सुखोपभोगांमुळे होणारी दुर्गती

सुखोपभोगांमुळे होणारी दुर्गती

सुखोपभोगांमुळे होणारी दुर्गती 

एक राहतो बंगल्यात । दुसरा पर्णकुटीत । 

कर्मे झाला ऐसा भेद । आपुलेनि ।।१।।

एका लहान बालकाचा जन्म मोठ्या बंगल्यात की जेथे प्रत्येक सुख-भोगाच्या वस्तु असतात. झोपण्यास पलंग, गादी, सोफा, टी.वी, एअर कंडीशन, फ्रीज या पेक्षा अधिक गोष्टी असतात आणि खाण्यापिण्याची तर काळजीच नाही, प्रत्येक गोष्ट मनमुरादपणे खाण्यास मिळते. 

जन्म होताच मुलाला फिरण्यास छोटी छोटी घोडा-गाडी चांगले रंगबिरंगी कपडे, तंदुरुस्त राहाण्यास टॉनिक सारखे औषधे अशा अनेक सुखावह गोष्टी, तर दुसरीकडे एखादा रस्त्यावर, उघड्यावर, फुटपाथवर, नंग्यापायाने भटकणाऱ्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतो.

जून जुलैमध्ये उन्हाळामध्ये एकीकडे पंखे, कुलर, एअरकंडीशन युक्त वातानुकुलित खोल्यात तर दुसरी कडे एक ही पंखा सुध्दा लावण्याचे भाग्य नाही. या प्रकारे थंडीच्या दिवसात अंगात एक फाटका शर्ट घालून कुड-कुड कापत रहावे लागते. ज्यांना कोणी विचारतही नाही.

दोघांमध्ये एवढा मोठा फरक असण्याचे कारण काय?माझ्या आदरणीय बंधु- भगिनींनो, जर आपण या गोष्टीस व्यवस्थित समजून घ्याल तर आपल्या जीवनात सफल होआल. म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखापासून, चिंतेतून आणि नरकातील पापकर्मातून मुक्त होआल आणि ईश्वरीय सुखशांतीचा आनंद प्राप्त कराल. आता थोडे लक्ष द्या- एखाद्या मातेस तीन-चार मुले असतील तर तिची सर्वांना राहाण्यास बंगली, फिरण्यासाठी मोटारगाडी असावी अशी इच्छा असते ती अशी आशा मात्र करत नाही की, 

एकास या सर्व गोष्टी असाव्यात व दुसऱ्यास या गोष्टी नसाव्यात. म्हणजे एक बंगल्यात ऐषारामात तर दुसरा वाटेत फिरून फिरून झोपडीत असावा, असे तिला वाटत नाही. परंतू आपण जिला “त्वमेव माता, त्वमेव पिता" म्हणतो अशी आपली सर्वशक्ती युक्त माता (ईश्वर) आपल्या भक्तांवर ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असते. ती कधी एखाद्यास लखोपती स्वतःहून करेल व दुसऱ्यास भिकारी करेल, अशा प्रकारे करून ती कोणावर जाणीव पूर्वक कधी अन्याय करत नाही.

असे असतांनाही आपणा समोर एक प्रश्न उभा रहातो की, एक मोठया बंगल्यात जन्म घेतो तर दुसरा उघड्यावर फुटपाथवर त्यांना या-त्या ठिकाणी कोणी पाठविले ? आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार तर कोणी फुटपाथवर जन्म घेऊ इच्छित नाही. कोणती अशी शक्ती आहे. की तिने या प्रकारे जन्म दिला. मग दोघांत इतका फरक कां त्याचे कारण काय ? हे आपणच सांगा ? कोणत्या फाईल मधून असा विचार केला गेला किंवा कोणत्या पुस्तकांमधून असा विचार करून त्या-त्या ठिकाणी जन्म दिला. ज्या फाईल मध्ये पाहून ठरवले की, त्या जीवास झोपडीत किंवा फुटपाथावर जन्म देऊन सर्व जन्म त्यास उघड्यावर जगावा लागेल.

कर्म तर आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत करत असतो. आपल्यापैकी कोणी बेकार उगीचच बसत नाही. मग कोणते असे कर्म आहे की, एकास झोपडीत जन्म तर एकास आलिशान बंगल्यामध्ये जन्म ! याचे मुख्य उत्तर म्हणजे सर्व संत महात्मे, ऋषी, मुनी, भगवान श्रीकृष्ण महाराज आणि स्वयं श्रीचक्रधरस्वामींनी आपल्या वचनात सर्वाना सांगितले आहे की, सकाळ पासून तर सायंकाळ पर्यंत जो वेळ ईश्वरासाठी खर्च करतात त्याचाच हिशोब पुण्यकर्मात घेतला जातो. 

इतर वेळेचा विचारच केला जात नाही. गेलेला वेळ वायफळच गेला. त्याचा योग्य विचार आपण का केला नाही ? याचा विचार करा. समजा आपणांस ६० वर्षे आयुष्य मिळाले तर त्यापैकी किती वेळ आपण नामस्मरणात घालवला व किती वेळ आपण विषय भोगामध्ये वायफळ घालविला. यावर आपले पुढील जीवन अवलंबून आहे. दुसरे असे की, जी धन-दौलत मिळाली त्यापैकी आपण धर्मासाठी साधु-संता साठी किती खर्च केला, की सर्व आपण खाण्यापिण्यातच वाया घालविले बस, याच दोन सेवांचा विचार पुढील जन्म देण्यासाठी विचारात घेतले जातात. 

या फाईलमध्ये सर्वात जास्त नोंदी ज्या जीवाच्या नावे सापडतील तो आलिशान बंगल्यात जन्म घेण्यास पात्र ठरू शकतो, म्हणून अशा प्रकारे जन्म प्राप्त करण्यासाठी नामस्मरण, साधु संताची सेवा, धर्मकार्यास उचित दान, तीर्थ यात्रासाठी खर्च करणे इ. सर्व बाबींचा विचार उचित ठरतो.

सूचना:- आपण चांगल्या धनवान व धर्मात्म्याच्या घरी जन्म घेऊ शकता किंवा अगदी खालच्या थरातील म्हणजे, नालीतील किड्याप्रमाणेही जन्म प्राप्त करू शकता हे सर्व आपल्या कर्मावर अवलंबून आहे. हे करण्यास आपणावर कोणतेही बंधन घातलेले नाही. आपण आपला योग्य मार्ग निवडावयाचा व त्याप्रमाणे फळभोग ही मिळवावयाचे आहेत. 

कारण भगवान श्रीचक्रधर स्वामींनी एका वचनात म्हटले आहे की, “जीव तो सर्वाधिकारी आहे." म्हणूनच आपण आपल्या पूर्व पुण्याईच्या आधारेच जे काही मिळवले आहे ते प्राप्त केले आहे. पुढील जन्माची चांगली कॅसेट आपणास सदाचरण करून तयार करावी लागेल. ती तयार करत असतांना आमच्याकडे दिवसाचे २४ तास आहेत. सर्व २४ तास माझ्यासाठी खर्च करा असे भगवान आपणास म्हणत नाहीत.

तर आपण आपले मुलांचे पालन-पोषण, टी.व्ही. सारखे मनोरंजन सांभाळून ही माझी सेवा करू शकता. परन्तु मला पूर्णपणे विसरता कामा नये. भगवंतानी त्यासाठी २४ तासापैकी २ ते ३ तास वेळ न चुकता खर्च करण्यास सांगितले आहे. माझ्या काही भगिनी आम्हास म्हणतात की, ३ तास तर खूप जास्त वेळ होतो. एवढा वेळ आम्हासं मिळत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो! आपण तीन-तीन, चार-चार, तास गप्पा मारण्यात टी-व्ही पाहाण्यात एकमेकांची निंदा करण्यास एकमेकांच्या चुगल्या करण्यास घालवतो, तो आपण परमेश्वर चिंतनात का वापरत नाही. 

फक्त आमच्यावर कोणाचे बंधन नाही. कोणाची आपणास भिती नाही म्हणून. म्हणतात ना? "दंड्याशिवाय जीव वठणी वर येत नाही." शेवटी तेच खरे आणि मग जीव जेव्हा एखाद्या अपघातात सापडतो, एखाद्या मोठया संकटात, अडकतो, तेव्हा मात्र आम्हास भगवतांची आठवण येते आणि मग साधू-संतांना पारायण करण्यास भाडे करू पध्दतीने दान- दक्षिणा घेऊन आणतो. 

मग मिठाई वगैरे घेऊन आम्ही मंदीरात जातो. परंतु अशी मतलबी गोष्ट परमेश्वर काय जाणत नाही किंवा जाणणार नाहीत ? मग सांगा, अशा मतलबाच्या भक्तीवर परमेश्वरांस आनंद वाटेल ? आपली भक्ती परमेश्वर आदराने मंजूर करतील ? मुळीच नाही. आणि पैशाच्या माध्यमाने केलेल्या पारायणामधून ही फारसा लाभ होणार नाही. ज्याला पीडा लागली तोच ती जाणतो, दुसऱ्यास त्या पीडेचे दुःख माहित असण्याचे कारण काय ? जो आजारी असतो त्यालाच औषधे खावी लागतात. 

तसेच आपण स्वतः १ तास स्मरण केलेले दुसऱ्याच्या १० तासच्या स्मरणापेक्षाही श्रेष्ठ ठरते. आपल्या संसारात काय चालले आहे. याकडे लक्ष द्या. आपण सर्व पाहून सुध्दा काही वेळा जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतो. आम्ही नियमितपणे पाहातो. बिना चप्पल घातलेला रिक्षा चालवतो. २/३ मैल आम्ही आपल्या ठिकाणी पोहचल्यावर दोन-तीन रूपये त्याच्या हातावर टेकवतो व हसत खेळत गप्पा मारत मारत चालले जातो. परंतु आम्ही हा विचार करत नाही की आपल्या प्रमाणेच तोही एक जीव आहे. या बिचाऱ्याने काय पाप केले व आपण काय पुण्य केले ? कधी ही अशा प्रकारे रिक्षात बसताना ही गोष्ट आठवणीत ठेवा की, याने काय कुणाचे बिघडले आहे ?

आता पर्यंत काहीच बिघडले नाही. आता तरी सावध व्हा व भगवंताचे २४ तासातुन ३ तास काढून स्मरण करा व बाकी २१ तास आपण आपल्या संसारात घालवा. जर २१ तास संसारांतील व्यवहारास पुरत नसतील तर आपणास २४ तास सुध्दा पुरणार नाही. त्यातुनच जास्तीत जास्त वेळ मिळवण्याच्या प्रयत्न करा. 

आपण विश्वास ठेवा अथवा ठेवू नका. आम्ही आमचा कोणताही स्वार्थ यातून साधत नाही किंवा आम्ही आपणास काही लालच म्हणूनही हे लिहीत नाही. आम्ही फक्त आपल्या जीवनाचे कल्याणासाठीच सांगत आहोत. आम्ही जीवास समजावे या कर्तव्य भावनेतूनच हे लिहीत आहोत. आपण यातून जागृत व्हावे. आपले जीवन मोक्ष-मार्गा कडे घालून परमेश्वरीय पूर्ण आनन्द मिळवावा व पुढील जन्म सुख समृध्दीत जावा. आपण झोपडीत किंवा फुटपाथवर पुढील जन्मास जावू नये म्हणून आपणासाठीच लिहीत आहोत.

खा, प्या मौज करा. असे पुढील जन्मासाठी म्हणणे आपण आपणासच फसवणे असा प्रकार आहे. जन्म मरणाच्या चक्रास मोठ-मोठया ऋषीमुनींनी व मोठ मोठया श्रीमंतानी सुध्दा मान्य केलेले आहे. म्हणून पुढील येणारा जन्म आपले स्वागत करत आहे. त्याचे तुम्ही ही स्वागत भगवंताची आठवण करूनचं करा. नाहीतर आपणांस पश्चातापाशिवाय पर्याय नाही. एका कवीने म्हटले आहे “ याद है तो आबाद है। भुल गया तो बर्बाद है ।। "भगवंताची आठवण ठेवाल तर मौज-मजा । विसरून जाल तर सर्वनाश हीच सजा" ।। असे म्हणावे लागेल. आणखी आपले खुप आयुष्य शिल्लक आहे. मोठे झाल्यावर (म्हातारे) भक्ती मार्ग करू. म्हातारपणी त्या शिवाय दुसरे काय काम ? असे अनेक तरूण आज स्वतः ठरवितांना दिसतात. वरून म्हणतात आमचे आता खाण्या-पिण्याचे वय आहे, उगीच त्यापासून दुर का जावे?

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपण मोठे होऊ याची आपल्या जवळ काय गॅरंटी आहे. आपले जीवन तर पाण्याच्या बुडबुडया सारखे त्याचा आज आहे तर उद्या काय भरोसा, असे आहे. मग आपण 'पुढे भक्ती मार्ग स्वीकारू' असे म्हणता ते योग्य नाही. उद्या करावयाचे काम आज नव्हे आताच सुरू करा म्हणजे आपणास योग्य मार्ग मिळेल. उद्या करावयावचे ते आज नव्हे आताच काम केले पाहिजे. नाही तर वेळ आपणासाठी थांबत नाही.

आता कोरोना महामारीत कित्येक लोकं मरण पावली व या संसारातून जीवानिशी गेली. तसेच आम्ही घरातून विचार करून काही महत्वाच्या गोष्टी करावयास निघालो तर, जर आपले प्रारब्ध फिरले तर, एका मिनिटात सर्वनाश होऊन जातो. आपल्या प्रतिदिवसांतील २४ तासांपैकी ३ तास भगवंताच्या नाम स्मरणासाठी वेळ काढणे फार अवघड नाही. आपणास जेव्हा थोडा थोडा वेळ मिळेल, तेवढा सकाळी, दुपारी सायंकाळी, रात्री, पहाटे यातून जमा करा. 

एकाच वेळेस ३ तास एकत्र काढा, असे ही भगवंत आपणास म्हणत नाहीत. आपल्या मुलाबाळामुळे वेळ मिळत नसेल, तर २ ते २।। घंटे (तास) वेळ काढा. परंतु २/५ मिनिटांनी काही साध्य होत नाही, जसे खूप खराब झालेल्या म्हणजे मळालेल्या कपडयास अगदी मामुली साबण लावली तर तो स्वच्छ होणार नाही. त्यासाठी भरपूर साबण लावून चांगले भिजून द्यावे लागेल. तसेच अशा या जीवाचे अनंत पाप धुवून टाकण्यासाठी आपणास जास्त वेळ म्हणजे कमीत कमी ३ तास तरी नाम स्मरणात घालावी लागतील.

बंधू भगिनींनो! मला आशा वाटते की, आपण मी सांगितलेल्या गोष्टी लवकरात लवकर आंमलात आणाल. भगिनींनो! आपणापासून तर अपेक्षा जास्त करणे अपेक्षितच आहे, कारण पुरुषांना कामास जाण्यामूळे फारसा वेळ मिळेल असे नाही आणी जर मिळत असला तरी त्यांनी गप्पा-टप्पा मारण्यांचे टाळले पाहिजे. मंदिरामध्ये जर आपण निरीक्षण केले, तर जेव्हा ७०/८० स्त्रिया दर्शनास येतील, तेव्हा १०-२० पुरूष दर्शनासाठी येतात.

पूजा पाठ न करणे, ईश्वर नामस्मरण न करणे व मंदिरामध्ये पूजा-पाठात न जाणे या संबधी हजार वेळा समजावून सांगून ही ज्यांच्या ध्यानी येत नाही, असे पुरूष जास्त दिसतात. यातून काही विशिष्ट पुरुषच असे असतात की, ज्यांच्या मनात ईश्वराबद्दल प्रेम भावना असते. काही उपदेशी भगिनींच्या घरी गेल्यावर त्या आम्हास रडून सांगतात. आमचे घर मालक करतात, मद्यपान (दारू) करतात, अशा या नराधमांना कोण समजावून सांगेल ? एवढे सांगून जर यांचे डोळे उघडत नसतील तर ही आमच्या आखत्यारीतील गोष्ठ नाही. त्यांना आता जे जे काय करायचे असेल ते भगवंतच ठरवितील. 

 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post