सत्संगाचे फायदे आणि कुसंगामुळे होणारे नुकसान
संग हा दोन अक्षरी शब्द सर्व क्षेत्रात वेग-वेगळ्या अर्थाने प्रसिद्ध आहे. उदा. संग, सत्संग, कुसंग, निसंग, संगत-विसंगत इ. आता संगणकामुळे तर हा शब्द आणखी जवळचा वाटायला लागला आहे. इतर क्षेत्राप्रमाणेच अध्यात्मातही संग या शब्दाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. (इथे आपण संग हा शब्द सहवासाच्या अर्थाने पाहणार आहेत.) मनुष्य आणि संग याचे अतुट नाते आहे. किंबहुना माणसाची उन्नती अवनती, प्रगती अधोगती हे सर्व संगावरच अवलंबून आहे. मनुष्यात चांगले किंवा वाईट संस्कार हे देखील संगामुळेच होतात. जशी संगत मिळेल तसा माणसाचा स्वभाव बनतो. म्हणून संग हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. असे म्हटले तरी वावगे होणार नाही. सर्व धर्म संप्रदायाने संगाला प्राधान्य दिलेले आहे व त्यात विविध दाखले देवून योग्य त्या सुचना देखील केलेल्या आहे. पारमार्थिक सुखाच्या लालसेने सर्वसंग परित्याग करून आलेल्या साधकाला महानुभाव संप्रदायाने निमित्य विधी म्हणून संग महत्त्वाचा विधी सांगितला आहे. तर वारकरी संप्रदायाचे संत तुकाराम म्हणतात.
संतसमागमे धरावी आवडी।
करावे तातडी परमार्थी ।
त्याही पुढे जावून संत ज्ञानेश्वर हरिपाठात म्हणतात
श्रीपती एणे पंथे । संताचिया संगती मनोमार्गे गती । आकळावा
संगती दोन प्रकारच्या चांगली, वाईट म्हटली की ती चांगलीच असेल असे काही नाही आणि मग जशी संगत तसा परिणामही ठरलेलाच संत कबीर म्हणतात
संगत करे बडो की तो बढत बढत बढ जाँय ।
गज मस्तक पर अजा चढे मनमाने सो फल खाय
संगत करें गधेकी तो दोदो लाता खाय ।
म्हणजे संगत जर चांगल्याची, मोठ्याची, गुणवाणाची केली तर उन्नती होईल मात्र जर का संगतीच्या बाबतीत अंदाज चुकला तर मात्र दुर्धर प्रसंग ओढवण्याची शक्यताच जास्त. ते उदाहरणा दाखल म्हणतात समजा एखाद्या गाढवाजवळ जावून तुम्ही म्हणाले गाढव दादा गाढव दादा जरा तुमची चरण धुळ घेवू द्या तर ते काय करेल? लत्ता प्रहाराने कप्पाळ मोक्ष नाही का करणार? गाढवच ते! लीळा चरित्रात आपल्या संगतीचे दोन्ही प्रकार बघायवयास मिळतात. एकांकामध्ये स्वामींच्या थोडा वेळ सहवासाने गुराख्यांना अप्रतिम आनंदाचा अनुभव आला, स्वामींचा जरासा सहवास ओरंगळीचे हेडावू (घोड्याचे व्यापारी) व झाडीतील गोंडांच्या जीवनात आनंदाची उधळण करून गेला. ही झाली चांगली; उलट वाईट संगत महादाईसा सारखी बुद्धिवान स्त्री पण दादोसासारख्या कर्मठाच्या सहवासाने तीची सारासार विचार करण्याची, स्वयं निर्णयाची क्षमताच नष्ट झालेली दिसते. कारण वाराणसीला जावे की जाऊ नये या द्विधा मनस्थितीत ती सापडते व स्वामी नको म्हणत असतांना वाराणसीला गेली आणि नंतर पश्चाताप करते. घोडा चुडीच्या शिष्यासारख्या अहंकारी क्रोधीष्ठ संन्याशाच्या सहवासाने स्वामी उदास झाले. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्याने त्याला किंचितही घृणा उत्पन्न न होता उलट तो हसतो आहे हे पाहून स्वामी खिन्न होतात व म्हणतात. “एसनी भुतहिंसा केली परि तुम्हा क्षणभरिही घृणा नुपजे होए" उदास होवून स्वामी निघून जातात. सुभाषितकार म्हणतात.
सेवितव्यो महावृक्षः फलच्छाया समन्विता ।
यदि दैवत् फलं नास्ति छाया केन निवार्यते ॥
ज्याप्रमाणे एखाद्या विस्तारित महावृक्षाखाली तुम्ही भर उन्हात गेले व तिथे तुम्हाला ऋतुमानामुळे म्हणा अथवा आणखी कुठल्या कारणाने फळांचा योग आला नाही. तरीही त्या झाडाच्या सावलीपासून तर कोणी रोखणार नाही. त्याप्रमाणे अनेक गुणांनी परिपूर्ण, समृद्ध असलेल्या व्यक्तीचा आपण सहवास करावा आश्रय घ्यावा; तिच्याकडून आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण नाही झाल्यातरी तिचा आपल्याला भक्कम आधार असतो हे झाले सज्जनाचे बाबतीत मात्र दुर्जनाचे ह्यापेक्षा फार वेगळे आहे. सुभाषितकार म्हणतात
दुर्जनेन समं सख्य वैरंजपि न कारयन्न
उष्णोदहतिचांगारो शित कृष्ण करायते ।।
म्हणजे ज्याप्रमाणे विस्तव गरम असताना हाताता घेतला तर हात भाजतो व विझून कोसळा झाल्यानंतर हातात घेतला तर हात काळे होतात. तसे दुर्जन हे कोळशासारखे आहेत म्हणून त्यांची सोबत मैत्री करू नये व वैर सुद्धा ठेवू नये. कारण दुर्जनाचे वैर याप्रमाणे
चंदन तेरी चुटकी भली क्या करना बभुलकी साल ।
सज्जन तेरी झोपडी भली क्या करना दुर्जन का महाल
अशा शब्दात दुर्जनांची संगती नको म्हणून सांगितले आहे.
कुसंगाचा परिणाम
कुसंगामुळे माणसाच्या मनात नेहमी कुवासना निर्माण होतात. बुद्धीत विकृतपणा येतो. बुद्धीचा योग्य वापर नसल्याने तिचा विकास होत नाही. विचारात संकोचित पणा येतो. मग माणूस वाईट व्यसनाकडे वळतो. तो संवेदना रहीत होवू लागतो. जर संगतच वाईट असेल तर तिथे चांगल्या विचाराची अपेक्षा करमे म्हणजे गटारात गंगोदक शोधल्यासारखे नाही का होणार? कर्णासारखा बुद्धीवान श्रेष्ठ धनुर्धारी दानशुर पण केवळ संगतीमुळे व्यर्थ गेलेच की नाही सर्व. कुसंगात चांगले विचार सुचत नाही मग माणूस चारित्र्यसंपन्न कसा बरे होऊ शकेल.
सत्संगाचा परिणाम
सत्संगामुळे माणसाच्या ज्ञानात भर पडते, विचारशक्ती वाढते. चर्चामंथन होत राहिल्याने ज्ञानाचे विविध अंग कळतात. मनुष्याचे चारित्र्य हे अफाट धनसंपत्तीमुळे अथवा नसुद्या शिक्षणाने बनत नसते तर त्याच्या के चारित्र्यसंपन्नतेमध्ये सिहांचा वाटा असतो तो त्याला लाभलेले मार्गदर्शक व सत्संगतीचा माणसाच्या संगतीवरून, वागण्यावरून माणसाचे मुल्यमापन होत असते. नेहमी आपल्यापेक्षा श्रेष्ठ थोर व्यक्तींच्या सान्निध्यामुळे बुद्धीचा विकास होतो. सत्संगामुळे सदाचाराची वृत्ती अंगी बाणते हिन, निच कृत्ये करण्याचा विचार देखील मनाला शिवत नाही. नेहमी सत्य बोलण्याची वागण्याची सवय लागते. त्यामुळे माणसाच्या वाचेमध्ये एकप्रकारचे माधुर्य येते. गोडवा निर्माण होतो. मग अशा संग आल्हाददायक वाटतो मग ती व्यक्ती कोणाला बरे आवडणार नाही! आणि अशा व्यक्तींचा सहवास म्हणजे सत्संगती होय. म्हणून श्रीचक्रधर स्वामी म्हणतात आपल्यापेक्षा ज्ञानी पुरुष याचा संग करावा. अशा ज्ञात विरक्ताचे दास, सेवक होऊन राहिले तरी लाभच होतो. सह्याद्री वर्णनकार म्हणतात म्हणून
उत्तमाचा पाई असीजे । तै नावाचे पडप लाहिजे ।
विश्वामाजी पाविजे । किर्ती देखा ॥
शेवटी मोरोपंतांच्या शब्दात तुम्हा, आम्हा, वाट चुकलेल्या सर्वांना
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो।
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो ।
सदंघ्री कमळी दडो मुरडता हटाने अडो ।
वियोग घडता रडो मन भवच्चरित्री जडो ।।
अशी त्या श्रीदत्तात्रेयप्रभुचरणी प्रार्थना करतो.
म. आवेराज बाबा कोठी