भाग 004 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)

भाग 004 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)

 भाग 004 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार) 

लेखक :- कै. सद्भक्त गोपाळ देगावकर पुणे 


त्रिकाळ ज्ञानी, योगी, ऋषीमुनी मात्र श्रीकृष्ण हेच रुक्मिणीस जिंकून नेतील हे जाणून होते. रुक्मियाने कितीही गरळ ओकले, तरी त्याचा किंचीतही दुष्परिणाम ह्या तपस्वी जणांवर होणार नव्हता. इकडे रुक्मियाचा आब राखण्यासाठी भीमकाने रत्नकेसर नावाचा भांडारी बोलविला व त्यास चैद्य देशीचा दमघोष राजा याचेकडे आमंत्रण देऊन पाठविला. दमघोषराजा सुपुत्र शिशुपाळ हाच वर भीमकाने मान्य केला आहे. तरी आपण सर्व वऱ्हाडीकेची तयारी करुनच निघावे असा निरोप धाडला.

शिशुपाळास खूप आनंद झाला. दमघोषासह तो कौंडीन्यपुरास निघण्याच्या तयारीला लागला. देशोदेशीचे राजांना त्याने विवाहास चलण्याचे आमंत्रणहि पाठविले.

आता आपला व श्रीकृष्णाच्या भेटीचा अंतराय वाढत जाणार. शिशुपाळासंगे आपला विवाह होणार हे ऐकताच रुक्मिणीच्या ठिकाणी विरह ज्वर उत्पन्न झाला. तिचे मन खिन्न झाले. तिला घेरी येऊ लागली. नाना वाईट विचारांनी तिच्या कोमल मनात थैमान घातले. ती व्याकुळ झाली. तिचा विरह ज्वर कलाकलाने वाढतच राहीला. तिच्या उष्ण अंगाला थंडावा-शीतलता प्राप्त व्हावी, म्हणून तिच्या सख्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण तो विरहज्वर शांत होण्या ऐवजी अधिक उग्र स्वरुप धारण करु लागला. चंदन जल, कमल फुले आणून त्याची शितलता देण्याचा प्रयोग झाला. कर्पूरी चंदनी लेप लावला तर तो कर्पून गेला. कस्तुरी वीणा वादनाने तिचे मन शांत व्हावे तर ते तप्तायमान झाले. अखेर - अखेर विश्वकाला हीमग्रह रचण्याची आज्ञा केली. त्यांत रुक्मिणीस ठेवले. जणू हिमग्रहाचा सूर्याला भेदारा लागला की काय, कोण जाणे? कारण तो मेरु पर्वता आड लपून राहीला. तेव्हां पासून तो पूर्वाभिमुख उगवताच थरथरा कापू लागलाय तो आजपर्यंत!

हरीचंदन अन् कर्पूर कस्तुरीचा हिमग्रहांभोवती सडा घालण्यात आला. त्यावर मुक्ताफळांची रांगोळी काढण्यात आली. कल्पतरुच्या कलिका तोडून त्यांचा विझणवारा करण्यात आला. पण ह्या सर्वांचा किंचीतही सुपरिणाम रुक्मिणीचा विरहज्वर कमी करण्यास झाला नाही. उलट पक्षी तो णिाक्षणाला वाढतच राहीला. तिच्या छातीची धडधड अधिक वाढली. तिने श्रीकृष्णाचा धावा केला, “धाव गा श्रीकृष्णा अनाथ नाथा !” असे म्हणून देवाची खूप धावनी व स्तुति केली, करुणा भाकली.

त्यावेळी अचानक आकाशवाणी झाली, “ना भी ! ना भी ! वो रुक्मिणी ! वरु पावसी श्रीचक्रपाणी ! हे निभ्रांत जाण !” ह्या आकाशवाणीने मात्र रुक्मिणीस थोडेसे हायसे वाटले. ती सावधचित्त झाली. तिला थोडी प्रसन्नताहि लाभली. ती सख्यांवर मात्र रागावली, “तुम्ही हितज्ञा नसून, जणू माझ्या वैरिणी आहात. ज्यामुळे माझे प्राण जातील असेच उपाय तुम्ही करता आहात. त्या चंदनजलाने माझे अंश चोळून निघते. ही कमळांची फुले मला इंगळाप्रमाणे डसत आहेत.” 

भावकळनेने जाणले. रुक्मिणीस जो विरहज्वर झाला आहे. तो दूर करण्यासाठी एका ईश्वराचाच जप तोही त्रिदण्डी संन्याशाकडून करवून घेतला पाहिजे, असा सूज्ञ विचार तिला सापडला. त्यानंतर ज्ञान-भक्ति-वैराग्यपरिपूर्ण संन्याशी पाचारण केले. त्यांनी श्रीदत्तात्रेय प्रभूचे पूजन व स्तवन करावयास सांगितले. कारण अशाच प्रकारे अलर्कऋषि तितापेपोळले होते. ते श्रीदत्त दर्शनाने निवाले होते. अर्थात हे त्रेतायुगात घडले. ठरल्याप्रमाणे श्रीदत्तात्रेयाचे जप करतांच ते प्रगट झाले. त्यांनी रुक्मिणीस वरदान दिले, “हे देवी! तू मनात जे चिंतीले आहेस तेच तू पावशील.” तत्पश्चात श्रीप्रभूचे श्रीचरणतीर्थ रुक्मिणीस प्राशन करावयास व सर्वांगास चोळण्यास सांगितले. त्यामुळे तिचा मानसिक व शारीरिक दाह शांत झाला. इतकेच नव्हे तर तिला नवचखैतन्य नवा उत्साह प्राप्त झाला. परंतु एक वेगळीच अवस्था दुनावली. ती म्हणजे तिचे श्रीकृष्ण भेटीचे आकर्षण, प्रेमसंचारामुळे वाढीस लागले. तिला अत्यंतिक ओढ लागली प्रभू भेटीची.

भावकळनेने हे ताडले. ती म्हणाली, “हे सखि! तू सांगशील तशीच आम्ही व्यवस्था करु. तुझ्या आोप्रमाणे वागू.” 

त्यावर रुक्मिणी मन मोकळे करीत म्हणाली, “हे भावकळने व मी तुला व माझ्या मातेला तुम्हां दोघींनाच माझे गुपित सांगत आले आहे. ऐक ! मला जेणेकरुन श्रीकृष्ण भेटतील, असा उपाय सांग. त्यांच्या भेटीसाठी हा आत्मा, ही कुडी उतावीळ झाली आहे. त्यांचे दर्शनाशिवाय मी जीवंत राहूच शकणार नाही.” 

भावकळना लटक्या प्रेमाने म्हणाली, “भीमकी ! असं म्हणायचं नाही हं! मरणाच्या गप्पा मारणारे भेकड असतात. तू तर शूर आहेस. शिवाय तूच नाहीस तर आम्ही जगायचं कुणासाठी?” पुढे तोडगा काढीत भावकळना म्हणाली. “आपण तुझे राजगुरु, श्रीकृष्ण भक्त श्री सुदेवांना श्रीकृष्णास आणण्याची कामगिरी सोपवू. ते हे काम गुप्तपणे व त्वरीत करतील ह्याची मला माहिती आहे.” 

मा रुक्मिणी खुलली. डोक्यावरचे भले मोठे ओझे उतरताच माणूस सुटकेशा श्वास घेत विसावतो तसे रुक्मिणीस झाले. सुदेवांना आणले गेले. येताच त्यांनी रुक्मिणीच्या श्रीगुरु वंदनास उत्तर दिले, “देवी तुझे मनोरथ सिद्धीस जावोत.” 

सुदेवांना द्वारकेस श्रीकृष्ण महाराजांकडे विनंतीपत्र, विडा व रुक्मिणीची आंगठी देऊन पाठविण्याचे निश्चित झाले. ठरल्याप्रमाणे विनंती पत्रिका तयार केली. सोन्याच्या लेखणीने भुजपत्रावर हेम उदकांनी विनंती लिहीली गेली. निरोपाचा पाठवणीचा विडा हडपीनीने तयार केला. तो रुक्मिणीने सुदेवांना देतानाच हातात कर्पून गेला. त्यातून ज्योती निघाली. ती कापुराची आरति हाती घेऊन हृदयस्थ श्रीकृष्णास मनोभावे रुक्मिणीने ओवाळले. असे तीन वेळा घडले. रुक्मिणी हडपीनीवर कोपली. पण हा कोप योग्य नव्हता हे जाणताच सुदेव म्हणाले, “हे देवी! तुझ्या विरहामुळे विडा करपतोय. पाने तर चांगली होती. तुझ्या विरहज्वरामुळे ती करपली गेली. ह्यांत हडपीनीचा काय दोष?” एक अखेर विडा घेऊन दहा घोडेस्वारांना सेवक म्हणून बरोबर घेऊन सुदेव निघाला. जणू दशइंद्रिये व अकरावे मन श्रीकृष्ण भेटीस निघाले आहे. “चार दिवसांचे आत जर तुम्ही परत आला नाहीत तर माझे प्राण जातील.” हे रुक्मिणीचे उद्गार मनात आठवित श्रीप्रभू नामस्मरण करीत सुदेव निघाला. एका अहोरात्रात सुदेव द्वारकेस पोहचला.

सुवर्णनगरी द्वारका. रत्नखचित द्वारका. प्रकाशाची पेठ द्वारका. परब्रम्हाची वसति द्वारका. मोक्ष मंदिर द्वारका नगरी पाहून सुदेव रोम रोम सुखावला. सर्वोच कोटीचे नेत्रांचे पारणे ह्या अलौकीक भव्य दिव्य व उदात्त दर्शनाने फिटले असे सुदेव अनुभवित होता. तो स्वारांना म्हणाला, "तुम्ही सर्वजण धन्य आहात. हे द्वारकेचे महातीर्थ दर्शन तुम्हाला अनायासेलाभले!" एवढे बोलून सुदेवाने द्वारकास साष्टांग लोटांगण घालीत, प्रायश्चिताचा प्रसव मोडला, “देवाधिदेव ! सर्वेश्वरा ! परमपुरुषा परमेश्वरा ! मी अनंत जन्मी परान्न-परपाणी घेत आलो. धर्मनिष्ठ वाचा भ्रष्ट असा मी, देवा मला क्षमा कर. माझे अनंत अपराध पोटी घालून माझेवर दया धरावी. आपले कृपाछत्र असू द्यावे.” 

हातात घोडे घेऊन ते सर्वजण द्वारका पाहू लागले. जेथे देवाचे चरणस्पर्श झाले आहेत ती भूमी अवघी पुण्यवान पवित्र बनली आहे. तेथे सर्वतीर्थ आहेत. तेव्हां पायी चालणे हे भक्तांचे कर्तव्य आहे. ह्या विचारानिशी तो अकरा जणांचा काफीला निघाला होता द्वारकेभोवती सागर जण निंबलोण करीत होता. ३६ योजनांची ही द्वारावतीनगरी इथे वसंत सहपरिवारे बारमाही निवासास होता. रिद्धि-सिद्धी घरोघरी पाणी भरीत होत्या. अन्नपूर्णासह लक्ष्मी इथेच राहात असाव्यात असे वाटत होते. द्वारके सभोवती आठहि दिशांना वनउपवनांची सुंदर पर्यावरणीय व्यवस्था होती. त्यांना शृंगारवने ही नावे होती.

 पाण्यासाठी सुंदर सरोवरे होती. जिवंत ऊसासे होते. सोमकांताचे पाटाने पाणी घरोघरी फिरविले होते. पाणी काढण्यासाठी रहाटांची आवश्यकताच नव्हती. पाणी धरण्यासाठी, कामाठी-पाटकऱ्यांचीही गरज नव्हती. पाणी घरोघरी अष्टौप्रहर चालत येत होते. सरोवरांतील कमलपुष्पांभोवती भ्रमरांचे गुंजारव चालल्याचे दिसत होते. जणू काही ते भगवंताचे सुरावटीत गायन करीत असावेत. द्वारकानगरीच्या अष्टदिशांना, अष्टदिकपाळ व आठ प्रकारची गणेशभुवने होती. त्यांना लागूनच अखंड चालणारी अन्नछत्रे होती. पांथस्थास तिथे इच्छाभोजनांसह अष्टभोगांची सोय होती. भव्य सागराला लागूनच गोमती नदीच्या तीरांवर भव्य महाप्रसादांची अतिशय सुंदर रचना केल्याचे दिसत होते. द्वारका सम्पूर्ण डोळे दिपावणारी होती.

द्वारकेत सर्वांना येण्याची मुक्त परवानगी होती. कोणताही प्रवेशकर न घेता येणाऱ्यांना पसायदान लाभत होते. जो जे वांछील, ते तो मिळवित असे. ज्याचा जैसा भाव। त्याला 'तो' भाव पावत होता. मन तृप्त होत होते. ह्या द्वारकेत देवद्विज विप्र ऋषी मुनी, योगी, महायोगी, सामान्य-असामान्य, चतुर्वर्णीयांना मुक्त विना अटकाव प्रवेश दिला जात होता. द्वारकेत कुणीही दु:खी, व्याधीग्रस्त, चिंताग्रस्त नव्हता. प्रत्येकजण सुखी-आनंदी होता. कारण इथेच सत्य स्वरुपात विश्वचालक चिंतामनी मनुष्य वेषाची बुंथि घालून अवतरला होता. द्वारकाधिश चक्रवर्ति प्रगट झाला होता.

मुख्य बाजार पेठेतून जात असताना सुदेवास वारांगणा म्हणू लागल्या, “अहो, विप्रदेव. आपण आमचे भोगभुवन सोडून पुढे कुठे जात आहात ? या, इकडे या.” वेश्यांचे ते लाघवी बोल ऐकताच भूमीकडे नजर वळवीत सुदेवाने मौन धारण केले. मनात श्रीकृष्ण नाम जप करीत, तो शांतपणे चालला होता. आपण जर ह्या कर्मरहाटीच्या दलदलीत, भोगभुवनात अडकलो तर तिकडे श्रीप्रभू भेटीस अंतराय पडेल. म्हणून तो ह्या रजो भूमिकेवरुन कामतरुचे हे काटे चुकवित निघाला होता. हा मोहपाश तोडीत तो मार्गस्थ झाला.

आता लवकरच यादवांची सभा लागेल, ह्या विचाराने तो झापाझप पावले टाकीत निघाला होता. यादवांची सभा घनदाट भरली होती. ५६ कोटीयादव सैन्य, देवादिक पढते, वक्ते, पुराणिक, वेदवीद, विद्वांस, वार्तिक-हेर, त्रिलोकातूनआलेले सर्व कलावंत, गायक, नर्तक, वादक, फुलमाळी, बडवे, चवरढाळक, पानांचे विडे देणारे हडपी, इ. अबालवृद्ध संसह ही सभा प्रचंड प्रमाणात भरली होती. अध्यक्षस्थानी अर्थात श्रीकृष्ण महाराज होते. त्यांचे उजव्या हातास अर्जुन, उद्धव, अग्रसेन, वसुदेव, नंद, अक्रूर इ. बसले होते. क्षत्रिय शुर वीर, धिप्पाड देहयष्टी, रक्तांबर डोळे, उफराटे रोम, मुद्गलावर हात, सहस्त्रनवनागबळ असलेले क्षत्रिय म्हणजे खरे लढवय्ये वाटत होते. क्षत्रिय यादव सैन्यात रणविभांड, रणराक्षेस, रणरंगधीर, रणग्रासे, रणबागुल, रणभयभीस, रणपिसे, रणदिव्ये, रणदावांनळ, रणसिंह, रणशार्दुल, रणमहाजाल, रणकोल्हाळ अशा आडनावाचे वीर होते. राजांपैकी राजे ठोसर, हातमल, राजे तोडरमल, राजे आडसूळ, राजे हेसल, राजे रणबंबाळ, जगझडप, जगकृदांत, जगजोहरे, जगजित, जगधडक, जगधूमकेतू, जमजमजूत, जगदळे, रायेसळे, जगसौरे, जगजंवजाळे, जगआमुले, जगव्याळे, जगझडप इ. आडनावांचे वीर देवाभोवती विराजमान झाले होते.

ब्रम्हादिक सुरवरांसह रुषि, मुनी, योगी, महायोगी, महातपस्वी तसेच साती द्विपांवरचे राजे, ३६ हजार इ. राजे स्थानापन्न झाले होते. एवढी मोठी प्रचंड राज महासभा सुदेव प्रथमच पाहात होता. आणि सुदेवाचे लक्ष मधोमध बसलेल्या श्रीकृष्णाकडे गेले. देवाच्या नीलवर्णीय दिव्य, दैवी तेजाने सर्व सभा उजळून निघाली होती. हा सर्व दैवी प्रकार पाहून सुदेव स्वत:ला जन्मास येऊन धन्य झालो. आज खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फिटले. खरोखरीच रुक्मिणी महाभाग्याची. ह्या द्वारकेची ती अनभिषीक्त सम्राज्ञी होणार होती. तिच्यामुळेच आज आपण हे देव, त्यांची वैभवसंपन्न नगरी पाहू शकलो असे सुदेवास सारखे वाटत होते.


त्याने आणलेले अनद्यरत्नांनी वेढलेले श्रीफळ देवास वाहीले. गंध, अक्षता, पुष्पांजली वाहून साष्टांग लोटांगणपूर्ण दण्डवते घातली. भगवान श्रीकृष्ण महाराजांनी त्यास उठविले. दिव्य सिंहासनी बसविले व त्याची अनय॑रत्नांनी पूजा केली. सुदेव सखावला. कृतकृत्य झाला. आपण कोणत्या कामासाठी आलो आहे हेच तो विसरला. सुदेवास सावधचित्त करण्यासाठी देवाने उपाय केला. सर्व सभाजनांना पाठविण्याचे सभा बरखस्तीचे विडे दिले. सर्व राजे मनात म्हणत होते की, आता आलेल्या विप्रास काहीतरी खास उपहार मिळणार असेल.

उद्धवाने सुदेवाचा परिचय करुन दिला, “हा भीमकन्येचा राजगुरू सुदेव काही गुप्त समाचार घेऊन आला आहे. शिशुपाळाशी रुक्मिणीचे स्वयंवर होणार आहे.” इकडेसुदेवाचा परिचय होतानाच तिकडे सर्वसभा लोपली. देवास आरोगणा झाली. सहपांति, देवाचे शेजारी बसून, सुदेवास भोजन मिळाले. देवाचे हातीचा महाप्रसाद मिळाला. सुदेव अपूर्व भाग्याचा. त्या प्रसाद सेवनाने त्याचा श्रमपरिहार, पीडाहरण झाले. नंतर पानाचा विडा चघळीत देव सुदेवास घेऊन एकांत स्थळी चित्रशाळेत प्रवेशले. त्या संकेतस्थळी म्हणजे चित्रशाळेत इतरांना येण्यास मज्जाव होता.

सुदेवास देवाने विचारले, “आपण कोणत्या कामासाठी आला आहात?” वास्तविक पाहता देवास काही जाणणे असे? ते सर्वज्ञ सर्व जाणतात. पण मनुष्यवेषास मान देण्यासाठी विचारणे भाग पडते. सुदेव पुढे सांगू लागला, “रुक्मिणीचे स्वयंवर शिशुपाळाशी होऊ घातले आहे. तिने तुम्हाला वरले आहे. चार दिवसांचे आत आपण तिकडे न आल्यास रुक्मिणी देहत्यागास सिद्ध होईल. तद्वतच आपल्या दर्शनाशिवाय अन्नपाणी ग्रहण न करण्याचा तिचा संकल्प महाभयंकर आहे. मला पाठवणीचा विडा देताना तो तीनदा हातात करपला. त्यातून कर्पूरज्योति निघाली. तिने आपणास ओवाळिले. पत्रिका व मुद्रीका आपणास दिली आहे.” सुदेवाने थोडक्यात इतिवृत्तांत कथन केला.

क्रमशः 

पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

भाग 01 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/001.html


भाग 02 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/002.html



भाग 03 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/003.html


भाग 04 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/004.html



भाग 05 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/005.html


भाग 06 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/006.html


भाग 07 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/007.html



भाग 08 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/008.html







Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post