स्नेहा प्रेमाचे लक्षण आणि महत्व

स्नेहा प्रेमाचे लक्षण आणि महत्व

स्नेहा प्रेमाचे लक्षण आणि महत्व 

स्वर्गात आपल्यापेक्षा सर्व सुखसोयी असूनही ते आपल्यासारखेच दुःखी आहेत. कारण काय? तेथे स्नेह नाही. अमृताने अमर होता येतं; पण सुखी होता येत नाही. अमृत अमर करतं; पण स्नेह अमृत पदावर आरूढ करतं, म्हणून स्नेह हे विश्वातल्या साया चितांची खाण आहे. भगवान श्रीचक्रधर स्वामी स्नेहाचं आणखी एक उदाहरण देतात, 'मातेचे स्नेह ते नैसर्गिक असते' हे त्यांचं मोलाचं दुसरं सूत्र आहे. स्नेहाची ओळख होण्यासाठी त्यांनी एक अप्रतिम उदाहरण आपल्यासमोर ठेवलं आहे. जीवंत झऱ्याचं पाणी जसं नैसर्गिक तसंच आईच्या हृदयातला स्नेह नैसर्गिक आहे.

मी एका खेड्यात मुक्कामी होतो. तेथे एक गृहस्थ म्हशीचं दूध काढत होता. म्हशीसमोर त्याने एक वस्तू ठेवली होती. त्याच म्हशीच्या मेलेल्या वगाराचे जे चामडे होते, त्यात भुसा भरून त्याला शिवलं होतं. शेतकऱ्याच्या भाषेत त्याला भूत म्हणतात. दूध काढल्यावर शेतकऱ्याला मी विचारलं की, 'दूध काढताना म्हशीच्या समोर काय ठेवलं होतं?' तेव्हा तो म्हणाला, “तिचं वगारू मेलं त्यात भुसा भरून समोर ठेवलं." मी म्हटलं, “का?” तो म्हणाले, "म्हैस हा सगळ्यात बिनडोक प्राणी आहे. सर्कसमध्ये सगळे प्राणी असताच. म्हैस नसते, कारण त्या प्राण्याला शिकवणं शक्यच नाही. रोडवरच्या गाडीचा हॉर्न ऐकून सगळी जनावरं बाजूला होतात; पण परिवहनमंत्र्याच्या गाडीचा हॉर्न ऐकूनही म्हैस सरकत नाही. असा हा निर्बुद्ध प्राणी आहे."

हे त्याचं, म्हशीबद्दलचं मत ऐकून मला खेद वाटला. बिगर पाण्याचं दूध देणाऱ्या म्हशीची निंदा दुधात पाणी टाकून विकणारा माणूस करीत होता. ते दूध ज्या मोटारसायकलवर नेलं जातं त्या गाडीत पेट्रोलऐवजी रॉकेल मिसळणारा माणूस स्वतःला चतुर व म्हशीला निर्बुद्ध समजत होता. माणसापेक्षा जनावरं प्रामाणिक असतात. माणूसच अप्रामाणिक आहे. दुसऱ्याला, स्वतःला व निसर्गाला, फार काय परमेश्वरालाही फसवून आपण जिंकलो असं या पराजित माणसाला वाटत असतं. जनावरं परोपकार करीत असतात, 'परोपकाराय दुहंति गावा' असं संतांनी म्हटलं आहे.

मी मनाशीच कल्पना केली की, म्हशीला माणसासारखं बोलता आलं तर ती काय म्हणेल? म्हणेल, 'स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या क्षुद्र वृत्तीच्या माणसा मी निर्बुद्ध नाही. माझं बाळ मेलं हे मला ठाऊक आहे. बाळ मेल्याची प्रथम जाणीव आईलाच होत असते. त्याच्या कातड्यात तू भुसा भरलास हे पण मला समजलं. त्याला समोर ठेवून तू माझं दूध काढतोस. चक्क मला फसवतोस हेही मी ओळखलं, तरीही मी माझा पान्हा मोकळा सोडला. बेइमान माणसा, तुझ्या हुशारीमुळे नाही, तर माझ्या बाळाचं कातडं मी समोर पाहिलं म्हणून. अरे! माझं वात्सल्य इतकं जीवंत आहे की, लेकराचं कातडं पाहिलं की, खळकन पान्हा फुटतो. मातेच्या स्नेहाची चव तुला कशी कळणार. तुझ्या बाळाचा तू विचार कर. 

व्यसनाच्या विळख्यात सापडलं आहे. गटारात पडतं आहे. त्याच्या जीवनाच्या चिंध्या झाल्या आहेत आणि तू उघड्या डोळ्यांनी पाहतोस? तुला त्याची दया येत नाही. माया येत नाही. याचं कारण तुला मुलं वाढवता येतात, घडवता येत नाही. • वाढवण्यासाठी ज्ञान लागतं ते तुझ्याजवळ आहे; पण घडवण्यासाठी स्नेह लागतो, ते तुझ्या जवळ नाही. काही हात उगारण्यासाठी असतात, काही हात उभारण्यासाठी असतात. उगारण्यासाठी शक्ती लागते व उभारण्यासाठी स्नेह होतं त्यांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवताच तो वेदमंत्राचा उच्चार करू लागला. त्या प्राण्याला तू निर्बुद्ध समजतोस. भांडणाऱ्या दोन रेड्यांमध्ये श्रीचक्रधरांच्या हाताचा स्पर्श होताच त्यांचं भांडण मिटलं. तो प्राणी वेडा आहे काय? मी तर उलट असं म्हणेन, तुझ्या स्पर्शाने माझं बाळ मेलं व ज्ञानेश्वराच्या स्पर्शाने वेदमंत्राचा उच्चार करायला लागलं या स्पर्शाचा तू विचार कर आणि आईजवळ असते हे लक्षात ठेव.

मुलावरचं आईचं प्रेम नैसर्गिक असतं म्हणून तर मातृदेवतेची भक्ती साऱ्या जगाने केली आहे. जगभरातल्या कवींनी आईवर कविता लिहिल्या. असं काय आहे त्या मातेच्या हृदयात आहे. त्याला स्नेह असं नाव आहे. जाणत्यांनी त्याची पूजा बांधली. राष्ट्रपुरूषांनी देशालाही माता या नावाने संबोधलं. "जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसि” असं म्हणून आई स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असल्याचं रामाने म्हटलं आहे. आईचे स्नेह परमेश्वर स्नेहाचंच लहान रूप आहे. घरात बाळानं विचारावं, 'आई गं, वाघ कसा असतो' व आईनं पटकन मांजराकडं बोट करून म्हणावं की, बाळा हे वाघाचं लहान रूप आहे. मांजर वाघ नसेलही; पण वाघाचं रूप, लक्षण त्यात शंभर टक्के आहे. आकारात फरक, बाकी गुण सारखेच आहेत. तद्वत परमेश्वराचे स्नेह पृथ्वीएवढे, तर आईचे मातीच्या कणाएवढे; पण सारखंच. आईच्या स्नेहातून परमेश्वराकडे जाण्याचा किती सुलभ मार्ग श्री चक्रधर स्वामींनी सांगितला आहे. आपल्या आनंदात निमग्न असलेला परमेश्वर फक्त एकाच जागी निमग्र होतो. ती जागा म्हणजे आईची कूस.

आपल्या बाळावर आई निर्व्याज प्रेम करीत असते. स्नेहामुळे मुलाबद्दल उचित विचार करते तिचे बाळावरचे स्नेह कराराशिवाय असते. कुठलाही मोबदला अथवा सौदा न करता ते प्रकट होते. जसा फुलांमधून सुगंध बाहेर पडतो, तो सुगंध म्हणजे फुलांचे स्नेह. तेथे निमंत्रणाशिवाय भ्रमर धावत येतात. मधमाशा फुलाभोवती घोंगावतात, सापासारखे विषारी प्राणी जवळ फिरतात. सूर्यातून निघणारी किरणे, साखरेत असलेली गोडी, मातीतून गंध पसरतो तसेच स्नेहातून उचित प्रसरण पावत असतात. आपलं जीवन हे फुलासारखंच आहे; पण स्नेह नसल्यामुळे ते कागदी फुलासारखं झालं आहे. कागदाचं फूल दिसायला आकर्षक असतं, रंग छान असतो. हे सगळं खरं; पण त्या फुलाला सुगंध थोडाच असतो? त्या कागदी फुलांपासून अत्तर थोडेच तयार होणार आहे? भ्रमर तर सोडाच; पण साधी माशीही त्या फुलाभोवती फिरकत नाही. कारण सुगंधरूपी स्नेह तेथे नाही.

आपलं जीवन हे कागदी फुलासारखंच नाही काय? आपण तरूण आहोत, सुंदर आहोत, शिक्षित आहोत; पण स्नेह नसेल तर त्या जीवनाला काय अर्थ आहे? आपण कागदी होत चाललोय, कापडी होत चाललोय, स्वार्थ, सत्तालोलुपता यामुळे आपल्या हृदयातून अनुचिताचं प्रदूषण जगभर पसरत चाललं आहे. हृदयातलं अनुचित शिव्याच्या रूपानं तोंडातून बाहेर पडतं. क्रोध क्रोधाच्या रूपाने डोळ्यातून, तर मत्सर मत्सराच्या रूपाने वर्तनातून पसरत जातो. अनुचिताची पेरणी करून अनुचिताचं पीक आपण काढत असतो.

भगवान श्रीचक्रधर स्वामींचा अवतार झाला तेव्हा स्वामींनी महाराष्ट्रात स्नेहाची पेरणी केली. त्यांच्या सहवासातल्या भक्तांच्या हृदयात स्नेह ओतलं अन् मग त्या स्नेहाच्या बळावर म्हाइंभटाला मराठीतला पहिला ग्रंथ लिहिण्याच उचित स्फुरलं. महदंबेला पहिली कविता लिहिण्याचं उचित स्फुरलं. काव्य, महाकाव्य, भाष्य, महाभाष्य साहित्याचं पीक महाराष्ट्रात बहरलं. सर्व तळागाळातल्या लोकांबद्दल त्यांना कळवळा होता म्हणून त्यांना स्फुरत गेलं. श्री चक्रधर प्रभूंना जे स्नेह अपेक्षित आहे ते मात्र डोळस आहे हे ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे. फाजील लाडानं मुलं वाया जातात असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या लाडात स्नेह तर आहे; पण उचित नाही हे सिद्ध होतं. 

संसारीक जीवनात मूल हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला आपल्या उचित स्नेहाची गरज आहे. जन्म देणं आपल्या हाती नाही; पण त्याची जडणघडण नक्कीच आपल्या हाती आहे. त्याच्या बोलण्यावर, चालण्यावर, ऐकण्यावर, पाहण्यावर, आचार-विचारावर उचिताचे संस्कार स्नेहाने होणे महत्त्वाचे. स्नेह हे दूध आहे, तर उचित साखर आहे. ते ज्या जीवनात निर्माण होईल ते जीवन मधूर आहे. स्नेह हे अत्यंत वाईट माणसात सुद्धा सूक्ष्म रूपानं असतं. ते विकसित होऊ शकते, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. जगातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात सुप्त स्नेहभावाला अंकुरित करता येतं. जगाला देण्याइतकं नाही अंकुरित करता आलं तरी स्वतः पुरतं तरी नक्कीच करता येईल.

आजचा माणूस स्वतःवर उदास दिसतो, व्यसनाधीन होऊन स्वतःचा वैरी होतो, आत्महत्येला प्रवृत्त होऊन स्वतःचा विनाश करतो. तो स्वतःचा स्वतः उद्धार करू शकतो, जर उचित स्नेह असेल तर. सर्वज्ञ म्हणतातच, 'स्नेह असेल तर भलं करावं असं उचित स्फुरते. 



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post