महाजनो येन गत: स पन्थाः ।
श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणम् ।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गत: स पन्थाः ॥ (३.३१४.११९, महाभारत.)
अर्थ
:- वेदांमधील श्रृतीमंत्र वेगळं काही
सांगतात आणि स्मृतीही वेगळेच सांगतात. असा एकही मुनी नाही की ज्याची शिकवण
सर्वांनी प्रमाण मानली आहे. धर्माचे तत्त्व (रहस्य, गूढ) व गुहेत लपल्यासारखे आहे. (म्हणजेच एक सुनिश्चित असं
समजणे अवघड आहे. मग काय करायचं?)
अशा स्थितीत महान,
थोर व्यक्तींनी जो मार्ग अवलंबला त्याच मार्गाने चालावे, तोच मार्ग
चोखाळावा.
टीप- महाभारताच्या अरण्यपर्वात यक्षाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना, 'को पन्थ:?' (धर्माचरणाचा मार्ग कोणता?) या प्रश्नाचे धर्मराज युधिष्ठिराने दिलेले उत्तर म्हणजे वरील श्लोक होय. या श्लोकाच्या संदर्भात एक पाठभेदही आढळतो ज्यात वरील श्लोकाची पहिली ओळच पूर्णपणे वेगळी आहे पण अर्थ जवळपास सारखाच,
तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम्। धर्माचरणाबाबतीत काय चांगलं काय वाईट याविषयीचे तर्क देखील स्थिर नाहीत (कारण सगळे धर्मनिर्णय स्थल-काल-परिस्थितीनुसार विविध दृष्टीकोनातून विवेकबुद्धीवर अवलंबून असतात, तर्काधिष्ठित असल्याने त्यात फरक असतात.) त्यामुळे साधारण तशाच परिस्थितीत महान व्यक्ती, थोर पुरुष कसे वागले हे आठवून त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणेच योग्य होय.
वरील श्लोकातून अजून एक गोष्ट मी आपल्याला दिसते ती म्हणजे धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां धर्माचे तत्त्व हे गुहेत लपलेले आहे. गुहेचा लक्ष्यार्थ ध्यान करण्याची जागा असा घेतला तर माणूस मनरुपी गुहेत आत्मबुद्धीद्वारे चिंतन, मनन, ध्यान करून आवश्यक वेळी आवश्यक ते तत्त्व गुहेतून बाहेर काढू शकतो आणि त्यात त्याला आधीच्या महात्म्यांनी अनुसरलेला मार्गच सहाय्यभूत होणार. म्हणूनच महाजनो येन गत: स पन्थाः। असे श्लोकाचे पुढचे व शेवटचे चरण आहे. मनुस्मृतीत धर्म (विहीतकर्तव्यकर्म) म्हणजे काय ? धर्माची लक्षणे कोणतीहे एका श्लोकातून सांगितलेले आहे,
धृति: क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रह:।
धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम्।। - ६.९१, मनुस्मृती.
धृतिः (धैर्य), क्षमा (अपल्याशी गैर वागणार्यावरही उपकार करणे), दमः (नेहमी संयम बाळगणे), अस्तेयं (चोरी न करणे), शौचं (अंतर्बाहय स्वच्छता, पावित्र्य), इन्द्रियनिग्रहः (इन्द्रियांना प्रयत्नपूर्वक सत्कर्माची सदाचरणाची सवय लावणे), धीः (सद्बुद्धीने वागणे), विद्या (योग्य ज्ञान प्राप्त करणे), सत्यं (सत्याने वागणे जे सर्वांना हितकारकआसेल तेच करणे.) आणि अक्रोध (क्रोधापासून रागापासून दूर रहाणे). मग आजवर होऊन गेलेल्या राम, श्रीकृष्ण, बुद्ध, महावीर, ज्ञानोबा-तुकोबां सारखे अनेक संतसज्जन वा महान विभूतींच्या मते धर्माचं खरं तत्त्व काय असे विचारले तर अनेक विचारांचा गोंधळ निर्माण होईल. जसे, परोपकार हाच धर्म.
अहिंसा हाच धर्म न हि सत्यात्परो धर्मः।
स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरर्धोक्षजे
पण या सर्व महान विभुतीच्या विचारांचं सार काढलं तर, 'ज्यातून विश्वाचे कल्याण होईल. जो विश्वातील सर्व जीवांचं हित बघेल तोच धर्म होय.' हे कळून येईल. मात्र याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला या महात्मांनी अवलंबिलेल्या मार्गाचं अनुसरण करावं लागेल तेव्हाच आपण खरा धर्म व त्याची तत्त्वे जाणून घेऊ शकू अनुभवू शकू. हाच सत्याचा, धर्माचा मार्ग महाजनो येन गत: स पन्थाः। परंतु वर उल्लेख केलेले महात्मे स्वतःचा सत्यमार्ग स्वतःच निर्माण करतात व तसे कटिबद्धतेने आचरणही करतात. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, सत्यासत्यालागी मन केले ग्वाही। मानियेले नाही । लोकमता ॥ जनसामान्यांनीही अशाच महात्म्यांच्या विचारधारेचा स्थळकाळपरिस्थितीचा विवेकी विचार करून अवलंबन करायचा असतो. वरील सुभाषितापासूनच महाजनो येन गत: स पन्थाः। ही लोकोक्ती प्रचलित झाली आहे.