23-5-2022
अर्थार्थी जीवलोकोऽयम्
Sunskrit Subhashit Sahitya
संस्कृत सुवचनानि -
आजची लोकोक्ती - अर्थार्थी
जीवलोकोऽयम्।
अर्थार्थी जीवलोकोऽयं
श्मशानमपि सेवते।
त्यक्त्वा जनयितारं स्वं
निःस्वं गच्छति दूरतः॥
- 'पंचतंत्र', विष्णूशर्मा.
अर्थ :- ह्या जीवलोकात (पृथ्वीवर) मनुष्य धन
(पैसे) मिळविण्यासाठी स्मशानातही नोकरी
करतो, (एवढंच
नाही तर) मनुष्य धनप्राप्ति
(धनार्जनासाठी) आपल्या जन्मदात्या मात्यपित्यांनाच नव्हे तर आपल्या देशालाही सोडून
दूर जातो. हा जीवलोक अर्थार्थी आहे
धनाच्या मागे पळणारा आहे.
टिप :- हे जग अर्थार्थी आहे याअर्थी, इथे प्रत्येकजण पैशांमागेच धावताना
दिसतो. या अर्थाने अर्थार्थी जीवलोकोऽयम्। ही
लोकोक्ती पंचतंत्रातील वरील सुभाषितापासून प्रचलित झाली आहे.
पंचतंत्राचे
रचनाकार विष्णूशर्मा यांच मत आहे की जीवनधारणा (आयुष्यनिर्वाह) पैशांशिवाय
(धनाशिवाय) शक्य नाही, म्हणून
मनुष्य धनार्जनासाठी कोणताही व्यवसाय वा नोकरी करण्यास विवश होतो.
काही व्यवसाय आणि नोकर्यांना समाजात प्रतिष्ठित
मानले जाते, त्यामुळे
लोक त्या करण्याचा प्रयत्न करतात आणि सौभाग्याने त्या नोकरी वा धंद्यात यशही
मिळवतात. परंतु सगळेच इतके भाग्यवान किंवा पात्र असू शकत नाहीत. त्यामुळे काहींना
निकृष्ट श्रेणीचे कार्यही स्वीकारावे लागते किंवा धनार्जअसाठी घर, देश सोडून दूर जावे लागते. हे
पंचतंत्रामधे विष्णूशर्म्याने इसवीसन पूर्व तिसर्या शतकात लिहिलं आहे. आजकालच्या
काळात तर या गोष्टी सामान्य झाल्या आहेत.
पोटापुरता पैसा कमविण्यासाठी प्रत्येकजण इथे प्रयत्न करतो पण खरे धन कोणते ते मात्र कोणालाच कळत नाही. आजवर अनेक संतमहात्म्यांनी हेच सांगितलंय की जे धन तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती करून देईल तेच खरे धन आजच्या युगात नामरुपी धनच आपली परमेश्वराची भेट घडवून देणार आहे. त्यामुळे त्याचाच संचय करवा असे संतांनी परोपरीने सर्वांना विनविले आहे. संत तुकाराम सांगतात,
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा श्रीरंगा ॥१॥
देह हें काळाचे धन कुबेराचे । येथें मनुष्याचे काय आहे॥२॥
देता देवविता नेता नेवविता । येथे याची सत्ता काय आहे॥३॥
निमित्ताचा धणी केला असे प्राणी । माझे माझे म्हणोनी व्यर्थ गेला॥४॥
तुका म्हणे कां रे नाशवंतासाठीं । देवासवें आटी पाडितोसी॥५॥
धनामागे धावणार्यांसाठी तुकोबा सांगतात की आताच योग्य वेळ आहे ऊठा, घाई करा आणि परमेश्वराचा ध्यास धरा.
देह हे काळाचे खाद्य आहे तर धन कुबेराचे आहे.मनुष्य निमित्तमात्र या सगळ्याचा धनी
आहे. देणारा आणि नेणार परमेश्वरच आहे मनुष्याची इथे काहीच सत्ता नाही. पण मनुष्य
सगंळ मी केलं या व्यर्थ मोहात आयुष्य वाया घालवतो. तुकोबाराय म्हणतात अरे माणसा
ह्या सगळ्या नश्वर क्षणभंगुर सुखासाठी आयुष्य पणाला लावू नका. तुम्ही देवाचे आहात
देवाचेच व्हा.
धनाची नश्वरता व निरर्थकता सांगताना संतकवी रहीमही आपल्या दोह्यात म्हणतात,
विपति भए धन ना रहे, होय जो लाख करोड़ ।
नभ तारे छिपी जात है, ज्यों रहीम भए भोर ॥
विपत्ती आली काही संकट आलं की तुमच्याकडं भले लाखो करोडोची संपत्ती असो ती काहीच कामाची नाही.अहो सकाळ झाली की रात्रीची संपत्ती असलेले तारकांनी भरलेले आकाशही लोप पावते तिथे तुमच्या धनाचं काय घेऊन बसलात. म्हणून धन साठवायचंच असेल तर कुठलं धन साठवावं हे संत कबीरांनी ह्या दोह्यातून सांगितलं आहे,
कबीर सो धन संचे, जो आगे को होय।
सीस चढ़ाए पोटली, ले जात न देख्यो कोय॥
कबीर म्हणतात धन संचय करायचा असेल तर अशा धनाचा साठा करा जो मृत्यूनंतर कामाला येईल तुम्हाला योग्य गती देईल पैशाची पोतडी डोक्यावर घेऊन तुम्ही कोणाला जग सोडून जाताना पाहिलंय का? पण मनुष्याला हेच कळंत नाही म्हणून, अर्थार्थी जीवलोकोऽयम्। ही विष्णुशर्म्याची उक्ती या जगाला तंतोतंत लागू पडते
संकलन व टिप - अभिजीत काळे,
सुभाषित दुसरे :-
चला लक्ष्मीश्चलाः प्राणाश्चले जीवितमन्दिरे।
चलाचले च संसारे धर्म एको हि निश्चलः ॥
अर्थ :- लक्ष्मी चंचल आहे, प्राण, जीवन, शरीर सर्वकाही चंचल व नाशवान आहे. या चलाचल (अस्थाई) संसारात (विश्वामध्ये) केवळ (मानवतेचा, सदाचरणाचा) धर्म ही एकच गोष्ट निश्चल आहे.
टीप - इथे धर्म हा शब्द अनेक अर्थ घेऊन येतो. या विश्वात जन्माला आल्यावर प्रत्येक प्राण्याला (सजीवाला) जीवितपालन हा धर्मच आहे त्यातून कोणाचीही सुटका नाही. पण या विश्वात विशेष प्राणी मानव आहे. मानवाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर विविध प्रदेशातील मानवाचे त्या त्या ठिकाणच्या मान्यतेनुसार अनेक धर्म आहेत व भौगोलिक परिस्थिती नुसार अनेक कर्तव्य आहेत. तरीही या विश्वातील सर्व धर्म व कर्तव्यांमधे मानवता व सदाचरण या दोनच गोष्टी सअयिक आहेत. म्हणूनच साधारणतः इथे (या सुभाषितामधे) धर्माचा अर्थ मानवता व सदाचरण हाच अपेक्षित आहे असे वाटते.
आता धर्म म्हणजे नक्की काय याचा मूळ विचार करू. आपण सारे परब्रह्माचे (परमेश्वराचे) अंश आहोत. मात्र त्यापासून वेगळं व्हायच्या आणि स्वतंत्र सुख उपभोगायच्या इच्छेने इथे अनेक योनींमध्ये जन्ममृत्यूच्या फेर्यात अडकतो. खरा जो धर्म आहे तो म्हणजे पुन्हा ह्या संसारापासून मुक्ती मिळवून परब्रम्हाशी एकरूप होणं म्हणजेच जन्ममृत्यूच्या आवर्तनापासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करणं हाच होय. ज्याचे आहोत त्यातच सामावणं. हाच भारतीय संस्कृतीचा आणि सर्व संतमंडळींचा संदेश आहे. हेच परमकर्तव्य म्हणजे धर्म आहे.
टीप :- अभिजीत काळे सर