आपण ज्याला सुख म्हणतो ते सुखच आहे का?
मी अनेक संसारी लोकांना संसार कशासाठी करता विचारत असतो. संसारातून मिळणारे सुख क्षणिक असून दुःखच अधिक आहे. पुत्र पुत्री इ. नातेवाईक यांच्यात आमचे मन गुंतलेले असते, ममता गुंतलेली असते. यांच्या बऱ्या वाईट वातेंमुळे, कृतीमुळे आमच्या मनावर सतत सुख दुःखाचे आघात होत असतात.
एखादा श्रीमंत असूनही मुले सेवा करीत नाहीत, एखादा गरीब असूनही मुले सेवा करतात. आम्ही ज्या ज्या अपेक्षा संसारात करतो त्या त्या अपेक्षा सफल होतातच असे नाही.
श्रीकृष्ण भगवंत गीतेत म्हणतात
अहंकार विमुढात्मा कर्ताहमिती मन्यते ।
अर्थात् अहंकाराने विमोहित झालेला आत्मा मीच कर्ता आहे. मी हे केले, हे काम करायचे आहे व हे कार्य करित आहो अशा प्रकारे स्वतःकडे कर्तृत्व घेत असतो.
पण निसर्गाची घंटी झाल्यावर संपत्ती तर काय स्वतःचा देह पण येथेच राहणार आहे. जर आम्ही कर्ते आहोत तर मग आता मरतांना का कोणाला सोबत घेऊन जात नाही?
याकरता आपली विचारसरणी अशी असावी की जगातील प्रत्येक वस्तू आम्हाला आनंद देऊन गेली पाहिजे. शत्रुकडे पाहिले व मित्राकडे पाहिले तर आम्हाला आनंदच वाटला पाहिजे. नाही आनंद तर दुःख तरी आमच्या वाट्याला नको. ही स्थिती ज्ञानाशिवाय शक्य नाही. आम्ही मध्यम अवस्थेत जीवन जगत आहोत. आमची अपेक्षा आहे मुलाला M.A. करून शिक्षक बनवू व संसाराचे ओझे त्याच्या मानेवर ठेवू.
पण M.A. झाल्यावर जर नोकरी लागली नाही तर अडाणी माणसापेक्षा हा सुशिक्षित माणुस जास्त दुःखी झाला आहे. आयुष्याचे २२ वर्षे शिक्षणात गेले व शेवटी नोकरी नाही. मोठे लोक मिसळून घेत नाहीत. बोलतांना बरोबर बोलत नाहीत. अडाणी माणसाला भाषेची तीव्र वाक्ये समजणार नाहीत, पण या सुशिक्षित माणसाला भाषेचे परिपूर्ण ज्ञान होऊन नेहमी अपमानीत जीवन जगावे लागत आहे. बारीक सारीक वागणुकीचे पडसाद याच्या मनावर उमटत आहेत. मग यापेक्षा अडाणी माणूस तरी जास्त सुखी आहे.
शिक्षण घेतल्यावर दुःखी झालेल्या मनुष्याला दुःख मुक्त होण्यासाठी आम्ही कोणत्या शाळेत भरती करावे? त्या करता विद्यापीठाने कोणता अभ्यासक्रम नेमला आहे? वास्तविक मानसशास्त्राचा अभ्यास दुःखमुक्त होण्यासाठी तरी प्रत्येकाला आवश्यक आहे.
प्रत्येकाला सुखी व्हावे वाटते, पण सुख म्हणजे काय आम्हाला माहिती नाही. मुलाला विचारले, तुला काय पाहिजे? तर कुणी कपडेमागतो, कुणी खेळाचे साधन मागतो, कुणी खाद्यपदार्थ मागतो. तरुणाला विचारले, तर तो विवाह करायचा म्हणतो. एक नौकरी करायची म्हणतो. एक पैसा मागतो. एक प्रतिष्ठेच्या मागे धडपडतो. वृद्धाला विचारले तर मुलगा मनासारखे वागत नाही म्हणतो. एक संतती नाही म्हणतो. एक मुलाची भरभराट पाहु इच्छितो. हे मनुष्य जीवन कशासाठी आहे? या जीवनात येऊन आपल्याला काय कर्तव्य पार पाडायचे आहे. हे आम्हाला माहित नाही. एखाद्या व्यक्तीला विचारा, तुला जीवनात काय पाहिजे? एका वाक्यात उत्तर दे. त्याला सांगता येणार नाही. एखादा म्हणेल आम्ही सर्व सुखी असावेत. पण सुख म्हणजे काय? सर्व गोष्टी आमच्या मनाप्रमाणे व्हाव्यात. कस शक्य आहे? एकही मानव असा नाही की सर्व विषय त्याच्या मनासारखे होतात. मग अशा अंधश्रद्धेत भरकटून काय उपयोग? ज्याला आपल्या कर्तव्याचा केंद्रबिंदू समजत नाही, ज्याला स्वतःच्या मनाची समजूत घालता येत नाही. त्याने जगाला शिकविण्याचा उद्यम का करावा ?
मी म्हणतो कष्ट करून जर क्षणिक सुख मिळते तर कष्ट न करता आठ तास झोपल्यावर फुकटचे आठ तास सुख मिळते. एकदा गाढ निद्रा लागली की तो माणूस उठल्यावर त्याला विचारा झोप कशी लागली? तो म्हणेल झोप छान लागली. झोपेत समाधान होते. सुख वाटत होते. गाढ झोपलेल्या माणसाला उठवा, त्याला उठावे वाटत नाही. त्या सुखात तो रममाण झालेला असतो. काहीही कष्ट न घेता आठ तास सुख घेणे आपल्या हातात आहे.
झोपलेला माणुस बाह्य जगापासून वेगळा आहे. त्याच्या नाका जवळ एक गुलाबाचे फुल धरा व थोड्याच वेळात बाजूला ठेवून द्या. नंतर त्या माणसाला उठवा व विचारा तुला वास कसा आला? त्याला माहिती नाही. सुगंध नाकाने येतो ना? मग नाकाने तर श्वास चालु आहे. वासाचा गंध का समजला नाही? मन दुसरीकडे दुसऱ्या विषयात गुंतलेले आहे.
झोपलेल्या माणसाला हळूच हाक मारा, हळूच स्पर्श करा, एक साखरेचा कण तोंडात टाका, अर्धवट डोळे उघडून झोपलेल्या पुस्तक धरा, त्याला या सर्व विषयाची जाणीव नाही कां? कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा ही ज्ञान करून देणारी इंद्रिये आहेत. पण मन, या इंद्रियाशी संबंध साधत नाही ते दुसऱ्या विषयात एवढे लीन झाले आहे की त्याला याविषयीची जाणीव देखील नाही. मग यांच्या माध्यमातून मिळणारे सुख दुःख आत्म्याला जाणवणार कसे? म्हणून म्हणतो यावेळी आपण बाह्य जगापासून काही अंतर दूर थांबलो आहोत.
झोपेत दोन अवस्था आहेत. स्वप्नावस्था व गाढ अवस्था गाढ अवस्थेत मनुष्याला स्वप्ने पडत नाहीत व सुखदुःखाची जाणीवपण नाही. मात्र स्वप्नावस्थेत आपण बाह्य जगाच्या सुखदुःखाच्या संवेदनेला जरी बळी पडलो नाही तरी स्वप्नामधील विषय पण मनाच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रिय वियोग व अप्रिय संयोग जेंव्हा होईल तेव्हा आपण दुःखी होऊ. मन हे प्रत्येक विषयावर कल्पनेचे डोंगर रचित असले तरी मनाचे विषय प्रिय असतील तर सुख व अप्रिय असतील तर दुःख हे आत्म्याला होणारच आहे.
गाढ निद्रेसारखी एकाग्र अवस्था न झोपता देखील होऊ शकते. ती म्हणजे सुख दुःखाच्या आघातामुळे.
उदा. - एका गरीब माणसाला एक लाखाची लॉटरी लागली हे समजताच तो खात्री करण्यासाठी घराबाहेर पडला लॉटरीवाल्याकडे जाताच त्याला लॉटरी लागल्याची खात्री झाली.
यावेळात त्याला रस्त्याने कोण कोण भेटले विचारा, त्याला संपूर्णपणे माहिती देता येणार नाही. कारण लॉटरीच्या आनंदात कित्येक लोकांना त्याने पाहिले पण त्याचे त्याकडे दुर्लक्ष झाले होते.
आईच्या भेटीसाठी उत्सुक झालेल्या बालकाला हॉस्टेलचे सर म्हणतात आता थोड्याच वेळात तुला आईच्या भेटीसाठी पाठवावयाचे आहे लवकर जेवण कर, बालक जेवण करतांना त्याचे चवीकडेपण लक्ष जात नाही. घरातील एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्याचे भुकेकडे पण लक्ष नसते.
सांगण्याचे तात्पर्य, जेव्हा माणुस एकाग्र होतो तेव्हा तो माणुस सुखरूपी किंवा दुःखरूपी विषयात रममाण झालेला असतो. त्याला बाकी विषयाचे भान नसते. ही मनुष्याची स्वाभाविक अवस्था आहे. पण संयमपूर्वक मनाला एकाग्र करायचे झाल्यास जगात सर्व विषयापेक्षा तो विषय कठीण आहे. पण एकाग्र झाल्यास त्या विषयातील संवेदना जाणवणारच व याकरता वैज्ञानिक भौतिक किंवा इतर सुखाप्रमाणे पैसे देण्याची गरज नाही.
शत्रुचा नाश किंवा हार झाल्यावर पण आनंद मिळतो. या ठिकाणी कोणते पैसे खर्च केले आहेत? एका दुःखाच्या अभावी सुख वाटते. ताप आला, डोके दुःखते, गोळी घेतली, डोके दुखणे थांबले. समाधान वाटत आहे. अग्नीजवळ चटके बसतात. दुर व्हा, समाधान वाटेल, नसता पाणी आणून अग्नी विझवा, चटके बसनार नाहीत. कोणते योग्य आहे? ठरवा, अग्नीपासून दूर होणे की पाणी आणून कष्टपूर्वक अग्नी विझवणे. हे दुःखाअभावी सुख आहे.
मनात चोरी करण्याचे विचार आले आहेत तर चोरी करून समाधान मानणे बरे की मनाची समजूत घालून समाधान मानणे बरे.
गावातील मित्र अमेरिकेला निघाले त्यापैकी एका मित्रास जाण्याची इच्छा आहे पण भाड्याला पैसे नाहीत. दुसऱ्याजवळ पैसे आहेत. अमेरिकेला जाणे तेवढे योग्य नाही म्हणून गेला नाही. या दोन मित्रात दोघे पण अमेरिकेस गेले नाहीत. एक दुःखी तर एक दुःखी नाही. म्हणजेच जो आपल्या मनाची समजूत घालू शकतो तो सुखी.
मनुष्याची लहानपणापासून जडणघडण व विचारसरणी अशी पाहिजे की आपल्यापासून अनेकास त्रास होऊ नये. आहे त्यात समाधान मानले पाहिजे, कष्ट, उद्योग कर्तव्य पार पाडले पाहिजे.
याकरता आध्यात्मिक दृष्टीक्षेप :
जगातील सर्व मानवाच्या सुखाचा विचार केला तर प्रामुख्याने तीन भाग पाडता येतील.
१) आध्यात्मिक सुख, २) अधिभौतिक सुख ३) अधिदैविक सुख
आध्यात्मिक सुख दोन प्रकारचे १) मानसिक २) शारिरीक मानसिक सुख म्हणजे प्रियसंयोग अप्रियवियोग
प्रियसंयोग - जेव्हा मनाला प्रिय असलेला विषय मिळतो तेंव्हा मनुष्याला विषयपुर्तिचे समाधान मिळते.
उदा. - मित्राच्या भेटीची इच्छा होती, तेवढ्यात मित्राची भेट झाली. अप्रियवियोग म्हणजे मनाला जे आवडत नाही ते न होणे. परीक्षेत पास न होणे मला आवडत नाही त्याचा वियोग उदा. झाला म्हणजे नापास झालो नाही, हे मानसिक सुख होय. -
शारीरिक सुख म्हणजे गादीवर लोळणे, स्वच्छ रहाणे, अत्तर वापरणे, स्पर्शसंबंधांचे सुख, नेत्राचे सुख, नाक, कान, जीव इ. इंद्रियांच्या विषयाची पूर्ती शरीराच्या माध्यमातून मिळणारे सुख असे मानसिक व शारीरिक दोन्ही मिळून आध्यात्मिक सुख होय आधिभौतिक प्राणीमात्राच्या संबंधातून मिळणारे सुख. सुख म्हणजे
उदा. गायी, म्हशी पाळल्या, कुत्रा, पक्षी पोपट मोर इ. प्राणी पाळले त्यांची व्यवस्था करतांना त्यांच्या अंगावरून हात फिरवतांना समाधान मिळते. मुले सांभाळणे, घोड्यावर बसणे, हत्तीवर बसणे, लहान कुत्र्यांचे पिल्लू जवळ घेऊन झोपणे, लहान मुलांना जवळ घेणे, खेळणे इत्यादी प्राणीमात्रांच्या संबंधातून उद्भवणारे सुख अधिभौतिक सुख होय. अधिदैविक सुख म्हणजे दैवयोगाने ऋतुबदलाने मिळणारे सुख.
उदा. उन्हाळ्याचा कंटाळा आला मग पावसाळा सुरू झाला तेंव्हा सुरवातीला पावसाळ्याने शांत वाटते. पावसाळ्याचा कंटाळा आला की पावसाळा उघडून हिवाळा सुरू होतो तेंव्हा समाधान वाटते. हिवाळ्यात थंडीचा कंटाळा आला की उन्हाळ्यात सुरुवातीला समाधान वाटते. दैवयोगाने शत्रूच्या गावी भूकंप होऊन शत्रू नष्ट झाले. शत्रूवर विज पडली व तो ठार झाला. अशाप्रकारे दैवयोगाने घडणाऱ्या घटनातून मिळणारे समाधान आधिदैविक सुख होय.
श्रीमद्भगवद्गीतेत
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तिदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ (अ. १७-१३)
असौ मया हतः शत्रूर्हनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ (अ. १७-१४)
या दोन श्लोकात सांगितले आहे की हे मी आज मिळविले, हा मनोरथ मी पूर्ण करणार आहो, हे धन माझ्याजवळ आहे, हे धन पण पुन्हा माझेच होणार आहे, या शत्रूला मी मारले इतर शत्रूंना देखिल मी मारणार आहे, मी इश्वर आहे, मी भोगी आहे, मी सिद्धपुरुष आहे बलवान सुखी मी
आहे. अशाप्रकारे जगातील सुख मानण्याचा एक प्रकार येथे सांगितला आहे.
सुखं त्विदानीम् त्रिविधं श्रुणु मे भरतर्षभ ।
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥ (१८-३६)
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् ।
तत्सुखं सात्विकं प्रोक्तमात्मबुद्धि प्रसादजम् ॥
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम् ।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ।।
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः ।
निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥
श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात हे अर्जुना ! अभ्यासामुळे (पुन्हा पुन्हा याच क्रिया केल्याने या सवयीमुळे) ज्या ठिकाणी ज्या विषयात मनुष्य रममाण होतो व ज्याचा शेवट दुःखातच होतो असे तीन = प्रकारचे सुख आहे आता तू ते ऐक.
१) जे सुरुवातीस विषाप्रमाणे वाटते पण परिणामी अमृतासारखे = असते. ते स्वतःच्या बुद्धिच्या प्रसन्नतेतून निर्माण झालेले सात्विक सुख सांगितले आहे.
उदा. - देवता भक्ती करतांना प्रयत्नपूर्वक कष्टपूर्वक मनाला ध्यान करायला लावणे, बिन्दू त्राटक, ज्योती त्राटक करणे, श्रवण, मनन, निदिध्यासन करणे इत्यादी बुद्धिच्या प्रसन्नतेतून निर्माण झालेले, सुरूवातीला जरी कष्टमय विषतुल्य वाटत असले तरी परिणामी मात्र अमृतासारखे असते. त्रिगुण सुखातले हे सात्विक सुख होय.
२) विषयाच्या व इंद्रियाच्या संयोगातून मिळणारे सुरुवातीला अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषाप्रमाणे वाटते ते राजस सुख सांगितले आहे.
उदा. स्त्री पुरुषांच्या संयोगातून मिळणारे सुख सुरूवातीला अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी मात्र विषाप्रमाणे वाटते. हे त्रिगुण सुखापैकी राजस सुख होय.
३) जे सुरुवातीला व शेवटी स्वतःला मोहित करणारे आहे जसे झोप, आळस, इंद्रियाच्या चुकीतून किंवा माजातून निर्माण झालेले ते तामस सुख आहे.
उदा. रागाने निर्बल शत्रूला मारतांना सुरवातीस व शेवटीपण मोहित होऊन समाधान वाटते. ते व झोप, आळस हे तामस सुख होय. अशाप्रकारे सात्विक राजस व तामस या क्षणिक नाशिवंत सुखाचे वर्णन श्रीगीतेत आले आहे.
काही लोक देवताभक्ती करून देवतेची फळे मिळवण्याचा प्रयत्न करतात काही भूताप्रेताची भक्ती करतात काही पितरांची भक्ती करतात. श्रीकृष्ण भगवंताच्या उक्तीप्रमाणे
यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रताः ।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपिमाम ॥ (अ. ९-२५)
अर्थात् देवतांचे व्रत धारण करणारे देवतेला पितरांचे व्रत धारण करणारे पितृदेवतेला, भूतांची भक्ती करणारे भूतांना व माझी भक्ती करणारे मला मिळतात हे सत्य आहे.
ज्या सुखाच्या इच्छेने आपण हे मिळवणार आहोत ते सुख सांसारिक
सुखापेक्षा दीर्घ मुदतीचे असले तरी ते मोजके आहे त्याची मुदत एके दिवशी संपणार आहे.
त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा
यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति
दिव्यान्दिवि देव भोगान।। (अ. ९-२०)
तेतं भुक्त्वा स्वर्गलोकविशालं।
क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।।
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना
गतागतं कामकामा लभन्ते (अ. ९-२१)
यज्ञादि क्रिया करून स्वर्ग सुख मिळविले तरी ते विशाल स्वर्ग संपल्यावर
सुख भोगने झाल्यावर ज्या पुण्याईने स्वर्गसुख मिळाले ते पुण्य परत या मृत्यूलोकात याव लागते अर्थात या सुखाला पण अंत आहेच.
पण स्वर्गाच्या पलिकडे गेलो तर काय?
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते।। (अ. ८-१६)
अर्थात मृत्यूलोकापासून ते मायाब्रह्मापर्यंन्त सर्व लोकांना रहाट घटीकेप्रमाणे कर्मानुसार फिरावे लागते. परंतू हे अर्जुना! मला प्राप्त झाल्यावर मात्र पुनर्जन्म घ्यावा लागत नाही.
सर्व देवताफळे व प्राप्ती नाशीवंत आहे हे श्रीमद्भगवद्गीतेचे मत आहे. सुखच मिळवायचे असल्यास दुःख मिश्रीत नाशीवंत देवताफळापेक्षा एका परमेश्वराचे नित्य सुख भोगणे योग्य नाही काय?
पण परमेश्वराचे सुखही नाशीवंतच असेल म्हणून सांगतात.
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते।
अर्थात मला प्राप्त झाल्यावर हे अर्जूना! पुनर्जन्म मिळत नाही. अर्थात् परमेश्वरीय आनंद नाशिवंत नसून नित्य आहे.
असे सांगूनही मानव परमेश्वर भक्ती का करित नाही? याला कारणीभूत आमचे कर्म व आवडीनिवडी आहे.
आम्ही आतापर्यंत जे मानसिक वाचिक शारीरिक कर्म केले तसे योग येतात व तशी प्रेरणा आम्हाला आतून होत असते म्हणून तर प्रत्येक व्यक्तीची आवडी वेगवेगळी आहे.
दुसरे कारण ज्याप्रमाणे लोहचुंबक फक्त लोखंडालाच आकर्षून घेतो. त्याप्रमाणे कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा आपआपल्या विषयातच रममाण होणार आहेत.
मनुष्य देहात असणाऱ्या सर्व ज्ञानेन्द्रियांच्या ठिकाणी देवतांचे सामर्थ्ये आहेत. त्यामुळेच ते आपल्या विषयाचे ज्ञान करून देतात. तसेच मन, बुद्धि, चित्त, अहंकार येथे पण देवतेचेच सामर्थ्य कार्यरत आहे. सामर्थ्य त नसते तर या इंद्रियांचे काम करणे बंद पडले असते. म्हणून माणसाला या भौतिक जगातलेच विषय आवडतात, देवतेकडेच तो ओढला जातो. पण वास्तविक सुख परमेश्वराचे प्राप्तीतच आहे व माणसाने तसा प्रयत्न करावा.
नरेंद्र मुनी शास्त्री बाबा