श्रीमद्भगवद्गीता एक महान पवित्र ग्रंथ
भगवान श्रीकृष्णासारखा पुराणपुरूष, पुरूषोत्तम, योगेश्वर, संपूर्ण अवतार, बत्तीस लक्षणी सुंदर देह असलेला 'नागर' अवतार गुह्यतम ज्ञान कथन करतो आहे आणि अर्जुनासारखा महापराक्रमी, महारथी, षडशास्त्र संपन्न, श्रीकृष्णाचा प्रिय भक्त ते ज्ञान श्रवण करतो आहे. हा योग केवळ अपूर्व आहे. आणि तेही कुठे? तर रणांगणावर, युध्दाला अगदी तोंड फुटायच्या वेळी ही परिस्थितीही विलक्षण आहे. जिवाचा अधिकार केव्हा कुठे चालत येईल आणि परमेश्वराला बोध देण्याची प्रवृत्ती केव्हा होईल काही सांगता येत नाही.
भगवान श्रीकृष्ण आणि शिष्योत्तम अर्जुनाचा हा अमृतमय संवाद आजही अनेक विव्दानांना भुरळ पाडतो आहे.
अनेक विचारवंतांनी आपल्या ज्ञानाचा कस गीतेवर लाऊन पाहीला भारतातल्याच नव्हे तर परदेशातल्या विव्दानांना गीतेवर भाष्य करावंसं वाटलं या गीतेवर विविध भाषांमध्ये जेवढे ग्रंथ लिहिले गेले जेवढया टीका लिहिल्या गेल्या, तेवढया जगात इतर कोणत्याही ग्रंथावर लिहिल्या गेल्या नाहीत.
गीतेच्या गहन तत्वज्ञानात डुबकी न घेता या पवित्र ग्रंथाविषयी इतर काही मला सांगावसं वाटतं. कुठेतरी वाचलेलं, ऐकलेलं या लेखाच्या निमित्तानं लिहावंसं वाटतं.
आपण शाळेत असताना किंवा नंतर केव्हातरी एक गोष्ट ऐकलेली असते विवेकानंदांची. त्यांनी श्रोत्यांना 'बंधू आणि भगिनी' असं संबोधून सभा जिंकल्याचं आपण वाचलेलं असतं. त्याचवेळची गोष्ट. अमेरिकेतल्या शिकांगो इथे सर्वधर्मपरिषद भरली होती. त्या परिषदेला भारताचं प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंदांनी केलं होतं. इतर बऱ्याच देशांचे, धर्मांचे प्रतिनिधी आले होते.
सर्वांनी आपापले धर्मग्रंथ आणले होते. तिथल्या व्यवस्थापकानं सर्वांना आपले ग्रंथ टेबलावर ठेवायला सांगितलं. सगळ्यांनी ठेवले. त्यांचे ग्रंथ चांगले जाडजूड होते. विवेकानंदांनी आपली छोटीशी गीता ठेवली. त्या व्यवस्थापकांन तिकडे तुच्छतेनं पाहिलं. त्याच्या दृष्टीनं हा अगदीच किरकोळ, बिनमहत्वाचा ग्रंथ होता. त्यानं तो इतर ग्रंथांच्या खाली खुपसला. विवेकानंदांनी शांतपणे त्या चळतीतून आपली गीता ओढून काढली.
त्यासरशी ते सर्व ग्रंथ चळत गडगडले. विवेकानंद त्या माणसाला म्हणाले, "बघितलं? मी गीता काढून घेतल्याबरोबर बाकीचे ग्रंथ कोसळले. गीता हा सर्व धर्मग्रंथांचा आधार आहे.” खंरच आहे ते. प्रत्यक्ष परमेश्वराच्या तोंडून निघालेलं ते परमपवित्र ज्ञान. त्या ग्रंथाचा महिमा काय वर्णावा ? विचार करायला लागलं तर अनेक वैशिष्ट्यं लक्षात येतात. गीतेचा प्रारंभच मुळी 'धृतराष्ट्र उवाच' असा आहे. तो आंधळा होता. त्याचप्रमाणे आपणही अज्ञानानं आंधळे झालो आहोत. हे अंधपण फेडून ज्ञानचक्षू देणारी गीता आहे. हा एकमेव असा ग्रंथ आहे की जो सर्वच धर्मसंप्रदायांना मान्य आहे.
गीतेचं महाभारतातलं स्थान सुध्दा फार महत्वाचं असं आहे. गीता महाभारतात साधारण मध्यभागी येते. अठरा पर्वांच्या महाभारतात एकीकडे सहा पर्वे, दुसरीकडे बारा पर्वे अशा ठिकाणी ती एखाद्या उंच दीपस्तंभाप्रमाणे दोन्ही बाजूला प्रकाश पाडत उभी आहे. प्रत्यक्षात सांगितली गेली तीही दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी. एकीकडे सात अक्षौहिणी, तर दुसरीकडे अकरा अक्षौहिणी सैन्य होतं.
गीतेचा प्रारंभ दुसऱ्या अध्यायातल्या ११ व्या श्लोकापासून धरावा असं अनेकांना वाटतं. कारण तिथूनच भगवान श्रीकृष्णांनी खरी उपदेशाला सुरूवात केली. तिथपर्यंत सैन्याचं, रथांचं, शंखांचं वर्णन आहे. आणि अर्जुनाचं हतबल झाल्याप्रमाणे अनेक शंका व्यक्त करणारं पांडित्य भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत ऐकत आहेत. भगवंतांनी दहाव्या अध्यायात ‘अक्षराणाम् अकारोस्मि” असं म्हटलं आहे. दुसऱ्या अध्यायातल्या ११ व्या श्लोकाची सुरूवात 'अशोच्यानन्व शोचस्त्वम् अशी अकारानंच होते.
गीतेमध्ये ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यापैकी नेमक्या कोणत्या योगाचा पुरस्कार भगवान श्रीकृष्णांनी केला आहे यावर जशी चर्चा होते, तशीच गीतेचं प्रयोजन काय, अर्जुनाला गीता का सांगितली याबाबतही होते. अर्जुन याचा अर्थ ऋजू किंवा सरळ स्वभावाचा. कोणी म्हणतात, अर्जुनाला ऐन युध्दाच्या वेळी आलेलं क्लैब्य, हतवीर्यता दूर करून त्याला युध्द प्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली. थोडा विचार केला तर हे मत तितकंसं बरोबर नाही हे लक्षात येईल.
ज्या अर्जुनाच्या महाप्रतापाचं तेज वर्णन करताना- “अग्रत चतुरोवेदाः पृष्ठतः सशंरं धनुः इदम् क्षात्रमिदम् तेजम् शापादपि शरादपि ” असं म्हटलं जातं, तो अर्जुन सैन्य पाहून घाबरला असं कसं होईल? ज्याच्या मुखात चारही वेद आणि पाठीवर धनुष्यबाण, क्षात्रतेज आणि ज्ञान ज्याच्या ठायी एकत्र नांदत होतं, शापानं किंवा शरानं तो शत्रूचा सहज नाश करू शकत होता, उजव्याच हातानं नव्हे, तर डाव्याही हातानं तो अचूक लक्षवेध करू शकत होता तो अर्जुन हतवीर्य होणं शक्य आहे का?
उर्वरित सैन्य अर्जुनापेक्षा जास्त योग्यतेचं होतं असं आपण म्हणायचं का? अर्जुन युध्दापासून परावृत्त होऊ बघत होता, तो घाबरला म्हणून नाहीच. शेकडो युध्दं जिंकलेला तो महावीर होता. नेहमीच विजय मिळवणारा तो खरा नर होता. वीरवृत्ती त्याच्या रोमारोमात होती. तेव्हा गीता सांगण्यामागचं हे कारण नाही.
दुसरे काही जण म्हणतात, अर्जुनाची अहिंसावृत्ती दूर करण्यासाठी गीता सांगितली. अर्जुन रणांगणावर उभा राहिला तो युध्द करण्याचा निश्चय करूनच. श्रीकृष्णाची शिष्टाई सफल झाली नव्हती आणि म्हणून युध्द अटल आहे हे त्याला माहित होतं. रणशिंग फुंकल्यावर दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा कर असं तो श्रीकृष्णाला म्हणतो. त्याला आपले शत्रू एकदा बघायचे होते. युध्द करायचं म्हणजे हिंसा होणारच हे त्याला माहीत होतंच.
त्याहीपूर्वी त्यानं अनेक लढायांमध्ये नर संहार केला होताच. तेव्हा त्याच्या शरीराला कंप सुटला नाही की त्याच्या हातातलं धनुष्य गळून पडलं नाही. तेव्हा त्याच्या मनात अहिंसावृत्तीचा उदय झाला नव्हता. आताच झाला कारण तो स्वजनांचा मोह होता, आप्तजनांची आसक्ती होती. त्या वेळी त्याच्या समोर आप्त स्वकीय नसते तर तो सहज लढला असता.
मग गीतेचं प्रयोजन काय? अर्जुनाची कर्तव्यनिष्ठा आसक्तीनं, मोहानं ग्रासली होती. त्यांचा हा संमोह, मोह दूर करणं श्रीकृष्णाला भाग होतं. म्हणून भगवंतांनी त्याच्या मोहनाशाचा उपाय आधी अवलंबिला. त्या क्षणी युध्द हाच अर्जुनाचा स्वभाव, स्वधर्म आणि कर्तव्य होतं. पण ते तो मोहानं टाळू बघत होता. स्वधर्माचरणाच्या आड येणारा जो स्वजनधनजनांचा मोह त्याचं निवारण करणं हे गीतेचं खंर प्रयोजन. कारण 'तुझा मोह नष्ट झाला का? ' असा शेवटी शेवटी श्रीकृष्णाचा प्रश्न आणि 'माझा मोह नष्ट झाला ' असंच अर्जुनाचं उत्तर आहे.
सबंध गीतेमध्ये अर्जुनाची बदलत गेलेली मनस्थिती बघणं फार बोधप्रद ठरावं. एतान्न हन्तुमिच्छामि ' असं प्रारंभी ठामपणे म्हणणारा अर्जुन अखेरीस 'करिष्ये वचनं तव' असं शरणागत उत्तर देतो हे किती हृद्य आहे! गीतेमध्ये एकूण ७०० श्लोक आहेत. त्यापैकी धृतराष्ट्राच्या वाटयाला फक्त एक, संजय पहिल्या, अकराव्या आणि अठराव्या अध्यायात शेवटी येतो. बाकी सगळा श्रीकृष्ण- अर्जुनाचा संवाद आहे.
अर्जुनाची मनोभूमिका अनुकूल केल्यावर, त्याला निरूपण सन्मुख केल्यावर मग भगवंतांनी काय सांगितलं? म्हणजेच गीतेचा प्रतिपाद्य विषय कोणता? यावरही लोकमान्य टिळकांपासून स्वामी चिन्मयानंदांपर्यंत अनेकांनी विविध दृष्टिकोन मांडले. श्रीकृष्ण कंसवध करायला मथुरेला गेला, मल्लयुध्द करायला आखाड्यात उतरला तेव्हा तो उपस्थित जनांना कसा भासला ? वृध्दांना आपल्या पुत्राप्रमाणे, ज्ञानीजनांना सर्वज्ञा प्रमाणे, प्रमदांना प्रियकराप्रमाणे, गोपालांना संवगडयाप्रमाणे आणि मल्लाना योद्ध्याप्रमाणे भासला. गीतेचही तसंच आहे. ज्या भावनेनं जो जसा विचार करतो, तशी त्याला उमटते.
कोणत्याही ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय ठरवण्याचे सात निकष आहेत. आरंभ, शेवट, ग्रंथात कोणत्या विषयाची पुनरावृत्ती आहे, तात्पर्यनिर्णय, ग्रंथफल इत्यादी. त्यानुसार गीतेचा विचार केला तर गीतेत आरंभ आणि शेवट याला महत्व आहे." माझं खरं श्रेय काय? खरं कल्याण कशात आहे? याबद्दल माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मला आत्मकल्याणाचा मार्ग दाखव" अशी विनंती अर्जुन श्रीकृष्णाला करतो. म्हणून अनन्यभक्ती आणि मोक्षोपयोगी ज्ञान हाच गीतेचा खरा प्रतिपाद्य विषय.
हेच दोन विषय गीतेत पुन्हा पुन्हा आले आहेत. गुह्यात गुह्य असं ज्ञान मी तुला सांगतो,
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात् कुरूतेर्जुन ।।
सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ।।
(सर्व कर्मांचा शेवट ज्ञानात होतो). हे ज्ञानाविषयी झालं. अनन्यभक्तीच्या बाबतीतही तेच. तू मलाच शरण ये, माझीच भक्ती कर, मीच तुला सर्व पापांपासून मुक्त 1 करीन, माझ्यात मन लाव, अंतकाळी माझं स्मरण कर म्हणजे तू मलाच येऊन मिळशील, माझा भक्त हो इतकं सगळं सांगितल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 'न मे भक्तः प्रणश्यति'. माझा भक्त कधी विनाश पावत नाही. या भक्तीचं महत्व इतकं आहे की, या भक्तीमूळेचं विश्वरूप पाहू शकला. वेद, यज्ञ, उग्र तप यापैकी कशानंही ते शक्य झालं नसतं. होतच नाही. ही भक्ती मात्र ज्ञानयुक्त पाहिजे.
ज्यांना गीतेतलं गहन तत्वज्ञान कळत नाही, त्या सर्वसामान्य लोकांना सुध्दा गीता का इतकी आवडते? याचं कारण गीतेत असलेलं बहुमोल व्यवहार ज्ञान. त्यानुसार आपण जीवनात वागलो तर आपलं जीवन सुकर होईल. मन प्रसन्न राहील. मन प्रसन्न असलं तर देवात चित्त लागेल.‘ प्रसादे सर्व दुःखानाम् हानिरस्योऽपि जायते' असं भववतांनी म्हटलंच आहे. चित्त प्रसन्न असलं की सर्व दुःखांचा नाश होतो. याचा अनुभव आपण घेऊ शकतो.
'गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः हाही शांत मनाचा मूलमंत्र. जी गोष्ट आपल्या हातची नाही, त्याविषयी पंडित लोक शोक करत नाहीत. ती शासक शक्ती निराळी आहे याची जाणीव ठेवावी. चं आपल्या हर्षशोकानं विचार करण्यात वेळ घालवू नये. की ‘तस्मादपरिहार्येर्थे न त्वं शोचितुमर्हसि '. आणि एक ती अत्यंत सुंदर सुभाषित गीतेमध्ये आहे- 'संभावितस्य चाकीर्तिः मरणादतिरिच्यते.' संभावित माणसाला आपले अपकीर्ती मरणापेक्षाही क्लेशकारक वाटत असते.
श्रेष्ठ, अनुभवी लोक समाजांच धुरीणत्व करू शकतात. त्यांनी आपल्या वर्तनाचा आदर्श घालून देऊन वन समाजाचं आरोग्य टिकवायला हवं असा फार मौलिक उपदेश गीतेत आहे. मोठयांचं अनुकरण इतरेजन करत असतात. ते जसं वागतील तसं अनुयायी वागतात. म्हणून विचारवंतांवर, नेत्यांवर, कुटूंबप्रमुख, संस्थाप्रमुख या सर्वांवर आदर्श आचाराची जबाबदारी आहे.
माणसाला आदर्श आचारापासून परावृत्त करणारा त्याचा मुख्य शत्रू कोण ? क्रोध. क्रोधाभ्दवति संमोहः संमोहात् स्मृतिविभ्रमः' अशी ही अधोगतीची सर्वनाशापर्यंत नेणारी उतरंड आहे. माणसाचं लोभी मन त्याला स्वस्थ बसू देत नाही. 'मी आज हे मिळवलं, उद्या ते मिळवीन' (इदमद्य मया लब्धं इमं प्राप्स्ये मनोरथम्) असे त्याचे मनोरथ सुरूच असतात. त्याला हे कळत नाही की हा प्रपंच अपूर्ण आहे म्हणून त्या पासून मिळणारं सुखही अपूर्णच आहे. मग यावर उपाय काय ?
तर 'सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ.' अशी समतोल बुध्दी आचरणात यायला हवी. प्रपंच मुळी अनित्य आहे तर त्यापासून मिळणारं सुख शाश्वत कसं असणार? या जगातल्या वस्तू, परिस्थिती हे सुखाचं खरं कारण होऊ शकत नाही. मग हे सुखदुःख कशाचं असतं? तर आसक्तीचं, मोहाचं. म्हणून अविनाशी, निरतिशय आनंदाचा मार्ग दाखवणारी गीता आचरणात आणली तर आनंददुर्ग चढून जाणं कठीण नाही.
लेखक अज्ञात (कुणाला लेखसंबंधी माहिती असेल तर कळवावे.)
दंडवत प्रणाम
हेही वाचा 👇
श्रीमद्भगवद्गीता की १६ ऐसी बाते जो आपकी जिंदगी बदल देगी