लोभा-मोहाचे चक्रभेदन
हे करणं खूप अवघड असतं, तारेवरची कसरत असते, पण प्रयत्नाने हे एकदा जमायला लागलं की ते वर्तन आंगवळणी पडतं आणि यश मिळवणं अवघड नसतं.. बऱ्याचदा कळते पण वळत नाही अशी अवस्था असते म्हणून नुसतं कळून काहीच उपयोग नसतो.. तशी कृतीही हवी
यः क्रियावान् स पण्डितः । ऐकलेले ज्ञान जो अमलात आणतो तोच खरा पंडित होय. बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले। ते सद्वर्तनही सातत्यपूर्ण असावे. दोन-चार दिवस करून सोडून देणे हे मूर्ख माणसाचे लक्षण होय. काही लोक वर्तमानात जगण्याचे सोडून भविष्यात मिळणाऱ्या मृगजळवत् सुखासाठी कित्येक आनंदाच्या क्षणांना तिलांजली देतात. त्यात त्यांना कित्येक वेदना सहन कराव्या लागतात. द्रव्य सुखोपभोग मिळणे हे भाग्याधिन असल्यामुळे पुरेसा प्रयत्न करूनही त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही. कारण ते नशिबातच नसते तर मिळणार कशाला? त्यांची अवस्था गुढघ्याइतक्या चिखलातून चालणाऱ्या माणसासारखी असते. वेगाने चालताही येत नाही आणि थकवा आला म्हणून बसताही येत नाही.
“ मी हे माझ्या मेहनतीने प्रयत्नाने कमावले आहे” अशी माणूस कितीही फुशारकी मारत असला तरी “समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नही मिलता.” या म्हणीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. ही म्हण तंतोतंत खरी आहे. नशिबात नसेल तर काहीही मिळत नाही. एक मोठे साहित्यिक त्यांच्या लेखात लिहितात की “मला क्रिकेटर व्हायचे होते त्याकाळचे विजय हजारे विनू मर्चंट इत्यादी क्रिकेटरांची यश पाहून मलाही खूप वाटायचे की आपण क्रिकेटर व्हावे पण नशिबात काही वेगळेच लिहिले होते आणि मी साहित्यिक लेखक झालो.”
मग वरील प्रसंग वाचून कोणालाही सहज प्रश्न पडेल की नशिबात आहे ते मिळणारच आहे, मग प्रयत्न कशाला करावा? “दे रे हरी पलंगावरी” असेच का न करावे? पण तसा विचार करणे ही योग्यच आहे कारण आपल्याला काय माहिती की आपल्या नशिबातले आपण प्रयत्न केला तरच मिळेल असे लिहिले आहे म्हणून उद्यम केलाच पाहिजे.
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ।।
कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. नुसत्या मनोरथांनी कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. गुहेत निवांत झोपलेल्या सिंहाच्या मुखात आपोआप हरीण येऊन पडले असे कधी तुम्ही ऐकले आहे का सिंह जंगलाचा राजा जरी असला तरी त्याला पोट भरण्यासाठी काहीतरी उद्योग करावाच लागतो.
म्हणून आपण काहीतरी उद्योग करत राहायला पाहिजे श्रीकृष्ण भगवंत गीतेत म्हणतात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे अर्जुना तुझा फक्त कर्म करण्यातच अधिकार आहे फळाची अपेक्षा तू करू नकोस. म्हणून सद्कर्म करत राहावे.
मग ते कर्म करत असताना दुःखमय संसारातील वरवर सुखावह दिसणार्या प्रलोभनांना बळी पडून अनितीरूप मार्ग अवलंबून, लोकांना फसवून, लुटून पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी अनेक लोकं पाप रूप कर्मांचे आचरण करतात आणि स्वतःचा अधःपात करून घेतात आपण या पासून सावध रहावे.
ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ती असू द्यावे। समाधान ।। या अभंगाप्रमाणे सतत समाधानी वृत्ती असावी. चार पैसे हातात आल्यावर आपली लायकी विसरून आप्त स्वकीय जणांशी अहंकाराने वागणाऱ्या माणसांना हा बलवान काळ धडा शिकवल्याशिवाय राहत नाही.
लोभ आणि मोह हे कधीही न तृप्त होणाऱ्या अग्नी सारखे अतृप्त आहेत हे पाहिजे ते पाहिजे हे मिळावे ते मिळावे या मोहाच्या भोवऱ्यात जो एकदा अडकला तो त्यातून बाहेर येणे हे दुरापास्तच असते. ज्याला एक लाख मिळाले तो म्हणतो दहा लाख पाहिजे, ज्याचा पगार 10, 00000 आहे तो म्हणतो एक करोड पाहिजे अशाप्रकारे माणसाचा हव्यास वाढतच जातो तो या मोहापायीच.
कितीही सुखे पायाशी लोळण घेत असली तरी असमाधानी वृत्तीमुळे अंतःकरणात मोह लोभ असल्यामुळे माणसास कधीही सुख लाभत नाही. मोहग्रस्त मनुष्य कधीही समाधानी नसतो. अति लोभ करू नये हे सांगणारी एक कथा पंचतंत्रात आलेली आहे त्या कथेचा सुरुवातीचा श्लोक पुढील प्रमाणे
श्लोक:-
अतिलोभो न कर्तव्यो लोभं नैव परित्यजेत् ।
अतिलोभाभिभूतस्य चक्रं भ्रमति मस्तके ।। तंत्र ५
चार तरूण ब्राम्हण एकमेकांचे मित्र होते ते दारिद्र्याने पीडित होते. एके दिवशी चौघांनी संगनमताने बाहेर देशात द्रव्य कमावण्यासाठी जायचे ठरवले व दुसऱ्या दिवशी ते घराबाहेर पडले. त्यांच्या गावाला शेजारीच एका डोंगराच्या गुहेत हरिदास नावाचे सिद्ध राहत असत. ते हरिदास सिद्धपुरुषाजवळ आले. त्यांना नमस्कार करुन त्यांनी आपला मानस त्यांच्याजवळ बोलून दाखवला व निघाले.
तेवढ्यात त्या प्रांतात प्रसिद्ध असलेला भैरवानंद योगी नावाचा सिद्ध त्यांना समोरून येताना दिसला. त्यालाही चौघांनी नमस्कार केला मग भैरवानंदाने त्यांना विचारले “तुम्ही कुठून आलात? कुठे जात आहात?” ब्राम्हणांनी मागील वृत्तांत सांगितला. व आम्ही धन कमावण्यासाठी परदेशात जात आहोत तरी आपणास द्रव्य कमावण्याचा एखादा उपाय माहीत असेल तर आम्हाला सांगावा असे म्हणून चौघांनी भैरवानंदाला विनंती केली.
भैरवानंदाने चौघांकडे निरखून पाहिले त्यांचे दारिद्र्याने गांजलेल्या शरीर व हतबल अवस्था पाहून त्याला किंवा आली व त्याने चौघांना मंत्र फुकून चार वाती दिल्या व सांगितले की, “तुम्ही चौघेही हिमालयांत जा, ज्याची वात ज्या जागी पडेल तेथें त्यानें खणावें म्हणजे भुमीगत धन मिळेल” त्याप्रमाणें चौघेही निघाले चालता चालता पहिल्याची वात पडली तेथे त्याने खणले त्याला तांबे सांपडलें. तो तिथेच थांबला. आणि इतर तिघांना म्हणाला “आपल्याला आपले दारिद्र्य फिटेल इतकेच आंबे मिळाले आहे हे तांबे आपण बाजारात नेऊन विकू तुम्ही सर्व इथेच थांबून जा पुढे जाऊ नका.”
ते ऐकून इतर तिघे हसू लागले व म्हणाले “अरे मुर्ख! तांब्याची काय किंमत मिळणार सिद्धांने चार वाती दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ कदाचित आपल्याला सोन्याची खान मिळेल” असे म्हणून बाकी तिघे पुढे चालले काही दूर अंतरावर गेल्यावर दुसर्याची वात पडली त्याने तिथे खोदले असता त्याला चांदीची खाण सांपडली तो तिथेच थांबला. त्याने ही इतरांना विनंती केली की “पुढे जाऊ नका या चांदीच्या खालीवर आपण जन्मभर बसून खाऊ” त्या दोघांनी त्याला वेड्यात काढले व पुढें निघाले.
पुढे गेल्यावर त्या पैकी एकाची वात पडली त्या जागेवर त्याने खोदले असता त्याला सोन्याची खाण सांपडली. त्याने आपल्या मित्राला विनंती केली की “आता सुवर्ण सापडले आहे, आता पुढे जाऊन काही उपयोग नाही सोन्यापेक्षा उत्तम काय असणार म्हणून तू थांब पुढे जाऊ नको” पण चौथा मित्र अत्यंत लोभी होता. त्याने विचार केला की आधी तांबे सापडले, मग चांदी सापडले, नंतर सुवर्ण सापडले, पुढे कोण जाणे हिऱ्याची खान असेल? म्हणून लोभाच्या अधीन होऊन तो पुढे निघाला.
काही अंतरावर चालून गेल्यावर त्याला एक विचित्र दृश्य दृष्टीस पडले. एक रक्तानें न्हालेल्या पुरुषाच्या डोक्यावर एक चक्र फिरत आहे. ते दृश्य पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या रक्तबंबाळ पुरुषाला त्याबद्दल प्रश्न विचारतांच तें चक्र याच्या डोक्यावर येऊन फिरुं लागलें. आणि तो घाबरला. त्या पुरुषाला म्हणाला, “अरे हे काय आहे?”
“अरे लोभी ब्राम्हणा हे वज्र आहे. मी ही तुझ्या सारखाच अति लोभामुळे येथे आलो होतो. माझ्या आधील पुरुषाच्या मस्तकावरील चक्र माझ्या माथ्यावर फिरू लागले. आणि आता ते तुझ्या मस्तकावर फिरत आहे.”
“पण हे चक्र कधी उतरेल यापासून सुटका कधी होईल?” ब्राह्मणाने घाबरत विचारले.
“ तुझ्यासारखाच एखादा लोभी मनुष्य द्रव्याच्या शोधात इथे येईल तेव्हाच हे चक्र तुझ्या मस्तकावरून निघेल”
असे म्हणून तो पुरुष तेथून निघाला. अति लोभामुळे तो ब्राह्मण संकटांत सांपडला.
म्हणून प्रत्येक मनुष्याने लोभाच्या हव्यासापोटी भलतेच कर्मांचे चक्र आपल्या मस्तकावर बांधून घेऊ नये समाधानी वृत्ती जे मिळेल त्यात जीवन जगत राहावे.
अतिलोभो न कर्तव्य - अति लोभ करू नये.
कथा क्र. २
पूर्वी एका समुद्राच्या बेटावर एका म्हाताऱ्या कोळ्याचे कुटूंब राहत होते. त्याचे कुटूंब म्हणजे तो आणि त्याची म्हातारी बायको. ते दोघेही अतिशय दारिद्र्याचे जीवन जगत होते. अशा प्रकारे एकदा कोळी मासे पकडण्यासाठी जाळे पसरून बसला असता जाळ्यात काहीतरी मासे अडकल्याची जाणीव झाली. जाळे पाण्याच्या बाहेर काढले पण त्या जाळ्यात एका छोट्या सोनेरी मासोळी शिवाय काहीच नव्हते. ते पाहून कोळी हताश झाला. पण लगेच ती मासोळी मानवी भाषेत बोलू लागली की, “तू मला घाबरू नकोस, मला जीवदान दे त्या बदल्यात तुला हवे असेल ते तू माग.” तिची दया येवून म्हाताऱ्या कोळ्याने तिला सोडून दिले व खाली हात झोपडीत परत आला.
म्हाताऱ्याला खाली हात घरी वापस आलेला पाहून म्हातारी चिडली व त्याला वाटेल तसे बोलू लागली. घडलेला प्रकार म्हाताऱ्याने म्हातारीस सांगितल्यानंतर तर म्हातारी आणखीच रागाने म्हाताऱ्याला म्हणाली, "तिला काही मागितले का नाहीस?" असे म्हणून आणखीच शिव्या घालू लागली व मासोळीकडे काहीतरी मागणी मागण्यासाठी आग्रह करू लागली. म्हातारीचा आग्रह पूर्ण करण्यासाठी तो नदीच्या काठावर आला व जोराजोराने बोलू लागला, “हे सोनेरी मासोळी मी तुझ्याकडे मागणे मागायला आलो आहे. तेव्हा तू आपले वचन पाळ.”
त्याचा आवाज ऐकून सोनेरी मासोळी पाण्यावर आली व कोळ्याला म्हणाली, “तुला काय हवे आहे ते तू सांग, तुझी इच्छा पूर्ण होईल.” त्यावर कोळी म्हणाला, “मला सुंदर घर व उत्तम जेवण रोज मिळाले पाहिजे.” “जा, तुझी इच्छा पूर्ण होईल” असे म्हणून सुवर्ण मासा पाण्यात अदृश्य झाला. म्हातारा आपल्या झोपडीकडे वापस आला तर त्या जागी सुंदर घर दिसले. तो घरात गेला तेव्हा तेथे खाण्यापिण्याच्या उत्तमोत्तम वस्तुंनी घर सजलेले दिसले.
परंतु म्हातारीच्या चेहऱ्यावर मात्र समाधान नव्हते. तिला यापेक्षा जास्त संपत्ती व धनधान्य हवे होते. त्याच बरोबर तिला सुंदर तारूण्य ही हवे होते. आपल्या या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने म्हातान्याला पुन्हा सूवर्ण मासोळीकडे पाठविले. म्हातारा नदीच्या काठावर आला व पुन्हा सोनेरी मासोळीला बोलावून पत्नीची इच्छा पूर्ण करण्याविषयी विनवले. तसेच होईल असे म्हणून मासा अदृश्य झाला.
म्हातारा घरी येवून पाहतो तर काय आता पहिल्या पेक्षाही सुंदर घर होते व त्यावर ऐश्वर्य झळकत होते. पण तिला एका साधारण कोळ्याची पत्नी म्हणून घ्यावयाचे नव्हते. तर तिला एखाद्या मोठ्या राजअधिकाऱ्याच्या पत्नीप्रमाणे रहावयाचे होते. तिचा हट्ट मोडणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे तिची ही इच्छा पुरविण्यासाठी तो सुवर्ण मासोळी कडे गेला व आपले म्हणणे तिला सांगितले. नेहमी प्रमाणे त्याची ही इच्छा पूर्ण केली.
आता पूर्वी पेक्षाही सुरेख वाडा होऊन दारावर पहारेकरी होते. कुणालाही परवानगी शिवाय आत प्रवेश नव्हता. पहारेकऱ्याची नजर चुकवून म्हातारा कोळी आत गेला व आपल्या पत्नीस लोभ आवरण्यास सुचविले. परंतु त्याचे असे येणे व उपदेश करणे तिला आवडले नाही व तिने म्हातान्याला शंभर फटक्याची शिक्षा करविली. अशा तऱ्हेने पत्नीच्या हट्टापायी बेहाल झालेला कोळी वाड्याच्या मागे असलेल्या गायीच्या गोठ्यात पडून राहिला.
इकडे म्हातारीला (सुंदर व तरूण दिसणारी कोळीण) राणी होण्याची इच्छा झाली आणि ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी म्हाताऱ्याचा शोध घेऊ लागली. बरीच शोधाशोध केली पण म्हातारा कोळी सापडला नाही. असे बरेच दिवस गेल्यानंतर एका शिपायाने त्याला पकडून सुंदर व तरूण दिसणाऱ्या कोळीणी पुढे त्याला हजर केले. आपली राणी बनण्याची इच्छा म्हाताऱ्यास सांगून ती पूर्ण करण्यास फरमाविले.
तो काहीही आढेवेढे न घेता चुपचाप सूवर्ण मासोळीकडे आला आणि आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यास सांगितले आणि तिची ती इच्छा पूर्ण झाली. आता जुन्या वाड्याच्या जागी सुंदर व भव्य राजवाडा उभा राहिलेला दिसला. वाड्यासमोर मोठा बगीचा त्यात कारंजे लागलेले आहेत आणि राणीच्या वाड्याच्या रक्षणासाठी शिपायांचा सक्त पहारा होता.
बिचारा म्हातारा राजवाड्या समोर केविलवाणा उभा होता. तेवढ्यात एक शिपाई तेथे येवून त्याला राजवाड्यात घेऊन गेला. समोर राणी झालेली म्हातारी सुंदर पोषाखात सिंहासनावर आऊढ झालेली होती. ती म्हाताऱ्याला म्हणाली, “मला याहीपेक्षा मानसन्मान, धनसंपत्ती हवी आहे.” त्यासाठी आता त्या आता सुवर्ण मासोळीकडे जाऊन मला समुद्रावर साम्राज्य करावयाचे आहे. तेव्हा मला जलसम्राज्ञी करण्यास सांगून ती माझी इच्छा पूर्ण करण्यास सांग.
म्हातारा आता निमुटपणे सुवर्ण मासोळीकडे जाऊन आपल्या पत्नीची ही इच्छा सांगितली. यावेळी मात्र सुवर्ण मासोळी काहीच न बोलता पाण्यात अदृश्य झाली. म्हातारा पुन्हा घराकडे वळला तेव्हा त्याला पूर्वाचीच आपली प झोपडी व त्यात काम करणारी म्हातारी बायको दिसली अशा प्रकारे देवाने दिले पण स्वार्थापोटी म्हातारा व म्हातारीने गमावून बसले. त्यांनतर कोळ्याने अनेकदा पाण्यात जाळे टाकले पण कधीही सोनेरी मासोळी जाळ्यात अडकली नाही. तात्पर्य :- मिळालेल्या धनसंपत्तीत समाधानी राहावे. अधिक धनाची आशा करू नये.