मीच माझा घात केला !!
स्वामी वियोग
सदर काव्यात म. प्रभाकरदादा पंचसरिताख्य यांनी परमेश्वराचा वियोग मला कशामुळे प्राप्त झाला. याचे पिर्वेद दुःखपूर्वक वर्णन केलेले आहे. ‘‘परमेश्वराची आज्ञाभंग करून अनेक प्रकारचे दोष आचरून मी परमेश्वरापासून दुरावलो आणि मीच माझ्यावर पायावर कुऱ्हाड मारून घेतली. या चतुर्विध भ्रमणात पडलो. आणि नरक भोगू लागलो.’’ अशा आशयाचे हे काव्य वाचतांनांच डोळ्यातून अश्रु वाहु लागतात.
आत्मनिवेदन :-
कृपा दृष्टी करूनी दिधले प्रति सृष्टी ज्ञान मजला ।
अधमतीने घालविले मीच माझा घात केला ।।धृ०।।
अनंत सृष्टी विश्व हननी अघाचा मी ढीग केला ।
महापात्र ज्ञानियाचा छळ शब्दे नित्य केला ।।
पापीयाला टाकूनीया स्वामी दूर गेला ।
तुजविण देह माझा प्रभू भूला भार झाला ।।१।।
अघाचा ढीग = पापांचा ढीग । शब्दाने ज्ञानि पात्रांना छळले । म्हणून देवाला खंती आली आणि मला टाकून स्वामी दूर निघून गेले. स्वामींच्या वियोगात माझे जीवित भुभार झाले.
काळबोटा परि खोटा कृतीचा मी वंचकीया ।
तरी तारी दुःख वारी भवारी हो स्वामीराया ।
षड्विध प्रमादाते आचरीता जन्म गेला ।
अष्टभोग नित्येसेवी खंत आली तुजला ।। २ ।।
षड्विध प्रमाद :- १) विकार २) विकल्प ३) हिंसा ४) विपरीतबुद्धी ५) अधिकवृत्ती ६) कथन
कुमरत्व युक्त पात्री दोष मिथ्या कल्पीले मी ।
साधनासी नित्य निंदी चाळी जायबावीसी मी ।
पुढीलाची श्रेष्ठचर्या पाहुनिया निंदी त्याला ।
माझे गर्व धरूनीया श्रेष्ठ मानी आपल्याला ।।३।।
कुमरत्वयुक्त पात्रांच्यां ठिकाणी नव्हत्या दोषांची कल्पना केली, वैरागी पात्रांना, उत्तम चर्या, वैराग्य करणाऱ्या महात्मा पुरुषांचा उपहास केला. त्यांचे नव्हते दोष घेऊन निंदा केली. त्यांच्याशी गर्वाने वागले. स्वतःला श्रेष्ठ मानले, किर्ती भोगली त्यामुळे देव तर दुरावलाच पण नरकालाही गेलो.
दीनबंधु कृपासिंधू अविद्येचा बंध छेदी ।
दीनानाथा अनंता हा दास तुझा पाद वंदी ।
पंचसरीताख्य प्रभाकर हा प्रार्थी तुजला ।
तृषाक्रांत फार झालो पाजी स्वामी प्रेमप्याला ।।४।।
=======================================
मनुष्यास अमूल्य वेळ वाया जाऊ देऊ नका यदर्थी उपदेश.
जाऊ देऊ नका क्षण वाया
घडीघडी स्मरा यदुराया ॥धृ.॥
लाभला बहुत मोलाचा,
हा जन्म असे नर तनुचा,
झीजवीत सुखे यदुराया ॥१॥
हा काळ ग्रास करण्याचा,
टपलाचि असे नेण्याला,
यम फास त्रास चुकवाया ॥२॥
भव सागर दुस्तर भारी,
पडताची असे निर्धारी,
चौऱ्यांशी भ्रमण चुकवाया ॥३॥
विश्रांती धाम शोधावे,
सद बोधामृत प्राशावे,
ढळु नका अंनत वचनाला ॥४॥
========================================
भक्ती कथा
काय म्हणाली मीरा जेव्हा तिला मंदिरात प्रवेश मिळाला नाही?
एकदा श्रीकृष्णभक्त मीरा वृंदावनात एका मंदिरात गेली, त्या मंदिरात स्त्रियांना येण्याची परवानगी नव्हती. कारण मंदिराचे पुजारी कट्टर ब्रह्मचर्य पाळत होते. स्त्रीयांचे दर्शन ही नको अशी विक्षिप्त मनःस्थिती होती त्यांची.
स्त्रीयांचे दर्शन होईल म्हणून तो तो मंदिराच्या बाहेर देखिल यायचा नाही. आणि त्याने स्त्रियांना मंदिरात प्रवेश निषिद्ध केला होता.
कोणीही स्त्री मंदिरात येऊ नये म्हणून त्याने बाहेर राखणदार ठेवले होते. मीरा मंदिराजवळ आली, ती आपली भक्तिभावाने भजने म्हणत, श्रीकृष्ण भक्तीत मग्न होत नृत्य करीत आत प्रवेश करू लागली. सगळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले ते सर्व पाहून द्वारपाल आत्मभान विसरले आणि मीरा नृत्य करतच आत शिरली. द्वारपाल त्या भक्तीमयतेतून बाहेर येईपर्यंत, मीरा आत पोहोचली होती.
पुजारी श्रीकृष्ण मूर्तिची पूजा करत होता, त्याने मागे वळून पाहिलं आणि घाबरून त्याच्या हातातून पुजेची थाळी खाली पडली. जे लोक चुकीच्या पद्धतीने वासंनांचे दमण करतात त्यांची अशीच गत होते. स्त्रीला पाहून थाळी त्याच्या हातातून पडली, आणि त्याला खूप राग आला. त्याने मीराला विचारले की “तू आत का आली? माझ्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही. क्षणाचाही विलंब न लावता बाहेर हो”
यावर मीराने जे उत्तर दिले ते खुप मार्मिक आणि यांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे.
मीरा म्हणाली, मला वाटले होते की, श्रीकृष्णाशिवाय दुसरा कोणीही पुरुष नाही. अच्छा तर तू पण पुरुष आहेस का? मी ऐकले आहे की श्रीकृष्णावर विश्वास ठेवणारे सगळे हेच मानतात की श्रीकृष्णाशिवाय दुसरा कोणीही पुरुष नाही. आणि तू इतक्या दिवसांपासून कसली पूजा करत आहेस? कोणाची पूजा करत आहेस? अजून तुझ्या ठीकाणी “मी श्रीकृष्णाची सखी” असा भाव उत्पन्न झालाच नाही, तू अजून राधा झालाच नाहीस का? तू अजूनही पुरूषच आहेस?
मीराचे ते बाणासारखे बोलणे ऐकून त्याचे हृदय विदीर्ण झाले.
पुजारी मीराबाईच्या पाया पडला; आणि म्हणाला, "मला क्षमा करा, मला कळलेही नाही की श्रीकृष्ण हेच एकमेव पुरुष आहेत."
श्रीकृष्णाच्या मोक्षमार्गावर श्रीकृष्ण हेच एकमेव पुरुष आहेत, कारण तो मार्ग स्त्री मनाचा मार्ग आहे. देव फक्त पुरुष आहे, बाकी सर्व स्त्रिया आहेत. हा आत्मसमर्पणाचा मार्ग आहे.
आमच्या संकेतस्थळाचे लेख आपणास आवडल्यास LIKE AND FOLLOW करा! आणि लिंकसहीत लेख शेअर करा!