भाग 006 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)

भाग 006 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)

भाग 006 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार) 


मागील भागावरून पुढे 

 रुक्मिणी भावकळनेस सम्हणाली. “सखे ! मी अंबिका दर्शनास का जाऊ? तो उपाय ती युक्ती सांग.” भावकळना म्हणाली, "ते मला सांग, अंबिका स्वप्नात आली. तिने विवाहाअगोदर कुळस्वामिनी दर्शनास येण्याचे बजावले आहे."

आणि भावकळनेची नामी युक्ती रुक्मिणीस पटली. तिने आपले स्वप्न सुधामति मातेस सांगितले. सुधामतिने भीमकराजास सांगितले. राजा म्हणाला, "अंबिकेच्या पुजाऱ्यास सुचित करा. रुक्मिणीदेवी दर्शनास येत आहे. अंबिका भवन सजवा, देवीला सजवा." अशा प्रकारच्या आज्ञा अंबिका पुजन्यास मिळाल्या.

इकडे रुक्मियास जेव्हा रुक्मिणी ही अंबिका दर्शनास निघाली हे समजले तेव्हां तो राजास भेटला व म्हणाला, "हे पिताश्री ! आज प्रसंग बाका आहे. रुक्मिणीच्या अंबिका दर्शनास वावगे महत्त्व का देता ? तेथे कृष्ण लपून बसला आहे हे माहिती असूनसुद्धा भीमकीस तिकडे का पाठविता ? आमंत्रणाशिवाय कोणाच्याही कार्यास उपस्थित राहू नये हा श्रीकृष्ण यादव सैन्यानिशी इथे आलाच कसा? शिवाय त्याची कृष्णकृत्ये, कपट कारस्थाने आपण जाणून आहातच ना ? मग जाणून बुजून हा प्रसंग का उभा करता ?"

रुक्मियास उत्तर देत राजा म्हणाला, "अरे ! तुम्हा पोरांना आपला कुलदैवताचा कुळधर्म तरी कळतोय का ? विवाहापूर्वी कुळदेवतचे पूजन केले नाही तर अरिष्ट ओढवते, शिवाय असे न केल्यास आपणास मानणारे राजे आपल्या हा दुष्कृत्याबद्दल हासतील. मी श्रीकृष्णास भेटलो आहे. तो खरा नितीमंत, धर्मशील द्वारकाधीश आहे. त्याचे यादव सैन्यहि काहीही वाईट-साईट करणार नाही ह्याची मला खात्री आहे." त्यावर रुक्मिया म्हणाला, "तात ! आपली श्रीकृष्णावर मर्जी असेल. पण शिशुपाळ व श्रीकृष्ण हे एकमेकांचे हाडवैरी समोरासमोर आले आहेत. कपट कारस्थान करुन कृष्ण रुक्मिणीला पळवून नेईल, तेव्हां माझे ऐका. मी प्रचंड सैन्यांच्या पहान्यात रुक्मिणीस अंबिका दर्शनास घेऊन जाईल. तुम्ही सर्वजण बसा आपल्या बाईलांपुढे सेखी मिरवीत.” 

त्यावर सुमति प्रधान मध्ये उभा राहीला व म्हणाला, "भीमकाच्या घरात एवढे सैन्य असताना आपण कुणीही जायचे नाही. मी एकटाच सर्वांना पुरुन उरेन, " सुमति प्रधानाच्या बोलण्यावर राजा व रुक्मिया संतोष पावले, रुक्मिया त्यास म्हणाला, "तुम्ही यादव सैन्यावर भरवसा ठेऊ नका. ते धावून आलेच तर मागपुढे न पाहता कत्तल करा. त्यांची व रुक्मिणीची अंबिका भेट सफल करा.

त्यानंतर सुमति प्रधानासह तीन अक्षयोनी सैन्य, रुक्मिणीच्या सर्व अंगलग दासी, राजगुरु सुदेव इतक्यांना पाठवून राजा व रुक्मिया निर्धास्त झाले. रुक्मीनीदेवी हा सर्व लवाजामा घेऊन अंबिका भुवनी सुखरूप पोहचली, अंबिका देवीस पंचामृत स्नान, लेणी लुगड्यासह दिव्य आभरणे, दागिने, सुवर्ण पुष्पांची पुजा, देवीच्या गळ्यात एक माळ व हातात दुसरी घातली गेली. अंबिका स्तवन केले गेले आणि अचानक गामान्यत आकाशवाणी झाली, "हे रुक्मिणी देवी ! तू भिऊ नकोस. तुला तुझ्या मनासारखा वर श्रीकृष्ण हाच मिळेल. निश्चित रहा."

त्यानंतर अंबिकेच्या हातातील माळ रुक्मिणीच्या हातात आली. ती घेऊन रुक्मिणी अंबिकेच्या देवळाचे वरील सज्ज्यात गेली. बरोबर अर्थात सुदेव व भावकळना होतेच. श्रीकृष्ण महाराज कुठे दिसताहेत का? हे रुक्मिणी बारकाईने पाहात होती. पण छे! तिला ते दिसतच नव्हते. अखेर तिला धाप लागली. बासोच्छवास वाढीस लागला. तिने भावकळनेस विचारले, "हे सखे ! एवढ्या मोठ्या सैन्यदलात आपले श्रीकृष्ण कोठे आहेत ते सांग.” भावकळने ऐवजी सुदेवच म्हणाले, "आकाशात सर्व देव आहेत. श्रीकृष्णास पहारा देणारे सैन्य फार मोठे आहे. "इतक्यात अचानक पाञ्चजन्य शंख श्रीकृष्णांनी फुंकला. सर्व सैन्य उभे राहीले. एकच हाहा:कार झाला व सुदेव आनंदाने सांगू लागले, "हे देवी! तुझा नवरा श्रीमुरारी 'भगवान श्रीकृष्ण' आले हो आले. सुवर्णरथ. वर गरुडध्वज. भव्य मेघडंबरी असा दिव्य रथ येतोय. तो पाहा." रुक्मिणीस तो रथ दिसला, देवहि दिसला. तिने दण्डवत प्रणाम केला. देवास विनविले, "हे आर्तदानी! शरणांगत वज्रपंजरुवा प्राणनाथा !आता अधिक वेळ लावू नकोस."

देव निघाले आहेत. सर्व सैन्य सज्ज होऊन देवाचे रक्षणासाठी सिद्ध झाले आहे. भीमकाचे सैन्य व यादवांचे सैन्य एकमेकांस म्हणू लागले, प्रथम भीमक सैन्य चिडले. "इथे रुक्मिणीदेवी अंबिका दर्शनास आली आहे. तेव्हा तुम्ही यादवांनो मागे सरा." यादव त्यांना प्रत्युत्तर देत म्हणाले, "अरे! तुम्हीच मागे सरा. आमची रुक्मिणी अंबिकामातेच्या दर्शनास आली आहे. हटा मागे. नाही तर तुमचे बळि देवीस चढवू. रुक्मिणीस आम्ही जिंकून नेत आहोत. जाऊन सांगा त्या शिशुपाळाला."

    आणि रणकंदन सुरु झाले. युद्धाला तोंड फुटले. प्रथम सुमति प्रधानाने श्रीउद्धवाचे अंगावर बाण सोडले. श्रीउद्धवानेही प्रत्युत्तर म्हणून चार गुणी बाण सोडले. एका बाणाने सुमतिच्या रथाचे चाक, दुसऱ्याने हातातील धनुष्य, तिसऱ्या बाणाने सारथ्यास मारले व चौथ्या बाणाने ध्वजस्तंभ दुभंगला. थोड्याच वेळात सुमति रथाखाली कोसळला. अनेक रथ, घोडे, हत्तींचा चुराडा करीत उद्धव देव खवळून निघाले होते. इतकेच नव्हे तर अंबिका भुवनापर्यंतची वाट मोकळी करण्यास वाला फार श्रम पडले नाहीत.

    हा सर्व भीषण भयंकर रौद्र संहार पाहून सुदेव रुक्मिणीस म्हणाला, "देव जेवढे श्रेष्ठ! तसे त्यांचे प्रधान उद्धवदेव हेही काही कमी श्रेष्ठ नाहीत. आता तो पहा. भक्तकैवारी श्रीकृष्ण इकडेच येत आहे." साक्षात परब्रम्ह परमेश्वर आणि त्यांची ती रौद्ररसपूर्ण श्रीमूर्ती पाहून रुक्मिणी आनंदली. आनंदाचे भरात तिने देवाचा जयजयकार केला “श्रीकृष्णचंद्र भगवान की जय ! द्वारकाधीश महाराज की जय !” स्तुति केली. मंगल आरती ओवाळली.

    इतके सारे होत असतानाच वायुवेगाने देव रुक्मिणी समीप आले. तिला उचलून रथात उभे केले. रुक्मिणीचे हाताची माळ श्रीकृष्णाचे गळ्यांत घातली गेली. देवास सुवर्णपुष्पांजली वाहिली. तिच्या सर्वांगावर रोम रोमी अष्टसात्विकभावाची पसरण झाली. तिला देवाचे 'विषयप्रेम लाभले.' ती तटस्थ झाली. स्वेदबिंदू तिच्या सर्वांगावर जमा झाले. सर्वांगास कंप सुटला. ती देहभान विसरली. आप-पर भाव विसरली. आत्मा व परमात्मा. स्वामी आणि सेवक यांचे अपूर्व अनाकलनीय मिलन झाले. दोन्ही सृष्टीआनंदसागरात न्हाऊन निघाल्या.

    "समोवर्तते" म्हणत देवतावर्गांनी आशीर्वचन म्हटले. श्रुति वेदांनी 'स्वस्ती' सावधान म्हटले. ऋषिवर्यांनी अंतरपाट धरले. ब्रम्हादिकांनी 'वोपन्या' म्हणून कन्यादान केले. सामवेदातल्या ऋचा गाईल्या. मंगलवाद्ये चौघडे वाजू लागले. देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. नारद तुंबराचे सरस्वतीचे वीणावादन झंकारले. रुक्मिणीस वामांगी तिचे मनोरथ देवाने ठरल्याप्रमाणे सिद्धीस नेले. अवघे ब्रम्हांड आनंदले. हा पराकोटीचा परमेश्वराचा कैवल्याचा आनंद अवर्णनीय ठरला. किन्नराचे कवच फिटले. तो पुन्हा वेदघोषाचे रुपात देवास भेटला. श्रीचरणी नतमस्तक झाला. देव म्हणाले, "वेदघोषा! आता होणारा रणसंग्राम पाहा. मगच आपल्या देशास जा.

    तिकडे रुक्मिणीस श्रीकृष्णाने जिंकून नेली. हे रुक्मिणीहरण झाल्याचे वृत्त शिशुपाळाचे कानांवर गेले मात्र आणि तो मनोमन खच्ची झाला. सर्वांगास घाम फुटला. जिव्हा जडावली. मनबुद्धि पांगुळली. चित्त वृत्ती कोमेजली. सर्वांगाला लावलेली हळद क्षणार्धात उतरली. त्यांचे तोंड काळे ठिक्कर पडले. म्लान वदनी शिशुपाळाची सर्व गात्रे ढिली पडली. तो जमिनीवर कोसळणार तेवढ्यात त्यांचे भावाने शैल्याने त्यास वरचेवर सावरले व तो शिशुपाळदादास म्हणाला, "दादा तुम्ही काही काळजी करु नका. मी क्षणार्धात रुक्मिणीस आणतो."

    इकडे खूपसे सैन्य जरासंदाभोवती एकवटले. "आता पुढे काय ?" ह्याची ते प्रतीक्षा करीत उभे राहीले. जरासंद शिशुपाळास आणि सैन्याला उद्देशून त्याला ऐकू जाईल असे म्हणाला, "चला रे चला ! धरा त्या चोराला सारंगधराला जाऊ नका देऊ." इकडे श्रीउद्धवही श्रीकृष्णास म्हणाला, "आता आपणही युद्धाला सज्ज झाले पाहीजे. तरी देवा आज्ञा द्या." यावर देव म्हणाले, "अरे! आपण सारे महायोद्धे आहात. तरी पण मी माझ्या एकाच सुदर्शन चक्रात सर्वांना नाहीसे करीन." अर्जुन खवळला. म्हणाला, "मी एकटा अर्जुनच सर्वांना पुरुन उरणारा असताना तुम्ही का उगीचच श्रम घेता?" सात्यकी प्रधान गरजला, "हे सर्व विरोधक माझ्या एकाच घोटापुरते आहेत." उग्रसेन म्हणाले, "मी सर्व सैन्याचा एकदाच कायमचा घोळाणा करीन." वसुदेव म्हणाले, "गारांचा वर्षाव होतो. तसा मी माझ्या तलवारीने सर्वांच्या मुंडक्याच्या गारा पाडीन." आक्रूर कडाडला, "हे देवा ! मी आता सर्वांचा संहार करीन. तरच आक्रूर नाव घेईन." बळिराम चिडला. म्हणाला, "हे श्रीकृष्णा ! माझे नांगर व मुसळ ह्या साऱ्यांचा एकदाच नायनाट करीन. तुझ्या हातात कांकण आहे. तू नवरदेव आहेस. तू हातात शस्त्र धरु नको. ते काम माझे."

    ह्या सर्वांच्या बोलण्यावर देव हसत म्हणाले, "अरे! आमच्या कपाळाला तर कायमचे बाशिंग बांधलेले आहे. आमचे नोवरेपण अद्यापि भंगलेले नाही. आज मात्र मी ह्या तलवारीशी भूतळावरील अठरापगड राजांचे लग्न लावीन. तुम्ही पाहा तर खरे." यावर बळिराम म्हणाला, "स्वामींची कामे स्वामींनी, सेवकांची सेवकाने करावयाची असतात. दारात पडलेला केर काढण्याचे काम दासींचे असते. ते काम स्वामींचे नसते. तेव्हां मी आता पृथ्वीचा घाणा, नांगराने भवंडून चैद्य सैन्याचे तेल गाळीन माझ्या मुसळाने."


    अशा प्रकारे वीरांची बोलणी ऐकून देव संतोषले व खऱ्या अर्थाने युद्धास तोंड लागले. प्रथम अर्जुनाचा देवदत्त शंख फुंकला गेला. तंगनग तंग नग करीत देवाचा 'पाञ्चजन्य' शंख गर्जू लागला. तुंबळ युद्ध झाले. प्रचंड रणसंग्राम झाला. महासंहार झाला. रक्त मांसाचा चिखल पडला. जरासंद घाबरुन शिशुपाळास म्हणाला, "हा श्रीकृष्ण कळिकाळालाहि झुंजण्यात हरवीन, मला एकट्यालाच सतरा वेळा रथाला बांधून ओढणारा, हा श्रीकृष्ण व त्याची कळा कधी कळलीय का कुणाला ?" शिशुपाळ चिडला व गरजला, "आता सर्व महावीर एक करा आणि तुटून पडा त्या श्रीकृष्णावर.' "


    शिशुपाळाच्या आज्ञेप्रमाणे शैल्य , काशेश्वर, दंतवक्र, काळींग, बाणासुर, जरासंद, मुर राक्षस, बाणासूर, भुमासुर, बलबलु, वासुदेव पौंड्रीक इ. महावीर एकत्र येऊन लढू लागले. तुंबळ युद्ध हातघाईची लढाई झाली. मुंडक्याच्या अन मुडद्यांच्या राशी पडल्या. रक्तमांसाचा चिखल झाला. त्यातूनच रक्ताचे पाट वाहू लागले.

    यादवांनी शिशुपाळाचे बरेचसे सैन्य पकडले. श्रीकृष्णापुढे उभे केले. ते सर्व सैन्य देवाला शरण आले. विनवणी करु लागले. देवाने सर्वांना अभयदान दिले. रथ घोडे देऊन त्यांना आनंदित करुन सोडून दिले. शरण आलेल्यांना मरण न देता दुःख मुक्त, चिंता मुक्त करुन, सुखी करावयाचे हे परमेश्वराचे ब्रीद, देवाने खरे करून दाखविले. देव यशवंत झाले. वरदवंत म्हणून मिरविले. रुक्मिणीसह सर्वांना आनंदाचे भरते आले. श्रीदेवांचा जयजयकार करीत सर्व सैन्य स्वस्थानास गेले.

इकडे शिशुपाळाचे वार्ताहेरांनी भीमक राजाला जाऊन सांगीतले की, रुक्मिणीस श्रीकृष्णाने जिंकून नेली. युद्धात आपली फार मोठी कत्तल झाली. शिशुपाळाचे बरेचसे सैन्य मारले गेले. उरलेले श्रीकृष्णास शरण गेले. मात्र शिशुपाळ बंधू सैल्य, काशीचा कासेश्वर राजा, कालिंग, पौंड्रीक, बाणासुर, जरासंद, वक्रदंत, बलबलु, भुमासुर इ. राजे हरले व मरणाच्या भीतिने पळून गेले." वृत्तांत ऐकून भीमक राजा मनोमन सुखावला. मनातल्या मनातच "माझी रुक्मिणी भाग्याची. देवाची. तिला श्रीकृष्णासारखा एकमेव द्वितीय नाऽस्ति पति लाभला. जो परब्रम्हपरमेश्वर पावन व्हावा, म्हणून अनेक जन्मात ऋषि-मुनी-योगी अभ्यासी यांना खूप प्रयत्न करावे लागतात. तरीही तो पावन होतोच असे नाही. मात्र रुक्मिणीस तो देव अनायासे प्राप्त झाला आहे माझे जिवीत धन्य झाले."

इतक्यात रुक्मिया झाला. तो खूप आकांडतांडवत करीत भीमकास म्हणाला, "तरी मी तुम्हास सांगत होतो की, ह्या काळ्या श्रीकृष्णापासून सावध राहा. पण आपण त्यास चोरुन भेटलातच. त्याचे हे फळ आहे. भोगा आता अपमानिनाचे जीणे. "अभागी, अनाधिकारी, निदैवी रुक्मियाला ह्यातले खरे गुह्य किंवा राजाचे मन ते काय कळणार ? भीमक राजा रुक्मियाची समजूत घालीत म्हणाला, "अरे बाबा. बुद्धी कर्मानुसारिणी विधीलिखीत कुणाला टाळता आलंय का ? बदलता आलंय का ?" राजाच्या बोलण्याने रुक्मिया अधिकच संतापला. त्याने रथ बोलविला व म्हणाला, "तो श्रीअनंत माझ्या हातून कसा निसटतोय तेच मी आता पाहातो." यावर भीमक म्हणाला, "अरे नुसत्या यादव सैन्यानेच सर्वांचा पराजय केला आहे. तिथे तुझा तो कितीसा टिकाव लागणार आहे." रुक्मिया या बोलण्यावर फारच संतापला. म्हणाला, "राजर्षि! आता फक्त तुम्ही माझाच पराक्रम पाहा. मी यादवांना तर पळवूनच लावीन. शिवाय रुक्मिणीस सोडवून आणीन व तिचे शिशुपाळाशी लग्न लावीन. तरच नावाचा रुक्मिया शिशुपाळाशी लग्न लावीन. तरच नावाचा रुक्मिया." भीमक म्हणाला, "पालथ्या घड्यावर दोन हजार घागरी पाणी ओतले तरी ती कोरडीच राहणार!" पण हे ऐकायला रुक्मिया जागेवर होताच कुठे.


तो श्रीकृष्णावर चाल करुन गेला. आणि मोठ्याने गरजला, "अरे कृष्णा ! रुक्मिणीस सोड. नाही तर एकाहि यादव जीवंत राहणार नाही." देवांनी उत्तरास उत्तर दिले, "अरे! तुझा वध करणे मला फारसे जड जाणार नाही. पण तू आमचा ज्येष्ठ मेहुणाव भीमकांचा ज्येष्ठ पुत्र म्हणून तुला जीवदान देतोय. शहाणा असशील तर माघारी फिर. अन्यथा हे यादव तुला जीवंत सोडणार नाहीत." तेवढ्यात रुक्मियाने श्रीकृष्णावर बाण सोडला. म्हणाला, "राख कृष्णा राख." रुक्मियाने देवावर नाना प्रकारची अस्त्रे, शस्त्रे, बाण सोडून पाहीले. पण देवाने ते सहज अगदी लीलया नष्ट करून टाकले. सर्वांचा बिमोड केला. देव "हे रुक्मिया ! मी तुला नावेवर खेळविले आहे. तुला न मारता तुझ्या आठवणीत राहील असाच तुझा अपमान मी करणार आहे." इतके बोलून देवाने 'जांभई अस्त्र' रुक्मियाचे सैन्यावर सोडले. कडकडा जांभया देत सर्व सैन्य निद्रीस्त झाले. रुक्मियाचा रथ मोडला. तो विरथ झाला. मग पळाला. पळता पळता देवाने त्याच्या केसांना पकडले. ओएीत ओढीत रथाजवळ आणले आणि बांधले. हे सर्व पाहून आपल्या दादाची अशी ससेहोलपट पाहून, रुक्मिणीचा चेहरा कोमेजला. काळवंडला. ते पाहून बळिराम म्हणाला, " रुक्मिणी देवी ! घाबरु नकोस. श्रीकृष्ण त्याला लवकरच मोकळा करील. अग ह्या संसारात कृणी कुणाचे बंधू, माता, पिता नाहीये. पुत्र कळत्र संपत्ति ह्यामुळे आपण देवापासून दूर जातों. संकटकाळी देवच सोडवितो. तेव्हां हे रुक्मिणी! तू मायापाशात चौऱ्यांशीच्या घोर नरकात पडण्यापेक्षा एका देवास श्रीकृष्णासच अंतःकरणात ठाव दे. तो तुला प्रेमसंचार करील. कृपा प्रसाद देईन व तुझ्या वंशाचा उद्धारही करीन." बळिरामाचे हे बोल ऐकून रुक्मिणीस टवटवी आली. ती आनंदभरीत झाली व बळीरामांचे चरणी लीन झाली.

    तत्पश्चात रुक्मिया जवळ जात देवच म्हणाले, "दादा !आता ह्या भीमकुमारास सालेपणाचा मान दिला पाहीजे." देवांच्या बोलण्याचा नेमका अर्थ बळिरामाला समजला. श्रीकृष्णाचे सांगण्यानुसार रुक्मियाचे डोकीचे केसांचे पाच पाट वस्तऱ्याने उतरले गेले. अर्धी मिशी, दाढी उतरविली गेली. त्याला अर्धनारीचा पोषाख घालण्यात आला. माथ्यावर थपथपीत शेंदूर फासला गेला नंतर त्यास मुक्त करुन बळिराम म्हणाला, "शिशुपाळास रुक्मिणी देण्याचा तू अविचार केलास, त्याचे हे प्रायश्चित भोग. ज्या देवाची तू खूप निंदा केलीस, त्याने सर्व सहन केले. अखेर सहनशक्तिलासुद्धा काही मर्यादा असतेच ना ?" त्यांनंतर रुक्मियास लेणी-लुगडी दिली. देवाने आपल्या गळ्यातील कंठा त्याचे गळ्यात घातला. अखेर रुक्मिया शृंगारवनाचे दिशेने पळाला. सहा महिने तरी कुणाला हे तोंड दाखवू नये. कारण सहा महिन्यानंतरच डोईचे केस, मिशा व दाढी वाढतील. तेव्हांच लोकांत जायचे. तोपर्यंत शृंगारवनाचा एकांत भोगायचा. त्याने निश्चय केला. रुक्मिया ह्या पात्राची सांगता झाली.

भावाच्या दुर्दशेचे रुक्मिणीस वाईट वाटले. अखेर ते रक्ताचे नाते होते. कसाहि असला तरी तो आपला दादा आहे, त्याचे असे हसू होऊ नये असे तिला वाटणे नैसर्गिक आहे साहजिक आहे. तसेच युद्धात असंख्यात सैन्य मरुन पडले होते. जखमींचे विव्हळणे चालूच होते. तो भेसूरपणा पाहून रुक्मिणीस ग्लानि व गहिवर आला. तिच्या मनात कणव निर्माण झाली. अखेर न राहवून तिने देवास निवनले, "हे सर्व शक्तिमान प्रभो ! ह्या वीरांच्या पत्नी, त्यांची बालके दुःख करीत असतील. आपण दयाळू मयाळू, कुपाळू, कनवाळू आहात. ह्यांवर दया कर. कृपादृष्टीचं अमृत वर्षावाने ह्या सर्वांना जिवंत करा.'

श्रीकृष्ण म्हणाले, "हे देवि, जितके लढाईत मारले गेले आहेत ते सर्वजण वैकुंठात अमृतपान करीत आहेत. मृत्यूलोकावर अध:पतन कमी व्हावे. म्हणून सुकृत आचरुन लोक वैकुंठास जातात. अशा अमृतपान करणाऱ्या जीवांना परत दुःखमूलकारक संसारात जाणणे योग्य नव्हे. तरीसुद्धा तुझी इच्छाच असेल तर देतो यांना जीवनदान! आणि श्रीकृष्णाने कांही क्षणातच सर्वांवर कृपादृष्टी फिरवली. सर्वांना जिवंत केले. शिवाय लढाईत ज्या जखमांनी शरीर व्यापले होते, त्या सर्व जखमाही नाहीशा झाल्या. अतिव परिश्रमाने त्यांना विश्रांति मिळाली. सर्वजण झोपेतून जागे व्हावे तसे जागे झाले. जिवंत झाले पूर्ववत झाले. लाई पूर्वी जसे होते, त्यापेक्षाहि चांगले झाले. त्यांना नवचैतन्य मिळाले. घोडे, हत्ती, रथ, तुरंग भूपाल, सर्वहि पूर्वस्थितीस आहे. सर्वांचा मानसन्मानकरून त्यांना सोडण्यात आले. त्यांनी जय जयकार केले. पुन्हा एकदा देव यशवंत झाले. जयवंत झाले. वरदवंत झाले भाटांनी स्तुति केली. कल्याणकीर्तिला बोलावून आणले गेले. त्याच्या सोबत आलेल्या पूर्वीच्या किन्नरास म्हणजे आताच्या शापमुक्त 'वेदघोषास' सन्मानित केले आणि पुढचा प्रवास सुरु झाला.

हेरांना पुढे यशोदा-देवकींना वृत्तांत देण्यासाठी पाठविले. युद्धी सैनिकांना जीवनदान, रुक्मिणीचे हरन इत्यादि माहितीनिशी त्यांना आगेकूच करण्याची आज्ञा दिली गेली विदर्भप्रांत ओलांडून देव सर्वांसह तापीच्या पूर्णासंगमी पावन झाले. तेथे यशोदा देवकीमाता, रोहिणी ह्या तिघांना श्रीकृष्णाने क्षेमलिंगन दिले. कृतवर्म्याला भेटून शाबासकी दिली. तत्रस्थानी एक मुकाम झाला. भल्या पहाटे सर्वजण जागे झाले. मंगलवाद्यांचे गुजरात देवास जागविले गेले. प्रातःकाळचे सर्व विधी स्नानादि कर्म उरकून सर्वासह देव पुढील प्रवासास सिद्ध झाले. रणांगण क्षेत्र, वने उपवने, भार्गवपुरी, सोरटी सोमनाथ पार करून सर्वांनी मूळमहादेव गाठले.

इकडे भीमक राजाने सर्व वऱ्हाड तयार केले. मूळमहादेवास होणाऱ्या लग्न समारंभास हजर रहाण्यासाठी भीमक सर्व तयारीनिशी सिद्ध झाला. मूळ महादेवास भीमक राजा सहपरिवारासह हजर झाला. मूळ महादेव जवळ येताच शंख, निशाण, भेरी मंगलवाद्ये वाजू लागले. तो गोंगाट ऐकून, अनभिज्ञ यादव सैन्य चाळवले. जागृत झाले. त्यांना वाटले की, शिशुपाळ चाल करून पुन्हा एकदा लढण्यास आला असावा. तो प्रकार पाहून श्रीकृष्ण अक्रूरास म्हणाले, "अरे वेड्यांनो ! शिशुपाळाच्या अंगची हळद केव्हांच उतरली आहे. डाऊ कांकणे अपमानित होऊन उतरली गेली देखील तो खाली मान घालून आपल्या देशाला निघून गेलाय. तो पुन्हा कदापिही येणार नाही. त्याची काळजी करू नका."

"आता येत आहेत ते आमचे पूज्य श्वशूर भीमक चक्रवर्ति आहेत." देवाचे बोलणे मधेच थांबवित अर्जुन म्हणाला, “युद्धनिमित्ते राजा भीमक येत असतील, तर त्यांना बांधून आणीन, सोयरीके निमित्त येत असेल तर त्यांना सन्मानाने आदरपूर्वक घेऊन येईन.” एवढे बोलून देवाची आज्ञा घेऊन अर्जुन भीमकास सामोरा गेला. त्यास आनंदाने भेटला. आपल्या रथात आदरपूर्वक बसविले. देवासमीप आणले. श्रीकृष्णास लोटांगण घालावयास निघालेल्या भीमकास श्रीकृष्णाने वरचेवर धरले. स्नेहे आळंगिले. क्षेमलिंगन दिले. त्यांचा आदरसत्कार केला. जावयाची व साऱ्याची अशी भेट झाली.

भीमक राजा देवाचे श्रीचरणी लागत म्हणाला, "देशोपदेशच्या राजांचे राजकुमारांचे जेव्हां किन्नराने वर्णन केले, त्याचवेळी आपली स्तुति केली. आपले गुणवर्णनाने मी शांत झालो. आनंदीत झालो. आणि आपली निवड निश्चयपूर्वक केली. त्याचेवेळी ज्येष्ठ पुत्र आडवा आला. त्याने शिशुपाळाचा प्रस्ताव मांडला. मोठा सुपुत्र म्हणून आम्ही भिडेखातर सर्व शांतपणे ऐकून घेतले. पण! देवा आपण हा घाट मोडून काढला. मला व भीमकीला चिंतामुक्त केले. आता एकच विनंती करतो, आपण चार दिवस इथे खरा लग्न सोहळा पार पाडावा आणि मगच व्दारकेला प्रस्थान करावे !"

क्रमशः

सातव्या भागात वाचा पुढील कथा

भाग 01 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/001.html


भाग 02 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/002.html



भाग 03 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/003.html


भाग 04 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/004.html



भाग 05 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/005.html


भाग 06 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/006.html


भाग 07 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/007.html



भाग 08 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/008.html



लेखक :- गोपाळ देगावकर पुणे

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post