श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत
(रुक्मिणी स्वयंवर - कथासार)
विदर्भातील कौंडीण्यपूर नगर. राजा भीमक, राणी सुधामति ह्यांना सहा मुले झाली. पांच पुत्र व सहावी कन्या.
ज्येष्ठ पुत्राचे नांव रुक्मि तर कन्येचे नांव रुक्मिनी, ही रुक्मिनी म्हणजे सौंदर्य व सद्णांची जोडवात. त्यामुळे तिचे बालपण फारच सुखात, चैनीत पार पडले. राजकुमारांप्रमाणे ती शूर, वीर व कला क्रीडा यांत निपुण व्हावी, म्हणून सुदेव नांवाचे तिला राजगुरु लाभले. ते श्रीकृष्णभक्त होते. भीमक राजाही स्वत: श्रीकृष्णभक्त होते.
रुक्मिनीचे सौंदर्य अतिशय नाजूक असल्यामुळे, तिला पाचशे परिचारीकांच्या देखरेखीखाली वाढविले गेले. एखाद्या सुंदर सुवासिक नाजूक फुलास तितकेच नाजूक हळूवार हातांनी जपावे कुरवाळावे, तसे रुक्मिणीस जपले जात होते.
भीमक राजा चक्रवर्ती होते. धार्मिक, नितिमंत, शूरवीर म्हणून सुप्रसिद्ध होते. सुखाचे बाबतीत सांगावयाचे झाल्यास, रिद्धी-सिद्धी ह्या सर्वशक्ति परीवारांसह भीमकाचे राज्यात मुक्कामास होत्या. त्यामुळे भीमकाचे अवघे राज्य म्हणजे सर्वसुखांची पेठच होते.यथा राज्य तथा प्रजा ह्या उक्तीप्रमाणे सत्य, न्याय, नीति, धर्मवान अशीच प्रजा राजास लाभली होती. उभय वर्गास आनंदाची प्राप्ती झाली होती. रुक्मिणीचे पूर्व आयुष्य अनेक अलौकिक घटनांनी भरलेले होते. ते आपण पाहू या.
अनेक पौराणिक ग्रंथांत रुक्मिीणी म्हणजे शेषशायी नारायणाची लक्ष्मी होती असे सांगितले आहे. तो लक्ष्मीचाच अवतार मानला आहे. परंतु लक्ष्मीच्या देहांत फळ भोगावयास गेलेल्या जीवात्म्याने श्रीकृष्ण पत्नी व्हावे हा अधिकार जोडून ठेवला होता. हे रहस्य ह्या रुक्मिनी स्वयंवर ग्रंथांत आढळते. ते असे - ''एकदा शेषशायी नारायणांचे पाय चेपण्याचे काम त्यांची पत्नी लक्ष्मी करीत होती. पाय चेपता-चेपता नारायणांनी लक्ष्मीकडे पाहून स्मित हास्य केले. त्यास्मित हास्यात उपेक्षा मिसळल्याचे दिसत होते.
'स्वामी ! आपण कोणत्या कारणासाठी स्मितहास्य केले? माझे काही चुकले तर नाही ना?'' लक्ष्मी म्हणाली.
त्यावर शेषशायी नारायणांनी हेतू टाळण्याचे उद्देशाने उडवाउडवीचे सहज उत्तर दिले, "अगं !काही नाही. सहज हसलो."
"कारणोंद्भवं कार्याः ." "कारणाशिवाय कार्य घडत नाही. आपण हसलात, ह्या कार्याचे कोणते ना कोणते कारण असलेच पाहिजे. ' लक्ष्मी.
"बाई गं ! तसं काही विशेष नाही." नारायण.
"म्हणजेच विशेष नसेल, पण कारण तरी असेल ना!" लक्ष्मीने प्रश्नाचा पिच्छांच पुरवायचा ठरविले असावे. कारण तिने अगदी बारकाईने विचार केला असता, तिच्या एक गोष्ट ध्यानात आली. जो कारण नसतांना हसतो तो वेडा असतो. म्हणजेच वेड्याला हसण्यासाठी कारणाची आवश्यकता नसते. तेव्हां स्वामी का हसले ते 'कारण' आपणास माहिती होईपर्यंत आपण पाठपुरावा सोडायचाच नाही.
स्त्रीहट्ट, राजहट्ट, बालहट्ट हे तीनही हट्ट असे आहेत की, ते पुरे करावेच लागतात. त्याशिवाय काही खरे नसते. लक्ष्मीच्या स्त्रीहट्टापुढे नारायण नमले. एक दीर्घ सुस्कारा सोडीत म्हणाले, ''ऐक ! द्वापार युग चालू आहे. गोकुळामध्ये साक्षात् परब्रह्म परमेश्वराचा उभय दृष्यावतार प्रगट झाला आहे. सावळेरुपांत नीलवर्णाची दैवी झाक प्रभा असलेला, हा ३२ लक्षणी परीपूर्ण अवतार आहे ! तया सौंदर्यास असावी सीमा ! मग तयास द्यावी उपमा ! त्याचे नांव श्रीकृष्ण चक्रवर्ती असून, त्यांच्या एका नखाची सरी माझ्या सर्वांगास नाही. इतके ते अनुपम्य सौंदर्याने लावण्याने नटले आहेत ! '' शेषशायी नारायणांचा खुलासा संपला.
लक्ष्मीने 'श्रीकृष्ण महाराजांचे नांव ऐकले खरे, पण त्या नावातच प्रचंड आकर्षण शक्ति आहे. त्यामळे ती तन-मनाने वेधून गेली. शेषशायी म्हणजे नरामध्ये नारायण किंवा नऊ कोट नारायण असे ज्याचे वर्णन केले जाते. ते इतके श्रेष्ठ-सुंदर असूनहि, त्यांच्यापेक्षा अनंत कोटी पट सौंदर्य धारण केलेले श्रीकृष्ण महाराज अवतरले आहेत. मग त्यांना आपण इथेच पाहू या. तसा आग्रह धरीत, लक्ष्मी म्हणाली, ''असे जर असेल तर मला ते पाहायचे आहेत. ते सुद्धा इथेच ! ह्या ठिकाणी !! व लवकरात लवकर !!!''
"ठीक आहे. आपले मनोरथ पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु!" शेषशायी नारायणांनी कशीबशी लक्ष्मीची समजूत काढीत उत्तर दिले. त्याने लक्ष्मीच्या अशांत मनांत उठलेले वादळ शांत झाले. पुढे काय घडणार? श्रीकृष्ण महाराज इथे कसे येणार? शेषशायीनारायण कोणता खेळ खेळून, डाव मांडून हे पूर्ण करणार? ते आपण पाहूया....!
...आणि खरोखरीच पुढे जे घडले ते अघटितच ! 'न भूतो न भविष्यति!' अर्थात हे जाणून घेण्यासाठी आपण प्रथम हस्तीनापुरास श्रीकृष्ण सभेत जाऊया.
सूर्योदयानंतर दोन घटकांनी, पांडवांच्या राज्यसभेत श्रीकृष्ण महाराजांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली. पांचही पांडव. सहावी द्रौपदी. यादवांसह उपस्थित पांडव पक्षातले कुरुक्षेत्रातले वीर. महाभारताचे महायुद्ध हाच विषय सभेत चर्चेला आलेला. चर्चा खूपच रंगत चालली होती. अर्थात चर्चा कसली ती, मनमोकळ्या गप्पाच त्या. सर्वांना बोलण्याचा अधिकार दिल्याने, प्रत्येकजण लोकशाही पद्धतीने आपले मत दिलखुलासपणे, प्रसंगी गंमतशीर कोपरखळ्यांनी वा टीकात्मक अस्त्र सोडीत, मांडीत होता. त्यामुळे सभेस खऱ्या अर्थाने रंगत येत चालली होती. तेवढ्यांत - तेवढ्यांत सभेच्या महाद्वारांत एक ब्राह्मण गृहस्थ नामें 'संदिपनी व्याळ' (व्यास) हस्तिनापूर रहिवासी आला व मोठमोठ्याने धर्मराजाच्या अर्जुनाच्या पराक्रमावर व पांडवांच्या राजकारभारावर काही बाही टीका, स्वर शिव्याशाप देत मोठमोठ्याने बडबडत होता
"धिक्कार ! धिक्कार असो या यादवांच्या राजवटीचा !कसले हे राजे !कसला!
श्रीकृष्णाच्या सुदर्शनाचा प्रताप !कसले ह्या बलरामाचे हे अधर्मी राज्य ! राजे अधर्मरत आहेत ! पापी आहेत.''
तो खूप चिडला होता. त्याचे ओरडणे ऐकतांच श्रीकृष्ण महाराज अजुनाला अरे पार्था ! पाहा बरे कोण ओरडतोय?" वास्तविक पाहतां श्रीकृष्ण महाराजाना सर्व ज्ञात होते पण मनुष्य रूपाला मान देऊन अवतार धारण केल्यामुळे जणू काही माहितीच नाही अशा अविर्भावात सहजगत्या त्यांनी अर्जुनाला सुचविले. अर्जुन देवांची आज्ञा होतांच तो महाद्वाराकडे धावला व आलेल्या संदिपनी व्याळांना म्हणाला,
''काका! तुम्ही का ओरडताय ? कोणते असे तुम्हांवर संकट कोसळलेय महणून एव्हढा आकांडतांडव करुन यादव राजवटीच्या नांवाने खडी फोडताय ?''
संदिपनी व्याळ थोडेसे नरमाईच्या स्वरांत म्हणाले, ''अरे वीरा ! धनुर्धरा ! आजपर्यंत कनक व कांता ह्यांच्या चोऱ्या व्हायच्या. पण जन्मजात बालकांच्या चोऱ्या त्याही दिवसाढवळ्या होताहेत. हे म्हणजे खूपच वरताण झाले हं ! अरे ! हे यादव आमचे राजे. सत्य, न्याय, नीतिधर्माने वागणारे, म्हणून यादवांचा लौकिक. पण श्रीकृष्णाचे बलरामाचे प्रजेकडे संरक्षण शांतता ह्या दृष्टिकोनातून लक्षच नाही. अरे! ज्याचे जळते त्यालाच कळते. इतरांना काय त्याचे? मला माझी चारही मुले चोरीस गेलेली, अपत्ये सहीसलामत मिळाली पाहिजेत. चोरास पकडून, त्यास कडक शासनहि घडले पाहिजे, म्हणजे पुन्हा असे घडले नाही पाहीजे. पण हे श्रीकृष्ण भगवान मला विचारीत नाहीत. हा बलराम माझ्या गा-हाण्याकडे लक्ष देत नाही. तू काय विचारतोयस? कोण तू ?''
काकांचे बोलणे ऐकून अर्जुनातील अहंकार आणि क्षात्रतेज जागे झाले. तो म्हणाला, "काका ! मी मधला पांडव. गांडीव धनुष्यधारी अर्जुन ! धनंजय म्हणतात मला . पांचव्या गर्भाचे प्रसूतिपूर्वी तुम्ही मला भेटा. तुमची चारहि मुले व हे पाचवे सहीसलामत तुम्हास आणून देईन. चोरास पकडीन. शासन करीन. जर मी चोर पकडावयास असमर्थ ठरलो, तर घ्या हे वचन - तुमची मुले परत आणीन. जिवंत सहीसलामत. चोरासहि पकडीन. अन्यथा मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. फक्त तुम्ही एक करा पत्नीस पाचव्या गर्भसंभूतीस ९ महिने ९ दिवस झाले, तिला प्रसूति वेदना होऊ लागल्या की, लगेच मला बोलवा. मी बाण अभिमंत्रून सहस्त्रावधी बाणांची उभी आडवी जाळी तयार करुन बाहेर पहाऱ्यावर बसेन. मुंगीलाही आंत जाता येणार नाही, अशी बारीक जाळी अवघड तटबंदीवत वज्रानेही न तुटणारी तयार करीन. मग पाहू या, कोणता चोर घरांत शिरतोय ते!" - अर्जुनाच्या संपूर्ण खुलाशाने दिलेल्या क्षत्रियोचीत प्रतिज्ञेने, काकांच्या रागाचा पारा खाली आला. ते म्हणाले, "ठीक आहे. पाहू या पुढे काय घडतेय ते. आलिया भोगासी असावे सादर।'' असे पुटपुटत संदिपनी काका मार्गस्थ झाले.
पुढे व्हायचे तेच झाले. अर्जुनाची प्रतिज्ञा भंगली. दिलेले वचन मोडले. अर्जुनाची तटबंदी दुभंगली. कारण पाचवी गर्भसंभूति संपली. प्रसूति काल आला. आतां केव्हाही प्रसूति वेदनांसह काकी मोकळ्या 'होणार' हे पाहातच कपडे करुन अर्जुनाकडे सांगावा देण्यास निघालेले काका, काकींच्या आक्रोशाने पत्नीकडे धावले. पत्नी आकांडतांडव करीत रडतरडत म्हणाली, "अहो, असे बघताय काय ? दळभद्र्यासारखे डोळे विस्फारुन आतापर्यंत चार वेळा किमान पुत्रमुख तरी पाहण्याचे, एक दिवस का होईना भाग्य लाभले. पण आता मात्र चोराची हद्द झाली हो ! माझ्या पोटी वाढणारा पाचवा गर्भगोळा नऊ महिन्यांचा गोळा, पोटातल्या पोटांतून नकळत कसा काय नेला ? हे एका देवासचे ठाऊक!"
"आपण थोडे शांत व्हा. आम्ही अर्जुनाकडे जात आहोत. अंमळशाने परत येऊन आपणास तपशीलवार माहिती देऊ. पिता म्हणून माझेही काही कर्तव्य मला पार पाडू द्या."
काका अर्जुनाकडे गेले. आणि शोकसप्तप्त स्वरांनी बोलू लागले. 'जळो अर्जुना तुझी प्रतिज्ञा ! जळो तुझे गांडीवधनुष्य ! जळो तुझे त्रियपण ! अरे आतापर्यंत निदान पुत्रमुख तरी पाहात होतो. या वेळेला तेही नाही. हताश अर्जुन पुसता झाला, "काका!काय झालंय? काही सांगाल काय ?'' एकट्या अर्जुनाला एकांतात नेऊन घडलेला सर्व तपशील घटनांचा क्रम सांगितला. अर्जुनाने विचार केला. चोर कुणीतरी मायावी अथवा दैवी अग आपण त्यास पकडू शकलो नाही. 'चला पाहिले मरण मी आपुल्याच डोळा' अग्रिीकांना आपल्या जीवनाची सांगता असेल, तर त्याला देव तरी काय करणार ? संपले आपर आयुर्मान. 'काका मी चोरास पकडण्यास असमर्थ ठरलो. माझ्या आयुष्यातले हे पहिले अन् अखेरचे अपयश. मी अग्निकाष्ठ गोळा करुन आणतो. तुम्ही होम हर्विद्रव्याची व्यवस्था करा." इतके निराशपूर्ण बोलून अर्जुन वनात गेला. जेवढी चंदनाची झाडे तोडता आली तेवढी तोडली. घराएवढी लाकडांची रास उर्फ सरण रचले. काकांनी समिधांसह हवीर्दव्य आणले. अग्नि प्रज्वलित केला. वेदमंत्रांचे अग्निकाष्ठ संदर्भाचे श्लोक म्हटले. अर्जुनाकरवी अग्नि पूजन हर्विद्रव्ये वाहीले. तांब्यात पाणी घेऊन, अर्जुनास तीन प्रदक्षिणा घालण्यास सांगितले. पहिली प्रदक्षिणा, दुसरी प्रदक्षिणा पूर्ण होताच त्याच दिशेने ब्राह्मण वेषधारी श्रीकृष्णाचा रथ येत असल्याचे उभयतांनी पाहीले. काकांनी अर्जुनास थांबविले. रथआला. गडबडीने घाईघाईने ब्राह्मण वेषातले श्रीकृष्ण महाराज म्हणाले,
"हे काय काका ! हा एव्हढा मोठा अग्नि की निमित्ते आणि हा धनुर्धर पार्थ अग्निभोवती प्रदक्षिणा का घालतोय? काही सांगितले तर बरे होईल?''
"माझ्या पाच जन्मजात मुलांच्या चोऱ्या झाल्या. चोरास व मुलांना आणून देईन. नाहीतर अग्निकाष्ठ भक्षण करीन ही अर्जुनाची प्रतिज्ञा व्यर्थ गेली. म्हणून तो अग्निकाष्ठ भक्षण करतोय.'' काकांचा खुलासा.
ऐकून श्रीकृष्ण देव हसले म्हणाले, "साक्षी नसता व्यर्थ सर्वही । ऐसे वेद बोलिले । तुम्हां उभयतांचा हा करार झाला. त्यास साक्षी म्हणून तिसरा कुणी माणूस आहे का? नसेल तर तो करारच होऊ शकत नाही अशी वेदश्रुति सांगते. बरे असो. तीन प्रदक्षिणापैकी किती झाल्या?"
काका व अर्जुन दोघेही एकाच सुरांत वदले, ''दोन प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आहेत."
तात्काळ देवाने तोडगा काढीत काकांना सांगितले, ''काका, तिसरी प्रदक्षिणा आम्ही स्थांतून अग्निभोवती घातली तर चालेल ना?''
काका झटदिशी म्हणाले, ''हो चालेल.''
भक्तरक्षणासाठी धावून आलेल्या ब्राम्हणवेषधारी माधवाने अर्जुनास डोळा मारला. अर्जुन काय ते समजला. न मे भक्त: प्रणश्याति । ह्या भगवत उक्तीनुसार परमेश्वराचा सच्चा भक्त कधीही नाश (अपमृत्यू) पावत नाही. इथे अर्जुन जर अग्निकाष्ठात स्वतःच्या जिवित्वाची हानी करुन घेत होता, तर त्याचे हातून भावी काळात काही महत्त्वाचे कार्यक्रम करवून घ्यायचे होते ते राहीले असते. शिवाय सृष्टी व्यवस्थेस बाधा आली असतावता कोलमडली असती. म्हणूनच भगवंत धावत आले. अर्जुनास खुणवित म्हणाल, ! माझे उजव्या हाताचे तर्जनी बोट पकड. डोळे मीट. मी म्हटल्यावर उघड..
तसरा प्रदक्षिणा घालण्याचे निमित्ताने देवाने रथ चाल केला. वारा प्रकारचा असा आवाज करीत त्या पाच घोड्यांना उचःश्रवा जातीचे श्यामकर्ण घोड्यांना आज्ञा देताच ते आकाश मार्गाने उडू लागले.
इकडे काका अचम्बीत नजरेने रथाकडे पाहात, स्तंभासारखे उभे राहीले. आपण आता काकांना इथेच सोडू अन भगवान व पार्थासंगे रथारुढ होऊया. आकाशमार्गे निघालेला रथ मेरु पर्वतशिखरी पठारावर स्थिरावला. असे म्हणतात की इथून स्वर्गाला जायची खास व्यवस्था होती.
"डोळे उघड. पादत्राणे काढ. पुन्हा माझे तर्जनी बोट पकड. नीटपणे नेत्र झाक. सांगेन तेव्हां उघड." भगवंत.
देवाचे आज्ञोप्रमाणे वागणाऱ्या आज्ञाधारक अर्जुनाने देवेच्छाप्रमाणे सर्व केले. 'आता डोळे उघड' भगवंत. स्वर्गाचे महाद्वारात पोचले. महाद्वारात प्रवेश करण्यापूर्वी तीन पायऱ्या चढाव्या लागतात. देव म्हणाले, ''पार्था ! ह्या तिसऱ्या पायरीस स्पर्श करु नकोस. एकदम दुसरी व मग पहिली असे कर.''
प्रत्येक प्रश्नास का ? का ? असे लावणाऱ्या अर्जुनाने श्रीप्रभूस विचारले, "पण का? पाय नाही लावायचा ?"
देवांनी खुलासा केला तेम्हणाले, ''सख्या अर्जुना !ह्या तिसर्या पायरीत तुझे पिताश्री आहेत. स्वर्गप्राप्ती इच्छीली तर त्यासाठी १०० यज्ञ करावे लागतात. तरच मृत्यूनंतर स्वर्ग फल प्राप्ती होते. हा द्वापारीचा देवता बहिर्याग आहे. त्यानुसार तुझे पिताश्री पंडु राजे यांनी ९९ यज्ञ केले व त्यांचे आयुष्यमान संपले. त्यांचे हातून १ यज्ञ करावयाचा राहून गेला आहे. त्या यज्ञाचे नाव 'राजसूय यज्ञ'. आपण खाली गेल्यावर आपला पूर्वनियोजित कार्यक्रम संपला की, यज्ञाचे मागे लाग. तूर्तास तू वच दे की, हा राजसूय यज्ञ पूर्ण करीन. असे केले तरच पंडुराजे स्वर्गात सुखफळाला जातील."
"हे घे वचन.'
अर्जुनाचे वचन मिळताच दोघे स्वर्गाचे महाद्वारात पोहचले देखील. एव्हाना द्वारपालांनी इंद्र-इंद्रायनी, आठ अप्सरांसह ३३ कोटी देवांना श्रीकृष्ण महाराज येत असल्याचे जाणवताच सर्वजण श्रीकृष्ण महाराजांच्या स्वागतास सामोरे आले..
''श्रीगोपालकृष्ण महाराज की जय!''
'पंडुपुत्र धनुर्धारी अर्जुनाचा विजय असो !'' घोषणांच्या गर्जनांनी स्वर्गभुवन दणाणून गेले. क्षणार्धात विश्वकाने श्रीप्रभू पूजेकरिता नऊ पायऱ्यांचे दिव्य रत्नखचित सुवर्णाचे सिंहासन रचले. अर्जुनासाठीही दिव्यासन रचले. हा सर्वप्रकार पाहून परमेश्वराच्या श्रेष्ठत्वाचा अलौकिकतेचा अनंत ब्रम्हांडनायक पदाचा अर्जुनास चालता बोलता प्रत्यक्ष अनुभव येत होता. तो आवाक् होऊन गांगरलेल्या अवस्थेनं नजरेने हे सारे पाहात होता.
स्वर्गात एकंदर २१ पुऱ्या आहेत. पैकी २० व्या पुरीत यमपुरी आहे. यमराज, त्याची पत्नी यमी. चित्रगुप्त यमदूत इ. यमपरिवार सर्वांवर यमाचे कडक नियंत्रण होते. यमपुरी म्हणजे नरकयातना भोगावयाचे खास ठिकाण. असिपत्र. कुंभीपाक. खैराचे इंगळ. लोहाची पुतळी. इ. अनेक प्रकारचे नरक तिथे भोगविले जातात. स्वर्ग ही सुखोपभोगाची तसेच दु:खोपभोगाचीही जागा आहे असे दिसते.
असो ! श्रीकृष्ण महाराज स्वर्गामध्ये आले असल्याचे समजताच अवघी यमपुरी यमासह ओस पडली. श्रीकृष्ण महाराजांचे अपूर्व सौंदर्य जवळून पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. परिणाम असा झाला की, नरक यातना भोगणाऱ्या जीवांना यमदूतांचे फटके, भाल्याची टोचणी, मुदगलांचे तडाखे इ. यातनांपासून क्षणैक सुटका मिळाली. असा ईश्वरी संकेत असावा अशी एक विचारसरणी मनाला स्पर्श करुन जाते.
स्वर्गातला भव्य आदर सत्कार स्वीकारुन भगवान स्वगचि पलिकडे असलेल्या कैलास, वैकुंठाकडे मार्गस्थ झाले. ब्रम्ह, विष्णू, महादेवांचा ९ कोटी परिवार त्यांचेक स्वागत समारंभाचा कार्यभाग उरकून भगवान अर्जुनासह क्षीराब्धीला पोहचले।
क्षीराब्धी म्हणजे दुधाचा समुद्र. पण हे गावाचे नांव क्षीराब्धी आहे. तेथे दुधाचा वगैरे काहीही समद्रासारखा प्रकार नाही. शेषशायी म्हणजे शेषाकारशय्या असलेली जागा खरोखरीच्या शेषावर ? लक्ष्मीपती नारायण पहुडले आहेत असे नव्हे. क्षीराब्धीच्या महाद्वारात भगवान येताच द्वारपालांनी शेषशायी नारायणांना वर्दी दिली. लक्ष्मीसह ते भगवंताच्या भेटीस सामोरे आले. श्रीचरणावर माथा टेकविला. डोक्यावरचे मुगूट काढून, लक्ष्मीनारायणांनी मोकळ्या केसांनी भगवान श्रीकृष्णाचे श्रीचरणाची धूळ झटकली.
श्रीकृष्ण महाराजांचे प्रवेशाने अवघे क्षीराब्धी भुवन उजळून निघाले. नीलवर्णीय दिव्य प्रभेने क्षीराब्धी भारावून गेली. लक्ष्मी तर आवाक् होऊन श्रीकृष्णाकडे तन मनाने वेधन गेली. 'त्यांच्या नखाची सरी माझे सर्वांगास नाही' हे नारायण म्हणाले होते, ते खरे आहे. लक्ष्मी नारायणांनी चांदीची थाळी व सुवर्णाची झारी घेऊन भगवंताचे श्रीचरण प्रक्षालन केले. भगवंताचे नीलवर्णी कुंकुमसम श्रीचरण कमल अतिशय कोमल सुंदर सतेज कांती नितळ त्वचा असल्याचे लक्ष्मी पाहात होती. इतकेच नव्हे तर ती स्वत:ची प्रतिमा श्रीचरणात दर्पणवत न्याहाळीत होती. इतके ते सहजसुंदर दिसत होते. ज्या अवयवांवर दृष्टी पडत होती. तिथून ती हालत नव्हती. इतका तो अवयव अपूर्वसौंदर्याने राजस तेजाने, दिव्य प्रभेने दैदिप्यमान दिसत होता.
-जीवांना वेध परमेश्वरच देतात. मग तो जीवात्मा कोणत्याही देही असो. स्त्री-पुरुश, पशुपक्षी, जलचर, वनचर, भूचर त्यांना वेध देण्याचे कार्य परमेश्वरच करतात. जो वेध देतो तो काढूनही घेऊ शकतो. भगवान श्रीकृष्णांनी लक्ष्मीला असाच वेध दिला होता व तो काढून घेताच ती भानावर आली. अखेर देव नऊ पायांच्या दिव्य सिंहासनावर आरुढ झाले. षोड्षोपचारे सुगंधी द्रव्यांनी, दिव्य पुष्पांजलींनी देवाचे पूजन झाले. फलाहार, दुग्धाहारदेऊन श्रमपरिहार करण्यात आला. लक्ष्मीनारायण प्रायश्चिताचे साष्टांग दंडवत घालून देवास विनंत कंदर होऊन विनवू लागले. "देवाधिदेवा! परब्रह्मा ! परमेश्वरा ! आपणास इथवर आणण्याचा आम्ही केलेला महतप्रयास म्हणजे अक्षम्य अपराध आहे. ह्या लक्ष्मीच्या स्त्रीहट्टामुळे मला हे सर्व करणे भाग पडले. क्षमा असावा देवा. संदिपनी व्याळ यांची पाचही बालके इथे सुखात आहेत. त्यांची चोरी करुन मी आपला फार मोठा अपराध केला आहे. आपण दयाळू अंत:करणाने मला क्षमा करावी.' असे म्हणत शेषशायी नारायण व लक्ष्मी उभयता गहिवरले.
ते पाहून तातडीने श्रीकृष्ण महाराज त्यांना उठवून क्षेमलिंगन देत म्हणाले, "शेषशायी नारायणा ! क्षमा कसली मागता? अहो, हे सर्व विधिलिखीत पूर्वनियोजित ठरल्याप्रमाण घडले. तेव्हा वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही मागे कधीही अपराधी नव्हता. आता आणि पुढेही असणार नाही. ह्याची आम्हाला पर्ण खात्री आहे. शात व्हा.
इतके बोलून श्रीकृष्ण महाराज म्हणाले, "अर्जुनाचे पिताश्रीना ९९ यशस्वी करीता केले. १ यज्ञ कमी पडला. ते अर्जुनास दाखवायचे होते.
पाचही बालकांना जन्म होताच क्षीराब्धीची प्राप्ती. स्वर्गभुवनात यमसदनात अडकलेल्या नरकगामी जीवात्म्याना क्षणैक विसावा. यमयातनेपासून सूट. सर्वांना आनंदाचा सोहळा पाहता यावा अशा एक ना अनेक हेतूंनी आम्ही इथवर प्रवास केला आहे.''
अमृतवर्षांनी परावाणी मुग्ध करणारी मधुर भाष्ये वेधक बोधक समजावणी. भगवंताचे सारे काही अलौकीक अनाकलनीय. एकाच दगडात अनेक पक्षी मारावेत तसे कर्तृत्व. भक्तरक्षणासाठी इकडची सृष्टी तिकडे न्यायची किमया. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. शक्तिचे दिव्य कार्य, अनंत शक्ति परमेश्वर सकलांसिही विषय व्यवस्था करीति । ह्या भगवद उक्तिचा श्रृतिचा वैज्ञानिक चमत्कार ! हे लक्ष्मी सह नारायण अनुभवित होते.
ती पाचही बालके भाग्याची. जन्म होता क्षणीच क्षीराब्धीसम अत्युच्च, तुर्य ब्रम्हपदी जाऊन आले. सुखफळ अनुभवून आले. त्यांचे ठिकाणी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बाळसे. तेज:पुंज शरीर त्यांना लाभले. सर्व कपिलाषष्ठीपेक्षा अनंत पटींनी श्रेष्ठ असा अपूर्व योग त्यांचे जन्म कुंडलीत असावा. पाचही बालकांना अर्जुनाचे स्वाधीन करुन, पुन्हा एकदा लक्ष्मीनारायणांनी क्षमायाचना केली.
शेषशायी नारायणांचे पाठीवरुन प्रेमळपणे हात फिरवीत, लक्ष्मीकडे स्नेहार्द कटाक्ष टाकीत, श्रीकृष्ण महाराज स्मित हास्य करीत महाद्वाराचे दिशेने निघाले. त्यांच्या दंतपंक्तीमधून नक्षत्रांचे प्रकाशणे झाले.
पुढे अर्जुन मागे श्रीकृष्ण. त्यांचे मागे लक्ष्मी व तिचे मागे शेषशायी नारायण असे चालले होते. महाद्वार येताच श्रीकृष्ण अर्जुनाचे कानात पुटपुटले, "पार्था ! लक्ष्मीनारायणाला सोडून माझे मागे लागली आहे. काय करायचे आता ?'' अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी देव पुटपुटले खरे.
'प्रभो ! येती तर घ्या ना ! नाही तर तुम्ही सदैव श्रीमुगुटी बाशिंग बांधून तयारीतच असता की?"
त्यावर देव हसत म्हणाले, "अरे वेड्या ! ज्यांच्या घरी आपण पाहुणचार घेतो, त्यांच्या बायका काय पळवून न्यायच्या होय रे ! बरे लक्ष्मीला डोक्याचा भाग नाही. पण आपण आपले डोके का गहाण टाकावे?"
अखेर लक्ष्मीकडे मोर्चा वळवित देव म्हणाले, 'आपला मनोदय आम्ही जाणतो. भावहि ओळखतो. तूर्तास आपण इथेच थांबावे. पुढे योग्य समयी तुम्ही भीमकी-रुक्मिनी म्हणून जन्मास या. आम्ही आपला स्वीकार करु."
देवाची आज्ञा होताच लक्ष्मी स्थिरावली. देवाची पाठ दिसेनाशी होईपर्यंत वेडावली. देवांचा परतीचा प्रवास सुरु झाला. क्षणार्धात अर्जुनासह देव मेरुच्या पठारावर रथात बसले देखील. व्यतिक्रमाने अग्नि प्रदक्षिणा सोडवित देवाचा रथ स्थिरावला. संदिपनी व्याळास त्याची बालके यथास्थित प्राप्त झाली. ब्राम्हण आनंदला.
"काका चोराबद्दल काहीही विचारु नका. तिकडे काकी सर्वांगाचे नेत्र करुन आपली आतुरतेने वाट पाहात असतील. त्यांना बालक प्राप्तीची ओढ लागली असेल.या ! देव तुमचे सदैव कल्याण करो." एवढे बोलून अर्जुनासह देव हस्तिनापूरीकडे मार्गस्थ झाले.
तर एकंदरीत रुक्मीनीचे पूर्व आयुष्य अशा अलौकीक घटनांनी भरल्याचे आपण पाहीले आहे. आता आपण रुक्मिणी राज्यात जाऊ. रुक्मीणी वयात आली. माता-पिता चिंताक्रांत बनली. मुलीसाठी आवडत्या नाजूक, सद्गुणी कन्येसाठी तितकाच तोला-मोलाचा सर्व गुणसंपन्न वयरुप योग्य असा वर आता शोधला पाहीजे. असे राणी सुधामती आणि राजा भीमकाला तिन्ही त्रि काळ जाणवत असे. इतकेच नव्हे तर आठही दिशांना संशोधनाचे कार्यासाठी हेर पाठविण्यात राजाने पुढाकार घेतला.
लेखक :- गोपाळ देगावकर
क्रमशः
भाग 02 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/002.html
भाग 03 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/003.html
भाग 04 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/004.html
भाग 05 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/005.html
भाग 06 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/006.html
भाग 07 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/007.html
भाग 08 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/008.html