भाग 01 :- नामधारकाचा आचारधर्म (असतिपरी)
नामधारकाचे आचरण (सर्वसामान्य आचरण)
१. प्रत्येक नामधारकाची एक आचारवंत उपदेशी म्हणजे कट्टरउपदेशी म्हणून ओळख असावी.
२. महानुभाव पंथाचा अनुयायी म्हणून प्रत्येकाला त्याचा अभिमान असावा.
३. प्रत्येक नामधारकास पंथाचे प्राथमीक ज्ञान असावे.
४. आपण करीत असलेल्या आचाराचे समर्थन करता आले पाहिजे.
५. पंथातील सर्व विधी निषेधांचे ज्ञान असावे.
६. ज्ञान प्राप्तीसाठी संत सहवास व धार्मिक पुस्तकांचे वाचन करावे.
७. त्रिकाल विधीपूर्वक देवपूजा करावी.
८. प्रातःकाळी पहाटेच्या वेळी नित्य नामस्मरण करावे.
९. सांसारीक उद्योग करतांना परमेश्वराचा वेध असावा.
१०. नामस्मरण निष्काम भावनेने करावे.
११. नेहमी नर्काची भिती असू द्यावी.
१२. नियमीत आहार नियंत्रीत असावा.
१३. रात्री १० वाजेच्या आत झोपावे व पहाटे उठावे
१४. संतांच्या सहवास जास्तीत जतास्त राहवे.
१५. परमेश्वराच्या गुणानुमोदना व्यक्तिरिक्त इतर गीत गाऊ, ऐकू नये.
१६. संधी मिळाली असता, आजारी/अशक्त महात्म्याची सेवा करावी.
१७. पूर्ण आचरण शक्य नसेल तर निदान आचरणाची हाव धरावी
१८. नेहमी परमेश्वर अप्राप्तीचे दुःख करावे.
१९. गृहस्थधर्मातील प्रत्येक कर्म ईश्वरार्पण करावे
२०. दंडवत घालतांना उत्तर दिशा, भिक्षुक, वासनिक, देवपूजा इ. कडे पाय करु नये.
२१. साधू संतांच्या आसनास पाय लागू देवू नये ; संतांसमोर त्यांच्या आसनापेक्षा उच्च आसनावर बसू नये.
२२. साधूसंत/गुरुवर ईश्वर बुध्दी ठेवू नये.
२३. गृहस्थधर्मीया नामधारकांनी श्राध्द, देवता-भक्ती, व्रत वैकल्य, उपवास इ. विकल्पजन्य क्रिया करु नये.
२४. पैसे देवून भिक्षुकांकडून धार्मिक क्रिया करून घेऊ नये (उदा. पारायण वगैरे) शक्यतो आपणच पारायण करावे. कारण स्वतः केलेले धार्मिक विधीच देवाच्या स्वीकारात पडतात.
२५. ईश्वर देवपूजेत, परमेश्वर अवतार चरणांकीत नसलेल्या मुर्ती, फोटो, मृतात्म्याची प्रतिमा इ. ठेवू नये.
२६. रागावर नियंत्रण ठेवावे, रागाच्या भरात इतरांचे मन दुःखवू नये. इतरांना शिव्या शाप देऊ नये. वैर चिंतू नये.
२७. इतरांचे वैभव पाहून दुःखी होऊ नये.
२८. कुणाशीही वैर, अबोला धरु नये. द्वेष करू नये. चुगली चाहाडी करू नये. क्रोधावर नियंत्रण ठेवावे, भौतिक सुख साधनांच्या आहारी जाऊ नये.
२९. मनोरंजनात, गप्पा गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा ईश्वर स्मरणात, धार्मिक पुस्तके वाचण्यात वेळ सत्कारणी लावावा, या प्रमाणे सद्विचारांनी वागल्यामुळे अनेक वाईट कर्मापासून बचाव होऊन आपला नर्कभोग टाळला जातो असे वर्तन गृहस्थधर्मीयाला आवश्यक आहे.
३०. संसारात समाधानी व त्यागी वृत्ती ठेवावी. आपणास प्राप्त झालेले वैभव, ऐश्वर्य, संपत्ती हा एक विश्वस्त निधी आहे. ती ईश्वराची देणगी आहे. या भावनेने पहाणे आणि त्याचा लोभ न बाळगता प्रसंग परत्वे योग्यरित्या खर्च करणे यास उत्तम व्यवहार असे म्हणतात. परोपकारी असावे, कोणाचीही अडवणूक करु नये. धार्मिक कार्यासाठी पैसा खर्चावा. सदैव प्रयत्नशील, प्रसन्नचित्त आणि शांत राहावे.
३१. आपला व्यवसाय नसतांना ज्या व्यवसायात हिंसा घडते असा व्यवसाय करु नये.
३२. संसारात अविहित कर्मांचा त्याग करुन परमेश्वराच्या नाम स्मरणादी उपासनेत आयुष्य घालावे.
दंडवत प्रणाम !
काही विशेष महत्त्वाच्या बाबी :
उपदेश घेण्यास लागणारी योग्यता -
महानुभाव पंथ हा ईश्वर भक्तीमार्ग आहे. या श्रेष्ठ भक्तीमार्गात प्रवेश करण्यासाठी मनुष्याला काही मानवी सद्गुणांचा अवलंब व आसूरी विचारांचा सर्वप्रथम त्याग करणे आवश्यक आहे. आसुरी प्रवृत्तीमध्ये प्रामुख्याने सप्तव्यसन मोडतात. त्यांचा आपल्या जीवनातून सर्वस्वी परित्याग केल्यानंतरच ईश्वराच्या धर्मप्रवेशास (उपदेश घेण्यास) योग्य ठरतो.
सप्त व्यसन :-
१) मद्य(दारु) पिणे
२) मांस खाणे
३) जुगार खेळणे
४) शिकार करणे
५) चोरी करणे
६) परस्त्रीगमण
७) वेश्यागमण
या सप्तव्यसनांचा त्याग करावा.
निष्काम भक्ती :
प्रत्येकाने कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता चतुर्विध साधनांच्या ठायी (स्थान प्रसाद, भिक्षुक, वासनीक) अत्यंत भावभक्तीने भजनपूजन करणे यास निष्काम भक्ती म्हणतात.
उपदेशी ईश्वरभक्ताचा विशेष आचार : (दिनचर्या)
१. कमीत कमी एक प्रहर (तीन तास) ईश्वरार्पण करावे -
परमेश्वर धर्मात प्रवेश केल्यानंतर (उपदेश घेतल्यानंतर) आपल्या दिनचर्येतला एक प्रहर म्हणजेच कमीत कमी तीन तास ईश्वरार्पण करण्याचा संकल्प धारण करावा. त्या एक प्रहरमध्ये परमेश्वराचे भजन, पूजन, वंदन, स्तवन, स्मरण, लीला पठन व सुत्रपाठ पारायण आदि विधी आचरण करावे. २४ तासातील तीन तास ईश्वरार्चनासाठी काढणे सहज शक्य आहे. 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.'
२. प्रत्येक प्रापंचिक कर्म श्रीकृष्णार्पण करावे -
ईश्वर भक्तीचे जे अधिकारी जीव आहेत त्यांनी प्रापंचिक कर्म करीत असतांना सर्व कर्मे श्रीकृष्णार्पण करीत कर्तव्यपूर्ती करावी व परमेश्वराची अनन्य भक्ती करीत राहावी. यामुळे ईश्वरभक्तीरुपी मोक्षमार्ग सुकर, सहज व सुलभ होईल.
३. दिवसाची सुरुवात ईश्वर स्मरणानेच करावी -
रोज सकाळी ३ ते ६ च्या दरम्यान उठावे. शुचिर्भूत होऊन स्वच्छ आसनावर सुखासनात बसून एकाग्रचित्ताने पाचही अवतारांच्या नामाची एकएक गाठी व तद्नंतर फक्त पाचव्या नामाच्या ५ गाठ्या अशा प्रकारे १० गाठ्या सकाळी अरुणोदयापूर्वी कराव्यात. नंतर प्रातःकाळची देवपूजा करावी.
--
४. नित्य नियमाने रोज प्रातःकाळची देवपूजा करावी -
देवपूजेच्या आससनावरील विशेषांवर असलेले मुखवस्त्र सारुन प्रातःकाळची आरती म्हणून देवपूजेला उठवावे. तद्नंतर गाळून घेतलेल्य पाण्याने हात धुऊन स्वच्छ वस्त्राने हात कोरडे करावेत व खाली बसून विधीपूर्वक देवपूजा (वंदन) करावी. विशेष वंदन करतांना विशेषास उलवे पालटे करु नये. त्यामुळे अवहेलनात्मक दोष लागतो व नकळत अविधीचा संचार होतो. अशा प्रकारे शांत मनाने आदरयुक्त अंतःकरणाने व प्रसन्न चित्ताने देवपूजा करावी. नंतर चंदनतिलक व सुगंधी पुष्प अर्पण करावे. विडा आसनावर दिवसभर ठेवून त्यावरील पैसे वेगळ्या डब्यात संचित करावे, प्रातःकाळचा पुजा अवसर म्हणावा. तद्नंतर धूप उदबत्ती व आरती
ओवाळावी. पाचही अवताराच्या नावाने पाच दंडवत घालावे. त्यानंतर प्रसव मोडण्यासाठी दोन दंडवत घालावेत.
५. दुपारचा पूजा अवसर सुध्दा विधीपूर्वक करावा -
दुपारी घरच्या गृहिणींनी किंवा घरी असलेल्या सद्गृहस्थांनी दुपारचा पुजावसर म्हणावा. विशेषवंदन करावे, धूप आरती ओवाळावी, पुष्प वाहवे. ताज्या भोजनाचा उपाहार भरुन संकल्प सोडावा. प्रभूला भोजनासाठी पाच दंडवते घालावीत. प्रार्थना म्हणावी. पाच गाठ्या किंवा एक गाठी स्मरण करावे. उपहारातील प्रसाद घरातील सर्वजणांनी आपल्या भोजनात मिसळून खावा. जेवतांना एखादी भोजनाची लिळा आठवावी. प्रसन्न चित्ताने जेवावे, उष्टे सोडू नये.
६. सायंकाळचा पूजावसर विधीवत असावा -
सायंकाळी म्हणजे सहा ते सात वाजेच्या दरम्यान सर्व सदस्यांनी एकत्र बसून पूजावसर म्हणावा. शक्य नसल्यास कॅसेट लावून, वातावरण निर्मिती करावी. नंतर एकत्र बसून देवपूजा करावी. प्रत्येकाने स्वतंत्रपणे देवपूजा करु नये. अवहेलनात्मक दोष लागतो. शक्य नसेल तर मागे राहीलेल्या व्यक्तिने क्षमायाचना करुन क्षेद दिल्याचा दोष लागू नये. म्हणून प्रार्थना करुन देवपूजा करावी. धूप आरती ओवाळावी. आरती आधी मोठ्यांना व साधूंना ओवाळायला द्यावी.
७. देवपूजा विधी झाल्यावर परस्परांना दंडवत प्रणाम करणे -
देवपूजा विधी झाल्यावर लहान मोठ्या सर्वांनीच सर्वांना कमरेत थोडे वाकून दंडवत प्रणाम करावा. दंडवत प्रणाम ह्या पूर्ण शब्दाचे उच्चारण करावे. नुसते दंडवत म्हणू नये
एक महानुभाव पंथच जगातील एकमेवाद्वितीय पंथ आहे. जो सर्वांना एकमेकास दंडवत प्रणाम करण्याची शिकवण देतो. कारण, न जाणो कोणत्या जीवाला ईश्वराचा किती तोष आहे. ईश्वराच्या तोषाला पात्र असलेल्या जीवास दंडवत प्रणाम करुन आपणही परमेश्वराच्या प्रसन्नतेला पात्र व्हावे.
हा दैनंदिन विधी नियमपूर्वक प्रत्येक उपदेशी साधकाच्या घरी रोज होणे आवश्यक आहे. रात्री जर ताजे भोजन असेल तर त्याचा उपहार दाखवावा. नाहीतर दुधाचा उपहार दाखवून संकल्प सोडावा.
८. रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे -
रात्रीच्या जेवणानंतर जास्तवेळ टी. व्ही. समोर बसून वेळ वाया न घालविता दहापर्यंत झोपण्याची सवय लावून घ्यावी. म्हणजे पहाटेला जाग येते. झोपायच्या आधी कमीत कमी पाच गाठ्या पाच नामाचे स्मरण अवश्य केले पाहिजे.
९. कोणत्याही परिस्थितीत अन्य देवी देवतांना शरण जाऊ नये -
कोणतीही दृष्टपर इच्छा असो, कोणतेही काम असो त्यासाठी अन्य ज्योतिषी, तांत्रिक, मांत्रिक, देवी-देवतांना शरण जाऊ नये. त्यामुळे विकल्प दोष लागतो. व परमेश्वर सृष्टीपर्यंत उदास होतात. का देवता भाग्यात असेल तरच देणार. ईश्वर सर्वसमर्थ आहेत. अनार्जित दाता आहेत, जे आपल्या भाग्यात नाही ते सुध्दा परमेश्वर देतात. गरज आहे फक्त एकनिष्ठ भक्तीची, अतूट श्रध्देची व योग्य विधी आचरणाची.!
१०. दर आवठवड्यातून एक दिवस देवपूजेस मंगल स्नान करावे
आठवड्यातून एक दिवस (शुक्रवार/रविवार) आपल्याजवळ असलेल्या आसनावरील सर्व संबंधीत विशेषांना मंगल स्नान घालावे. त्यासाठी प्रथम पान सुपारीचा विडा अर्पण करावा ; प्रार्थना करावी; दोन दंडवत घालावे; स्वच्छ हात धुवून स्वच्छ पात्रात (परातीत) विशेष ठेवून दुध/दही केळी शिकरण याने विशेषांची हलक्या हाताने मर्दना करावी. दुसऱ्या हाताने उष्णोदकाने विशेषांवर हळूवार पाणी ओतावे. स्वच्छ कापडाने विशेष कोरडे करावे ; आसनावरील वस्त्र बदलावे व विशेषांची यथावत स्थापना करुन सुगंधी तेल/अत्तर लावावे नंतर अष्टगंध केशर आदिचा मंगल तिलक लावावा. पुष्प/पुष्पहार समर्पित करावे.
स्नानाचे पाणी (चरणोदक) सर्वांनी दोन दोन थेंब तोंडात टाकावे; बाकीचे झाडाच्या बुडाला आळ्यात जेथे आपला पाय पडत नाही अशा ठिकाणी टाकावे. मोरीत वा गटारीत चरणोदक टाकू नये; नंतर पान सुपारीचा विडा अर्पण करावा. दक्षिणा ठेवावी ; आरती उदबत्ती ओवाळावी ; विड्यावर ठेवलेले पैसे स्वतंत्र साठवावे. घर खर्चास वापरु नये ; योग्य साधूंना श्रीकृष्णार्पण करावे.
* काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी
१. पूजाघर मंगलमय वातावरणात असावे -
२ शक्य असल्यास पूजा घरासाठी स्वतंत्र छोटी रुम असावी.
३ त्या ठिकाणी छोटेसे मंदिर दक्षिणामूखी स्थापावे.
४ मंदीरास कमीत कमी तीन पायऱ्या असाव्यात.
५ पुजागृहात सर्व दैनंदीन विधी, पूजा, आरती, स्मरण, उपहार, पारायण करावे.
६ अनावश्यक गोष्टी टाळून पूजा गृहाचे पावित्र्य राखावे. - देवपूजेसमोर उच्च आसनावर बसू नये; चामडी वस्तू ठेवू नये. - अडचणीच्या जागी देवपूजा नसावी... -- पूजागृह पुर्वोत्तर (ईशान्य) कोपऱ्यात साधता आले तर अतिउत्तम.
११. देवपूजेतील विशेष/प्रसादाचा संग्रह विधीवत् असावा -
देवपूजेतील प्रसाद विशेषादि वंदनाच्या वस्तू प्रसन्नतेने श्रीगुरुकडून संत पुरुषांकडून प्राप्त झालेलेच असावे. देवपूजा, मूर्ति, प्रसादजोड विकत घेऊ नये. त्या अमूल्य वस्तुचे आपण मुल्य केल्यामुळे खुप मोठा दोष लागतो.
- चोरुन घेऊ नये, अथवा इतरांकडून अतिआग्रहाने त्यांचे मन दुखवून घेऊ नये.
- जास्त पूजा प्रसादाचा संग्रह केल्यानेच मोक्ष प्राप्त होणार असा गैरसमज मनात असेल तर तो काढून टाकावा.
- प्रसन्न होवून दिलेलाच प्रसाद असतो; तोच वंदनाचे गोमटे देवू शकतो.
१२. आपल्या उत्पन्नाचा १०% भाग धार्मिक कार्यासाठी वापरावा -
- आपले जे मासिक/वार्षिक उत्पन्न असेल त्याचा १०% भाग धार्मिक कार्यासाठी म्हणजे दान, तीर्थाटन इ. साठी वापरावा.
- वर्षातून एकदा तरी तीर्थाटन करण्यासाठी वेळ काढावा.
- चतुर्विध साधनवंताच्याच ठिकाणी भजन, पूजन, दान करावे.
- अन्य जीवाच्या ठिकाणी पुण्यभावनेने भजनादि क्रिया करु नये. (उदा. कुत्र्याला, कावळ्याला, कबूतराला, टाकणे इ.)
- अन्य भजनामुळे ईश्वरभक्ती मार्गावरुन पतन होऊन देवताभक्तीची चाल सुरु होते.
१३. घरातील मुलामुलींवर परधर्माचे संस्कार टाकावे -
- धर्माचरणाचे नियम आपण स्वतः काटेकोर पाळावे व मुलामुलींकडून पाळून घ्यावे.
- मुलांना संस्कारीत करुन दृढ करावे. त्यांच्या शंका निरसन कराव्या. - मुलगा असो वा मुलगी १२ वर्षानंतर त्यांना उपदेश देऊन टाकावा.
- मुलीचे पुढे कसे होईल! या विचाराने मुलींना परावृत्त ठेवू नये.
- परमेश्वरावर दृढ श्रध्दा ठेवून त्या जीवाचे नुकसान टाळावे.
१४. व्रत वैकल्य उपास इ. क्रिया परमेश्वर साधकाने करु नये. -
- शरीराच्या अवयवांना विश्रांती म्हणून उपवास करावा पण व्रत म्हणून उपवास करु नये.
- लग्न, गृहप्रवेश, वास्तूशांती, भुमीपूजन इ. कार्यक्रम महानुभाव साधूसंताकरवी संपन्न करावे. विकल्प टाळावा.
१५. व्यावसायीक जीवनात हिंसा कमीत कमी करावी -
- उठता-बसता, खाता-पिता, चालता-बोलता, इ. व्यवहार करतांना हिंसा कमीत कमी होईल याची दक्षता घ्यावी.
- घरात उंदीर, झुरळे, मुंग्या, पाली, साप इ. मारण्यासाठी विषारी द्रव्ये औषधी वापरु नयेत. पर्यायी निर्हिंसक उपाय करावा.
- व्यावसाईक कामात न टाळता आल्यास प्रायश्चित करुन घ्यावे.
१६. आपल्या जीवनात सेवाभाव असावा -
- सेवादास्यामुळे अंगी नम्रता प्राप्त होते ; स्वयं दास्य करावे म्हणजे इतरांकडून सेवा करुन घेऊ नये.
उर्वरित माहिती पुढच्या भागात...
भाग 002👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/12/02.html
संकलित
खूप छान माहिती दिली, दंडवत प्रणाम 🙏
ReplyDelete