भाग 007 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)

भाग 007 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)

 

भाग 007 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार) 


सहाव्या भागावरून पुढे - 

भीमक राजा देवाचे श्रीचरणी लागत म्हणाला, "देशोपदेशच्या राजांचे राजकुमारांचे जेव्हां किन्नराने वर्णन केले, त्याचवेळी आपली स्तुति केली. आपले गुणवर्णनाने मी शांत झालो. आनंदीत झालो. आणि आपली निवड निश्चयपूर्वक केली. त्याचेवेळी ज्येष्ठ पुत्र आडवा आला. त्याने शिशुपाळाचा प्रस्ताव मांडला. मोठा सुपुत्र म्हणून आम्ही भिडेखातर सर्व शांतपणे ऐकून घेतले. पण! देवा आपण हा घाट मोडून काढला. मला व भीमकीला चिंतामुक्त केले. आता एकच विनंती करतो, आपण चार दिवस इथे खरा लग्न सोहळा पार पाडावा आणि मगच व्दारकेला प्रस्थान करावे !"


देवाने हसत मुखाने हे सर्व मान्य केले, रुक्मिणी देवींना भीमाकाकडे पाठविण्यात आले. “आपण सर्व तयारीनिशीच यावे!” असे रुक्मिणीस सांगून पाठविले पुढे श्रीकृष्णाने स्वर्गस्थ विश्वकर्म्यास पाचारण केले. त्यास त्रिभुवनांत सांपडणार नाही असा भव्य दिव्य मंडप ऊभारण्यास सांगितला. विश्वकर्मा अंगीकृत कार्यास लागला. अतिभव्य सुशोभित मंडप रचला गेला,


पुढे वरमूळ निघाले. महाव्दारी आले. सर्वांना सन्मानाचे विडे दिले. टिळे लावले. चंदनाची ऊटी लावली गेली. देवाचे स्नान उरकलं. विप्रांनी वेदध्वनी मंत्राचारण केले वैदिक विधि यथासांग पार पडले. मंगल वाद्यांच्या गजरांत बाळा, मुग्धा, प्रौढ, वृध्दा, चतुर्विध नारी देहमान विसरून, आनंदाच्या सोहळ्यांत न्हाऊन निघाल्या.


देवाची हत्तीवरून मिरवणुक काढण्यात आली. हत्ती शृंगारलेला सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मढविलेला, रुबाबदार भारदस्त दिसत होता. माहूत म्हणून स्वतः विश्वकर्मा बसला होता. देवाचे मागे करौली नटून थटून सुभद्रा भगिनी बसली होती. तिच्या डोक्यावर चिंतामनीचा कलश दिला होता.


घोड्यावर बसण्याऐवजी देव हत्तीवर का बसले? व्यापक दूरस्था म्हणजे देव सर्वांना दुरुनहि दिसावेत. असे परमोच्च बहुमानाचे सर्वश्रेष्ठ आसन म्हणजे हत्तीची अंबारी हे होय! तेच देवाने स्विकारले होते. खाली देवापुढे यादव सैन्याचे घोडदळ सजले होते. देवा भोवती ऋण मुनीजन मंगळोच्चारसह जयजयकार करीत चालले होते. नंद, वसुदेव, उग्रसेन, बळिराम, अक्रूर, अर्जुन सजविलेल्या रुबाबदार घोड्यांवर बसून चालले होते. गर्दी हटविण्यासाठी सर्वात पुढे श्रीउद्धवदेव चालले होते. भूतलावरील कैवल्यानंदाच्या हा अपूर्वदिव्य सोहळा पाहण्यासाठी आकाशात विमानी बसून सर्व देवगण पुष्पवर्षाव करीत येत होते. चतुर्विध नारी सुवर्णाचे परिमळ व आरत्या घेऊन देवासवे चालल्या होत्या. देव मुख्य मंडपात प्रवेश करतांच चंदनपणी गुलाबपाणी शिंपडण्यात आले. पूर्णकुंमानिशी सुवासिनींनी देवास ओवाळले. सुधामतिने देवास इतक्या जवळून प्रथमच पाहिले. हे लावण्याचे रुपडे किती मनमोहक वेधक सौंदर्याने नटले आहे. हे पाहून सुधामति राणी सुखावली. माझी पोर खरी भाग्यश्री ठरली असे सुधामति राणीस वाटले. मी माता होऊन धन्य झाले !!


वर्‍हाडाचे क्रमश पाद प्रक्षाळण झाले. गौरी हरास देव आले. गौरीहराचा विधि आटोपून देव पाटावर बसले. अर्थात उध्दवदेव जवळ ऊभे होतेच. सुवासिनींनी देवाभोवती गर्दी केली. त्यांस प्रमुख होत्या सावित्री, उमा, कमळजा, अनसूया, आदि सती सुवासिनी इ.


वैकुंठींची देवता विष्णू व महादेवाने अंतरपाट धरला. देवी रुक्मिणीच्या हातात पुष्पमाला देऊन पाटावर ऊभे केले. घटिकापात्र बुडतांच गर्गाचार्यांनी महादेवांनी 'सावधान सावधान' उच्चारले. ब्रह्मदेवाने बोपन्या' म्हटले. मंगल अष्टके घवळे गाईले गेले. तत्पश्चात जवनीक फिटली, अंतरपाट दूर झाला. रुकिमणीने हर्षभराने देवाचे गळ्यांत माळ घातली. मनोमन म्हणाली " गोपाळकृष्ण महाराज की जय।"


हरीहरांनी वधूवरांची शेष भरली. अप्सरांचे नृत्य सुरु झाले. विप्रांनी मंत्रोच्चार केले. शेषाने वेदघोष केला. सुवासिनींचे आक्षेवण झाले. कन्यादान पार पडले. पदरांस गांठी पडल्या. वधूवर होमस्थळी आणले गेले. होमाचे मंत्र अग्नि हवन इत्यादि विविध यथासांग पार पडले, भटजींनी देवास सांगितले, म्हणा, "अर्थेच कामेच धर्मेच स्वामी! या अर्था पुरुषार्था न वंचावी ! देव म्हणाले, “न वंचु हे रुक्मिणीदेवी केले दधीप्रमाण!” तत्पश्चात् रुक्मिणीचे बंधू देवाजवळ आले आणि याचक बनून म्हणू लागले, "यादवेश्वरा आम्हालाहि सुखदे!" ते पाहून बळिराम म्हणाले, "अरे! खरे पाहीले तर तुम्हींच खरे सुखी! नाहीतर कौंडीण्याचा पानवठ्यावर तुमच्या रुक्मियालाच आम्ही खरे सुख दिले आहे. जाऊन विचारा, याला! तो जर म्हणाला, की मला सुख नाही मिळाले. तर त्याच्या अकरापटीने आपणास सुख देऊ !!" बळिरामाची विनोद बुद्धि पाहून, सर्वजण हास्य सागरात काही काळ बुचकळले.. गेले. हास्याची सर्वत्र जणूं करिंजीच उडाली.


श्रीउध्दवदेवांनी सर्वांना भेटदान म्हणून दिव्य वस्त्रे, अलंकार भूषणे दान केली. सभोवतालच्या सैंग रणावर पूर्णासंगम सांजा विंझा येथील रहिवाशांनाहि देवाने खरे सुखी केले. ऋषिधरांनी वधू-वरांचे खास पूजन केले. पाणिग्रहन झाले, भीमकास आंदन म्हणून बरेच काही देवाने दिले. जो देव ब्रहमादिकांना दुर्लभ त्या देवाचे बोटाला धरुन, देवाने क्षणक खेळ मांडला होता !!!


पुढे पाय घड्या अंथरल्या गेल्या. देवकी, यशोदा, रोहिणी आदिकरुन वरमायांना पायघड्यांवरून मंडपव्दारी आणले. आणतांना त्यांचेवर श्रीगीरी, चवरे ढाळीत विप्रांनी वैदध्वनी केले. माटांनी पोवाडे म्हटले. चरित्रे गाईली. धवळी म्हणण्यांत आली. त्यास नारद तुंबर सरस्वतींनी प्रतिसाद दिला. अशा प्रकारें हा वरमायांचा सुखसोहळा सुधामति राणी व भीमक राजाने मोठ्या थाटांत पार पाडला.


त्यानंतर वधू वरांसाठी खास तयार केलेल्या सिंहासनावर बसविण्यात आले. डावीकडे रुक्मिणी देवी म्हणजे जणूं लावण्याची निधि, चैतन्याचा गाभा कैवल्याची प्रभाच बसली होती. त्या ऊभयतांमुळे अवघे त्रिखंड- भुवन ऊजळून निघाले होते जणू, तो सर्वज्ञ मूर्तिमंत होऊन अवतारला होता. त्याची पराशक्ति विग्रहवंती होऊन जीवांची भ्रांति फेडावयास संयोगानेच अवतरली होती. देव परब्रम्ह तर देवी ब्रम्हविद्या! असा सुसंवाद दोघांत असताना, विसंवादाला अणुमात्र जागाच नव्हती तिथे !!!


अशा प्रकारच्या देवी, दैदीप्यमान जोडप्यांचे वर्णन करावयास शब्द अपुरे पडतात. जिथे वेदश्रुती नेति नेति म्हणून परत फिरल्या आगम निगम निजसार वस्तू भुलून गेल्या, तिथे मानव मर्त्यमानवांची वैखरी काय करणार ? त्यानंतर प्रथम उध्दवदेवांनी देवास ओवाळले. मंगल आरति केली. रोहिणी, यशोदा,


देवकी त्या तीन मातांनी देवास जीवेभावे ओवाळले. निंबलोण केले. त्यांचे श्रीचरण वंदिले. भीमकाने भोजनाची तयारी केली. लहिये पेये, चौष्यें, भोज्ये, षड्विध प्रकारची ताटे तयार केली. सर्व प्रकारच्या फळभाज्या, फुलभाज्या ज्या, अशी अष्टादश पक्वान्नांची मेजवानी सर्वांना देण्यात आली. कर्पूरोदकाची पात्रे घेऊन, दासी दिमतिला सज्ज होत्या. वाढण्यांची संख्या अगणित होती. ज्या पक्कान्नावर ज्याची विशेष प्रीती होती तेच वाढले जात होते.


अधून मधून जयजयकार गर्जत ऋषी, मुनि देव व्दिज, योगी, तपी, सैनिक, सेवक सर्वच जण त्यात सहभागी होत होते. "श्रीकृष्णचंद्र भगवान की जय !" " श्रीव्दारकाधीश महाराज की जय !"


भीमकाने देवास "आरोगणा करावी" म्हणून विनवणी केली, रुक्मिणीसह श्रीभगवान एकाच ताटांत बसून, आरोगणा करीत होते. ज्या परब्रह्मावताराचे साधे उष्टेहि ज्या देवांना कधी प्राप्त झाले नाही, त्या देवांनीही रुक्मिणींचा हेवा केला. रुक्मिणीदेवी भाग्याच्या! तिने असे कोणते पूर्वकर्म जोडले, की


जेणेकरून साक्षात परमेश्वरास तिचा गृहस्थ धर्म स्किाराव लागला, है तो देवच जाणे ! असो! उध्दवार्जुनांनी देवा कडून प्रसाद मागवून घेतला, भीमकाने देवास विनविले. "जी! जी!! मी आपला ताटकाढा आहे! मलाहि आपल प्रसाद द्यावा !!!" देवाने सर्वांना भोज्य शाकि प्रदान केली होती, त्यामुळे सर्वजण तृप्तीचा देकर देत प्रसन्न चित्ते जेवले. तृप्त झाले. भोजनपश्चात् शीतल सुवासिक चंदन जळाने देवांनी हस्त प्रक्षाळण केले. कर्पूरासहित विडे सर्वांना दिले गेले.


देव दिव्य अशा सिंहासनावर बसतांच गंधर्वादिक कलाकारांनी नृत्य गायन वादन करून देवाचे मन रीझविण्यासाठी आपआपली हजेरी लावली. पुढे देव जानवस घरी आले. तोपर्यंत रात्रीचा अंमल सुरु झाला. सर्वजण सुखनिद्रेत विसावले. रात्र सरली. प्रातः काळ झाला. मंगल वाद्यांच्या गजरांत देव जागे झाले. वास्तविक पाहतां चराचर झोपले, तरी परमेश्वर जागेच असतात.


अहर्निशी ज्या भगवंता। सफल जीवांची लागली चिंता !! मेघवर्षे जयाची सत्ता सिंधु मर्यादा धरावी !!!


देव कधि झोपत नसतात. देव झोपले तर सारेच संपले!! वाऱ्याचे वाहणे, चंद्रासूर्यांचे ऊगवणे, कोंबड्याचे आखणे, दुःखी जीव थोडेफार सुखी होतात. ते थांबले तर देवाची अवकृपा होईल. सृष्टि व्यवस्थेचा तोल दयाळु मयाळू कृपाळु कनवाळू परमेश्वराच्या ब्रिदांना बोल लागेल. मग देव विसावतात. विश्रांति घेतात पहुड उपहुड करतात?. दैहिक संबंध, क्षुधापिपासा, मलमूत्र, शीतउष्ण भयनिद्र इ. अष्टस्वभाव धर्म अंगी करतात. ते केवळ मानवदेहाची बुंधि घेऊन, पांघरुन घेऊन, अवतरतात म्हणून हे सर्व त्या देहाला मान देऊन करीत असतात.


पुढे थोड्याच वेळांत देवाचे उसंगी रुक्मिणीस घालीत असतांनाच तिच्या मातापित्यांनी देवास चिनविले, "महाराज! आमचे जन्मजिवीत धन्य झाले. जरी ही कन्या दूर झाली, तर आम्ही कासावीस व्हायचो. आता तर सर्वकाळ ती आम्हापासून दूरच राहणार आहे. तरी आजवर तिला आम्ही फुलांप्रमाणे जपली आता आपण तिला सांभाळाल. हा भार आजपासून आपणावर सोडला जात आहे. आम्ही तिचे रक्ताचे पण आपण मात्र अनादिचे निजाचे!" भीमकाच्या बोलण्यावर प्रसन्नचित्त होत देव म्हणाले. "आपण सर्वथा चिंता न करावी'


पुढे भगवंतांप्रमाणे रुक्मिणी देवीस सात जणांच्या उसंगी म्ह. ओटीत पालण्यांत आले. ते सात जण भाग्याचे वसुदेव, नंद, उग्रसेन, सात्वीक आक्रूर, अर्जन व उध्दवदेव ! ते सातजण म्हणाले, "रुक्मिणी माये, तूंच खरी आमची आजपासून कुळस्वामीनी, कुळेश्वरी वास्तविक आम्हीच तुझ्या उदरी जन्म घेऊन धन्य व्हावे असे वाटते !!" पूजन पंगत आंदणदान इ. कार्यक्रम पार पाडले. गृहस्थ धर्मातील जगरहाटीचे महत्वाचे कार्य भीमकाने पार पाडले.

रुक्मिणीच्या तैनातीस ७०० सखी परिचारिका, दासी तितक्याच दुभत्या गाई, रथ, गज, घोडे, बरीचशी गांवे रुक्मिणीस भीमकाने दिली. नंतर रथारूढ झालेल्या रुक्मिणीच्या संख्यांनी तिला वेढा घातला. इतका मोठा भव्य दिव्य अपूर्व अवर्णनीय आनंदाचा सोहळा पाहून त्या सग्ददित अंतःकरणाने रुक्मिणीजवळ गेल्या व म्हणाल्या,


"हे सुंदरी! तूं आम्हाला सोडून चाललीस. आतां आमचे उरलेले आयुष्य व्यर्थ आहे. हे देवाधिदेवा ! श्रीकृष्णराया !! आमच्या ह्या भीमकीस सदैव आपले सान्निधान द्या. या परमभक्तास विभक्त करूं नका. तिला सर्वकाळ नित्यसंबंधच द्या!" त्यांचा तो विरह पाहून देवादिक ऋषीमुनींनाहि गहिवर आला. त्यांचे नेत्र पाणावले.


त्यानंतर भीमक राजा परत फिरण्याचे उद्देशाने महाराजांजवळ गेला. देव म्हणाले, "आपण व्दारका पाहा. दोन दिवस आमचा आदर सत्कार स्विकारा आणि मगच विदर्भप्राती जा!" राजाने तो शब्द पाळला. देवाचे म्हणण्यास मान दिला.


श्रीकृष्ण महाराजांनी सत्यधान सेनापतिस व्दारका सजवून ठेवा. आम्ही सर्वांना घेऊन येत आहोत' असे सांगून पुढे पाठविले. व्दारकेतून वरात काढावयाची आहे. तेव्हा सर्वांना व्दारका सजविण्यास सांगा. अशी देवाची आज्ञा घेऊन सातही जण अंगीकृत कार्याला लागले.


अखेर काही क्षणांतच सर्वजण दारकेला पोहचले, देवाबरोबर चालले तर, मार्गक्रमणा केव्हा संपली, इच्छित स्थळी केव्हा आलो हे देव भक्तांना कळतच नाही. हा अनुभव शब्दातील आहे. अवधी सुवर्णमयी रत्नखचित व्दारका हिरे माणके, पाचूनी सजविलेली, मढवलेली द्वारका, म्हणजे अपूर्व सुंदर अशा नयनरम्य प्रकाशाची ही पेठच आहे. असे भीमकाला वाटले. अशी ही रम्य नगरी त्रिभुवनात कोठे हि आढळणार नाही. अशी प्रत्येकाची धारणा झाली होती. जात्याच मूळचीच सुंदर, त्यात तिला दिव्य बरव अलंकारांनी शृंगारले, तर ते मूळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते! तिचे मूळ सौदर्य अनमोल होते. त्याची खरी किंमत वाढीस लागते. तशी ही व्दारका पाहून नेत्राचे पारणे फिटले असे राजाला वाटले. चाहणारांना अवाक करते ही व्दारकापुरी !


व्दारकेने महाउत्सव मांडला. त्यांत व दारकाधीश सपत्नीक, सोयरे, घायरे, आप्तस्वकीय, कौंडीण्य नगरी निवासी यादव सैन्य, भीमकाचे सैन्य आणि वर माया, दास, दासी इत्यांदिचा विशेष प्रवेश होणार होता. म्हणून घरोघरी गुढ्या तोरणे ऊभारली गेली, ध्वजा पतांकाचा तर हिशेबच नव्हता. दारवंते विचित्र प्रकारें पण सुंदर असे सजविले होते. घरा- दारांवर मखरें तवंगे शोभा वाढवित होते. आनंदाच्या गुड्या आनंद कंदाच्या स्वागतास सिध्द झाल्या. सुवर्णभूमीवर सुगंधांचे सडे, मुक्ताफळांची सुंदर रांगोळी सगळीकडे घातली गेली. सोन्याला सुगंध कसा सुटतो, हे पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी व्दारका गांठावी, म्हणजे कळेल! असेच वाटत होते.


नगरीच्या सर्व स्त्रीया कुमारीका उत्तम प्रतिचा शृंगार करून अत्तरदाणी, आराते घेऊन दुतर्फा ऊभा होत्या. जणूं कैवल्यपति येत आहे. म्हणून आदिशक्तिच संपूर्ण व्दारकानगरी होऊन नटली असावी! सूर्य अस्ताला गेला. रात्रीचा अंमल होऊ लागला, सुवासिनी पालख्यांत बसल्या. सुंदर सजविलेल्या त्या हत्तीवर ३६ कुळांचे राजकुमार बसले, तमाम यादव सैन्य अश्वारूढ होऊन, आनंदाने निघाले होते.

लेखक :- गोपाळ देगावकर 

पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

भाग 01 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/001.html


भाग 02 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/002.html



भाग 03 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/003.html


भाग 04 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/004.html



भाग 05 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/005.html


भाग 06 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/006.html


भाग 07 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/007.html



भाग 08 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/008.html



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post