मरणोत्तर जीवन
अर्थात पुनर्जन्म विज्ञान
जन्माला आलेला प्रत्येक प्राणी केव्हातरी मरतोच. प्रत्येक प्राणीमात्र ठराविक कार्यकाळ प्राप्त देहात घालवितो आणि एक दिवस तो या मर्त्य देहाला सोडून निघून जातो. जन्म आणि मृत्यूची ही अविश्रांत साखळी अव्याहत आणि अखंडपणे सुरू असते असेच आपल्याला सभोवतालच्या जगाचे आणि जीवनाचे निरिक्षण केल्यास जाणवते आणि एकदिवस आपलाही मृत्यू निश्चित आहे हे जीवंत सत्य पटायला लागते. जन्म हाच मृत्युचे कारण आहे. मृत्यु अंतीम टोक मानले तर जन्म हे पहिले टोक आहे. या दोन्हीच्या दरम्यानचा जो काही ठराविक कार्यकाळ आहे त्याला जीवन असे आपण नाव देतो. मृत्यूसाठी एकच अट आहे ते म्हणजे जन्म होणे. जन्म झाला की मृत्यूचेही रिझर्वेशन झालेच असे समजायला हरकत नाही. जन्म आणि मृत्यू ह्या दोन्हीही घटना एवढ्या अद्भूत आणि आश्चर्यकारक आहेत की, आपल्याला व्यक्तीगत आपल्या जन्माचाही अनुभव नाही तर मृत्यूचाही अनुभव नाही. जन्ममृत्युच्या दरम्यान असलेल्या जीवनात, आपण खूप अज्ञान आहोत! म्हणूनच या मनुष्यदेहात स्वतःचे जगाचे नि जीवनाचे ज्ञान मिळवायला पाहिजे! असे कां वाटू नये? म्हणजे भौतिक जगा पलिकडील असलेल्या सूक्ष्मचेतन तत्त्वांचा विचार करण्याची आणि शाश्वत जीवनाकडे पाहण्याची जिज्ञासा कां करू नये? असा विचार जेव्हा निर्माण होतो तेव्हाच अध्यात्मात प्रवेश करता येतो.
आपण स्वतःला जोपर्यंत देहात्मभावाने पाहतो तेव्हा ते पाहणे केवळ भौतिक असते म्हणजे केवळ पंचमहाभूतांच्या अत्यंत विकृत विकृत झालेल्या म्हणजे स्थळ-स्थुळ झालेल्या मिश्रणालाच पाहत असतो म्हणून अध्यात्मात अशा पाहण्याला मिथ्याज्ञान म्हटले आहे. वस्तुतः असे पंच महाभूतांचे विकृती विकृतींनी नटलेले अत्यंत स्थूल झालेले रूप केवळ आपल्याच देहासाठी वापरल्या गेले नाही तर सर्व जगासाठी हेच मिश्रण वापरल्या गेलेले आपल्याला दिसत असते. म्हणून देह म्हणजे मी नाही हे सहज चिंतनातून कळायला लागू शकते. जर देहाकडेही या विचार चिंतनातून आपण पाहिले तर हा देह सतत बदलतो आहे हे आपणास अध्यात्माप्रमाणे भौतिकशास्त्रेही सांगु शकतात. दरसात वर्षांने शरीरातील प्रत्येक अणूपरमाणू बदलतो.
दररोज देहात बदलण्याची ही प्रक्रिया सतत सूरू आहे आणि जन्मापासून प्रत्येक क्षणाक्षणाला दिव्याच्या ज्योतीप्रमाणे ही देहज्योत जळत आहे, वाढत आहे हे आपणास जाणवते. नदीच्या प्रवाहाप्रमाणे शरीर वाहत आहे, हे जाणवते. यात आंत असणारं तत्व मात्र तेच आहे, हेही जाणवतं. आत जीवन आहे म्हणून शरीराला आपण जीवंत म्हणतो. आत जर जीव नसेल तर ते शरीर निर्जीव प्रेत होऊन जातं. अस प्रेत पुरण्याच्या, जाळण्याच्या, कुजण्याच्याच अवस्थेचं असतं. मग ते प्रेत राखेत मातीतच रूपांतरीत होऊन जातं. मातीतूनच ते तयार झालं, पंचमहाभूतांच्या संयोगानेच ते बनलं आणि पंचमहाभुतातच ते विलीन झालं. आपण अन्न खातो, पाणी पितो, श्वासोश्वास घेतो यात अग्नितत्त्वाचा आणि आकाश तत्त्वाचा ही सूक्ष्म सहयोग असतोच, अशा पंचमहाभूतांतून त्रिगुणातून देहाची उत्पत्ती होते. त्या देहात जीवात्म्याचे संक्रमण कसे होते? तो कशाप्रकारे ते देह धारण करतो? आणि कसा गर्भात वाढतो? हे जन्माचे गुढ गहन असे विज्ञान आहे. भौतिक विज्ञानास हे अभौतिक तत्त्व अजूनही अज्ञातच आहे. याचे कारण म्हणजे ते गुढ गहन विज्ञान अध्यात्मविज्ञान आहे. आणि अध्यात्म विज्ञानाला जाणण्यासाठी आत्म्याला जाणणे आवश्यक आहे. अध्यात्म या शब्दाचाच अर्थ आहे -
अधि + आत्म = आत्म्याजवळ. आपण शरीराजवळच असतो देहधर्माप्रमाणेच सर्व क्रिया करीत असतो आणि म्हणून देहापेक्षा सूक्ष्मतम त्या देहाचा स्वामी = आत्मा आहे हे आपल्या कधी आकलनातच येत नाही. ते जेव्हा आकलनात येते तेव्हा एक क्रांतीकारी बदल आपल्यात घडून येतो. मग देहाला पाहताच आत्म्याचा बोध आपणास व्हायला लागेल आणि मग त्या आत्म्यासंबंधीची काळजी निर्माण होईल. 'शरीर म्हणजेच मी आहे' हे आपणास जाणवत असते म्हणून आपण शरीराचीच काळजी घेत असतो ना? अगदी तसेच जेव्हा 'मी म्हणजे आत्मा आहे' असे जाणवताच, मी आत्म्यासंबंधीची काळजी घ्यायला सुरवात करीन. शरीराची सर्वतोपरी काळजी जशी मी घेतो. "शरीर वृद्ध होईल, कोणी आपणास विचारणार नाही” असे वाटते तेव्हा आपण वृद्धापकाळासाठी जशी काही
पुंजी जमवून ठेवतो, ज्यामुळे कोणीही त्या पैशासाठी आपली सेवा करील,' असे आपणास वाटत असते. अगदी तशीच काळजी आत्म्यासंबंधी स्वतः संबंधीचे ज्ञान होताच मी घ्यायला लागेन. मग या जीवनात मरणोत्तर जीवनासाठी मी काही पुंजी जमवून ठेवेन. 'पुढील माझी गती काय?" याचा विचार करेन आणि त्या पुनर्जन्माची सुखावह व्यवस्था कशी करता येईल याचा विचार करायला लागेन, त्यासंबंधीचे ज्ञान मिळवीन ही घटना घडणे म्हणजे एक अध्यात्मिक क्रांती घडणे होय.
तेव्हा मृत्यू तर मग एक घटना होईल! एक द्वार ठरेल! त्या द्वारातून आत्मा जाईल आणि येईल. जन्म आणि मृत्यूत आपणास खूप अंतर जाणवते! पण मृत्यू आणि जन्म यात मात्र क्षणाचही अंतर नाही. जन्म झाला की मृत्यूसाठी ठराविक कार्यकाळ पूर्ण करायचा असतो. कुणी ५/२५ वर्ष, तर कुणी ५०/६० वर्ष तर कुणी १०० वर्ष तर कुणाचा अगदी जन्मताच. पण मृत्यू झाला की लगेच जन्म होतो. जशी ती सुरवंट अळी, एकापानाहून दुसऱ्या पानावर प्रवास करते, तेव्हा जोपर्यंत ती दूसरे पान पकडत नाही, तोपर्यंत पकडलेले पहिले पान सोडीत नाही. हीच अवस्था आत्म्याची ही असते. तोही एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जेव्हा जातो, तेव्हा दुसरे शरीर निश्चित होताच पहिले शरीर सुटून जाते. आत्म्याने शरीर सोडणे याच घटनेला मूत्यू म्हटल्या गेले आहे.
शरीर नाशवान आहे. आत्मामात्र अविनाशी आहे. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणे म्हणजेच पुनर्जन्म होय. अनेक भारतीयदर्शन शास्त्रकारांनी या पुनर्जन्मासंबंधी खूप चिंतन केले आहे आणि कर्म सिध्दांत हाच या पुनर्जन्माचे कारण आहे हे सिध्द केले आहे. भारतीय दर्शनशास्त्रे आणि पुनर्जन्म मृत्यू म्हणजे काय? तोच जीवनाचा शेवट आहे काय? पुन्हा जन्म आहे किंवा नाही? जर आहे तर तो कोणता देह धारण करतो? कोण त्याला या देहातून काढून दुसऱ्या देहात घालतो? असे हे जन्म आणि मृत्यूचे चक्र कां सुरू आहे? इत्यादी अनेक गूढ आणि गहन प्रश्न अनादिकाळापासून मानवाला सतत सतावित आले आहे.
सामान्यपणे मनुष्याला जे दिसते, स्पर्श करता येते मोजमाप करता येते त्यावरच तो विश्वास ठेवतो. "बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशीच मनुष्याची मूलभूत नैसर्गिक प्रवृत्ती आहे. परंतु या जगात मानव, भौतिक इंद्रियांच्या कक्षेबाहेरच्या, मोजमाप करणाऱ्या साधनांच्या आणि मानसिक तर्काच्या पलिकडे असणाऱ्या तत्त्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो; तेव्हा त्या मूलभूत, नित्य, शाश्वत तत्त्वांच्या ज्ञानाच्या उगमस्थानाकडे जाणे अगत्याचे असते. आजपर्यंत कुठल्याही शास्त्रज्ञाला जड जगतात वावरत असणाऱ्या प्राणिमात्रांमधील विविध चेतन तत्त्वांचा उकल झालेला नाही. या देहात चेतन तत्त्व कसे आले? आणि देहाला सोडून ते जे चेतन तत्त्व आहे ते कसे गेले? हे अज्ञान अजून कायम आहे.
तसेच जन्मानंतर जसा मृत्यु निश्चित आहे तसे जन्माआधी (पूर्वजन्म
मृत्यू) झालेला आहे काय? आणि मृत्यूनंतर पुनर्जन्म आहे काय? हे कोडे वैज्ञानिक जगतात अजूनही कायमच आहे. या गूढ आणि अनाकलनीय सिद्धांताला जाणण्याच्या दृष्टीने विविध संशोधन झालेले आहे आणि स्वनिर्मित तर्कानुमानामुळे परस्पर भिन्नभिन्न मते प्रत्येक तत्त्व चिंतकांनी मांडले आहे. परंतु चार्वाक दर्शन सोडले तर सर्वांनी पुनर्जन्म मानला आहे.
भारतीय दर्शनामध्ये पुनर्जन्मासंबंधीचे आलेले मत स्थूलमानाने आपण प्रथम पाहू या.
मिमांसा दर्शन
मिमांसा दर्शनानेही आत्म्याचे अस्तित्व मानले असून परमेश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. जीव अनेक आहेत त्याचे धर्माधर्म वेगळे आहेत. सुखदुःखेही वेगळी आहेत. आत्म्याचे नऊ गुण आहेत ते म्हणजे बुद्धी, सुख, दुःख, ईच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म व संस्कार या नऊ गुणांच्याद्वारे जीवात्म्यांकडून कर्म घडतात आणि ते कर्म पुनर्जन्मास कारण ठरते. जीवाने केलेल्या क्रियेचे फळ जीव स्वतःच आपोआप भोगतो धर्माधर्माच्या निशेष क्षयाने शरीर इंद्रियांचा उच्छेद होतो तेव्हा जीव मुक्त होतो. (प्रकरण पंचिका १०२,१०३,१५६)
सांख्य दर्शनाने आत्म्याचे अस्तित्व मानलेले आहे. ईश्वराचे अस्तित्व मानले नाही. आत्मा नित्य आहे आणि तो मुक्तही आहे असे हे दर्शन मानते. परंतु आत्मा प्रकृतीच्या परिणामास अभिन्न समजतो.
प्रकृतीकडे आकृष्ट झाल्यामुळे तो बंधनात पडतो. या विश्वाच्या मुळाशी सांख्य दर्शन प्रकृती आणि पुरुष हे दोन तत्त्वे मानते. प्रकृती ही जड आणि अचेतन आहे ती सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणाची साम्यावस्था आहे. प्रकृती ही नित्य असून तिचे सर्व परिणाम अनित्य आहेत. प्रकृतीपासून बुद्धी किंवा महत्, त्यापासून अहंकार, अहंकारापासून ११ इंद्रिये तसेच पंचतन्मात्रा या पांच तन्मात्रांपासून पंचमहाभूते निर्माण होतात.
अशाप्रकारे प्रकृती पुरुषाच्या या सिद्धांताला सांख्य दर्शनाने मानलेले आहे. प्रकृतीच्या बंधनात पडल्यामुळे पुरूष म्हणजे जीव, नाना प्रकारचे कर्म करतो. पुरूषास भोग प्रदान करणे, हाच प्रकृतीचा भाव आहे आणि या भावाला जेव्हा पुरूष वश होतो, तेव्हा तो दृष्टा, नित्यमुक्त शुद्ध असूनही अज्ञान अविद्यादि बंधाने युक्त पुरुष, जीवभावाने युक्त होतो. लिंग शरीराचे धारण करतो. आणि या लिंग देहाच्या संबंधानेच तो बंधनात पडून सुखदुःखाच्या गर्तेत सापडतो. लिंग शरीर हे मन, बुद्धी, अहंकार, दशइंद्रिये आणि पंच तन्मात्रांचे बनलेले असते आणि या लिंग शरीराद्वाराच जीवात्मा भोग भोगतो. या लिंग शरीरामुळे जीवात्मा प्रकृतीच्या परिणामास, बुद्धीचा परिणाम असलेल्या धर्माधर्मास जीव आपलेच समजतो आणि जन्ममृत्यूरूप या संसारचक्रात भ्रमण करीत राहतो. विवेक ज्ञानानेच व पुरूष प्रकृती पासून मुक्त होतो.
विवेकज्ञानामुळे, लिंगशरीर नष्ट होते. धर्माधर्म नष्ट होतात व सांसारिक जीवन नष्ट म्हणजे पुरूषत्व होते प्रकृतीपासून मोक्ष होतो. धर्माधर्मामुळे पुनर्जन्म आहे. धर्माच्या कारणाने पुरुषाचा उर्ध्वलोकात पुनर्जन्म होतो, तर अधर्माच्या कारणाने अध:लोकात पुनर्जन्म होतो. दैवीसर्ग आठ प्रकारचा, पशुपक्षांचा पाच प्रकारचा मानवसर्ग एक प्रकारचा आहे. दैवीसर्गात ब्रह्म, प्रजापत्य, इंद्र, पैत्र, गंधर्व, राऊळ, यक्ष आणि पिशाच्च अशी वर्गवारी आहे. दुसऱ्या सर्गात पशू, मृग, पक्षी, जलचर आणि स्थावर योनी आहे. आणि तिसऱ्या सर्गात मानव प्राणी आहे. पहिला सत्त्वप्रधान, दुसरा तमप्रधान आणि तिसरा रजप्रधान सर्ग आहे. ही सृष्टी प्रकृती संबंधाने आहे. हाच अज्ञान बंध आहे. जोपर्यंत विवेकज्ञान या जीवात्म्यास प्राप्त होत नाही तोपर्यंत पुनर्जन्माचे चक्र सुरू आहे. विवेक ज्ञान होताच प्रकृती त्या पुरुषास मुक्त करते. सांख्यात सेश्वर सांख्यही आहे. ते ईश्वर तत्त्व (सांख्यकारिका) मानते.
योगदर्शन
योगदर्शन, सांख्य मताप्रमाणेच विचार करते. परंतु 'प्रकृती पुरूष मग हे दोनच मूलतत्त्व आहे', असे मानीत नाही. तर 'प्रकृती पुरुष व ईश्वर' असे तीन तत्त्व मानते ईश्वर हे तत्त्व जगाचे निमित्त कारण समजते. पुनर्जन्मासंबंधीही योगदर्शन सांख्य मताचाच पुरस्कार करते. मनुष्याच्या कर्मानुसार त्याचा जन्म निश्चित होतो. माणसाच्या तीनप्रकारच्या वासना आहेत. त्यामुळे दिव्य कर्माने दिव्य वासना, मानुषिक कर्माने मानुषिक वासना व नारकीय कर्माने नारकीय वासना होतात. देव मनुष्य त्रियंच यात सर्वप्रकारच्या योनी आल्या आहेत. कर्मानुसार जीव त्या त्या योनी प्राप्त करतो.
न्याय वैशेषिक दर्शने
न्यायदर्शन आणि वैशेषिक दर्शन ही दोन्ही दर्शने पुनर्जन्मवादाचा क पुरस्कार करतात. मनुष्याच्या कर्माचे संस्कार आत्म्यात राहतात आणि एक देह सोडून मरणानंतर दुसऱ्या देहात ही ते आत्म्यासोबतच असतात. सत्कर्माने पुण्य, तर असत् कर्माने पाप निर्माण होते. हे पाप पुण्य ते ते फळ भोगेपर्यंत आत्म्यात असतात. त्या पापपुण्याचा परिपाक म्हणून नाना योनीत, या आत्म्याला जन्ममृत्यू होत असतो. धर्माने सुख तर अधर्माने दुःख निर्माण होते. धर्माधर्माच्या पूर्ण उच्छेदाने पुनर्जन्म नष्ट होतो.
अद्वैत वेदान्त दर्शन अद्वैत वेदान्तदर्शन ही कर्मानुसार पुनर्जन्म मानते.
'सर्व खल्विदं ब्रह्म' असा सिद्धांत प्रतिपादन करणारे अद्वैत वेदान्त, 'व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता' असे दोन भेद मानते. पारमार्थिक सत्तेत ब्रह्म, ईश्वर आणि जीव हे एकच आहेत. तर व्यावहारिक सत्तेत ब्रह्म ईश्वर आणि जीवात भेद मानला आहे. व्यावहारिक सत्तेत जीव संज्ञा ज्यास प्राप्त झाली, तो शरीर, इंद्रिय, बुद्धी आणि अहंकाराने युक्त आहे. आत्मा एकच आहे. पण उपाधी भेदाने तो नाना जीवांच्या रूपाने भिन्न भिन्न दिसतो.
जीव ज्ञाता, भोक्ता, कर्ता आहे. तो आपल्या कर्माने पाप, पुण्याचा संचय करतो व त्यानुसार फळे भोगतो. तो देश, काल निमित्ताच्या अधीन होऊन या संसार चक्रात जन्म घेतो आणि मृत्यू पावतो. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यूला प्राप्त होतो. अविद्येमुळे ईच्छेने प्रेरित होऊन कर्माचा कर्ता होण्यामुळे तो सुखदुःख जन्ममरणादि भोग भोगतो.
आत्म्याचा बुद्धीशी संबंध अज्ञानाने येतो. अज्ञानाचा नाश ज्ञानाने होतो. जीवाचे तीन शरीर आहेत. १) स्थूलशरीर २) लिंग किंवा सूक्ष्मशरीर ३) कारण शरीर. स्थूलशरीर स्थूल पंचमहाभूते, ज्ञानेंद्रिये, आणि प्राण यापासून निर्मित झाले आहे. लिंग शरीर, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण, मन व बुद्धी या सतरा तत्वापासून निर्माण झाले आहे. पापपुण्याचे संस्कार याच लिंग शरीरात संचित असतात. स्थूल शरीर सोडून जीव जेव्हा दूसरे शरीर धारण करतो तेव्हा हे लिंग शरीरही त्याचे बरोबर जाते आणि कारण शरीर अविद्या निर्मित असते. जीव हा शरीराचा चेतन अधिष्ठाता आणि प्राणास धारण करणारा आहे..
स्थूल शरीर चार प्रकारचे आहे. जरायुज, अंडज, स्वेदज, उद्विज. जरायुज = मनुष्य पशु आदिंचे शरीर, अंडज पक्षी सर्पादिकांचे - शरीर, स्वेदज = माशा, डांस, किडे आदींचे शरीर आणि उद्विज = लता वृक्षादि वनस्पतींचे शरीर. दिव्य शरीरे देवतांची आहेत. अशा नाना योनी आहेत. जीव शुभाशुभकर्मे करतो व पापपुण्याचे अर्जन करून
सुखदुःखे भोगतो. सम्यक् ज्ञानाने तो मुक्तीप्राप्त करू शकतो. अशाप्रकारे व्यावहारिक सत्तेवर शांकर अद्वैत दर्शन पुनर्जन्मवाद सत्य मानते.
विशिष्टाद्वैत मत
रामानुजाचार्यांच्या मते चित् आणि अचित् हे दोन्हीही त्या ब्रह्माचे शरीर आहेत. जीव शरीराचा आत्मा आहे, तर आत्मा, ईश्वराचे शरीर आहे. चैतन्य, अणुत्व आणि शुद्धता हे त्याचे स्वरूप गुण आहेत. सर्व जीव ज्ञान व आनंदाने युक्त आहेत. ते ईश्वराचे शरीर आहेत. पण प्रकृतीच्या संयोगाने ते कर्म करतात, म्हणून बंधनात पडतात. अविद्यामुळे कर्म निर्माण होते. ते शुभाशुभकर्म पापपुण्य रूपात निर्माण होते आणि या कर्माच्या योगे जीवास सुखदुःखे भोगावी लागतात अर्थात अविद्येमुळे पुनर्जन्म प्राप्त होतो. अविद्येचा नाश उपाधी भिन्न ज्ञानाने होतो आणि त्यामुळे ज्ञान व आनंदाची प्राप्ती होते.
जैन दर्शन
जैनदर्शनाने परमेश्वराचे अस्तित्व नाकारले असून जीवाला नित्य मानले आहे. कर्म पुदगलाचा त्याच्याशी संबंध येण्यामुळे तो जन्म मरणाच्या चक्रात पडला आहे. बंधनात पडला आहे. स्थूल शरीराचा नाश झाल्यावर बंधनयुक्त जीव कर्मपुदगलाने बनलेल्या सूक्ष्म देहात राहतो आणि त्या सूक्ष्म देहाच्या सहाय्याने, तो नवीन स्थूल शरीरास धारण करतो. जीव स्वतः कर्मपुदगलाची निर्मितीकरून बंधनात पडतो.
त्यामुळेच जन्म मरणाच्या संसारात भटकत राहतो. सम्यक् ज्ञान, सम्यक् श्रद्धा, व सम्यक् चरित्राने जीवात्मा या बंधनापासून मुक्त होतो. अशाप्रकारे जैन दर्शनही जीवाच्या पुनर्जन्मास कर्म कारण मानते. (पंचास्तिकाय
समयसार ५९,६०, ७५,७९,१५०)
बौद्ध दर्शन
बौद्ध दर्शनाने आत्म्याचे नित्यत्व मानलेले नाही. परंतु पुनर्जन्मवाद मानला आहे. कर्माप्रमाणे पुनर्जन्म होतो. आत्मा न मानून विज्ञान संतानाची एक अविच्छिन्नता त्यांनी मानली आहे. जेव्हा एक विज्ञान संतानाचे अंतिम विज्ञान समाप्त होते तेव्हा ते नविन विज्ञानास जन्म देते. अंतिम विज्ञानाचा मृत्यू होऊन एका नवीन देहात नवीन विज्ञान तयार होणे, यालाच पुनर्जन्म म्हटले गेले. या प्रक्रियेत ना भेद असतो ना अभेद आहे. कर्म आणि कर्मफल हे सुद्धा असेच अभिन्न आहे. त्यांची उत्पत्ती एकाच विज्ञानात होते.
जसे - दिवा जळतो पण त्याची ज्योत एकसारखीच नसते, ती सतत वेगळी असते, अनेक असते, तरी त्यात एकसंघपणा दिसतो. असेच विज्ञानाच्या संतानात अविच्छिन्नता असते, पण विज्ञान सतत बदलत असते. जसे - दुधापासून दही, दह्यापासून ताक, ताकापासून लोणी, त लोण्यापासून तूप यात एक नित्यक्रम आहे. पण यात अभेद ही नाही. वास्तविक दूध एकच असून, त्यात जसे परिवर्तन होत गेले, तसे पुनर्जन्मातही, विज्ञान संतानाचा एक अतूट संबंध आहे. पुढील जन्माचे प्रथम विज्ञान,पूर्वजन्माच्या अंतिम विज्ञानापासून निर्माण होते आणि त्या जन्मातील सर्व विज्ञानाच्या संचित संतानाचा तो परिणाम होतो. (संयुक्त निकाय २, २०) भारतीय षड्दर्शने, व जैन दर्शन हे सर्व आत्म्याचे अस्तित्व आपापल्या मतानुसार मानतात आणि बौद्धदर्शन हे आत्म्याचे अस्तित्व मानीत नाही परंतु तरीही सर्व दर्शनांनी पुनर्जन्माला मानले आहे. चार्वाक दर्शनच काय ते पुनर्जन्म नाकारते. चार्वाक दर्शनाच्या मते 'देहस्य नाशो ते मुक्ती' देहाचा नाश हीच मुक्ती आहे. आत्मा म्हणून काही नाही. केवळ पंचमहाभूतांच्या संयोगातूनच देह निर्माण होतो आणि पंचमहाभूतांचा हा एक सतत परिवर्तनाचा नियम आहे. त्यातून जन्मापासून केवळ मृत्यूपर्यंतच फक्त जीवन आहे पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म ह्या केवळ कल्पना आहेत. म्हणून “यावद् जिवेत् सुखं जिवेत् ऋणं कृत्त्वाघृतं पिबेत्” असे निव्वळ भौतिकवादी विचार चार्वाक् दर्शनाने मांडल्यामुळे त्या दर्शनास भारतीय अध्यात्म ज्ञानक्षेत्रात प्रतिष्ठा मिळाली नाही. चार्वाक दर्शनाप्रमाणेच आधुनिक उ भौतिक विज्ञानवादी काही संशोधक वैज्ञानिक आत्मा, पुनर्जन्म आणि पूर्व जन्म आदि गोष्टी मानत नाहीत. परंतु काही वैज्ञानिकांनी, आणि पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांनी पुनर्जन्माचे विज्ञान जाणण्याचा प्रयत्न केला आहे. पुनर्जन्माबद्दल काही वक्तव्य केलेले आहे. त्यांचाही येथे आपण विचार करू या.
पुनर्जन्मासंबंधी पाश्चात्य विद्वानांची मते
आर्थर शॉपेनहर या एकोणिसाव्या शतकातील महान जर्मन तत्त्ववेत्त्याने एकदा म्हटले होते, "मला जर एखाद्या आशियातील माणसाने युरोपची व्याख्या करण्यास सांगितले तर मला हेच म्हणावे लागले की, तो पृथ्वीचा असा भाग आहे की, जिथे मनुष्याचा जन्म शून्यातून झाला आहे व त्याचा वर्तमान जन्म हा अगदी पहिला आहे." या अचाट भ्रमाचे भूत, केवळ भौतिक शास्त्रांचाच अभ्यास करणाऱ्या पाश्चिमात्य देशातील अत्यंत प्रबळ विचार प्रवाहाने सर्वांच्या मानगुटीवर बसले आहे. भारतीय चार्वाकवाद्यांप्रमाणेच त्यांची धारणा दिसून येते.
परंतु पाश्चिमात्य इतिहासात असेही काही विचारवंत होऊन गेले आहेत की, त्यांना चेतन शक्तीचे अमरत्व आणि जीवात्म्याचा पुनर्जन्म याचे ज्ञान होते व त्यांनी त्याला पुष्टी दिली आहे. प्राचीन ग्रीकांमध्ये साक्रेटीस, पायथागोरस आणि प्लेटो यांनी पुनर्जन्म हा आपल्या शिकवणूकीचा एक महत्त्वपूर्ण घटक बनविला होता.
आपल्या आयुष्याच्या अखेरीस साक्रेटीसने म्हटले होते. “माझी अशी खात्री आहे की, पुनर्जन्म हे सत्य आहे व मृत शरीराचा त्याग करून जीवात्मे परत एकदा शरीर धारण करतात.' पायथागोरसने तर असा दावा केला होता की, त्याला त्याच्या ल पूर्वजन्माची आठवण होत असे.
प्लेटोने आपले मत आपल्या प्रमुख मांडले आहे की, “विशुद्ध आत्मा इंद्रियजन्य वासनांच्या आहारी गेल्याने, परमसत्याच्या स्तरावरून पतित होतो व एक भौतिक शरीर धारण करतो. प्रथमतः ची पतित आत्मे मनुष्य शरीर धारण करतात व मनुष्यामध्ये जो सर्वश्रेष्ठ ज्ञानाचा उपासक, तत्त्वज्ञ असतो त्याचे शरीर सर्वश्रेष्ठ समजले जाते. अशा तत्त्वज्ञाने जर पूर्ण ज्ञानाचे उद्दिष्ट गाठले तर तो शाश्वत जीवनाकडे परत जाऊ शकेल. पण जर का तो भौतिक वासनांच्या जाळ्यात जास्त अडकला तर त्याला भविष्यात पशू योनीत जन्म घ्यावा लागेल.'
प्लेटोची अशी समजूत होती की, “अतिशय खादाड व दारूडे यांना भविष्यात गाढवाचे शरीर मिळते, हिंसक व अन्यायी लोकांना लांडगा व ससाणा याचे शरीर मिळते व रूढी प्रथांचे आंधळेपणाने अनुकरण करणाऱ्यांना मधमाशा किंवा मुग्यांचे शरीर मिळते. काही काळानंतर त्याच्या काही चांगल्या कर्माने पुन्हा मनुष्य शरीर मिळते आणि मुक्ती मिळविण्यासाठी परत एकदा संधी मिळते." ज्यू आणि प्राचीन ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात सुद्धा पुनर्जन्मासंबंधीचे सूचक उल्लेख जागोजागी आढळतात. संपूर्ण 'कबाला' मधून पूर्वीच्या आणि भविष्यातील जन्माविषयी माहिती आढळते. हिंब्रू विद्वानांच्या मते 'कबाला' हे धर्मशास्त्रातील गुप्तज्ञानाचे प्रतिनिधीत्व करते. कबाला मधील 'झाहेर' या एका प्रमुख ग्रंथात असे म्हटले आहे. “आत्मे ज्या परिपूर्ण अवस्थेतून प्रकट होतात त्यात त्यांना पुन्हा गेले पाहिजे. परंतु हे साध्य करण्यासाठी त्यांनी त्यांच्यात बीजरूपाने असलेल्या सर्व सिद्धी प्राप्त केल्या पाहिजेत व जर एका आयुष्यात त्यांना यश आले नाही तर मग, दुसऱ्या तिसऱ्या याप्रमाणे अनेक जन्मात त्यांना ईश्वराशी पुनर्मिलन होईपर्यंत प्रयत्न करावा लागतो." हासिडिक ज्यूंच्या समजूती सुद्धा अशाच आहेत. (युनिव्हर्सल ज्युइश एनसायक्लोपेडिया) तिसऱ्या शतकातील धर्मशास्त्रज्ञ ओरिंगन जो हा ख्रिस्ती धर्माच्या आदि संस्थापकांपैकी एक होता व बायबलचा मोठा अभ्यासक होता. त्याने असे लिहिले होते की, “पापवृत्तीमुळे काही आत्मे प्रथम मानवी शरीर धारण करतात. त्यानंतर मानवी . शरीरातील अवधी संपताच विषय वासनेच्या आहारी गेल्यामुळे त्यांचे पशूंत रूपांतर होते व त्याहीनंतर त्यांना वनस्पती म्हणून जन्म घ्यावा लागतो व त्याच स्थितीतून त्याच पायऱ्यांनी ते वर येतात आणि आपल्या स्वर्गीय पदाला प्राप्त करतात.
ख्रिस्त आणि त्याचे अनुयायी यांनाही पुनर्जन्मासंबंधी माहिती असल्याचे अनेक पुरावे बायबल मध्ये आहेत. एकदा येशूला त्याच्या शिष्यांनी ओल्डटेस्टामेंट मधील ‘एलिअस' पृथ्वीवर पुन्हा येईल या भविष्यवाणीबद्दल प्रश्न केला. तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिले की, “एलिअस, खरोखरच येईल आणि सर्व काही बरोबर करील. पण माझे सांगणे असे आहे की, एलिअस अगोदरच आला आहे परंतु हे कोणालाही ठाऊक नाही.' नंतर येशूने असे घोषित केले की, “ज्याचा हेरोडने शिरच्छेद केला होता तो 'जॉन द बॉप्टिस्ट' हा एलिअस चा अवतार होता.”
दुसऱ्या एका प्रसंगी येशू आणि त्याचे शिष्य एका जन्मांध माणसाला भेटतात. त्यावेळी शिष्य येशूला विचारतात, “नक्की पापी कोण हा माणूस की त्याचे आईवडील? हा जन्मापासून कां आंधळा आहे?” येशूने उत्तर दिले की, पापी कोण हे महत्त्वाचे नसून परमेश्वराची किमया दाखविण्यास ही एक चांगली संधी आहे. येशूने मग त्या माणसाची दृष्टी परत चांगली केली. तेव्हा शिष्य म्हणाले "आता स्वतःच्या पापाचे फळ म्हणून जर तो माणूस आंधळा जन्मला असला, तर हे पाप त्याने केले असले पाहिजे" तेव्हा या सूचनेला येशूने अमान्य केले नाही.
अर्थात् पूर्वजन्म आणि त्याचप्रमाणे पुनर्जन्मासंबंधीचे सूचक संदर्भ बायबलमध्येही दिसतात.
कुराणात म्हटले की, "आणि तुम्ही मृत होता आणि त्याने तुम्हाला पुन्हा जिवंत केले आणि तो तुमच्या मृत्यूचे कारण होईल व परत जिवंत करील व शेवटी आपल्यात सामावून घेईल.'
इस्लामधर्माच्या अनुयायांत विशेषकरून 'सूफी' असे समजतात की, मृत्यू म्हणजे नाश नव्हे, कारण अमर आत्मा सतत निरनिराळ्या देहांतून फिरत असतो. प्रसिद्ध 'सूफी' कवी जलालउद्दीन रुमी लिहितो -
मी खनिज म्हणून मृत झालो, व वनस्पती म्हणून जन्मलो। मी वनस्पती म्हणून मृत झालो, व पशू म्हणून जन्मलो।।
मी पशु म्हणून मृत झालो, व माणूस म्हणून जन्मलो।
मला भिती कसली? मृत्यूमुळे माझ्यात काहीही कमतरता आलेली नाही.
अशारितीने ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या पाश्चिमात्य धर्मांच्या शिकवणूकीत पुनजर्म्माचे धागेदोरे हाती लागतात. 2060 तसेच पाश्चात्य तत्त्वज्ञ व्हॉलटर याने लिहिले की, "पुनर्जन्माचे तत्त्व विक्षिप्त किंवा निरूपयोगी नव्हे. दोनदा जन्माला येणे हे एकदा जन्माला येण्यापेक्षा अधिक आश्चर्य कारक नाही."
राष्ट्रीय पुढारी यांनीही आपल्या अमेरिकेचे लिखाणात लिहिले की, “स्वतःचे अस्तित्व समजल्यामुळे मला वाटते की, या किंवा त्या स्वरूपात मी नेहमीच अस्तित्वात असेन.” हिंदू धर्मग्रंथाचा अभ्यास करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 'जॉन अॅडम्स ' यांनी इ. स. १८१४ मध्ये दुसरे राष्ट्राध्यक्ष ता 'थॉमस जेफरसन' यांना पुनर्जन्माच्या तत्त्वासंबंधी लिहिले होते की, न "परमेश्वरांविरुद्ध बंड केल्यामुळे काही आत्मे 'संपूर्ण अंधकारमय प्रदेशात फेकले गेले बंदिवासातून मुक्त झाल्यावर त्यांना पृथ्वीवर येण्यास परवानगी देण्यात आली आणि स्वभावानुसार त्यांना परिक्षार्थ सर्व प्रकारचे प्राणी, सरपटणारे जीव, पशू, पक्षी, मानव व अगदी वनस्पती व खनिज पदार्थात ही जाण्याची मोकळीक मिळाली. जर त्यांनी सर्व परीक्षा नीट पार केल्या तर त्यांना मानव होण्यास परवानगी मिळते. जर मानव म्हणून ते चांगले ते त्यांना स्वर्गातील आपले मूळ पद प्राप्त होते. ' वागले तर
युरोपमध्ये नेपोलियननेही आपल्या पुर्वजन्मीच्या स्मृती आपल्या सेनापतीला सांगितल्या. पूर्वजन्मी तो 'सम्राट शालमान' होता महान जर्मन कवी जोहान वुल्फ गँग फॉन गटे हा सुद्धा पुनर्जन्मासंबंधी बोलत होता. तो श्रेष्ठ नाटककार व शास्त्रज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याने म्हटलेले आहे की, "माझी अशी खात्री आहे की, जसा सध्या मी इथे आहे. तसा हजारो वेळा पूर्वी मी इथे होतो आणि हजारोवेळा पुन्हा येणार आहे.”
इमर्सन, व्हिटमन व थोरो यांना भारतीय पुनर्जन्म व अध्यात्म शास्त्राविषयी खूप ओढ होती. त्यांनी या अध्यात्म विचारांचा अभ्यास केला. इमर्सनने कठोपनिषदाच्या अभ्यासावरून विधान केले आहे की,
“आत्मा जन्माला येत नाही, तो मरत नाही, तो कोणापासून ही निर्मिलेला नाही. जन्मरहित, शाश्वत असलेला आत्मा शरीराचा वध झाला तरी अमरच राहात असतो.” तसेच एकेठिकाणी त्याने लिहिले की, “जगाचे हे एक रहस्य आहे की, सर्व वस्तूंचे अस्तित्व चालू राहते व त्यांना मरण कधीच नसते, तर त्या थोडावेळ डोळ्याआड होतात व नंतर पुन्हा परत येतात. . काही मरत नसते. माणसे स्वतःला मृत समजतात व नाटकी प्रेतयात्रा आणि शोकमय अंत्यविधी सहन करतात आणि त्याचवेळी धडधाकटपणे कुठल्यातरी नव्या अनोख्या वेषात खिडकीतून पाहात असतात.' वॉल्ट व्हिटमन आपल्या 'साँग ऑफ मायसेल्फ' या कवितेत वर्णन करतो.
मला माहीत आहे की, मी अमर आहे. आतापर्यंत कोट्यावधी उन्हाळे व हिवाळे आपण पार केले आहेत, कोट्यावधी पुढे आहेत, व त्यांच्याही पुढे कोट्यावधी आहेत
फ्रान्समध्ये ओनोर बालझॅक या प्रसिद्ध लेखकाने आपली 'शेराफिता' ही कादंबरी पुनर्जन्मावर लिहिली. त्यात तो म्हणतो - "सर्व मनुष्य प्राण्याचे पुनर्जन्म झालेले असतात. दिव्यशांतीचे पद परत प्राप्त करण्यासाठी या स्वर्गाच्या वारसदाराला (मनुष्याला) आणखी किती हाडामासांची शरीरे धारण करावी लागताहेत कोण जाणे?”
चार्ल्स डिकन्सने पूर्वजन्मातील स्मृतीच्या अनुभवांचा शोध घेतला आहे. तो म्हणतो “आपण सर्वांनाच कधी कधी असा अनुभव येतो की, जे काही आपण सध्या करीत व बोलत आहोत, अगदी तेच, खूप खूप वर्षापूर्वी आपण बोललो होतो व केले होते आपल्या भोवताली तेच चेहरे, त्याच वस्तु व तीच परिस्थिती होती. . . .'
रशियात काऊंट लिओ टॉल्सटॉय यांनी लिहिले आहे की, "या आयुष्यात आपल्याला जशी हजारो स्वप्ने पडतात, त्याचप्रमाणे आपले वर्तमान आयुष्य अशा हजारो आयुष्यांपैकी एक आहे. सत्यजीवनांतून आपण ह्या स्वप्नवत जीवनात आलो आहोत व आपल्याला मृत्युनंतर त्याच 'सत्य जीवनात' जायचे असते. जोपर्यंत परमेश्वरासारखी जीवनाची अवस्था प्राप्त होत नाही. तोपर्यंत अशा अनेक स्वप्नांतून आपल्याला जावे लागते.”
मानव व त्याची अफाट कर्तृत्व शक्ती ही अणुपरमाणूंच्या गणितात अजिबात बसत नाही. थोर शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांनी मान्य केले की, ‘शरीरातील चेतनेचे योग्य स्पष्टीकरण करणे हे पदार्थ विज्ञान शास्त्राला अजून जमलेले नाही.” एकदा ते म्हणाले की, “वैज्ञानिक सिद्धांत” मानवीप्रणालीच्या जीवनाला लागू करण्याची वर्तमानप्रथा पूर्णपणे चूकीचे आहे असे नव्हेतर ती दोषपूर्ण आहे.” यावरून पूर्वजन्म किंवा पुनर्जन्मा संबंधीचे विचार चिंतन करतांना भौतिक वैज्ञानिक प्रयोग हे कामाचे नसून
अध्यात्म चिंतन आणि जगाचे जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण करूनच आत्म्याचा बोध होणे महत्त्वाचे आहे. भारतीय अध्यात्मशास्त्राने हजारो वर्षापासून त्याच तत्त्वावर आत्मा, परमात्मा, शक्ती, निसर्ग = पंचमहाभूतांचे नियम पूर्वजन्म, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, विकार वृत्ती, मन, बुद्धी, अहंकार आदि जड शरीरापलीकडील चेतन जगताचा शोध आणि बोध घेतलेला आहे. केवळ जड जगताचे पृथक्करण करून चेतनेचे गूढ उकलणार नाही. याबाबत शरीरशास्त्र व वैद्यकशास्त्रात नोबेल परितोषिक मिळविलेले डॉ. अल्बर्ट सेंट जॉर्जी अशा अपयशाने वैफल्यग्रस्त होऊन म्हणतात की, “चेतनेचे गूढ समजण्याचा मी जो आयुष्यभर प्रयत्न केला, त्यात माझ्या हाती फवत निर्जीव अणू-परमाणू-विद्युतकण ह्या गोष्टी आल्या. मध्येच कोठे तरी चेतना निसटून गेली आहे म्हणून आता म्हातारपणी मी पुन्हा मागे परतत आहे.”
तसेच पदार्थ विज्ञान शास्त्रात नोबेल पारितोषिक मिळविलेले 'निल्स बोहर' म्हणतात “निश्चितपणे हे मान्य करणे भाग आहे की, चेतनेशी किंचित सुद्धा संबंध आहे अशी कोणतीही गोष्ट जीवशास्त्रात अथवा रसायनशास्त्रात आपल्याला सापडत नाही. तरीही चेतना म्हणून काहीतरी आहे हे आपण सर्वजण जाणतो कारण इतकेच की ती आपणास्वतः जवळ आहे. 'क्वाँटम' थिअरीत मांडलेल्या नियमा व्यतिरिक्त आपल्याला अशा नियमांच्या विचार करावा लागेल, जे पदार्थ विज्ञा व रसायन शास्त्राच्याही वेगळे आहेत. अर्थात पाश्चिमात्य जगतात ही बुद्धीवंतांची शास्त्रज्ञांची मते पुनर्जन्माकडे आकृष्ट झाली आहेत.
जड जगतापेक्षा सूक्ष्मातिसूक्ष्म असलेले चेतन जगत आणि त्याचा नियम जाणण्याचा मानवाजवळ कोणता उपाय आहे. बुद्धी मनाद्वारा निर्माण होणाऱ्या तर्कावितर्कानी त्या चेतनेचे गुढ उकलणार आहे काय? अर्थातच नाही म्हणून आपणास त्या सर्वज्ञ व्यक्तीच्याच शोधात फिरावे लागणार आहे. जर सर्वज्ञ कोणी व्यक्ती असेल तरच त्याद्वारा आपणास ते परम गुह्यातिगुह्य दिव्य ज्ञान होऊ शकेल. तेव्हाच पुनर्जन्माचे तत्त्व समजून घेता येईल. हे तत्त्व समजून घेणे ही जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती प्राप्त करून घेण्याविषयीच्या ज्ञानाची प्रथम पायरी होय. पुनर्जन्म आणि भगवद्गीता
श्रीमद्भगवद्गीतेचे जर आपण सूक्ष्मपणे अवलोकन केले तर, त्यात आपणास जीव, जगत, देवता शक्ती आणि परमेश्वर या चार नित्य तत्त्वांचे थोडक्यात पण ठोस स्वरूपात निरूपण केलेले दिसून येते. पुनर्जन्मासंबंधी किंवा पुर्नजन्मासंबंधीच विस्तृत विवेचन आपणास श्रीगीतेत दिसून येते. भगवान श्रीकृष्ण महाराज म्हणतात श्लोक -
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ (२-१२)
देहिनोऽस्मिनयथा देहे कौमारं यौवनंजरा ।
तथा देहान्तर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ (२-१३)
म्हणजे हे अर्जुना पूर्वी मी कधी काळी नव्हतो, तू कधी नव्हतास किंवा हे जनधिप नव्हते असे काही नाही. आणि यापुढे आम्ही राहणार नाही असेही नाही. अर्थात आम्ही सर्व मागेही होतो. या देहातून गेल्यानंतरही राहणार आहोत.
ज्याप्रमाणे या देहात बालपण, तरुणपण आणि म्हातारपण आहे. तसेच देह सोडल्यानंतर दुसऱ्या देहाची प्राप्ती होते. त्या विषयी ज्ञानीपुरुष मोहित होत नाहीत. तसेच
श्लोक -
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ (अ.२-१९)
आत्मा अविनाशी आहे म्हणून जो कोणी याला मारणारा किंवा मरणारा समजतो ते दोन्हीही हे तत्व जाणत नाहीत अर्थात् अज्ञान आहेत. हा आत्मा न मारतो. न मारला जातो.
श्लोक -
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वानभूयः ।
अजो नित्यः शाश्वतोयं पुराणो नहन्यते हन्यमाने शरीरे ।। (२-२०)
हा आत्मा केव्हाही उत्पन्न होत नाही. मरत नाही. तसेच न एकवेळ होऊन पुन्हा होणारा आहे. हा आत्मा अज = उत्पत्ती रहित नित्य निरंतर राहणारा शाश्वत = सतत सारखा राहणारा पुराण आहे. शरीराच्या मारल्याने हा मरत नाही. याश्लोकांत भगवंतांनी आत्म्याचं = प्राचिन स्वच्छ आणि सुंदर विश्लेषण केलेले आहे त्यामुळे "अद्वैत सिद्धांत" श्री गीतेत सांगितले आहे असे मानणारे जे सिद्धांत आहेत ते कोसळून पडतात. जीवात्मा परमेश्वरापासून उत्पन्न झाला किंवा त्याचे प्रतिबिंब आहे हा सर्व ब्रहम्याचाच परिणाम आहे किंवा विवर्त आहे असे सर्व सिद्धांत कोलमडून पडतात आणि आत्म्यासंबंधी यथार्थ ज्ञान आपणास मिळते. येथे आत्म्याची स्वतंत्र सत्ता श्रीगीतेने स्विकारली आहे. भगवंतांनी पुढील श्लोकात हे तत्त्वज्ञान अधिक व्यापक स्वरूपात सांगितले आहे.
श्लोक -
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथंस पुरुषः पार्थ के घातयति हन्तिकम् ॥ (२-२१)
अर्थात् हे अर्जुना! या आत्म्याला जो विनाशरहित उत्पत्तिरहित, निरंतर राहणारा आहे असे जाणतो, तो पुरूष कोणाला कसे मारवितो आणि कोणाला कसा मारतो अर्थात जो पुरुष हे तत्त्व पुर्णाशांने जाणतो तोच खरा ज्ञानी आहे. तोच अहिंसा तत्त्वाला समजू शकतो. पुढील श्लोकात तर भगवन्त हा देहान्तराचा अर्थात पुनर्जन्माचा विषय अधिक विस्तृतपणे आणि उदाहरण देऊन पटवित आहेत
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णा
न्यन्यानि संयाति नवानि देही । (२-२२)
ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण झालेली वस्त्रे टाकून देतो आणि दुसरी नवी वस्त्रे घेतो त्याचप्रमाणे देहधारी जीवात्मा जीर्ण झालेली शरीरे सोडून दुसऱ्या नव्या शरीरात जातो.
शरीर नाशवान आहे पण आत्मा मात्र अमर आहे. हे तत्त्व भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यावरून पुर्नजन्मासंबंधीचे यथार्थ ज्ञान आपणास सहजतेने मिळते आणि सर्वज्ञ शक्तीयुक्त असलेल्या भगवंताच्या उपदेशवाक्यांवर प्रतितीही बसायला लागते. भगवंत आत्म्यासंबंधी विस्तृत निरुपण करतात.
श्लोक -
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ (२-२३)
या आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत. अग्नि जाळू शकत नाही आणि पाणी सडवू शकत नाही आणि वायू सुकवू शकत नाही.
श्लोक -
अच्छेद्योऽयमदाह्योयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ (२-२४)
हा आत्मा तोडण्यायोग्य नाही, जाळण्यायोग्य नाही, सडविण्या योग्य नाही आणि सुकविण्या योग्यपण नाही. हा आत्मा नित्य, सर्व ठिकाणी जाणारा, निश्चल, जडमूड आणि सनातन आहे. अशा या जीवात्माचे स्वरूप आणि त्याचे कार्य यातून भगवंतांनी आपणास सांगितले आहे आणि त्यामुळे आत्मा हा कर्मानुसार एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. पहिले शरीर हा त्याचा पूर्वजन्म आणि नंतर मिळालेला देह हा त्याचा पुनर्जन्म आहे. परंतु अशी जन्म मरणाची ही अखंड परंपरा मूळ सृष्टीरचनेपासून सुरूच आहे आणि या मृत्यू संसार सागरातून सुटका परमेश्वराला अनन्यभावे जाऊन त्याच्या ज्ञान प्रेमप्राप्तीनेच होऊ शकते.
(आचार्य श्रीन्यायंबासबाबा शास्त्री)