श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत
(रुक्मिणी स्वयंवर - कथासार) भाग 002
एके दिवशी राजाने दरबार भरविला. दरबारामध्ये रुक्मिया सहीत त्याचे पान सहावी रुक्मिणी., इतर मानकरी, मांडलिक राजे, राणीवसा व प्रधान यांनी रुक्मीणीसाठी वर संशोधन कार्य चालू असल्याचे कळावे म्हणून दरबार भरविला होता
भीमक राजाकडे सुमति नावाचा कुशल, चतुर शूरवीर असा पंतप्रधान होता रुक्मीणीच्या पाचशे परिचारीकांमध्ये (दासींमध्ये) तिची सर्वात प्रिय परिचारीका होती 'भावकळना'. नावाप्रमाणेच ती रुक्मिणीचे मनातील भाव जाणण्यास मनकवडी 'भावकळना' होती. रुक्मिणी सुद्धा आपले मनोगत रहस्य गुपिते भावकळनेशिवाय इतर कुणालाही सांगत नसे.
इतकी सर्व अनुकुलता असूनही रुक्मिणीचा थोरला भाऊमात्र तिच्या सदैव विरोधात उभा ठाकत असे. रुक्मिणी सर्वात लहान असल्यामुळे ती हटवादी न बनता त्याच्या दादापणाला मान देत असे. त्याचे तिला ऐकणे भाग पडत असे. वरसंशोधनाचा विषय निघाला असता रुक्मियाने त्याचा समवयस्क मित्र ३२ लक्षणी गुणयुक्त शूर दमघोषाचा सत शिशुपाल नावाचा वर रुक्मियाने निवडला होता. तसे त्याने भीमकास सांगितलेहि होते. सुमति प्रधान हा हेरगिरीत विशेष प्राविण्य मिळविलेला होता. आठहि दिशांना पाठविण्यात आलेले हेर लवकरच राजांपुढे आपला अहवाल सादर करणार होते. इतक्यात- एका हेराने बातमी आणली.
"काशीच्या कासेश्वर नावाच्या राजाचा भाट 'कल्याण कीर्ति' हा सहपरिवारे देशाटन उद्देश्ये आपल्या भेटीस येत आहे. त्याच्या बरोबर 'किन्नर' नावाचा अर्धमनुष्य, अर्धा पक्षी असा विचित्र पक्षी बरोबर येत आहे. त्याने आतापर्यंत आठहि दिशांचे देश पाहीले आहेत व तो आपल्या भेटीस आता लवकरच येत आहे.'
भीमक राजाला ही सुवार्ता शुभशकुनाची गाठ वाटली. त्याने आपले दोन बंधू 'नरपुरंधर' व 'संगीत सुधाकर' तसेच पाचहि पुत्रांना आज्ञापित केले," कल्याणकीर्ति' भाटास सामोरे जा. आदर सत्कार करीत त्यास आमच्या सभेत उपस्थित करा.
ह्या किन्नर नावाच्या विचित्र पक्षाला पाहण्यासाठी अलोट गर्दी लोटली होती. प्रजाजन सभाजनांसह रुक्मिणीहि हा अजब पक्षी पाहण्यासाठी उतावीळ झाली होती. मंगल वाद्याच्या जय घोषातच कल्याणकीर्तिचे आगमन झाले. त्याचे शाही थाटातच राजाने स्वागत केले.
भाट म्हणजे स्तुतिपाठक. त्यात हा राजाचा खास भाट. राजांना 'कीर्ति आवडत्या राणीसारखी प्यारी असते. कल्याणकीर्तिने भीभक चक्रवर्तीच्या ३६ कुळांचा इतिहासकर केला. गौरवपूर्ण शब्दांतले त्याचे भाषण ऐकन राजा प्रसन्न झाला. राजाने त्यास - थांबविले. (सोमवंशाची वंशावळ फार मोठी होती.) त्यात भरपूर दानदक्षिणा देऊन त्याचा सत्कार केला. त्याला आपल्या सिंहासनाजवळ बसवून कल्याणकीर्तिस म्हणाला, "आपल्या स्तुतिसुमनांनी आम्ही भारावून आत्तापर्यंत आपण कोणकोणते देश, राजे पाहीले, त्यांचे राजकुमार त्यांचे बल पराक्रम इत्यादीची साद्यंत माहिती द्या. आमची कन्या भीमकी उर्फ रुक्मिणीस वर संशोधनास हे फायदेशीर व सोपे जाणार आहे."
प्रसंगाचे नेमके गांभीर्य ओळखून कल्याणकीर्तिने आपल्या भाषणास शुभारंभ केला, 'हे चक्रवर्ति राजन् ! मी गेली १२ वर्षे देशाटन करीत फिरत आहे. एकदा मधुबनातून जात असताना मला हा 'किन्नर' पक्षी सापडला. गरुडासम विशाल काया, सुरेख व अतिसुंदर देहयष्टी, बोलण्यात लाघवी चतुरता असा हा असामान्य पक्षी आहे. गायनवादनातही हा नारदतुंबर तथा वीणावादिनी सरस्वती ह्यांना मागे सारणारा असा हा विशेष पक्षी आहे. तो मी सुवर्णपिंजरीबद्ध केला आहे. ह्यास पाताळ लोकीचे 'कमल स्वरतरु' नावाचा गायनप्रकारही ज्ञात आहे. हा माझेपेक्षा दशदिशांच्या राजांची विशेष माहिती देईन. पूर्वी हा 'वेदघोष' नावाचा ऋषि होता. तप:सामर्थ्याचे बलावर हा स्वर्गास जात येत असे. रंभा ह्याचे बलावर विशेष भाळली होती. त्यास रति मागू लागली असता वेदघोषाने तिचा अव्हेर केला. शाब्दीके झिडकारली. रंभेने तात्काळ यास शापदग्ध केले, 'तू तात्काळ मधुबनात किन्नर पक्षी होऊन पडशील. ज्यावेळी रुक्मिणी श्रीकृष्णास माळ घालील त्याचवेळी तू शापमुक्त होशील. तुझे किन्नर कवच फुटेल.' पुढे काही दिवसांनी भगवान श्रीकृष्णांनी ह्याचे गायन मधुवनात ऐकले. भगवान प्रसन्न झाले. त्यांनी किन्नरास आपल्या कंठातील मोत्यांची माळ बक्षिस दिली. ती त्याच्या गळ्यात दिसते आहे पहा.' कल्याणकीर्तिच्या वक्तव्याने सर्व सभाजन प्रभावित झाले. किन्नर पक्षास पाहण्यासाठी सर्वजण टाचा उंचावून पाहू लागले. श्रीकृष्ण नावाचा उल्लेख कल्याणकीर्ति करवी ऐकून रुक्मिणीस वेध संचरला. ईश्वरी वचनामृताची साक्ष पटली.
राजाने किन्नरास सोडून आमचे समोर उभा करण्याचे सांगताच त्यास सुवर्णपिंजऱ्यातून जायबंदी केले होते. ते मुक्त करण्यात आले. सभेत शांतता पसरली. किन्नराने आपले पंख फडकावले. क्षणैक नेत्र मिटले. श्रीकृष्णांचे नामस्मरण केले. देवाने दिलेल्या मौक्तिक हारास वंदन केले. राजास वंदन केले. सभाजनांना नमस्कार केले वनवखंड पृथ्वीतळ सप्तसागरांसह सप्तद्वीपे हिमालय आदि करुन पर्वतरांगा त्यांची निर्मिती, छपन्न कोटी योजनांची भव्य बहुरत्नी वसुंधरा, त्यावर असणारी १०८ प्रमुख तीर्थस्नाने इ. च्या वर्णनाने किन्नराने शुभारंभ केला.
"हे भीमक चक्रवर्तिराया !आपण परमभाग्यधारक आहात. सर्वशक्तिमान परमेश्वराचे श्वसुर आहात. आपल्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो आहे. मला आनंदासह अभिमान प्राप्त झाला आहे. आपल्या राजकुमारीसाठी सुयोग्य वरांची माहिती मी आपणास देईन. आपण निश्चिंत असावे. वरांची माहिती मी पुरवीनच, त्यातून आपण निवड करणे हे आपले काम आहे. तेव्हां हे राजन्, आपण प्रत्यक्ष पाताळभुवनाकडे वळू या."
किन्नराने पुढे आपले ओजस्वी वर्णन चालू ठेवले, " पाताळामध्ये ३६ नागकुळे व मत्स्यकन्या आहेत. मत्स्यकन्यांचे अर्धे शरीर माशांचे व अर्धे मानवाचे आहे. ते मानवी संबंधास सर्वथैव अयोग्य आहेत. कारण ते विद्रुप देहधारी आहेत. नागकुळांच्याशी मानवी सोयरीक होऊच शकणार नाही. हे लहान मूल सुद्धा सांगू शकेल. एकंदरीत पाहता पाताळ लोकीची माहिती गोळा करणे म्हणजे वेळेचा अकारण अपव्यव होय. तूर्तास इतकेच लक्षात ठेवा की, पाताळभूमी म्हणजे सप्तद्विपाखालची जी भूमी आहे तीच पाताळ या संज्ञेस प्राप्त होते. व सप्त द्विपांप्रमाणेच सप्त पातळ आहेत. सर्वात शेवटचे ते रसातळ जाणावे."
''पाताळ भुवनानंतर आपण स्वर्गभुवनाकडे मोर्चा वळवू. इंद्र देवांचा राजा. त्याची राणी इंद्रायणी. रंभा, उर्वशी, मेनका, घृतिचित्ता इ. अष्ट अप्सरांसह ३३ कोटी देव इंद्राधिन आहेत. ऐरावत हे इंद्राचे वाहन. स्वर्गातल्या व वरच्या हद्दीच्या देवांना गायन कला, नृत्यकला करुन रिझविण्याचे काम अंतराळस्थ देवता करतात. त्या अंतराळाच्या हद्दीवर जिथे स्वर्गाची सुरुवात होते, तिथे सरहद्दीवर अंतराळातील गंधर्व देवता नाचगाण्याचे वाद्य वादनाचे कार्यक्रम करीत असतात. स्वर्गात एकंदर २१ पुया असून, २० व्या पुरीत यमपुरी आहे. देवलोक जितके सुंदर तेवढे कुरुप व आक्राळ विक्राळ रुपधारक आहेत. काही देवाना चार तोंडे, तर काहींना पाच, कुणाला चार हात तर कुणाला दहा हात. काहींना नुसते मुंडके तर काहींना नुसतेच घेऊ. कोणी हत्तीवर बसतो तर कोणी सिंहावर. कोणाला वाद्याशिवाय स्वारीच चालत नाही. कोणी अंगाला राख, गळ्यात सर्प घालून व्याघ्राबरावरच बसतात. चिंतामणी, कामधेनू, कल्पतरु, अमृत तर पाण्याप्रमाणे प्राशन केले जाते."
"एकदा देवेंद्राने गौतम ऋषी भार्या अहिल्या हिचा व तभंग केला म्हणून गौतमाने त्यास शापिले होते. तेव्हापासून देवेंद्र-भगेंद्र म्हणून सर्वांगाने विद्रुप झाला असल्याचे पुराणी लिहिले आहे. चंद्राचे कलंकित जीणे तर सूर्याचे दाहकत्वाचे जगणे. अशी ही अमरपुरी सुखकारक व काहीशी दु:खकार, काहीशी सुंदर तर काहीशी विद्रुप. त्यापेक्षा नाकीडोळस बरी व सुंदर असलेली मृत्यूलोक स्थित मानवी शरीरे बरी. इतकेच नव्हे तर बारा महिने अठरा काळ, तिन्ही त्रिकाळ अमृतास विटलेल्या देवांना मानवलोकी कशा प्रकारचे षड्रस परिपूर्ण अन्न व फलाहार असेल या विषयी उत्सुकताच फार. यावरचा एक मजेदार किस्सा ऐका."
"सात वर्षांचे भगवान श्रीकृष्ण गोपसवंगड्यांसह नित्याप्रमाणे गाई चारणे, खेळ खेळणे व एकत्रितपणे गोपाळकाला करुन जेवणे इ. करीत होते. स्वर्गस्थ ३३ कोटी देव यमुनेच्या डोहात जलचर मत्स्य, कर्म इ. बनून आले होते. उद्देश हा की ही देवाची सवंगडी पोरं भोजन होताच हात धुणे व पाणी पिणे ह्यासाठी यमुनेच्या डोहातयेतील. त्यांनी खाल्लेल्या गोपाळकाल्याचा शीतरुप प्रसाद (खरकट्या हाताचा) हस्तप्रक्षालन करताच आपणास शीतप्रवेश घडेल ह्या लालसेने सर्व देव मत्स्य, कर्म इ. जलचर बनून वाट पाहात होते. मानवी अन्न तेही भगवंतांनी परब्रम्ह परमेश्वर श्रीकृष्णांनी स्वहस्ते कालविलेले ‘गोपाळकाला' अन्न म्हणजे देवाचा महाप्रसाद कसा असेल हे पाहण्यासाठी खाण्यासाठी हे देव लोक आसुसले होते. पण...."
"पण ! भगवान सर्वज्ञ. सर्व जाणणारे. त्यांनी सवंगड्यांना सक्त ताकीद दिली. 'जेवण झाल्यानंतर कुणीही यमुनेच्या पाण्यात हात धुणे वा तेथील पाणी पिणार नाही. सोबत आणलेल्या ताकाच्या भांड्यात हात धुवायचे, ताक पाणी म्हणून प्राशन करावयाचे व आपल्या टेरीस वा घोंगड्यास हात पुसावयाचे. पण याद राखा. आजच्या दिवसापुरती ही माझी आज्ञा ऐका. असे का हे मी उद्या सांगेन. सभाव्य अनिष्ट टाळणे व माझी आज्ञा ऐकणे जो असे करील तोच देवाचा लाडका होईल व भाग्यवान ठरेल.''
"ही देवांची आज्ञा मोडण्यास कुणीही सवंगडी तयार झाला नाही. इकडे ३३ कोटी देव मार्गप्रतिक्षा करुन कंटाळून नाद सोडून स्वर्गाकडे परत फिरले.''
"हे राजा ! अशा ह्या ३३ कोटी देवांना एकट्या रावणाने बंदिशाळेत घातले होते हे तुला ठाऊक असेलच. धनीच पडला बंदिशाळे । मग कोण पुरावे नोकरांचे सोहोळे।' जे देव स्वत:च बंदिवासात जातात ते देव भक्तांना काय मुक्ती देणार ? मोक्ष ही तर फारच लांबची गोष्ट. शिवाय ह्या देवांना सतत राक्षसांच्या धाडीचा धाक असतो. अशा ह्या बंदिस्त भित्र्या व विचित्र देवांना कोण बरे आपली सुकन्या देईन ? तेव्हां हे राजन् ! आपण बहुरत्नानी वसुंधरा इकडेच आपला मोर्चा वळवू.''
"प्रथम आपण सप्त सांगरांस सलग्न असलेल्या सप्तद्वीपांकडे जाऊ.' ''जंबुद्वीप. तेथे भितीनेच धडकी भरेल अशी महाविशाल मानवांची वसति आहे. त्यांना जात ना कुळ. शेंडा ना मूळ. विकट-विद्रुपदेहधारी. ताडामाडासम ऊंचीची. तद्वतच खुजट खुरटी माणसे. लांब वाटोळे घंगाळागत नेत्र. काहीच्या जिव्हा बेंबीपर्यंत लोळणाऱ्या. घोड्यासारखे काहींचे पाय. बैलासारखी डोक्यांवी शिंगे. काहींचे कान हत्तीसारखे, तर काहींचे हरीणासारखे. सुकरमुखी, सिंहमुखी, जंबुकमुखी, अश्वमुखी, अजामुखी, गोमुखी, महिशीमुखी, सर्पमुखी देखील आहेत. अशा प्रकारांप्रमाणेच इतर सहा द्वीपे आहेत. तिकडे न जाणेच बरे. त्यापेक्षा भूतलावरील सुदेशांचे वर्णन ऐका.
'प्रथम बद्रिकाश्रम. बारा हजार वस्तींचे. सात हजार ऋषी रिद्धी-सिद्धीसाठी अक्षुण्ण तपाचरण करीत आहेत. त्यांच्या तपसामर्थ्यामुळे तेथील भूमी संपूर्ण सात्वीक बनली आहे. वसंतऋतु बारमाही तेथे सहपरिवारे वास्तव्यास आला असावा असे वाटते. विशिष्ट प्रकारच्या बदरी म्हणजे बोरफळांचा तेथे सदैव सडाच पडलेला असतो. त्यावरुनच बदिराश्रम ही नामसंज्ञा प्राप्त झाली आहे. एका बोराचे सेवनाने शरिर धष्टपुष्ट, बलदंड बनून अनंत जन्मींची क्षुधापिपासा शमली जाते. अत्रिऋषी आश्रमाचे प्रमुख असून त्यांची भार्या, अनसूया ही सात पतिव्रतांमधील सर्वश्रेष्ठ पतिव्रता म्हणून त्रिखण्डात प्रसिद्ध आहे. सोम, दुर्वास व सैंग म्हणजे एकमुखी जगद्गुरु श्रीदत्तात्रेय महाराज अशी त्यांना तीन पुत्ररत्ने झाली आहेत. श्रीदत्तप्रभूना वंदन करुन आपण पुढे निघूया."
'कनोजदेश. ३६ लक्षांची वसति. राजे शूर वीर. शहाणे सुंदर, उदार आहेत. माळीवा देश १८ लक्ष ९२ हजार जनगणनेचा. राजे सुंदर पण वाचा धड नाही."
"मारवाड नऊ कोटींचा. राजे धर्मज्ञ पण कपट कारस्थानात पटाईत. अघोरी मार्गाने जाऊन पुण्यसंचय करु पाहणारे. सत्तर हजारांचा गुजरात. राजे सुखी श्रीमंत. सगात्री, डोळस, पुण्यशील, भावीक पण भोळे आहेत. चोवीस हजारांचा अहीर देश. राजे शूर वीर. पण भाषा उग्रट, कर्कश, कठिन आहे. चौदा ताळांचे कोंकण. राजे श्रीमंत पण अष्टभोम पुरंधर. प्रबळ समुद्राचे प्रमुख भांडारी. सात लक्ष महाटे. महाराष्ट्र देशी वसति. दिसावयास सुंदर, भाषा मन्हाटी. स्पष्ट, पडखर वाणी. येथची दक्षिण गंगा गोदावरी. भविष्य पुराणांत सांगितलेप्रमाणे हिच्या उभय तीरांवर ईश्वर अवतार क्रीडा करतील. आणि ते तसेच घडले आहे. उभय गंगातीराची तीर्थयात्रा पूर्ण करणाराचे मनोरथ सिद्धीस जातील असे सांगीतले जाते.याच महाराष्ट्रामध्ये दुसरे पवित्र स्थान म्हणजे श्रीदत्तात्रेय प्रभूचे निद्रास्थान माहूरगड आहे. ते श्रीप्रभूचे क्रीडास्थान आहे. सह्याद्री पर्वतावरील हे मातापूर उर्फ माहूरगड सर्व परमेश्वर भक्तांचे रेणूका भक्तांचे आवडते ठिकाण आहे. त्रेतायुगात अलर्क त्रिविधतापे पोळला होता. आदिगुरु श्रीदत्तात्रेय महाराजांनी 'शम्बलीन-शम्बलीन्' असे म्हणत त्यास दर्शन दिले. शांत केले, निवविले. सहस्त्रअर्जुनास सहस्त्र कर दिले. परशुरामास पारधिवेष भेट दिली. ऋश्चिक ऋषीला पाचशे श्यामकर्ण घोडे दिले. यदुराजाला ज्ञान दिले. त्या श्रीप्रभूचे दर्शन अमोघदर्शनी आहे. त्यांचा अवतार चतुर्युगी क्रीडणारा आहे."
"ईशान्येस वर्हाड प्रांत. कौंडीण्यपूर नगर. राजन हे आपले राज्य वैभव पाहून, आम्ही थक्क झालो आहे. ९२ हजार १८०० वसतिंचे आपले नगर म्हणजे राजा चक्रवर्ती भीमकाचे साम्राज्य म्हणून सर्वदूरवर सुप्रसिद्ध आहे. आपल्या बलपराक्रम अन् पागुणांची थोरवी म्या पामरें काय वर्णावी?"
किन्नराचे इतर वर्णनात द्राविड देश, तेलंगदेश, कर्नाटक, ओडीया, बदर, वैरागर, लांजी, पंचगौर, बंगाल, काऊरळ, चक्रकोट, जाजनगर, गोरखपूर, झीनझीन, जालंदर, मगमंडक, नेपाळ, काश्मिर, कामरुळ, रुवंस, निषेध, निमिषारण्य, मुलतान, हस्तिनापूर, गांजना, भिंगणापूर, वैश्वानरदेश, हबसिकार देश, अरब देश, हत, प्रगति, खसिये, खुरासान, खुपरदेश, तेनियेदेश, आसुरमंडळ, दरिद्रताळ, सिंगल, गांधार, मधुरापुर, जालुधर, मधिवासु, भूमंडळ, डाहाळ, चीन, जाल्हौद, वेतालपूर, मलपांचौर,, पाडीये, मुलमंडळ, हरिताळ, चंद्रमंडळ, गजकर्ण देश, गौमुख, काळाक्ष, महीरवनगरी, रावण देश, दासर, नितंबपूर, सहपांचौर, गंधर्वदेश, कमुंडदेश, सहामुंड, नहाड, हजस, येमुख, बहाळीक, पठाण देश, सिंध देश, बांकनौर, कर्दळीवन देश, त्रिगुळ, फिरंग, हसमुंज देश,मळिवाड, कंभुज, संपीठ, सोरठ, नमियाड, रणावट, ढोलदेश, स्त्रीमंडळ देश..." इ. इ. देशांची वर्णने व नांवे ऐकून असेवाटले की, किन्नर हा पक्षी सर्वात मोठा व प्रथम पर्यटक असावा.
पुढे किन्नराने आपल्या उपसंहारास प्रारंभ केला. ''हे भीमक राजा ! मृत्यूलोकावर असे अनेक देश आहेत की, तेथील राजांचे वर्णन मी कसे करु ? हेच मला समजेनासे झाले आहे. कारण कोणताचा राजा दोषरहीत सापडणे कठिण आहे. शिवाय असा कोणताच देहीया निर्दोष निकोप नाहीये. वय, रुप, गुण, कुल, शीलसंपन्न, बलपराक्रमी, बलवान, सर्वांग परिपूर्ण असा एकहि नाही. वय, रुप आहेत पण गुण नाहीत. नुसत्या वरकरणी देखणेपणाला भुलणे योग्य नव्हे. बाह्यरंगांसह अंतरंग सुंदर असणारा एकहि वर आपल्या कन्येस सुयोग्य सापडत नाही.'' ''परंतु...''
"एक मात्र राहिला आहे. तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. परब्रम्ह परमेश्वराचा अवतार. कर्तुम् अकर्तुम् अन्यथाकर्तुम् अनंत शक्तियुक्त. योगेश्वर गोपालकृष्ण म्हणज भीमकीस योग्य वर वाटतो. शोभतो.''
आत्तापर्यंत इतर राजांचे वर्णन ऐकतांना भूमीवर पायाने चाळे करणारी खाली मान घालून अपसंति दर्शविणारी रुक्मिणी भगवान श्रीकृष्ण हे नाव ऐकताच हर्षभरीत होऊन किन्नराकडे वेधली गेली. हे सर्व भीमकाच्या चाणाक्ष नजरेतून सुटू शकर मृत्यूशय्येवर अखेरच्या घटका मोजीत बसलेल्याला अचानक अमृत संजीवनी चा अलभ्य लाभ व्हावा, तसे रुक्मिणीस झाले. ती रोम रोम खष झाली. तिच्या मुख 'पूर्ण चद्राचे तेज प्रकाशले की काय? असे पाहणाऱ्यास वाटत हात....
क्रमशः
लेखक :- सद्भक्त गोपाळ देगावकर (पुणे)
तिसरा भाग 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/003.html