भाग 003 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत
(रुक्मिणी स्वयंवर - कथासार)
“वासुदेव हे श्रीकृष्ण महाराजांचे पिताश्री ते बत्तीस लक्षणांनी युक्त लावण्याचा जणूं गाभाच ! त्याचा थोरला मुलगा बळिराम उर्फ हलधर हा बलदंड आडदांड असा महावीर आहे. नांगर व मुसळ ही दोन शस्त्रे वागविणारा मल्लविद्या निपुण शत्रूला नांगराने ओढायचे व मुसळाने ठेचायचे कसब त्यास अवगत आहे. दैत्यदानवव देवलोकांनाहि त्याचा मोठा धसका आहे.”
“बळिरामाचा धाकटा भाऊ श्रीकृष्ण” हा सर्वशक्तियुक्त ज्ञान-विज्ञान शक्तिधारक ह्याच्या एकाच मायाशक्तीने चराचरा सृष्टीची रचना संहार व स्थिति कायम राखली जाते. अशा ह्या श्री भगवानांचे वर्णन करतां - करतां शेषादिक श्रमले. आगम - निगम भुलुन गेले. वेद थकुन गेले. मुके झाले. पुराणांना तर त्यांचा मूळ ठावठिकाणा सापडलाच नाही. ब्रम्हादिक देवगण ऋषिमुनि त्या परमतत्वाचे ध्यान लावण्यासाठी धडपडत आहेत. जगात नव्हे, संम्पूर्ण विश्वांत असा एकहि राजा वा देव नाही, की जो कुणाच्या ना कुणाच्या तरी अधीन आहे. धाकात आहे. पण यास अपवाद मात्र भगवान श्रीकृष्ण हेच आहेत. कारण ते जगत वंद्य जगन्नियंते स्वतंत्र आहेच ! एकमेवा व्दितीयोनास्ति- हे फक्त भगवान श्रीकृष्णांनाच लागू आहे. जसे इतर राजे पदरी अनेक लहानसहान राजे बाळगून, स्वत शेखी मिरवितात. जनतेकडून भरमसाठ करवसुली करतात. लढाई लढतात बिचारे सैनिक जयजयकार करतात, तो राजाचा शिवाय पराजय झाला तर सैनिकांना तंबी धाक ताकीद सैन्याला पुढे करुन लढाई लढणारे राजे पुरुषार्थ हीन या उलट भगवंताचे सारेच काही आगळे वेगळे निराळे प्रजेकडे कर वसूली न करता, प्रजेलाच पसायदान देणारा वैरीयाला दुसऱ्या करवि मारवितो शत्रु वा मित्र दोघानाही समान सद्गतिचा न्याय देतो. नरकांपासून सोडवितो. शरण आलेल्यास मरण देता नाही. त्याची सर्व प्रकारच्या पापापासून सुटका करुन, त्यास मोक्ष देतो''!
“त्याचे मूळस्वरुप शुध्द बुध्द वैराग्य अशा विविध मार्गानी भक्ती नित्यमुक्त व सर्व शक्तिीयुक्त असें आहे. त्याची प्राप्ती होण्यासाठी इतर कोणत्याहि जीव-देवतांच्या भक्तिने - भावाक्रियेने साधनांनी ते साध्य होत नाही. त्यासाठी हवी त्याचीच कृपा !! त्याच्या कृपेने ज्ञान- प्रेम प्राप्त होते. ज्ञान भक्ति दुर्लभाहून दुर्लभ त्या देवाचे विषय प्रेम' अति दुर्लभ !!! त्या देवाची पत्नी होणे, होणे, परमभाग्याचे लक्षण आहे. एकीकडे मातेला वाटते, वर संपत्तिमंत असावा. पिताश्रींना वाटते शूर वीर महापराक्रमी असावा. कन्येला वाटते, वय-रुप गुणांनी युक्त असा पति असावा - ह्या सर्व जणांचे एकत्रिकरण केले, तर श्रीकृष्ण महाराज समोर ऊभे ठाकतात. ही रुक्मिणीच त्या देवाची पत्नी होणार, हे सूर्यप्रकाशाइतके प्रखर सत्य आहे. आणि हो राजा ! आपण जर खरोखरीच भाग्यवान असाल, तर श्रीकृष्णाशी सोयरीक जोडाल. त्यामुळे तुमची गुणकीर्ति अजरामर होईल. अर्थात हे वाटते तितके सोपे नाही. त्यासाठी फार मोठ्या दिव्यातून जावे लागणार आहे. जगात चांगली व्यक्ति चांगले ज्ञान व चांगली वस्तू ह्या तिघांना खूप विरोध असतो. त्यांच्या प्रखर विरोधामुळे त्यांची श्रेष्ठता सिद्ध होते. रुक्मिणीचे लग्नात प्रचंड रणकंदन होईल. तुंबळ युद्ध होई पण तरीसुद्धा श्रीकृष्ण रुक्मिणीस जिंकून नेतील. अशी भविष्यवाणी-आकाशवाणी आहे !!”
त्यानंतर किन्नराने रुक्मिणीचेहि यथोचित वर्णन केले. रुक्मिणीने नकळत प्रसन्नतेच्या भावातून गळ्यातला रत्नजडीत हार किन्नरास बक्षिस दिला. त्याने तो श्रीकृष्णाच्या हाराखाला परीधान केला. हा सर्व सुखसोहळा सुखाचा होता. पण- पण शंकेची पाल मात्र रुक्मिणीच्या मनात सतत चुकचुकत होती.
देवाशी सोयरीक जोडताना येणारे अडथळे रुक्मिणीच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसू लागले. पहिला अडथळा रुक्मि या दादाचा. दुसरा शिशुपाळाचा. ह्या अडथळ्याना पार करुन देवाजवळ जायचे म्हणजे खरे अग्निदिव्य वाटत होते. रुक्मिणीच्या मनातले हे वादळ किन्नराचे आवाजाने शांत झाले.
“हे भीमक राया ! मी आता तुझी स्तुति करीन ती ऐक !” असे म्हणून त्यात भीमकराजाची खूप खूप स्तुति केली. “सभापतिसह ही सर्व सभा चंद्र सूर्य असे चिरंजीवित होवो !” असा मंगल आशिर्वाद देऊन किन्नराने आपल्या भाषणाची इतिश्री केली.
त्यानंतर भीमकाने किन्नरासह कल्याणकीर्ति भाटाची आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमनीय, स्नान व मधुपर्क, तिलक, अक्षत, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, ताम्बूल, नारियल। या षोडष उपचारे पूजा केली. त्यांचे समागमे आलेल्या बंदीजनांचे, विप्रजनांचे, बैकारांचे, पढते वक्ते, कलावंतांचे दानदक्षिणा, लेणी लुगडी, दिव्य वस्त्र अलंकारांनी सन्मानित केले.
कल्याणकीर्तिस एक लक्ष श्वेत घोडे, दहा हजार श्रृंगारलेले हत्ती, चौदा हजार रथ, सुवर्णानी लादलेले बारा हजार ऊंट व जिंकलेले लहान सहान देश आंदण दिले. एवढे दान देऊन भीमक राजा म्हणाला, “हे आम्ही तुम्हास केवळ तुळशीपत्र प्रदान केले आहे.”
उत्तरादाखल कल्याकीर्ति म्हणाला, “हे महाराजा ! आपल्या दानामुळे मी भारावून गेलो आहे. त्याच्या ओझ्याने मी थकून गेलो आहे. आता पुढे काहीही घेण्यास माझे हात सरसावणारच नाहीत.”
किन्नराने राजास एक विज्ञप्ती केली. “हे राजन् ! जेव्हां श्रीकृष्ण रुक्मिणीस जिंकून नेतील, तोपर्यंत आम्ही इथेच राहू.” आणि राजाने ती विनंती तात्काळ व आनंदाने मान्य केली.
यावर कल्याणकीर्तिने अधिक खुलासा केला, “शिवाय अंबीकेच्या भुवनी श्रीकृष्णास जेव्हां रुक्मिणी माळ घालील, तेव्हां किन्नराचे कवच फिटेल. तो शापमुक्त होईल. व त्याचे पूर्व देह वेद घोष ऋषिचे त्यास पावन होईल. ते त्याचे रुप आम्हीही पाहू. त्यानिमित्ते आम्हासहि देवदर्शन घडेल. तत्पश्चात आम्ही कासेश्वराकडे काशीला प्रयाण करुव आमच्या कुटुंबियांस भेटू.”
इकडे रुक्मिया म्हणजे रुक्मिणीचा दादा मात्र फारच संतापला होता. त्या काळ्या कृष्णाची एवढी स्तुति म्हणजे आपल्या जखमेवर मीठ चोळावे तसे त्यास झाले. श्रीकृष्ण रुक्मिणीला जिंकून नेतील ही भविष्यवाणी ऐकून ते शब्द नव्हे, तर कर्णरुपी वारुळांत विषारी नागाचा प्रवेशच आहे असे त्यास वाटले. त्याच्या डोळ्यांतून अंगार बाहेर पडत होता. जमिनीकडे दृष्टि लावून दांत ओठ खात व हाताच्या मुठी जोराने आवळीत तो आपला राग व्यक्त करीत होता. त्याची ही क्रोधायमान अवस्था पाहून रुक्मिणीदेवी फारच घाबरुन गेल्या होत्या. भीमक राजा मात्र शांत व आनंदी दिसत होता. रुक्मियाच्या अशा वागण्याकडे त्याचे अजिबात लक्षच नव्हते. आनंदाच्या भरात राजा सुमति नावाच्या प्रधानास म्हणाले,
“हे प्रधाना! आता वरसंशोधनास हेर पाठविणे तातडीने बंद करा. भीमकीस श्रीकृष्ण हाच वर सर्व दृष्टिने यथायोग्य असाच आहे. तरी आपण द्वारकेस जाऊन श्रीकृष्ण महाराजांना भीमकाच्या कन्येचा स्वीकार करावा, अशी विनंती करा. सोबत आम्ही विनंतीपत्रिका देतच आहोत. आपण नावाप्रमाणेच गुणी व शहाणे आहात. तेव्हा याबाबतीत आपले पराकाष्ठेचे प्रयत्न अपेक्षित आहेत. कारण, जगात प्रयत्नवाद हाच सर्वश्रेष्ट मानला आहे. तेव्हां सूज्ञांस अधिक काय सांगावे?”
यावर सुमति म्हणाला, “हे राजर्षि! श्रीकृष्णासारखा अद्वितीय सोयरा जोडणे म्हणजे दैवाची दशदिशांनी जणू खैरातच आहे.”
दुसरा सुबुद्धि नामक अग्रमानांकित प्रधान राजास म्हणाला, “हे राजन् ! श्रीकृष्णाशी सोयरीक जोडणे म्हणजे भवसागर लीलया तरुन जाणेच होय!”
तिसरा सत्कीर्ति नामक प्रधान उद्गारला, ''हे चक्रवर्ति राया ! यदुपाते श्रीकृष्णांसारखा सोयरा आपण जोडल्यास मनुष्यांसह देवलोकी आपली सर्वजण कीर्तिच गातील।
चौथा बुद्धिसिंधु नामक प्रधान म्हणाला, “श्रीगोविंदासारखा सोयरा जोडणे म्हणजे उभयवर्गास चराचर सृष्टीस आनंदाची बरसात करणेच होय.”
राजा ह्या बोलांनी सुखावला. विनंती पत्रिका सिद्ध जाहली. सुमति प्रधान कार्य करण्यास प्रवृत्त झाला. आतां तो निघणार इतक्यात अचानक ढगगडगडावेत तसा रुक्मिया गडगडला. मोठ्याने उपहासगर्भ विकट हास्य करीत तो गरजला,
“हे पुज्य पिताश्री ! आणि आमच्या धुरंधर प्रधानांनो !आपण सारेच सूज्ञ आहात. हे खरे आहे. आपण कोणत्याही गोष्टीचा आदि-अंत न पाहता सारासार विचार न करता, निर्णय घेताच कसे? हा कल्याणकीर्ति भाट म्हणजे आधीच ओस पडलेली वाट. त्याच्या मधुर भाष्यावर तुम्ही भरवसा कसा ठेवता? त्यात हा “किन्नर पक्षी” म्हणजे भकालाचे भाकाल स्वरुप, विद्रुप पाखरु! ते काहीही अरळ-बरळ भकत राहीले. ओकत राहीले अन तुम्ही वेड्यासारखे त्याचे बोलणे ऐकत राहीले. त्याचे बोलणे सुरु झाले, तेव्हांच आमचे कपाळ उठले होते. ही भंकसबाजी आम्ही मधेच बंद पाडली असती, पण सभेचा बेरंग होऊन तुमचा मानभंग होऊ नये म्हणून आम्ही भिडेखातर मूग गिळून बसलो. शिवाय सभाजन कोपले असते. आपली अपकीर्ति झाली असती. व्यासांनी घालून दिलेले “व्यासपीठाचे नियम” सांभाळून आम्ही शांत राहीलो. वास्तविक पाहता हा किन्नर म्हणजे रंभेने शापिलेला शापग्रस्त-मतिभ्रष्ट. तो काहीही असंबद्ध अवास्तव बोलत राहीला, ते तुम्ही मान्य कसे केलेत? ह्या काळ्या श्रीकृष्णाची काळी करणी कधी कुणाला कळलीय का? मला तर वाटते, त्याच कृष्णाने हे पाखरु शिकवून पाठविले असावे. तुम्ही त्या काळ्या कृष्णाशी सोयरीक कराल, तर जगात फसाल. जग म्हणेल, राजाने त्रयस्थांचे काही-बाही ऐकून आपली कन्या कृष्णाचे घरी जाऊन दिली. जशी गाय सिंहाच्या गुहेत आयतीच नेऊन द्यावी तशी तुम्ही रुक्मिणी श्रीकृष्णाला द्यायला निघालात. हे भलतेच कर्तव्यकर्म आपणास शोभा देणारे नाहीये. ज्याला आपली कन्या द्यावी, त्याचे कूळ, त्याची जात, ठावठिकाणा तरी नीट पाहायला नको का? ह्या कृष्णास ह्यातील काहीच नाही. हा नक्की कुणाचा? कृणा पासून झाला? की अयोनी संभवला? खरे काय? नी खोटे काय? काहीही समजत नाही. कोणीम्हणतो वसुदेव-देवकीचा, तर कोणी म्हणतो नंद-यशोदेचा. कोणी म्हणतो विष्णूच्या दहा अवतारातला आठवा तर कोणी म्हणतो दशअवताराा वेगळा? वेदशास्त्रादि आगमनिगमांनाही याचा खरा वर्ण, खरे वर्म, खरे स्वरुप, ह्यांचा ठावठिकाणाच सांपडला नाही. हा मनष्य की देव? ह्याचीच सर्व देवांना तुम्हा-आम्हांला भ्रांति पडली आहे. ह्याचे ठिकाणी सकळ विद्या असून त्याने बहुधा मंत्रशक्तिने त्रिभुवनास वेड लावले आहे. कपट कारस्थानात वाकबगार. मायावी कलाकौशल्यात निपुण. त्याची मायावी करणी ब्रम्हादिकांना कळली नाही. तेथे आपणास काय कळणार ? ऋषिमुनी बिचारे अष्टभोग सोडून याचे मागे लागले आहेत. स्त्री पुरुष, नर-नारी, पशु-पक्षी सर्वांनाच ह्याचा जबरदस्त वेध लागला आहे. असा हा वेधक आहे. ह्याचे कूडकुजांत्र सामर्थ्य वेगळे आहे. असा हा महाकारस्थानी आहे. ह्याचे गुपित रहस्य कुणालाच समजणार नाही. ह्याचे जातकभविष्य ब्रम्हदेवासच जाऊन विचारावे. तात्पर्य ! हे पिताश्री ! आपण माझे ऐका. पुढील अनर्थ टाळा. अन्यथा हा काळा कन्हैय्या सकळ कुलशिलास तिलांजली द्यावयास भाग पाडेल आणि अखिल विश्वास तारक जो “विश्वव्यापक मानव धर्म” तो नष्ट पावेल. व सर्वनाश ओढवेल. ह्याची जाण ठेवा."
“हे राजन् ! ह्या श्रीकृष्णाचे बालपण तर फारच रंगभरणी करुन रंगविले गेले आहे. ह्या काळ्या-निळ्या गवळ्याच्या पोराने एक साधी गौळण मेली असता पुतना राक्षसीन मारली असे उठविले गेले. दहीभाताचा कवळ घशात अडकून कावळा मेला तर म्हणे याने कागासुर मारला. एक मरतुकड्या बगळ्याची मान मोडली तर म्हणे बगासुर मारला. एक जुनाट मोडकळीस आलेला गाडा मोडला तर याने म्हणे शकटासुर मारला. ऊखळ झाडांत अडकले, त्यामुळे यमळार्जुनाची जुळी झाडे जमिनीकडे धावली, तर म्हणे यमळार्जुन उद्धरले. गोकुळातील एक वासरु मरणारच होते, ते मेले तर म्हणे याने वच्छासूर मारला. एक शिंगरु मेले तर केसियास मारले म्हणे. वणवा पेटला. आपोआप विझला, तर म्हणे याने बारा गांव अग्नि गिळीला. एक अजगर मारला, तर म्हणे अघासूर मेला. यमुनेच्या काळ्या डोहांतला एक सामान्य विरुळा मारला, तर म्हणे याने कालियामर्दन केले. वास्तविक पाहता शब्दांनी शब्द अतिशयोक्तीच्या मानवी मुसीतून ओतले गेले अन श्रीकृष्ण चरीत्राचा ढांचा-सांचा तयार झाला.”
"कंस मामांना मारले. जरासंदास आकाशात गरगरा भवडले आणि मग भीतिपोटी समुद्रात तळ ठोकला. असा हा पळपुट्या कृष्ण. त्यापेक्षा मी एक सुसल्ला देतो तो सर्वांच्या हिताचा आहे. माझा बालमित्र शिशुपाळ. दमघोष राजाचा सुपुत्र. हा राजबिंडा ३२ लक्षणांनी युक्त, सुंदर महापराक्रमी असा आहे. तो रुक्मिणीस योग्य वर आहे. शिवाय चैद्य देशातली प्रजा पिता-पुत्रांना राजकुळांसह मानदेते. इतरही राजांना ते मान्यवर आहेत. तेव्हां कृपया माझा हा प्रस्ताव आपण मान्य करावा व अनार्थापासून दुरावा मिळवावा हेच सर्व हितकर आहे.”
अशाप्रकारे रुक्मियाची ही आगपाखड थांबली एकदाची. तो काही जहरी तर काही अमृताचे बोल नकळत बोलून गेला. त्याने श्रीकृष्ण पक्षाचे खंडण करुन शिशुपाळ पक्षाची प्रतिष्ठापना केली. तर्ककुतर्काचे व कर्मकुशलतेचे लंगडे प्रदर्शन दाखविले. जणू श्रीकृष्ण ह्या सूर्याची किरणे लोप पावताच शिशुपाळासारख्या काजव्याची सूर्यासम स्थापना करुन जगास प्रकाशाचा अनोखा मार्ग दाखविण्याचे काम केले आहे. एखादा कल्पतरु मोडावा आणि तेथेधोतरा लावावा. किंबहुना दिव्यावर झडप घालून सर्वनाश करवून घेणाऱ्या पतंगाने घरच्यांवर अंधारात चांचपडायची पाळी आणावी. असा काहीतरी प्रकार स्पष्ट दिसत होता. भीमकाची नाना प्रकारे मनधरणी करण्याचा त्याचा कुटिल डाव यशस्वी होतोय का ? अशी सर्वांना शंका सतावीत होती. वडिल पुत्र म्हणून भीमकाने त्याच्या वक्तव्याला मान दिला. तोहि भिडेखातर शांतपणे. पण अमृताची चूळ भरण्याची संधि जवळ येताच हलाहलासाठी मुख पसरावे किंवा रुक्मिणीसारखी लावण्य रत्नांची माळ शिशुपाळासारख्या मर्कटाच्या गळ्यात घालण्याचा हा निंदनीय प्रकार भीमक राजा करणार तर नाही ना? ह्याच अनामिक भीतिने सभा काळवंडली होती. एखाद्याचा विनाशकाल जवळ येत चालला तर, तयास विपरीत बुद्धि- वाईट बुद्धि सुचते. तसे रुक्मियाचे हसे होऊ नये हीच सर्वांना अपेक्षा होती.
क्रमशः
भाग 01 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/001.html
भाग 02 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/002.html
भाग 03 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/003.html
भाग 04 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/004.html
भाग 05 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/005.html
भाग 06 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/006.html
भाग 07 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/007.html
भाग 08 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/008.html