प्रमाणमन्तः करणप्रवृत्तयः संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit rasgrahan

प्रमाणमन्तः करणप्रवृत्तयः संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit rasgrahan

 खालिल सुभाषिताचे रसग्रहण करा

आजची लोकोक्ती - प्रमाणमन्तः करणप्रवृत्तयः। अर्थात - ऐकावे जनाचे करावे मनाचे 

असंशयं क्षत्रपरिग्रहक्षमा यदार्यमस्यामभिलाषि मे मनः।

सतां हि सन्देहपदेषु वस्तुषु प्रमाणमन्तःकरणप्रवृत्तयः॥

               - १.२२, अभिज्ञान शाकुन्तलम्.                 अर्थ :- निःसंशय ही (कुमारिका) क्षत्रियाद्वारे पाणीग्रहण करण्यास (वरण्यास) योग्य अशी आहे. कारण माझे विशुद्ध मनदेखील हिच्याकडे आकर्षित झालेले आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी संदेह (शंका) उपस्थित होते, तेव्हा सत्प्रवृत्त माणसांनी आपल्या अंतःकरणाचे, मनाचे ऐकायला हवे. 

         प्रस्तुत प्रसंग 'महाकवी कालिदास' यांनी लिहिलेल्या अभिज्ञान शाकुंतल ह्या नाटकाच्या पहिल्या अंकामधील आहे. राजा दुष्यंताने जेव्हा शकुंतलेाला कण्व ऋषींच्या आश्रमात पाहिले तेव्हा त्याच्या मनात शकुंतलेविषयी आकर्षण निर्माण झाले, मात्र त्याला शंका आली की 'हा ऋषींचा, तपस्व्यांचा आश्रम आहे त्यामुळे ही ब्राह्मणकन्या तर नसावी?' त्यावेळी दुष्यंताने मनोमन विचार केला, 'निश्चितच ही कोण्या क्षत्रियाची कन्या असावी अन्यथा माझे (क्षात्रतेजाने संस्कारित) मन तिच्याकडे आकर्षितच झाले नसते.'

       'अभिज्ञान शाकुंतल' मधील उपरोक्त श्लोक वाचल्यावर संतकवी तुलसीदासरचित 'रामचरितमानस' मधील प्रसंगाचा इथे उल्लेख करावासा वाटतो आहे. सीतास्वयंवरासाठी श्रीरामचंद्र मिथिलानगरीस गेले असताना लक्ष्मणासह जनकाच्या राजमहालानजिकच्या उद्यानात विहार करत असताना त्यांना सीता दिसते त्या समयी श्रीरामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात,

तात जनकतनया यह सोई।

धनुषजग्य जेहि कारन होई॥

पूजन गौरि सखीं लै आईं।

करत प्रकासु फिरइ फुलवाईं॥

जासु बिलोकि अलौकिक सोभा। 

सहज पुनीत मोर मनु छोभा॥

सो सबु कारन जान बिधाता

फरकहिं सुभद अंग सुनु भ्राता॥

रघुबंसिन्ह  कर  सहज   सुभाऊ ।

मनु कुपंथ  पगु  धरइ  न  काऊ ॥

मोहि अतिसय प्रतीति मन केरी ।

जेहिं  सपनेहुँ  परनारि  न  हेरी ॥

      हे बंधु लक्ष्मणा, ही तीच जनकाची कन्या आहे, जिच्यासाठी हा धनुष्ययाग होत आहे. तिच्या सख्या तिला गौरी पूजनाकरिता घेऊन आल्या आहेत. या उद्यानात ती फिरत असताना सगळीकडे (तिच्याच मुखचंद्राचा) प्रकाश पडलेला दिसतो आहे. (सीता इतकी सुंदर आहे कि सर्व सख्यांमध्ये तीचे सौंदर्य उठून दिसत आहे, जणू तिच्या मुखचंद्राची प्रभा उद्यानात सगळीकडे पसरली आहे.)

      जिचे अलौकिक सौंदर्य पाहून स्वभावतःच पवित्र असलेले माझे मन क्षुब्ध झाले आहे. माझे मन असे का झाले? याचे कारण विधाताच जाणो. परंतु हे बंधो! माझा सुमंगल असा (उजवा) बाहू स्फुरत आहे, माझी (उजवी) पापणीदेखील लवलवते आहे. रघुवंशियांचा हा सहज (जन्मजात) स्वभाव आहे की, ते कधी मनानेही कुमार्गावर पाऊल ठेवत नाहीत. माझा तर स्वतःच्या मनावर निरतिशय विश्वास आहे, ज्याने कधी स्वप्नातही परस्त्रीकडे पाहिलेलं नाही.

     पुढे सीतेचेही सौंदर्यवर्णन आणि रामाला त्या उद्यानात पाहून झालेली तिची अवस्था तुलसीदासांनी अतिशय मनोहर अशा शब्दांमध्ये गुंफलेली आहे. अभिज्ञान शाकुंतल मधील श्लोक वाचून  रामचरितमानस मधील हा प्रसंग आठवला म्हणून या ओळी शोधून इथे नमूद केल्या. 'शाकुंतल' असो किंवा 'रामचरितमानस' त्याकाळातील क्षात्रवर्णानुरुप असे राजपुत्रांवरील संस्कार मात्र दोन्ही प्रसंगातून दिसून येतात.

  असो, वरील श्लोकातील  'प्रमाणम् अन्तःकरणप्रवृत्तयः।'   ह्या उक्तीशी अर्थसाम्य असणारी 'ऐकावे जनाचे करावे मनाचे.'  ही म्हण मराठीत आहे. जेव्हा अनेकजण आपल्याला अनेक प्रकारचे सल्ले देत असतात, अशा वेळी मनात एखादीसुद्धा शंका उपस्थित झाल्यास त्यावर विशुद्ध मनाने; विवेकबुद्धीने सारसार विचार करून जे उत्तर मिळते तेच ऐकावे, अंतःकरणाचा कौल घ्यावा.    मागील सुवचनानिमध्ये आपण मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः।  ह्या लोकोक्तीतून मूर्ख, निर्बुद्ध लोक एखाद्या गोष्टीबाबत कसा विचार करतात? कसे मत बनवतात? हे पाहिले. आज प्रमाणम् अन्तःकरणप्रवृत्तयः।  ह्या लोकोक्तीमधून सद्विचारी सुसंस्कारी व्यक्ती कशाप्रकारे निर्णय घेतात हे जाणून घेता आले.    

     सद्गुण संपन्न माणसांच्या मनात जेव्हा एखाद्या वस्तू, प्रसंग किंवा व्यक्ती यांच्या विषयी शंका निर्माण होते, तेव्हा ते विशुद्ध मनाने; निर्मळ अंतःकरणाने; विवेकबुद्धीचा उपयोग करून निर्णय घेतात. संस्कृतमध्ये म्हटले जाते की, 'मनः हि हेतुः सर्वेषाम् इन्द्रियाणां प्रवर्तने।' 

      सर्व इंद्रियांच्या प्रेरणेने आपले मन वर्तन करीत असते. हेच पहा ना, कानांना जे श्रवणीय वाटते ते ऐकण्यातच मनही रुची घेते; जे कानांना जे नको वाटते ते ऐकायला मनही प्रवृत्त होत नाही. जीभेला ज्यात रूची असते ते खाण्यास मन आपल्याला उद्युक्त करते; जो पदार्थ जीभेला अप्रिय असतो तो खाण्याची इच्छा मनदेखील करत नाही. 

अगदी ह्याच प्रमाणे पहाणे; गंध घेणे, कठीण-मृदू किंवा शीत-उष्ण स्पर्शाची अनुभूती घेणे ह्यांच्याशी संबंधीत विषयातील आवड-नावड मन त्या इंद्रियाच्या त्या त्या बाबतीतील रुचीनुसार ठरवते. वरील सर्व इंद्रीयविषयांच्या संदर्भात सामान्य मनुष्य विशुद्ध मनाचे किंवा निर्मळ अंतःकरणाचे मत प्रमाण मानतो. परंतु सुसंस्कारी माणूस मात्र फक्त इंद्रियांच्या सुखदुःखाचाच विचार करत नाही तर त्याहीपुढे जाऊन तो निर्मळ अंतःकरणाला विवेकबुद्धीची जोड देतो, अनुभवांच्या आणि शिक्षणाच्या सहाय्याने प्राप्त केलेले ज्ञान कसोटीस लावून निर्णय घेतो. यालाच प्रमाणम् अन्तःकरणप्रवृत्तयः। म्हणावे.

     तुकोबारायांच्या एका अभंगातील पद आहे,

तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण।

ठकावे हे जन तैसे न हों। 

 तुकोबाराय म्हणतात परमेश्वराचं प्रामाण्य आम्हालाच माहिती आहे. इतरजन फसतात तसे कोणीही यावे आणि त्याबाबतीत आम्हाला फसवावे इतके आम्ही मूर्ख बावळट नाही आहोत. मोठमोठाल्या बाता मारून आध्यत्म कळत नसते, आध्यात्म स्वानुभवाचा, अंतःकरणाला साक्षी ठेवून स्वपरीक्षणाने जाणायचा, उमजायचा विषय आहे. मग विचार करा कालिदासाने लिहिल्यानुसार सतां हि सन्देहपदेषु वस्तुषु प्रमाणमन्तःकरणप्रवृत्तयः। हे खरे आहे की नाही? संतसज्जन सुसंस्कारी माणसे निश्चयात्मक विवेकबुद्धीने अंतःकरणाला प्रमाण मानून साक्षीभूत ठेवून निर्णय घेतात. प्रमाणमन्तःकरणप्रवृत्तयः।

लेखक :- अभिजीत काळे

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post