नमस्काराचे महत्व आणि नमस्कार केल्यामुळे होणारे फायदे

नमस्काराचे महत्व आणि नमस्कार केल्यामुळे होणारे फायदे

नमस्काराचे महत्व आणि नमस्कार केल्यामुळे होणारे फायदे 



साधु संत दिसता । त्वरे नमस्कारू करीता । 

साष्टांग दंडवत घालिता । गोमटे होए ।। 

तीर्थ स्थाना नित्य जावे । दुरौनि देखिलेया दंडवत घालावे ।

मग वंदन पूजन करावे । भक्ती भावे ।। 

मानवात असलेले दुर्गुण काढून सद्गुणांची स्थापना करणे यालाच 'संस्कार' असे म्हणतात. वस्तुतः संस्कार मानव जीवनाला परिष्कृत करणारी एक आध्यात्मिक विद्या आहे. संस्कारसंपन्न झाल्यावरच माणूस सुसंस्कृत, चारित्र्यवान, सदाचारी आणि ईश्वरभक्त होऊ शकतो. कुसंस्कारजन्य चारित्र्यपतन हेच माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. संस्कारयुक्त झाल्याने माणसाचा इहलौकिक आणि पारलौकिक अभ्युदय सहज शक्य होतो. प्राकृतिक पदार्थही संस्कारित (प्रक्रिया) केल्याशिवाय वापरण्यास योग्य होत नाही. मग अविद्या, अज्ञानग्रस्त, मतित्रययुक्त जीवाचा अभ्युदय संस्कारांशिवाय कसा शक्य आहे? मानवाचं जीवन पवित्र, चांगलं करण्यासाठी संस्कारांची फार गरज आहे.

कर्मणा जायते जन्तुः कर्मणैव विलीयते

सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते ।। (भागवत १०-२४-१३)

प्रत्येक प्राणी कर्मानुसार जन्म प्राप्त करतो आणि कर्मानुसारच देहत्याग

करतो. मानवाला मिळणारी सुख-दुःखे ही कर्मानुसारच मिळतात. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी गुरूमुखाने संस्कारोपदेश झाल्याने सुसंस्कृत झालेला जीवच ईश्वरभक्तीस योग्य बनतो.

'अभिवादन' मानवाचा सर्वोच्च सात्विक संस्कार आहे. वस्तुतः 'प्रणाम' स्थूल देहाला नसून स्थूल देहातील आत्म्याला केला जातो. 'प्रणाम' हा भारतीय संस्कृतीचा मुख्य संस्कार आहे. अभिवादन संस्कार सदाचार, शिष्टाचार याचा एक प्रमुख भाग आहे. याने केवळ लौकिक लाभ होत नसून आध्यात्मिक लाभही होतो. भारतीय धार्मिक ग्रंथात अभिवादनाचं वर्णन अनेक ठिकाणी सापडतं. अभिवादन, प्रणाम, नमस्कार हे सर्व पर्यायवाची शब्द आहेत. आपले वरिष्ठ, गुरूजन, आई-वडील आणि पुजनीय व्यक्तींच्या पायांना स्पर्श करून त्यांना प्रणाम करणे हे भारतीय संस्कृतीचं अंग आहे. ज्याने प्रणाम करण्याचं व्रत घेतलं, त्याच्यात नम्रता, विनय, शील, श्रद्धा, सेवा अनन्यता आणि शरणांगताचा भाव येतो. सामान्यतः अभिवादनाचे दोन प्रकार आहेत. लहानांनी मोठ्यांना प्रणाम करणे हा एक आणि समान वय असलेले एक दुसऱ्याला अभिवादन करतात. ते तप, ज्ञान आणि त्याग पाहून करतात. शुक्र देवाच्या त्यागामुळेच त्याचे वडील 'व्यास' यांनी उठून शुक्र देवाला नमस्कार केला होता. मनुस्मृतीनुसार

अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः ।

चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम् ।। (२-१२१)

जे माता-पिता, गुरू, वृद्ध यांना नित्य प्रणाम करतो त्यांची सेवा करतो, त्याचं वय, विद्या, यश आणि बल यांची वृद्धी होते. महाभारतातही सांगितले आहे की, अभिवादनाने दीर्घायु प्राप्त होते.


मातापितरमुत्थाय पूर्वमेवाभिवादयेत ।

आचार्यमथवाप्यन्यं तथायुर्विन्दते महत् ।। 

वडिलधाऱ्या मंडळींना पाहताच उठून उभे राहावे. स्वतः पुढे होऊन त्यांना नमस्कार करावा. भगवान श्रीकृष्ण सदाचार, शिष्टाचार आणि विनयाची मूर्तीच होते. नारद श्रीकृष्ण भगवंतांना भेटायला आले तेव्हा त्यांनी रुक्मिणीच्या पलंगावरून उठून नारदाला कायाप्रणिपात केला आणि आपल्या आसनावर बसविले. या प्रमाणेच रुक्मिणीने पाठविलेल्या ब्राह्मणाला पाहताच, सिंहासनावरून उठून त्याचा आदर सत्कार केला. 

नीतिशास्त्रात भर्तृहरि म्हणतो

'देवाः कुर्वन्ति साहाय्यं गुरूयत्र प्रणम्यते ।'

मार्कंडेय ऋषी पाच वर्षांचा होता. तेव्हा त्याचे वडील मृकण्डु याला कळालं की, त्याच्या मुलाचं आयुष्य फक्त सहा महिने आहे. वडिलांनी मार्कंडेयाचा यज्ञोपवित संस्कार केला आणि त्याला सांगितलं की, आजपासून ज्या कोण्या ऋषीला, ब्राह्मणाला, पूजनीय व्यक्तीला पाहशील त्यांना विनयपूर्वक नमस्कार कर. तेव्हापासून मार्कंडेय श्रेष्ठजनांना पाहून नमस्कार करून आशीर्वाद घेऊ लागला. एके दिवशी वसिष्ठ ऋषिंनी 'दीर्घायुभव' असा आशीर्वाद देऊन त्याच्या आयुष्याविषयी ब्रह्माला निवेदन केलं. ब्रह्मा म्हणाला या बालकाने अभिवादन आणि विनयामुळे काळालाही जिंकले. आजपासून हा अमर झाला.


महाभारतात युद्ध सुरू होण्यापूर्वी युधिष्ठिराने द्रोणाचार्यांना नमस्कार करून युद्ध करण्याची परवानगी मागितली आणि त्यांनी विजयाचा आशीर्वाद दिला. गुरूचा आशीर्वाद घेऊन युधिष्ठिर भीष्म पितामह यांच्याकडे गेला आणि नमस्कार करून युद्धासाठी अनुज्ञा मागितली. भीष्म म्हणाले की, जर तू मोठ्यांच्या अनुमतिविना आणि आशीर्वादाविना युद्ध केलं असतं तर मी तुला शाप दिला असता. परंतु आता तू निश्चिंत होऊन युद्ध कर. तुझा विजय होईल. याप्रमाणेच युधिष्ठिराने कुलगुरू कृपाचार्य आणि महाराज शल्य यांचीही परवानगी घेतली व विजयाचा आशीर्वाद मिळवला. हा सर्व नमस्काराचाच परिणाम होता.

युद्धात भीष्माने प्रतिज्ञा केली की, उद्या पांडव तरी जावंत राहतील मी तरी राहीन. ही प्रतिज्ञा ऐकून भगवान श्रीकृष्ण चिंतीत झाले. भीष्म प्रथम प्रहरी ध्यानस्थ बसले असताना श्रीकृष्ण भगवंतांनी द्रौपदीला भीष्मांसमोर अंधारात उभे करून नमस्कार करावयाला लावला. भीष्मांनी नमस्कार करणारी व्यक्ती कोण आहे हे न पाहताच नेहमीच्या सवयीप्रमाणे 'सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद देऊन टाकला. नंतर श्रीकृष्ण भगवंतांनी भीष्मांना विचारले की, पितामह आपली कालची प्रतिज्ञा खरी की, आजचा आशीर्वाद खरा?' तेव्हा भीष्मांनी सांगितलं की, आजचा आशीर्वाद खरा. सारांश, भीष्मप्रतिज्ञा म्हणजे जगातली अटळ गोष्ट. त्या प्रतिज्ञेलाही केवळ एका नमस्कारामुळे हतबल व्हावे लागले. चाणक्य म्हणतो, 'सर्वस्य भूषणं विनय' सर्व गुण असूनही मनुष्यात विनम्रता नसेल तर व्यर्थ आहे.


नमस्कार न केल्याने शाप - 

सूर्यवंशी खट्वाङ्ग याचा पुत्र दीर्घबाहू (दिलीप) हा संतान नसल्यामुळे महर्षी वशिष्ठ यांचेकडे गेला. वशिष्ठांनी त्याला सांगितले की, एकदा तू स्वर्गांतून परत येत होता. मार्गात तुला कामधेनू भेटली. परंतु कामधेनूने तुला शाप दिला की, 'माझ्या संततीची आराधना केल्याशिवाय तुला पुत्र होणार नाही". माझ्याजवळ असलेली ही नंदिनी गाय कामधेनूची पुत्री आहे. या गाईच्या सेवेमुळे तुला पुत्र होईल. वशिष्ठांच्या आज्ञेने राजा दिलीप आणि त्याची राणी या दोघांनी नंदिनी गाईची खूप सेवा केली. त्या सेवेचं फळ म्हणून त्यांना एक पुत्र झाला. त्याच नाव राजा 'रघु'. हा अत्यंत प्रतापी आणि महादानी राजा होता. त्याच्या नावामुळेच त्याच्या वंशाला 'रघुवंश' हे नाव पडले. राजा दशरथ, राम, लक्ष्मण हे सर्व रघुवंशीच होत. असा शाप कुणी देऊ नये म्हणून समोर आलेल्या व्यक्तिला प्रणाम अवश्य करावा.


देवाच्या स्थानाला पूज्य गुरुजनांना अवश्य प्रमाण करावा. धर्मशास्त्रात सांगितलेले आहे की, जी व्यक्ती देवालय देवता, भिक्षुक, अधिकरण यांना पाहून नसस्कार करीत नाही तो प्रायश्चिताचा भागी होतो.

देवता प्रतिमां दृष्ट्वा याति दृष्टवा त्रिदण्डिनम् ।

नमस्कारं न कुर्वीत प्रायश्चित्ती भवेन्नरः ॥


भागवतातही शंकर पार्वतीला म्हणतो

प्रत्युग्दमप्रश्रयणाभिवादनं विधियते मिथं: समुध्यगे ।।

प्राज्ञैः परस्मै पुरुषाय चेतसा गुहारायायैव न देहमानिने ।।

म्हणजे सज्जन लोक परस्पर जे उठून उभे राहणे, विनम्रता आणि प्रणाम करतात, ते चित्तात असलेल्या ज्ञानस्वरुप परमात्म्याला करतात. शरीर आणि शरिरात वास करणाऱ्या अहंकाराला नाही.

अभिवादन करण्याची श्रेष्ठतम पद्धत "साष्टांग दंडवत प्रणाम" आहे. जमिनीवर झोपून, दोन्ही हात पसरून, मस्तक भुवया, नासिका, वक्ष, उरू, गुडघे, तळहात आणि पायांची बोटे या आठ अंगांनी भूमिला स्पर्श करावा. ही नमस्काराची पूर्ण विधी आहे. गुडघ्यावर बसून, डोके वाकवून नमस्कार करणे अर्धरूप आहे. उभ्या उभ्या दोन्ही हात जोडून डोळे वाकवणे नमस्काराचं सांकेतिक रूप आहे. हात न जोडता, मस्तक न वाकवता नमस्कार होत नाही. हात हालवून, टोपी हलवून केलेला संकेत नमस्कार होत नाही. स्नान करते वेळी, शौच करताना, मुखमार्जन करताना, प्रेत नेत असताना प्रणाम करण्याची आवश्यकता नाही. स्मशानात, प्रवचनात, देवविग्रहासमोर मानसिक प्रणामच करावा. स्त्रियांनी परपुरूषाच्या पायाला स्पर्श करू नये. पतीशिवाय अन्य पुरुषांना लांबूनच नमस्कार करावा.


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post