परमेश्वराचे स्मरण करण्याची योग्य वेळ कोणती?

परमेश्वराचे स्मरण करण्याची योग्य वेळ कोणती?

परमेश्वराचे स्मरण करण्याची योग्य वेळ कोणती?

या जगात जन्माला आलेला प्रत्येक प्राणी त्याचा मृत्यु हा अटळ असतो. हे या जगातील जीवंत सत्य प्रत्येक मानवास दृग्गोचर आहे. ज्ञात आहे. जन्म, बालपण, युवावस्था, तारूण्य, प्रौढावस्था व वृध्दापकाळ हे षड्विकार किंवा या अवस्था मानवी जीवनातच नव्हे तर प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये दिसून येतात. इतर प्राणीमात्रामध्ये आणि मनुष्यामध्ये ज्ञान जाणिवेच्या दृष्टीने मूलभूत फरक आपणास जाणवतो, मनुष्य मननशील, चिंतनशील, विचारशील आहे आणि इतर प्राणीमात्रांमध्ये हे गुणवैशिष्ट्य दिसत नाही. त्यांचे निसर्गदत्त मर्यादित असे ज्ञान आहे. पण मनुष्य मात्र आपल्या या गुणवैशिष्ट्यांमुळे अधिकाधिक ज्ञानग्रहण करून ज्ञानी होऊ शकतो अध्यात्मीक होऊ शकतो. एका सुभाषितकाराने म्हटलेले आहे.

आहार निद्रा भय मैथुनं च 

सामान्यमेतद् पशुभिः नराणाम्। 

धर्मोहि एको अधिको विशेषो ।

धर्मेणहिना पशुभिसमाना ।।” 

आहार, निद्रा, भय आणि विषयोपभोग भोगणे हे तर मनुष्याप्रमाणे पशु पक्ष्यांमध्येही दिसून येते मग माणसात आणि पशुमध्ये फरक तो कोणता ? तर धर्म हाच एक विशेष मनुष्यामध्ये दिसून येतो. धर्मरहित मनुष्य पशुप्रमाणेच आहे. धर्म म्हणजे काय ? तर एक श्रेष्ठ विचारधारा, ज्यामुळे इहलौकीक जगात अभ्युदय आणि मृत्युनंतर परमशांती प्राप्त होऊ शकते. अशा या विचारधारेत यच्य यावत मानव मात्राचे कल्याण साठवलेले असते, एवढेच नव्हे तर अखिल प्राणिमात्रांच्या कल्याणाची कामना असते. मनुष्याचे बालपण हे अज्ञानातच व्यतीत होते. तेथून बाहयव्यवहार ज्ञानाचे संस्कार होत जाऊन युवावस्थेत ज्ञानर्जनाचा प्रयत्न झाल्यास त्यास ज्ञान ग्रहण करता येते. पण युवावस्थेत खेळ खेळण्यातच वेळ गमावल्या जातो. 

तारूण्यात विवाह बंधनात अडकल्यानंतर विषयोभोग भोगण्यात आणि संसाराचा गाडा ओढण्यात, कबाड कष्ट करण्यातच त्याचा वेळ जातो. आणि प्रौढावस्थेत मग अनेक जबाबदाऱ्या वाढतात. मुलामुलीचे लग्न, कुटूंबाचे संगोपण अनेक व्यवहार करता करता नाकी नऊ येतात आणि जेव्हा वृध्दावस्था येते, जेष्ठ नागरिक बनतो तेव्हा तो हताश निराश झालेला असतो. हातातून सर्व व्यवहार निघून जातात, इंद्रिय शिथील होतात. शरीर कमजोर होते आणि मिळविण्यासारखे काहीही मिळविता येत नाही. अशा वेळी एक विक्षिप्तता माणसाला ग्रासू पाहाते. हाच काळ खरा अत्यंत संवेदन शीलतेचा काळ आहे. या काळात आपली स्वस्थता कायम राखणे हे महत्वाचे आहे. अशा या विविध तापाने तापलेल्या काळात अध्यामिक चिंतन हाच खरा श्रेष्ठ आणि कल्याणकारी उपाय आहे. चिंतन म्हणजे चिंता नव्हे. या कालावधीत बहुतेक काळ माणसाचा चिंतेतच व्यतित होतो. ही चिंता झटकून चिंतनाला लागणे महत्वाचे आहे. प्राचीन सर्व धर्मग्रंथ तसेच सर्वसंत चिंतनावर भर देतात. संत कबीरांनी सुध्दा सांगितले आहे.

चिंतासे चतुराई घटे, दुःख से घटे शरीर।

पापसे घटे लक्ष्मी। कह गये दासकबीर ।।”

हिच गोष्ट दुसऱ्या पध्दतीने सांगितल्या गेली आहे ।

“चिंताबिना चतुराई नही दुःख बीना नहीं शरीर । 

पाप बिना लक्ष्मी नहीं झूठा दास कबीर ।। "

म्हणून जीवनाचे, जगाचे चिंतन हा सर्वोत्तम उपाय आहे. पण चिंतन म्हणजे केवळ ग्रंथातील शब्द वाचणे किंवा ते आठवणेही नव्हे. चिंतन हे काहीतरी निराळे आहे. दिवसभर आपण अनेक उद्योग करतो. रिकाम्यावेळी आपण नाना तर्क, विचार, संशय करीत मनोव्दन्दात अडकलेले असतो. आत्म्याच्याजवळ जाऊन चिंतन मात्र आपण कधी करीतच नाही. केलेच तर अगदी अत्यल्प. त्या चिंतनाचा आपल्या मनाला स्पर्शही होत नाही तर ते संपून जाते. त्यामुळे काहीही बदल घडत नाही. चिंता उदेग हे सतत मनात कायमच असतात. श्रीमद्भगवद्गीतेत चिंतनाचा विधी आणि महत्व वर्णन केले आहे. "सततं चिन्तयन्तो माम्" भगवन्त म्हणतात, जो सतत माझे चिंतन करतो, तो भक्त मलाच येऊन मिळतो. 

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामीनीही चिंतनाचे महत्व सांगितले आहे. स्वामींनी या संबंधी भिंगुरटीचा एक दृष्टांत दिलेला आहे. “भिंगुरटी असते. ती अळी शोधते. तिला काटा रोवते आणि घेऊन आपल्या घरात नेते आणि ती घर बंद करून निघून जाते. ती अळी त्या भिंगुरटीचे चिंतन करते. ती येईल, मला खाईल, असे तिचे सतत चिंतन करता करता काही दिवसात त्या अळीचे भिंगुरटीत रूपांतर होते. ती अळी भिंगुरटी होऊन जाते. त्याच प्रमाणे जो परमेश्वर भक्त परमेश्वराचे सतत चिंतन करतो तो परमेश्वरा सारखाच होतो.”

आत्मा म्हणजे आपण आहोत. शरीर हे पंचमहाभुते व सत्व-रज-तम या त्रिविध गुणांमुळे बनले आहे. परमेश्वर या जगाचा नियंता आहे. तो अनंत शक्तीयुक्त आहे त्याचा विश्वव्यापार शक्तींच्या माध्यमातुन सुरू आहे. जीवास मिळणारे सुख दुःख हे त्याच्या कर्मानुसार मिळत असते. ते देणाऱ्या त्याशक्ती आहेत असे जीवनाचे व जगाचे जर चिंतन करता आले तर विविध तापांपासून मनुष्य अलिप्त होऊन परमगती प्राप्त करू शकतो. प्राचिन काळी भारतीय संस्कृतीत चार आश्रमांची विभागणी जीवन विकासाचे दृष्टीने केल्या गेली होती. 

वयाच्या २५ वर्षापर्यंत ब्रम्हचर्याश्रम २५ ते ५० गृहस्थाश्रम, 

५० ते ७५ वानप्रस्थाश्रम आणि ७५ च्या पुढे संन्यासाश्रमात व्यक्तीने आपले जीवन व्यतीत करायचे. 

असा हा आयुष्यातील २५/२५ वर्षापर्यंतचा टप्पा. 

तो ५० वर्षाचा झाला म्हणजे तो जेष्ठ नागरिक झाला असे समजण्यात येई आणि त्याने समाजात आपला एक आदर्श निर्माण करून मुलांवर सुसंस्कार घडविण्याचे कार्य करायचे असा एक त्याकाळी अलिखित नियम होता. वयाच्या ५० नंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारून घरापासून दूर होऊन घरातील तसेच समाजातील मुलांवर धार्मिक सुसंस्कार घडविण्याचे व्रत धारण करणे किंवा सर्वसंग परित्याग करून आत्मकल्याणा संबंधीचे व्रताचरण करणे. चिंतन-मनन करणे हे कार्य करीत राहणे, त्या व्यक्तीच्या विकासाचे दृष्टीने महत्वपूर्ण समजले जात होते. महानुभाव तत्वज्ञानानुसार तर परमेश्वराला अनुसरण्याचे वय ५६ पर्यतचे सांगितले आहे. 

 ब्रह्मविद्याध्ययनाची योग्यता विषयोपभोगासाठी योग्य ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्मज्ञानाला तथा संपूर्ण कर्माला जाणतात. श्रीगीतेतील या श्लोकांत भगवंतानी वृध्दापकाळापासून अलिप्त राहण्याचा एक दिव्य संदेश दिला आहे. जो भगवद् आश्रय धारण करतो तो म्हातारपणाच्या दुःखातून तसेच मरण समयीच्या दुःखापासून मुक्त होतो. या जगात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मरणधर्मा आहे तसेच बालपण तारूण्य आणि वृध्दापकाळ या अवस्थांतराच्या प्रवाहात अनेक सुखदुःख त्यास प्राप्त होतात. बालपण तारूण्यानंतरचा काळ म्हणजे वृध्दावस्था हा काळ मानवी जीवनात अत्यंत क्लेशदायक काळ आहे. भूतकाळातील मधूर आठवणींचा संग्रह सोबत घेऊन, मृत्यूचे भीषण भविष्य समोर असल्याने जीवन नीरस झालेले जाणवत असते. 

त्यातच शरीर कमजोर होऊन इंद्रीयांची शक्तीही क्षीण होत होत जाते. तारूण्यात गाजवलेला पराक्रम, मिळविलेली शक्ती, धनसंपदा, मान मान्यता, यश, कीर्ती यांचीही उपयोगिता जाणवत नाही. सांसारिक सुख हेच सर्वश्रेष्ठ आहे, असा जो तारूण्यातील उन्माद, तोही बाद होत जाऊन जीवन हे एक अनाकलनीय रहस्यमय आहे, ते अगम्य अगोचर आहे, हे या वृध्दावस्थेत जाणवायला लागते, संसार दुःखरूप आहे. दुःखाचा नाश करणे हे मानवाच्या हातचा खेळ नाही, हे कळू लागते अशा अवस्थेत मनुष्य निराश होऊन खचून गेलेला असतो. शरीरबळ, इंद्रियबळ, मनोबल, बुध्दीबल ही महत्वपूर्ण बल संपदा नष्ट होत जाते आहे, हा अनुभव येत असल्यामुळे आत्मबल ही नष्ट होऊन सर्वनाशा कडेच वाटचाल सुरू असल्याचे जाणवू लागते आणि असा आत्मबल हरवलेली व्यक्ती मग तो ऐन तारुण्यात पदार्पण केलेली असेल तरी त्यास नैराश्य पोखरून टाकल्या शिवाय राहत नाही.

बालपणापासून मनुष्य अध्ययन करतो. वृध्दापकाळात तर बुध्दीचा अधिकाधिक विकास व्हायला हवा पण असे होत नाही. शरीराचा विकास होत जाऊन त्याच्या शक्तीचा ऱ्हास होत जातो. इंद्रीयांचा तरूणपणापर्यंत विकास होऊन त्यांचीही शक्ती क्षीण होत जाते, मनाचे सामर्थ्यही मनाप्रमाणे काहीही घडत नाही म्हणून क्षीण होत जाते. ज्यांच्यामनावर चांगले संस्कार नाहीत अश्या लोकांमध्ये तर मनोविकृतीही निर्माण होते. बुध्दीबळ कमजोर होत जाऊन स्मृतीभ्रंश होतो. विकासाच्या ऐवजी बुध्दीचे अधःपतन होते. अशा या वयात, वृध्दावस्थेत या सर्व दुःखाचे जाळे मानवी जीवनात पसरते आणि मनुष्य हतबल होतो. या वयात सुख, शांती, सात्विकता, आत्म संतुष्टी प्रत्येक व्यक्तीला अत्यंत आवश्यक आहे. पण ती संस्काराने चिंतनाने अध्ययनानेच प्राप्त होऊ शकते. ज्यांनी जीवनभर कुठलेही अध्यात्मिक चिंतन केले नाही त्यांना म्हातारपणात कसे ते अलौकीक सुख प्राप्त होणार ? म्हणून सुखी जीवनासाठी अध्यात्मिक चिंतनाची अत्यंत आवश्यकता आहे.

सेवा भाव

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी अखिल मानवजातीच्या कल्याणाकरीता प्रत्येक जीवास ज्ञानदातृत्व केल. स्वामींनी दया, सत्य, अहिंसा, नम्रता, शांती. सेवा असे अनेक शाश्वत नितीमुल्ये स्वतः आचरून प्रत्येकाने आचरावे अशी आज्ञा केली आहे. ही नीतीमूल्ये शाश्वत तर आहेत परंतु तरी सुध्दा शब्दरूपाने त्यांची कृतीशीलता तर फार अल्पप्रमाणात दिसते.

सेवा:- कोणत्याही प्रकारचे कार्य करताना ते आवडीपूर्वक व श्रध्दापूर्वक करणे म्हणजे सेवा. हाच याचा खरा अर्थ होतो. आपण आई-वडील, गुरू व इतर लोकांची सेवा करतो. पण त्यामागे आपला दृष्टपर हेतू असतो. तो त्यांच्या द्रव्याचा, संपत्तीचा पण सेवा करताना ते आपलं एक कर्तव्य असते हे समजून घेतले पाहिजे. आपण पुढीलाची सेवा करू, तर पुढील आपली सेवा करेल. व आपण जर ती आवडी पूर्वक केली तर पुढीलाच्या मनात आपल्याबद्दल आदर, सहानुभूती निर्माण होते.

'सेवा - दास्य' हे एकाच अर्थाचे शब्द वाटतात परंतू या दोन्हींमध्ये फरक आहे. तो असा अंगलक ते सेवा, दास्य ते दुरांतर. एकाला त्रास देऊन दुसऱ्याची सेवा करू नये. अन्नदान तर करायच पण धमक्या देत जेऊ घालायचे. एका व्यक्तीचे पैसे अन्यायाने घ्यायचे व ते दुसऱ्याला दान दयायचे ही तर समाजाची रीतच आहे. असे होऊ नये. म्हणूनच स्वामी म्हणतात. जर कुणाची सेवा करायची असेल तर कोणालाच त्रास न देता करता आली पाहिजे. जो सेवा करतो त्याला निश्चितच त्याचे फळ मिळते. याच संदर्भात एक कथा आठवली

एका गुरूंना दोन शिष्य असतात. एक विव्दान पंडीत असतो व दुसरा खुपच अशिक्षित असतो. पण जो अशिक्षीत शिष्य असतो तोच गुरूंची मनोभावे सेवा करीत असतो. गुरूंच्या पश्चात विव्दान जो शिष्य असतो त्याला वाटते; आपणास ही गुरूंची सर्व संपत्ती मिळेल परंतु गावातील पंचांनी सांगितले की इतके दिवस ज्या शिष्याने सेवा केली त्यालाच ही सर्व संपत्ती मिळेल. तेव्हा सर्व संपत्ती विव्दान शिष्याला न मिळता सेवाभावी शिष्यालाच सर्व संपत्ती मिळते.

थोडक्यातः

‘जो करील सेवा, त्यास मिळेल मेवा' सेवेमुळे परमेश्वर प्रसन्न होतात. साधूसंतांची, गुरूनिमित्यांची, चतुर्विध साधनाची सेवा ही तत्परतेने केली पाहिजे. सेवा करताना आपल्या मनात काहीवेळा भिती असते. कि न जाणो माझ्याकडून यांना काही त्रास होईल किंवा काही चुकेल. 

पण सेवकाला सर्व माफ असते म्हणून आपण सेवा करताना कशाही प्रकारे करायची नाही, तर ती आवडीपूर्वक केली पाहीजे. मी परमेश्वराजवळ एवढीच विनंती करतो. 

तुझ्या साधनाची घडो मज सेवा । 

आणिक न काही मागु तुज देवा ।


 






Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post