भगवान श्रीचक्रपाणिप्रभू महाराज चरित्र
श्रीचक्रपाणिप्रभू हे महानुभावांच्या पंचकृष्ण अवतार परंपरेतील तृतीय कृष्ण म्हणजेच पूर्णपरब्रम्ह परमेश्वराचे अवतार आहेत. श्रीदत्तात्रेयप्रभूपासून शक्ती स्वीकार केला म्हणून लौकिक अर्थाने त्यांनी श्रीदत्तात्रेय प्रभूंचे शिष्यत्व स्वीकारलं होतं व श्रीगोविंदप्रभूंचे ते निमित्त गुरू होत.
भगवंतांचे चरित्र
सुमारे १००० वर्षापूर्वी द्वारावती म्हणजेच आजची द्वारका येथे कऱ्हाडे ब्राह्मण राजनायक नावाचे एक विद्वान पंडित राजगुरू म्हणून राहत होते. लोक त्यांना द्वारावतीकार म्हणत असत. ते सर्व नगरजनाच्या आदराला अत्यंत पात्र होते. त्याकाळी आणि आजही द्वारावती हे अत्यंत पवित्र असे तीर्थक्षेत्र होते व आहे. आणि त्यामुळे संपूर्ण भारतवर्षातून यात्रेकरूंचे थवेच्या थवे तीर्थयात्रेच्या निमित्ताने दर्शनाला येत असत आणि विद्वान राजनायकांची वेदविद्येवर प्रभुत्व असलेली प्रवचने ऐकायला मिळत. त्यांची प्रवचने म्हणजे भावभक्तीने परिपूर्ण अशा यात्रेकरूंना आनंदाची पर्वणीच असे.
आज महानुभावांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फलस्थपुरी म्हणजेच फलटणचे यात्रेकरू एकदा द्वारावतीला गेले असता तिथे त्यांना राजनायकांची विद्वत्तापूर्ण प्रवचने ऐकायला मिळाली. त्या प्रवचनांना ऐकून फलटणचे नगरजन अत्यंत प्रभावित झाले व त्यांनी राजनायकांना फलटणला येण्याबद्दल विनंती व आग्रह केला. त्यांचा तो प्रेमाचा आग्रह मानून राजनायक पत्नी राजाईसा समवेत फलटणला येऊन राहिले व फलस्थनगरीत वेदादी विद्यादानाचे कार्य करू लागले. अशा प्रकारे फलस्थपुरीतील लोक कृतार्थ झाले.
कऱ्हाडे ब्राह्मण राजनायक व पत्नी राजाईसा या दांपत्यांना सात मुले झाली. सातही मुलांना स्वतंत्ररित्या मोठे मोठे वाडे बांधून दिले व त्यांचा प्रपंच सुरू झाला. या ब्राह्मणांच्या वस्तीला त्याकाळी 'ब्रह्मपुरी' असे म्हणत असत. वडील, पुत्र रूपनायक व त्यांची पत्नी रूपाईसा यांना जनकनायक नावाचा पुत्र झाला. मूळतः हा सर्व परिवार द्वारिकेचा असल्यामुळे त्यांना द्वारावतीकार असेच नाव पडले. तसेच द्वारिका निवासी असल्यामुळे भगवान श्रीगोपालकृष्णांची भक्ती करणे या सर्व ब्राह्मण परिवारास अत्यंत आवडत होते. जनकनायक वयात आल्यावर चाकण येथील जनकाई नावाच्या स्वरूपसुंदर कन्येशी त्यांचा विवाह लावून दिला. जनकनायकाचा सुखी प्रपंच सुरू झाला. नवतीचे नऊ दिवस आनंदात व्यतीत झाले.
वेदाध्यन शिकविण्याचा वारसा राजनायकानंतर रूपनायक व नंतर जनकनायकांवर येऊन पडला. सर्वत्र मान-सन्मान होता. कुबेराचं वैभव घरात होतं. सर्व रिद्धी-सिद्धी अंगणात खेळत होत्या. पण जनकाइसाला कशातच सुख वाटत नव्हते. कारण लग्न होऊन बरीच वर्षे उलटली तरी तिला पुत्रप्राप्तीचे सुख लाभत नव्हते. नवस, जाप्य, उपवास, तापास सुरूच होते. जनकाईसाच्या पित्याने चाकणच्या आपल्या कुळदैवताला म्हणजेच चक्रपाणि देवतेला नवस बोलला होता. तसेच त्याकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील तापी पयोष्णीच्या संगमावरील चांगदेव या तीर्थक्षेत्री जावून चांगदेव देवतेला सुद्धा नवस बोलून आले होते. परंतु अजून काही फळ मिळत नव्हते.
जनकाईसाने मात्र पुत्रप्राप्तीच्या इच्छेने आपली धाकटी बहीण रंभाईच्या सोबत जनकनायकास अत्यंत आग्रहाने विवाह करण्यास भाग पाडले. रंभाईसाला तरी पुत्र होईल या आशेने जनकाई पुत्रप्राप्तीची कामना उराशी बाळगून दर दिवस त्या आनंदाच्या गोड बातमीची वाट पहात होती. परंतु हाय रे नशीब बघता बघता दोन वर्षे उलटून गेली, तरी रंभाईसालादेखील पुत्र होईना. मला पुत्र हवा या एकाच ध्यासाने तिने द्वारकाधिशाची व्रतस्थ होऊन भक्ती आरंभिली आणि चमत्कार झाला. द्वारिकाधिश भगवान गोपाल श्रीकृष्ण प्रसन्न झाले. जनकाईसा गरोदर राहिली.
तिची श्रीगोपालकृष्णावर अत्यंत भक्ती जडली आणि तो भाग्याचा दिवस उगवला. शके १०४३ अश्विन वद्य नवमी गुरुपुष्यामृत योगावर प्रातःकाळी ५.०० वाजेला जनकाईसाने एका सुंदर बालकाला दिला. संपूर्ण ब्रह्मपुरी व फलस्थनगरी आनंदाने न्हाऊन निघाली. आज्याला वाटले की, चक्रपाणिच्या नवसाने पुत्र झाला. म्हणून त्यांनी चक्रपाणि नाव ठेवले. इकडच्या आजोबांना वाटले चांगदेवाचा प्रसाद आहे म्हणून त्यांनी चांगदेव नाव ठेवले. ती दोन्ही नावे परमेश्वराने स्वीकारली. परमेश्वराने जनकाइसाची आर्त हाक ऐकली आणि स्वतः त्या भाग्यवान मातेच्या गर्भात अवतार धारण करून तिला मातृत्व प्रदान केले.
श्रीचक्रपाणिप्रभू अवतारांनी एक वर्षापर्यंत जनकाईसाचे दुग्धपान केले. त्या अमृताची चव तो भगवंतच जाणो अन् परमेश्वराला दुग्धपानामृत करताना होणारा परमानंदानुभव ती माताच जाणो. रंभाईसा मावशी पण बाळ चक्रपाणिला कडेवर घ्यायची अन् जणू काही तो तिचाच बाळ आहे अशा गोष्टी त्याच्यासंगे ती करायची. तेव्हा जनकाइसा मातेने तिच्या अंतरीचे भाव जाणून बाळाला तिच्याच वाड्यात ठेवले. बहिणीला पुत्रसंततीचे दुःख न ग्रासावे म्हणून. कारण पुत्र नसल्यावर मनाला काय आणि कशा वेदना होतात हे तिने चांगले अनुभवले होते.
रंभाई तर त्या बाळविश्वात पूर्ण बुडून गेली. अशा प्रकारे दोन मातेला पुत्रत्वाचे सुख आणि फळ त्या भगवंताने दिले आणि दोन्ही मातेचे जीवन धन्य झाले. श्रीचक्रपाणिप्रभूंचे बालपण जनकाई, रंभाई आणि माता रूपाईसा आजीच्या मांडीवर अंगा होऊ लागले. खांद्यावर, कडेवर लडिवाळपणे साताही वाड्यांवर व्यतीत दिसादिसानं, मासामहिन्यानं चक्रपाणि मोठे होऊ लागले. सर्वजण त्याच्या बाळलीळांचं कौतुक करण्यात मग्न असत. त्यांच्या दर्शनानं स्पर्शनानं संभाषणानं सर्वजण आनंदी होऊन जात. त्या आनंदाचे परिमाण तेच जाणोत.
बघता बघता श्रीचक्रपाणिप्रभू वर्षाचे झाले. आजोबा लोकांना वेदमंत्र ऋचा शिकवित. तेव्हा श्रीचक्रपाणिप्रभू स्वयंस्फूर्तीने आजोबांसोबत वेदमंत्र व ऋचा स्पष्टपणे बोलू लागत. त्यांचे हे अलौकिकत्व पाहून सर्वजण आश्चर्य करीत व कुतुहलाने म्हणत हा बालक सामान्य नाही. हा प्रत्यक्ष ईश्वर अवतारच आहे. हळूहळू बाळाचे पाऊलं वाड्याच्या बाहेर अंगणात व नंतर गावात पडू लागले व त्याच्या बालक्रीडा व चमत्कारिक लीळा पाहून नगरजनही अलौकिक सुखात आकंठ बुडून गेले. आठव्या वर्षी समारंभपूर्वक मौंजीबंधन केल्या गेले.
एकदा काय झालं. रंभाईसाच्या वाड्याभोवती लहान मुले खेळण्यात मग्न होती. तेव्हा एक भयंकर विषधर मुलांकडे सरकू लागला. मुलांच्या गावीही हे संकट ठावं नव्हतं. अचानक श्रीचक्रपाणिंप्रभूंची नजर त्या सर्पावर गेली. तेव्हा त्यांनी त्या सर्पाला आदेश दिला 'अरे थांब! तिकडे जाऊ नको इकडे जा' आणि आश्चर्य झालं. लगेच सर्पाने दिशा बदलली व तो आल्या वाटेने निघून गेला. मुलांनी हे आश्चर्य पाहिले व आपआपल्या घरी जाऊन माता-पित्यांना सांगितले. सर्वांना अत्यंत आश्चर्य झाले.
एकदा रंभाईसाच्या वाड्यासमोर कुंभार टेकावर एक गोंडदेशीचा ब्राह्मण आला. तो मांत्रिक होता. त्याने कुंभाराचा आवा मंत्रवून टाकला होता. त्याच्या या उद्योगामुळे आव्यातील डेरे माठ, मडके, भांडी आपोआप फुटून जायचे. कुंभार लोक अत्यंत हवालदिल झाले व आपले गाऱ्हाणे घेऊन रंभाईसाकडे आले. रंभाईसाला त्यांची कीव आली. तेव्हा रंभाईसा बाळ श्रीचक्रपाणिप्रभूंना घेऊन कुंभाराच्या आव्याजवळ गेली. त्या आव्याला श्रीचक्रपाणीप्रभुंनी चरण लावताच आव्यातील जादू नष्ट झाली व भांडी चांगली निघू लागली.
अशा एक ना अनेक चमत्कारिक घटनांनी परिपूर्ण असं राऊळांच हसणं, खेळणं, बागडण, क्रीडा करणं चालू होतं. मात्र प्रत्येक घटनेनंतर ग्रामस्थांची श्रीचक्रपाणिप्रभू महाराजांवर हे ईश्वर अवतारच आहेत अशी दृढ निष्ठा झाली. एके दिवशी एका कुमारीकेस सर्पदंश झाला. तेव्हा श्रीचक्रपाणिप्रभू तिथे गेले व कृपादृष्टीने अवलोकून सर्पाचे विष उतरविले. सर्वजण आश्चर्यचकीत झाले.
असेच एकदा एका शेतकऱ्याची धान्याची रास चाललेली होती. श्रीचक्रपाणिप्रभू तिथे त्याच्या खळ्यावर गेले आणि राशीला कृपा दृष्टीने अवलोकून श्रीकराने स्पर्श केला. त्यामुळे ती रास अधिकाधिक वाढू लागली. दहा बैलगाड्या अहोरात्र धान्य घरी नेण्याचे काम करीत होत्या. परंतु धान्याची रास किंचितही कमी झाली नाही. हा चमत्कार पाहण्यासाठी सगळा गाव गोळा झाला. स्वतः जनकनायक तिथे पहायला आले आणि तेही आश्चर्यचकीत झाले. ते कधी राशीला तर कधी आपल्या पुत्राला पहात. अत्यंत आनंदाचे भरते येऊन चक्रपाणिना छातीला धरून कवटाळले. आपले पितृत्व धन्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. नंतर श्रीचक्रपाणिप्रभूंनी ते धान्य सर्व नगरजनांना घेऊन जाण्यास सांगितले. सर्वांनी भरभरून धान्य वाहिले पण रास जशीच्या तशीच.
श्रीचक्रपाणिप्रभू प्रातःकाळी उठून ध्यानस्थ बसून सकळ जीवांचे चिंतन करीत. वेदशाळेत जावून विद्यादान करीत. पानपेखणे श्रीकृष्ण मंदिरात दोन्ही खाबांमध्ये पद्मासन घालून बसत. तेथे अनेकांचे दुःख दूर करीत, अनेकांचे मनोरथ पूर्ण करीत. अनेक याचकांना दान देत. मग शास्त्र निरूपण करीत. तेथेच क्षेपणिकांना वादविवाद चर्चेत पराजित करून वेदमार्गाची प्रतिष्ठा राखली. महारोगांनी पछाडलेल्या रोग्यांना दुःखमुक्त केले, मुक्याला वाचा, पांगळ्याला पाय व आंधळ्याला नेत्र दिले, निर्धनांना धन, निपुत्रिकांना दुःखमुक्त केले. पिडीतांची पिडा द्रवित व्हायचा आणि त्याला पाहिजे ते देऊन पाहून कृपासागर, दयार्णव दुःखमुक्त करायचा.
द्वारावतीकार श्रीचक्रपाणिप्रभूंनी आता तारूण्य स्वीकारले होते. गौरवर्ण, सुंदर बत्तीस लक्षणांनी युक्त श्रीमूर्ती पाहून अनेक ब्राह्मण मंडळी असा जावई आपणास प्राप्त व्हावा म्हणून आपापल्या मुलींची स्थळे घेऊन येऊ लागले. परंतु राऊळांनी तर ब्रह्मचर्याची प्रवृत्ती धारण केली होती. म्हणून जनकनायकांचा नाईलाज व्हायचा. शेवटी सोयरे धायरेपण स्वस्थ बसू देईनात व माता-पिता वृद्ध झाले व म्हणू लागले 'बाबारे! आता आम्ही थकलो आहोत आम्ही पिकल्या पानासारखे केव्हा गळून पडू याचा नेम नाही.
जीवनात यश, कीर्ती, मानसन्मान, धनद्रव्य, सुख उपभोगले आता काही एक वासना उरलेली नाही. आता फक्त आमच्या डोळ्यादेखत तुझे लग्न व्हावे एवढीच मनीषा उरली आहे. आमची एवढी इच्छा पूर्ण कर म्हणजे सुखाने डोळे मिटता येतील. आई-वडिलांच्या या भावनापूर्ण आग्रहामुळे मात्र नतमस्तक होऊन श्रीचक्रपाणिप्रभूंनी विवाह स्वीकारण्याचे कबूल केले. कमलाईसा नावाच्या सुस्वरूप ब्राह्मणकन्येशी त्यांचा विवाह लावण्यात आला. विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. परंतु ब्रह्मचर्याची प्रवृत्ती व अखंड व्रत घेतलेले सांसारिक जीवनाविषयी पूर्णपणे विरक्त व उदासीनच होते.
राऊळांचे पिता जनकनायक दिवसेंदिवस थकत चालले होते. त्यांची सर्व जबाबदारी राऊळांनी स्वीकारली होती. नगरवासींयांचे गुरूत्व वेदशाळा चालविणे इत्यादी कर्तव्ये पार पाडीत असताना अचानक माता-पित्यांनी इहलोकाचा त्याग केला आणि हे नश्वर शरीर सोडून अक्षय चिरशांतीसाठी परमेश्वराच्या मोक्षानंदाच्या प्राप्तीसाठी फलस्थ नगरीचा अखेरचा निरोप घेतला. त्यामुळे राऊळांची उदासवृत्ती अधिकच वाढली. त्याच अवस्थेत सर्व कारभार पाहू लागले. ज्ञानदान आणि जनकार्यात उदास, विरक्त असलेल्या आपल्या स्वामींची सेवा अत्यंत आवडीपूर्वक करीत होते.
राऊळांच्या माता-पित्याला जावून वर्ष झाले होते. राऊळांनी लोक व्यवहाराप्रमाणे श्राद्ध विधी आटोपला. ब्राह्मण भोजने झाली व त्या दिवसांपासून राऊळांनी अत्यंत कठोर व्रत धारण केले. ब्रह्मचर्याची प्रवृत्ती तर आधीच होती आणि आता तर अखंड ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले. मौन धारण केले व भूमीशयन करू लागले. रात्री बाहेर ओट्यावर निद्रा करू लागले. कमळाईसा आपल्या प्रिय पतीची ही कठोर वृत्ती आपल्याबद्दलची त्यांची उदासीनता पाहून घाबरली. जवळ येऊन संसार सुखाची याचना करू लागली.
पतीचे मन रिझविण्याचे नाना उपाय करू लागली. परंतु निजानंदात रमलेल्या तृप्तकाम परमेश्वराला तिच्या विकारजन्य कामचेष्टा पाहून तिच्या वेडेपणावर हसू आले. शेवटी कमळेने निर्वाणीची विनंती केली की, “आज आपण माझा हट्ट पुरविला नाही तर माझ्या उदरी येणाऱ्या बालकाची जन्माच्या आधीच हत्या केल्याचे पाप आपणास लागेल.” राऊळांनी कमळेला समजाविले. “आम्हास आणि पाप? अरे आम्ही तर अनंत जीवांच्या पापराशी नाशण्यासाठी अवतार घेतला आहे. जीवोद्धार करणे हेच आमचे काम आहे. त्यासाठी या संसाराच्या मोहजालात आम्हास गुंतविण्याचा प्रयत्न करू नका. तो व्यर्थ आहे.” पण कमळाइसा काही ऐकेना. शेवटी नाईलाजास्तव औदासीन्यपूर्वक तिला स्वप्नात रती दिली. मात्र तेव्हापासून भयंकर उदासीनता कमळाईवर व संसारकार्यावर धारण केली.
विमनस्कता दिवसेंदिवस वाढत गेली व तिचेच निमित्त धरून गृहत्याग करायचे ठरविले. ३२ वर्षांच्या वास्तव्यानं फलस्थनगरी श्रीचक्रपाणिप्रभू राऊळांच्या पवित्रस्पर्शानं पावन होऊन गेली. फलस्थनगरीच्या अधिकारी जीवांचा उद्धार करून झाले होते. आता जिथे अधिकारी जीव आहेत तिथे जायचे होते. झाले ठरले आणि तो दिवस जवळ आला. कार्तिक पौर्णिमा. सर्व फलस्थवासी जगद्गुरू, श्रीदत्तात्रेय प्रभूंचे विश्रांती स्थान असलेल्या माहूरगडावर तीर्थयात्रेनिमित्त समूहाने जायला निघाले. त्यांच्या समवेत फलस्थपुरीला कायमचे सोडून श्रीचक्रपाणिप्रभू पण निघाले. अनेक दिवसांचा पायी प्रवास करून सर्वजण माहूरला पोहोचले. थोडी विश्रांती घेऊन गड चढायला लागले. मध्यभागी पोहोचल्यावर एक वेळूचे बेट लागले. यात्रेकरूंच्या मध्यभागी श्रीचक्रपाणी प्रभू चालत होते. ते वेळूच्या बेटाजवळ येताच वेळूच्या जाळीतून डरकाळी फोडत एक व्याघ्र बाहेर निघाला.
लोक वाघोबादादाला पाहताच घाबरले व पुढचे पुढे पळू लागले आणि मागचे मागे. परंतु श्रीचक्रपाणिप्रभू जागीच स्तब्ध झाले. वाघ पुढे आला लोक सुरक्षित अंतरावर जावून पुढे काय होते ते श्वास रोखून बघू लागले. तेवढ्यात चमत्कार झाला. वाघ दोन पायांवर उभा राहिला एक पंजा त्याने श्रीचक्रपाणिंच्या श्रीमुगुटावर ठेवला व श्रीमुखास मुख लावले. लख्ख प्रकाश पडला. लोकांचे डोळे दीपून गेले. पुढचे काहीच कोणाला दिसले नाही. व्याघ्रवेषात ते आदीगुरू श्रीदत्तात्रेयप्रभू होते. त्यांनी आपला वरदहस्त श्रीचक्रपाणिंप्रभूंच्या श्रीमस्तकावर ठेवला आणि श्रीमुखास श्रीमुख लावून परावर उभयशक्तींचे संक्रमण केले.
श्रीचक्रपाणिप्रभूंनी अत्यादरपूर्वक वंदन करून उभयशक्तीचा स्वीकार केला. आणि महानुभावांचेपण आदीगुरू झाले कारण शक्ती स्वीकार केल्यानंतर श्रीचक्रपाणिप्रभूंनी अवधूत वेषाचा स्वीकार केला. देवदेवश्वरी येथे दोन्ही देवाचे शयन व्हायचे.
मेरूवाळ्याच्या तळ्याच्या काठावर दोन्ही देवांचे भोजन व्हावयाचे असा नित्यनेम चालायचा. कमी-अधिक सहा महिने वास्तव्य तेथे श्रीचक्रपाणिप्रभूंनी केले. पण दूर कुठेतरी अधिकारी जीवांची कणव त्या आनंदघनाला खुणावीत होती. म्हणून त्या जीवांच्या उद्धाराकरिता राऊळांनी माहूरहून तिकडे जाण्याचे ठरविले. पण कुठे? तर द्वारावतीला आपल्या वाडवडिलांच्या कर्मभूमीत. द्वारिकानाथ भगवान गोपालकृष्णाच्या परमपावन द्वारिकेत. कारण जन्मतःच ते द्वारावतीकार श्रीचक्रपाणिराऊळ म्हणून जन्माला आले होते नव्हे अवतारच त्यांनी द्वारावतीकारांच्या घरात स्वीकारला.
त्यामागे हा हेतूच मुख्यत्वे कारणभूत असावा. कारण आपले अवतार कार्य त्यांना द्वारिकेत करावयाचे होते. प्रत्येक अवतार अवतार धरतांनाच आपल्या अवतार कार्याची योजना आखूनच अवतार घेत असतो. म्हणून श्रीदत्तात्रेय प्रभूंची आज्ञा घेऊन ते निघाले आणि वैशाख महिन्याचा तो दिन उगवला. माहूरचे भक्तजन द्वारिकेला दर्शनासाठी मेळ्याने निघाले. त्यांच्या समूहात श्रीचक्रपाणिमहाराजही निघाले. मजल दर मजल पायी यात्रा करीत द्वारावतीला पोहोचले. तेथे गोमतीच्या व सागराच्या संगमाजवळच नारायण देवतेचे मंदिर होते. त्या मंदिरातील आतल्या गुंफेत म्हणजेच पाताळ गुंफेत त्यांचे अवस्थान झाले.
नित्यदिनी सुर्पमार्जनी क्रीडा म्हणजे एका हातात खराटा व दुसऱ्या हातात सुप. द्वारिकेतील मुख्य रस्ते, छोटे रस्ते बिदी आणि गावाबाहेरील गोदऱ्या झाडायच्या सुपात केर भरायचा व गोमती जिथे समुद्राला मिळाली तिथे गोमतीत नेऊन टाकायचा. त्यानंतर हस्तमुख प्रक्षालन करून चहुवर्णी भीक्षा करायची. नदीतिरी भोजन करायचे. स्पृश्य-अस्पृश्य, कुणबी, तेली, महार, मांग, ब्राह्मण, खाटीक, वाणी सर्वांच्याच घरी मुक्त संचार करायचे. अनेक लीळा त्याही चमत्कारपूर्ण म्हणून सर्वच द्वारिकेत, तसेच दर्शनाला येणाऱ्या अनेक प्रांतातील लोक त्यांना ईश्वर मानू लागले, भजू लागले आणि राऊळदेखील लहान-मोठा गरीब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य सर्वांवर सारखे प्रेम करायचे.
नारायण मंदिराच्या पाताळ गुंफेत राऊळांच्या दर्शनाला अनेक भक्त, विद्वान, पंडित, विद्यावंत पुरूष, सिद्धी साधक तपस्वी स्त्री-पुरुष येत असत. ज्या जीवाचा जसा अधिकार असेल तसे त्याला राऊळ दान देवून टाकायचे. कुणाला विद्या, कुणाला स्थिती, कुणाला देवतानंद, तर कुणाला भोजनाचे गोमटे, उधळीनाथ, शुक्लभटासारख्या ५२ पुरूषांना विद्यादान दिले.
एकदा एक ब्राह्मण पत्नीसह महाराष्ट्रातून द्वारिकेला भरपूर धनद्रव्य घेऊन निघाला. वाटेत चोरांनी लुटले. सर्व धन हिरावून नेले. ब्राह्मण दुःख करू लागला. द्वारिकेला जावून सहस्त्र ब्राह्मण जेऊ घालीन म्हणून निघाला होता. परंतु सहस्त्र भोजनाची लीळा.
द्वारावतीला पूर्वीपासूनच धर्मक्षेत्र म्हणून अनन्यसाधारण महत्त्व होते. व आजही आहे. त्याकाळी संतमहंताचा मेळा व भाविक भक्तांनी संपूर्ण द्वारिकानगरी गजबजून गेली होती. प्रतिवर्षी कार्तिक पौर्णिमेला द्वारावतीला खूप मोठी यात्रा भरत असे. त्या यात्रेसाठी महाराष्ट्रातून विदर्भ प्रांतातील रिद्धपूर या गावाचाही भाविकांचा मेळा आला होता. त्या मेळ्यात श्रीगोविंदप्रभू हे ईश्वरी अवतार द्वारावतीला आले होते. काणव शाखेतील वैदिक ब्राह्मणकुळात अवतार घेतल्यामुळे ब्राह्मणोचित कुळाचार आचरीत गोमतीच्या तिरावर देव देवपट मांडून ते ध्यानस्थ बसले होते.
श्रीचक्रपाणिप्रभू नित्यनेमाप्रमाणे बिदी गोदऱ्या झाडून, केरकचरा सुपामध्ये भरून, डोक्यावर सूप व श्रीकरी खराटा अशा वेषात गोमतीच्या तीरावर आले. पुंजा गोमतीमध्ये टाकला व श्रीगोविंदप्रभू बसले होते. तेथे आले आणि त्यांच्या पुढ्यात असलेले सगळे देव, लिंग, शालीग्राम सुपामध्ये भरले. दंड मोडला व ते सर्व गोमतीत टाकले आणि हातातील सूप श्रीगोविंदप्रभुंच्या डोक्यावर ठेवून वर खराट्याने हाणले आणि परावर उभयशक्तीचा संचार केला. श्रीगोविंदप्रभुंनीदेखील अत्यंत आदराने उभय शक्तींचा स्वीकार केला. पर प्रगटीत केले अवर आच्छादले व रिद्धपूरला परत जावून आपल्या अवतार कार्यास प्रारंभ केला. अनंत जीवांचा उद्धार केला.
अशा प्रकारे आमच्या सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे गुरू श्रीगोविंदप्रभु हे आमचे परमगुरू व श्रीगोविंदप्रभूंचे गुरुत्व ज्यांनी धारण केले ते श्रीचक्रपाणीराऊळ ते आमचे पर-परम गुरू. श्रीचक्रपाणिराऊळांचे गुरू म्हणून श्रीदत्तात्रेय प्रभू या परमार्गाचे आदीगुरू होत. अशी ही अवतारांची गुरू परंपरा व पाचवे ते द्वापरयुगातील श्रीकृष्णचक्रवर्ती हे महानुभावांचे परम श्रद्धास्थान असलेले पंचकृष्ण म्हणजे पूर्णपरब्रह्माचे अवतार आहेत.
श्रीचक्रपाणिराऊळांचे अनेकानेक चमत्कार द्वारावतीला चालूच होते. त्यांच्या समर्थत्वाने प्रभावित होऊन व विद्यादान प्रवचन, निरूपण ऐकण्यासाठी गावातील महाजन मंडळी नेहमी त्यांच्याभोवती हजर असत. समाजातील अत्यंत वरचा स्तर व सर्वसामान्य तसेच बहुजन समाजही राऊळांचे दर्शन, स्पर्शन व संभाषण ऐकण्यासाठी आतूर असायचा.
असेच एकदा गावचे महाजन स्वामींजवळ बसले असता बोलता बोलता अचानक देव उठले व टाळी वाजवून उभे राहीले व श्रीमुखात बोट घातले. महाजनांनी विचारले राऊळो ऐसे काई? तेव्हा देव म्हणाले काऊरळीची कामाख्या ती सुगरण आहे. ती अळजपूरला वडे पुऱ्या तळत होती. पुरी काढता काढता ती पोळली तिला वेदना झाल्या व तिने तोंडात बोट घातले. तिची वेदना आम्ही येथून शांत केली. महाजनांना अत्यंत विस्मय वाटला. त्यांनी तोच दिवस मास लिहून पाठविले व खात्री करून घेतली. इकडे कामाख्यास जेव्हा हे कळले. तेव्हा तिलाही श्रीचक्रपाणि महाराजांच्या अलौकिकत्वाचे आश्चर्य वाटले.
आणखी एका प्रसंगी सारंगधराच्या देवळात पूजारी आरती ओवाळत असतांना वरच्या चांदव्याला आग लागली ती राऊळांनी हात कुसकरताच विझली. राऊळांचे हात काळे झाले. समोर बसलेल्यांनीच विचारले हे काय? तेव्हा राऊळांनी सांगताच त्यांनी खात्री केली. तेव्हा देखील त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
एकदा काय झाले की, नारायणाच्या देवळात दोन चाफ्याच्या तेलाच्या घागरी भरुन ठेवल्या होत्या. गोसावी तिथे गेले व त्यांनी त्या दोन्ही घागरी श्रीमुगुटावर ओतून घेतल्या. तेवढ्यात भोपा आला व त्याने विचारले. राऊळो एथ चांपेल होते ते काई-केले? तेव्हा राऊळांनी देवतेच्या मूर्तीकडे बोट दाखविले व सांगितले ऐणे घेतले" आणि देवतेच्या मूर्तीच्या बेंबीतून तेलाची धार सुरु झाली. पुजाऱ्याने पुन्हा घागरी भरुन ठेवल्या. हा चमत्कार पाहून सर्व नगरजन आश्चर्यचकीत झाले.
अशाप्रकारे अनंत आश्चर्यकारक घटना आपल्याला राऊळांच्या अवतारकार्यात पाहावयास भेटतात. श्राद्धगृही उत्पवन करुन जाणे, मृत वसो जीवविणे, उंटाच्या सापळ्यात आसन, मृत स्वान परित्यजने, खीरीने पोळलेल्या बाइची वेदना शमविणे इत्यादी.
परंतु राऊळांच्या या चमत्करांनी लोक प्रभावित व्हावे हा हेतू नसायचा. लोकांना सुख व्हावे. दुःखितांचे दुःख दूर व्हावे हाच त्यांचा उद्देश असायचा अवरशक्ती राऊळांनी प्रगट केल्यामुळे त्यांनी अधिकारी जीवांना अनंत सिद्धी प्रदान केल्या. अनंतांना विद्या प्रदान केल्या, अनंतांना देवतानंदाच्या स्थिती प्रदान केल्या व अनंतांना देवताफळाला पाठविले. राऊळांची कीर्ती दूरवर पसरु लागली. त्यांची कीर्ती ऐकून दूरदूरचे लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. व राऊळांचे दर्शन घेऊन आपल्या जीविताचे भले करुन घेऊ लागले. परंतु परमेश्वराच्या भक्तांवर, साधनवंतावर ज्ञानीयांवर प्रतिकूल भाव ठेवून त्यांच्याशी वैमनस्य ठेवणारे लोकसुद्धा याच जगात राहतात. त्यांचा प्रतिकूलतेचा प्रसव वाढत जाऊन ईश्वर अवतारापर्यंत जातो व शेवटी ते नित्यनरकास पात्र होतात. सृष्ट्यान्तापर्यंत दुःख भोगतात.
अशाच एका प्रतिकूल जीवाची प्रतिकारणता त्या काळी फळाला आली होती. परमेश्वराचे श्रीद्वारावती येथील अवतार कार्यदेखील पूर्णत्वाला आले होते. अवतार कार्याची सांगता पूरत्यागाने करायची असते. नेमका अशाच वेळी अशा प्रतिकूलजनाची प्रतिकूलबुद्धी अवताराप्रति प्रतिकूल करावे अशी कुमती त्यांना प्राप्त होते. द्वापरयुगात श्रीकृष्णचक्रवर्तीनी पारध्याला पूरत्यागासाठी निमित्त केले होते. असाच अधचालीचा एक जीव द्वारावतीकारांची कीर्ती, सामर्थ्य, प्रभाव, ईश्वरत्व ऐकून द्वारावतीकडे निघाला. कोण होता हा जीव? काय साधायचे होते त्याला?
ही होती काऊरळीची कामाख्या, मोठी नावाजलेली हटयोगिनी योगसाधना करुन प्राप्त झालेलं सामर्थ्य विकाराच्या पूर्ततेसाठी नव्हे आपल्या अहंकाराला सुखावण्यासाठी ती करु लागली. राजयोगाच्या सात्विक वाटेने वाटचाल करुन चैतन्यानंदासारख्या मोक्षतुल्य सुखाला डावलून हटयोगाच्या राजस तामस सामर्थ्याने अनेक सिद्धसाधकांना तपापासून ढळविण्याचा सपाटाच तिने लावला होता. तिच्या हटयोगापुढे भलेभले सामर्थ्यवंत पराभूत झाले होते. आणि त्यामुळे तिच्यातला अहंकार मस्तावलेला होता.
द्वारावतीकारांना परास्त करावे या विकृत मनोवृत्तीने पछाडलेली ती कामाख्या काउरळीहून म्हणजेच आजच्या आसाम प्रांतातून निघाली. पुऱ्या तळतांना पोळलेल्या हातांना हजारो मैलावरुन शांतविणाऱ्या दयाघनालाच ती आपला हात दाखवायला निघाली. आदीगुरू श्रीदत्तात्रेयप्रभूंची शिष्या असलेली कामाख्या हे सुद्धा विसरली की लौकिक अर्थाने श्रीचक्रपाणि महाराज हे श्रीदत्तात्रेय प्रभूंचेच शिष्य असल्याकारणाने ते आपले गुरूबंधू होत. मात्र म्हणतात ना "कामातुराणां न भयं न लज्जा" कामातुर झालेल्या माणसाला भीती नसते आणि लाज तर नसतेच नसते.
कामाख्या द्वारिकेत येऊन पोहोचली. श्रीचक्रपाणिंप्रभूंचा शोध घेतला. पाताळगुंफेत श्रीचक्रपाणि महाराज ध्यानस्थ बसून जीवांचे हितचिंतन करीत बसले होते. तेवढ्यात त्यांच्या चिंतनात काही तरी व्यत्यय आला. डोळे उघडून पाहिले. गुंफेच्या द्वारात कामाख्या उभी होती. तिच्या नजरेतला कामाग्नी त्या सर्वज्ञाने ओळखला. कामाख्या एवढ्या स्वरूपसुंदर योग्याला प्रथमच पहात होती. दर्शन होताच ती क्षणभर आनंदली. वाटले लोक आपल्या सुंदरतेवर मोहीत होतात. परंतु या जगभरुन उरणाऱ्या सौंदर्यापुढे आपले सौंदर्य म्हणजे चंद्राच्या प्रकाशापुढे लुकलुकणारा काजवा.
आपले सौंदर्य या पूर्णपुरूषोत्तमाच्या चरणावर अर्पण करुन त्याची दासी होऊन रहावं. पण दुसऱ्याच क्षणी तीच्या आतल्या अहंकारानं तिला स्वकर्तृत्वाची जाण करुन दिली. ती सावध झाली. आपण तर या पुरुषाला हरवायला आलो आहोत. आपल्या हटयोगाने आपण आजवर अनेक योगीतपस्वी निस्तेज करुन टाकले. या योग्याची काय बिशाद आणि ती गुंफेत प्रवेश करायला पाऊल उचलताच त्या दयानिधानाने तिच्या मनातील हेतू ओळखला. तिला आपण तिचा गुरूबंधु असल्याची जाणीव करुन दिली. तिला नीतिचा उपदेश केला. श्रीदत्तात्रेयप्रभूंची शपथ घातली.
सात अहोरात्र परमेश्वराच्या परावाणीतून अमृत झरा वाहू लागला. परंतु त्या अमृताने देखील तिच्या मनातले विषयाचे विष संपले नाही. शेवटी-नित्यनरकापासून परमेश्वराचा प्रयत्नही तिला शकला नाही. भगवंताने तिच्या हट्टापुढे माघार घेतली. माघार घेण्याचे कारण होते तिला नित्यनरक व्हावेत. अशी तिची चाल होती आणि श्रीचक्रपाणि महाराजांना आपले अवतारकार्य आवरायचे होते. श्रीकृष्णभगवंतांनी पारध्याच्या बाणाचा स्वीकार केला. पण पूरत्याग करता करता ना भी - ना भी ' असा आशीर्वाद देऊन त्याला नित्यनरकापासून वाचविले होते. पण सात अहोरात्र नीती उपदेश करुनही या जीवाची अधचाल संपलेली नव्हती. कशी संपेल? तशी कणवच जोडलेली नव्हती.
शेवटी श्रीचक्रपाणि महाराजांनी तिला निमित्त करुन त्या मायापुराचा त्याग केला व स्मशानात अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या भरवस नगरीच्या प्रधानपुत्राचे हरिपाळाचे देहात परकाया प्रवेश करुन त्या पतीत देहाचा उद्धार करुन नवा अवतार धारण केला. पुढे ह्याच अवताराने श्रीगोविंदप्रभूंपासून ऋद्धीपूरला शक्ती स्वीकार करुन श्रीचक्रधरप्रभू हे नाम धारण केले. आजा गेला आणि नातू झाला. आजाचंच नाव नातवाला ठेवण्याची प्रथा आहे. हे जाणून श्रीगोविंदप्रभुंनी देखील आपल्या या शिष्यांचं नाव श्रीचक्रधर असं ठेवलं. म्हणून द्वारावतीकार तेच आमचे गोसावी त्या जीवोद्धरण व्यसनीया श्रीचक्रधरांना साष्टांग दंडवत प्रणाम करुन माझी सेवा संपवितो. जय श्रीचक्रधरा
शब्दांकन :- कै. महंत श्री मुरलीधर शास्त्री आराध्ये