
ज्याप्रमाणे दुधांत जेवढी साखर घातली तेवढे ते दूध अधिक गोड होत जाते. त्याचप्रमाणे जेवढ्या संख्येने भक्तगण एकत्रित येवून पुजा प्रार्थना करतील जेवढी अधिक श्रद्धेने अधिक प्रेम आवडीपूर्वक करतील तेवढी त्या क्रियेची, विधीची शक्ती वाढेल आणि साधकांना भक्तांना अधिक पुण्य प्राप्त होईल. याकरिता जिथे फार मोठ्या संख्येने स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक एकत्रित असतील तिथे जाऊन दर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा आणि पूजा प्रार्थनेत सहभागी होऊन आपले जीवन सफल केले पाहिजे.
सामुदायिक प्रार्थनेत सर्व संत, महंत तथा भक्तगण, हाथ, कपाळ स्वच्छ धुवून व परिमार्जन वस्त्राने पुसून पूजेच्या सिंहासनासमोर गोलाकार किंवा ओळीबद्ध बसतात. पुजारी, ज्याला सुध्दा म्हणतात.. तो विशेष अवताराचे संबंधित पाषाण, स्वतः विधीपूर्वक वंदन करून जवळच्या साधकास देतो तो पलीकडील तिसऱ्या साधकास याप्रमाणे देत देत शेवटी फुलारकर जवळ आल्यावर ते विशेष एक एक करून यथास्थित आसनावर अधिष्ठित करतो.
पुजावंदन करण्याचा क्रम पहिले विशेष नंतर काष्ट तद्नंतर वस्त्रप्रसाद, (जे अति यत्न करून सुरक्षित बांधणीकरून ठेवण्यात येतात) व शेवटी मूर्ती. हा क्रम ठेवण्यामागे उद्देश हा की ओल्या हाताचा कपाळाचा स्पर्श काष्ट किंवा वस्त्र प्रसादाला झाल्यास ते लवकर जीर्ण होतील. याच कारणास्तव वस्त्रप्रसाद देण्याअगोदर परिमार्जन वस्त्र फिरविण्यात येते. या गोष्टी कडे पूर्ण लक्ष देण्यात येते की केस, नख किंवा मुखाचा श्वास याचा स्पर्श पूजेला व्हायला नको. यानंतर सर्व उपस्थित भक्त समुदाय देवाला फल-फूल, विडा अर्पण करतात. समयोचित आरती स्तोत्र, स्तवन म्हणतात, यानंतर दण्डवत करून प्रायश्चित, करून प्रसव मोडावा, अशाप्रकारे सामुदायिक पूजाविधी संप्रदायात अनेक ठिकाणी आचरल्या जातो.
नामस्मरण -
नाम महिमा एक संत भक्तांना हिन्दीमध्ये उद्देशून सांगतो
"एक बार का 'कृष्ण' नाम ही, हर लेता है जितने पाप।
नहीं जीन की शक्ति, कर सके जीव मे उतने पाप।।”
श्रीकृष्ण नाम-जप करावयाचे १०८ मणी एकाच दोऱ्यात ओवले असतात. त्याचप्रमाणे पूजा प्रार्थनेच्या सर्व विधींमध्ये देवाचे (श्रीकृष्णाचे) नाम स्मरण व्हावे. या सूत्रामध्ये सूत्रबध्द असतात. या तथ्याला असे समजणे सुलभ होईल की पूजा प्रार्थना करतांना आचरले जाणारे सर्व अ विधी जीवनात मनापासून श्रीकृष्ण नामस्मरण साध्य व्हावे म्हणून केले अ जातात. कारण
"ब्रह्मांडानां कोटिसंख्याधिकानामैश्वर्य यच्चेतना वा तदंशः ।
आविर्भूतः तन्महः कृष्णनाम तन्मे साध्यं साधनं जीवनंच ॥
असंख्य ब्रह्मांडांचे समस्त ऐश्वर्य आणि संपूर्ण चेतन पदार्थ ज्याचा अंश मात्र आहे. ते सर्वेसर्वा, महामहिम, 'श्रीकृष्ण' नामच माझे साध्य आहे, तेच माझे साधन आहे व तेच माझे जीवन आहे. अशाप्रकारची परम प्रेमयुक्त श्रध्दा ज्या उपासकाची आहे. तोच माझा खरा उपासक आहे. या तत्वाचा अर्थबोध भगवान श्रीकृष्णांनी श्रीगीतेच्या चौथ्या अध्यायांत "द्रव्याने सिध्द होणाऱ्या सर्व यंज्ञांमध्ये ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे” असे सांगून ज्ञानाची महिमा सांगितली तर दहाव्या अध्यायांत ‘यज्ञानां जपयज्ञोस्मि’ हे सांगून भगवंतांनी अर्जुनाला, जपयज्ञ स्वयं मीच आहे असे समजावले आहे. एका हिंदी कवीने म्हटले आहे.
'कृष्ण नाम ही स्वयं कृष्ण है भजो सहित निष्ठा अविराम।
सदा नाम के सहित विराजित रहते हैं हरि स्वयं ललाम ।”
याकरिता जप, यज्ञ सर्वच प्रकारच्या यज्ञांत सर्वश्रेष्ठ यज्ञ मानल्या गेले आहे. हे यज्ञ सर्व यशाचे दातृत्व करणारे आहे. कारण जप केल्याने सात्विकवृत्ती जागृत होते. राजस, तामस वृत्तीचा लोप होतो. अन्तर्मुखी वृत्तीमुळे वासनांचा क्षय होतो, संकल्प विकल्पाचा नाश होतो आणि मन ईश्वराच्या स्मरणात तल्लीन होते पण इथेही 'तुलसीदासा'ने सांगितल्याप्रमाणे हे ध्यानांत असू द्यावे.
"बिना प्रेम रिझे नहीं, 'तुलसी' नंदकिशोर ।”
म्हणजे प्रेमाशिवाय केलेली प्रार्थना, जपलेले प्रभूचे नाम परमेश्वराला मोह किंवा आकर्षण निर्माण करू शकत नाही, तसेच कोणतेही फळ देऊ शकत नाही. तसेच त्याला नामस्मरणही म्हणता येत नाही. आत्म्यांत परमात्मा विषयी खरी तळमळ असावी लागते. विरह वेदना असावी लागते. मुखाने नामात केवळ उच्चार आणि मन कनक कामिनीमध्ये अटकलेले! काही क्षणापूर्वी नामजपाचे कर्म करणारा दुसऱ्या क्षणीच अ पाप कर्मरत! अशा नामजपाचा काय लाभ? म्हणून साधकाने दृढनिश्चयाने शपथ घ्यावी, व्रत स्वीकारावे की मी जाणून बुजून कोणतेच पाप तर करणार नाहीच पण त्याकडे फिरकणार सुध्दा नाही. लक्षही देणार नाही. एका कवीने म्हटले आहे.
“खावत सोवत जहाँ-तहाँ, लेह जो हरि का नाम
देस काल के नियम बिनु सिध्द होय सब काम।”
म्हणजे सदा सर्वदा ईश्वराचे नाम घेत राहावे. एका क्षणालाही ज त्याला न सोडावे तुमचे सर्व कार्य सिध्द होतील. सोबत प्रभु चरणी एक प्रार्थना सुध्दा करत राहा, की हे प्रभू! मला आपले प्रेमदान द्या! मला आपले प्रेमास पात्र करा! हे ईश्वरा! स्त्री, द्रव्य आणि कीर्ति यासारख्या नाशवान पदार्थात जी माझी आसक्ती जडली आहे ती नष्ट होऊ द्या! म्हणजे मी आपल्या हृदयातील संपूर्ण आत्मीयतेने तुम्हाला भजीन. स्मरण करीन. तुमचे स्तुती-स्तोत्र करीन.
इथे ही गोष्ट लक्षात ठेवावी की देवाचा नामजप केल्याने आमची पूर्ण अनुरक्ति, भक्ति देवांत स्थायी रुपाने झाली, असे समजू नये, म्हणून निराश किंवा हताश होऊन नामस्मरण सोडू नये कारण की : “सर्व शास्त्रबीज हरिनाम द्वि-अक्षर!"
हरि म्हणजे कृष्ण ह्या दोन अक्षरातच सर्व शास्त्रांचे बीज रूप असल्यामुळे काही दिवसांच्याच श्रीकृष्ण नामस्मरणामुळे आम्हाला चमत्कार दिसू लागेल. त्याच्या अपार शक्तिचा अनुभव येत जाईल आणि ताबडतोब परमानंदाची प्राप्ती होईल.
“जकारो जन्म विच्छेदः पकार: पाप नाशकः ।
तस्माञ्जप इति प्रोक्तो जन्म पाप विनाशकः ॥”
अर्थात 'ज' पासून जन्माचा विच्छेद आणि 'प' पासून पापाचा नाश! म्हणजे जो जन्म-मरण आणि पापाचा नाश करणारा आहे त्याला जप म्हणतात. त्रितापापासून त्रस्त मानवाला फक्त देवाच्या जपाचाच एक मात्र आसरा असतो. यापेक्षा चांगला, सरळ, सोपी दुसरा कोणताच उपाय किंवा साधन नाही ज्यामुळे सर्व दुःखांपासून मुक्तता होऊ शकेल. अनुभवी संतांनी आणि शास्त्रांनी तर असे ही म्हटले आहे की श्रध्दा विधीरहित आणि द्वेष मुलक जप सुध्दा व्यर्थ जात नाही. श्रीमद्भागवतात लिहिले आहे.
“पतित स्खलितश्चार्तः क्षुत्वा वा विवशोब्रुवन ।
हरये नम इत्युच्चैर्मुच्यते सर्व पातकैः ।।”
म्हणजे पडतांना, घसरतांना, शिकतांना किंवा विवश होऊन जो मनुष्य हरि म्हणजे भगवान श्रीकृष्णासह नमस्कार करतो तो सर्व पापापासून तसेच रोग, शोकापासून मुक्त होतो. परंतू सर्व तन कांचनमय करण्यासाठी आपले अंतःकरण सुध्दा अंतर्बाह्य शुध्द करणे आवश्यक असते. ते तेव्हाच घडते जेव्हा तनमनाच्या कणाकणांत एका 'हरि' शिवाय आपल्या श्रीकृष्णाशिवाय दुसरे काही नसते. सोबत हा दृढविश्वास ही असतो
“स देवो यदेव कुरूते तदेव मंगलाय ।”
परमेश्वर जे काही करतो ते सर्व माझ्याकरिता मंगलमय तथा कल्याणप्रदच आहे. अशा भक्ताचे उठणे-बसणे, खाणे-पिणे, बोलणे-चालणे इ. सर्व 'भगवदर्थ' असते आणि त्यांच्या अन्तरात्म्यांत “राजी है हम उसीमे जिसमे तेरी रजा है” अर्थात ईश्वरास जे स्वीकार्य आहे तेच मला मान्य आहे त्यात मी खुश आहे.
ईश्वराच्या रंगात इतका रंगून जातो की त्याला सर्व जग गोकुळातल्या गवळणी प्रमाणे "जित देखो तित श्याममयी” दिसत असते.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी सुध्दा तेच सांगितले आहे की तुम्हाला उठता-बसता, खाता पिता, झोपता जागता ईश्वराचेच स्मरण असावे. तुम्ही कुणाचेही अधीन नसावे, न कुणाला आपले अधीन करावे. कारण जीवाला सदैव ईश्वराधीनच असावयास पाहिजे.
“मोर दास कहाइ नर आसा ।
करइ तो कहहु कहाँ विस्वासा”
माझा दास म्हणवतो आणि मनुष्याची आशा करतो, हा कुठला माझ्यावर विश्वास ? म्हणून केवळ ईश्वरावर पूर्ण भरवसा ठेवावा, निरंतर स्मरण करावे. जर कुणी याचक कुणाच्या दरवाज्यावर हाक देतो तर साधारण माणूस सुध्दा त्याला काही न काही दान निश्चित देतो, तर मग अखिल चराचर विश्वाचा नियंता, अनंत करुणाधाम भक्तवत्सल परमात्म्याचे जर कुणी अंतःकरणाच्या आंतून कळवळून नाम घेतले तर तो काही न काही अवश्यक देईल. परंतु
“हरि से लागा रहु रे भाई । ते तेरी बनत बनत बन जाई ।।
ह्याप्रमाणे विश्वास ठेवून त्याची दशी धरावी. मातेप्रमाणे त्याचा पदर धरावा. बालकाप्रमाणे हट्ट धरावा. या संसारातील जे माता पिता, घर-दार, धन, भोजन, वस्त्र इ. नाशवान पदार्थाना देतील पण 'ईश्वर' हा असा दाता आहे की तो स्वतःलाच स्मरण करणाऱ्या भक्ताला देऊन टाकतो.
“स्मरतः पादकमलमात्मानमपि यच्छति।”
ते तेव्हांच शक्य आहे जेव्हा
“मम नाथ यदस्ति योऽस्म्यहं सकल तध्दि तवैव माधव"
म्हणजे हे नाथ! जे काही माझे आहे आणि मी जो आहे, ते सर्व माधवा! तुझेच आहे या भावनेने सर्वस्व श्रीकृष्णार्पण होईल.
म. श्री कृष्णदास महानुभाव (हैद्राबाद)
दंडवत दादा जी.
ReplyDeleteखुप छान विचार मांडले(यथार्थ)