दुःखी जीवांना सुखी करणारे तीर्थस्थान श्रीआत्मतीर्थ- पांचाळेश्वर - aatmatirtha panchaleshwar

दुःखी जीवांना सुखी करणारे तीर्थस्थान श्रीआत्मतीर्थ- पांचाळेश्वर - aatmatirtha panchaleshwar

दुःखी जीवांना सुखी करणारे तीर्थस्थान श्री आत्मतीर्थ- पांचाळेश्वर

आत्मतीर्थ 

सिद्ध महापुरुष चक्रेश नामू । 

तो स्वभक्ता सहितू पुरुषोत्तमू । 

तो एकदा कार्तिका श्रीदत्ताश्रमू। 

येता जहाला ।। (काव्य ग्रंथ आत्मतीर्थ प्रकाश)

एकदा सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू गंगातीराने परिभ्रमण करीत असतांना भक्तीजनांसह महातीर्थक्षेत्र श्री आत्मतीर्थी दर्शनार्थ आले होते व पांचाळेश्वराला वास्तव्यास थांबले होते. गुंफास्थानातून आपल्या श्रीकराने भक्तीजनांना श्री दत्तात्रेय प्रभूंचे गंगेच्या पात्रातील भोजनस्थान दाखविले व आत्मतीर्थाचा महिमा वर्णन केला. नंतर आपले दोन्ही श्रीकर जोडून श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या भोजनस्थानाला नमस्कार केला.

असेच एके दिवशी श्री चक्रधर प्रभू भक्तीजनांसह नदीकाठी आले... अवधूत नावाच्या एका जोग्याच्या खांद्यावर बसून श्रीचक्रधर स्वामी श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या गंगापात्रातील भोजनस्थान (आत्मतीर्था) वर आले. दर्शन घेतले. भक्तजनांनी साष्टांग दंडवत घातले. स्वामी भक्तजनांना म्हणाले - हे पहा येथे श्री दत्तात्रेय प्रभूंचे भोजनस्थान आहे. येथे श्री दत्तात्रेय प्रभू प्रतिदिनी भोजनास येतात. प्रभूंची येथे आरोगणा झाली म्हणजे चराचर विश्व तृप्त होते. सर्व अरिष्टाची निवृत्ती होते.

श्री आत्मतीर्थाच्या संदर्भात पौराणिक इतिहास (शास्त्रोक्ती), सांगितला जातो तो असा - कुंभ-निकुंभ या ब्राह्मण कुलोत्पन्न बंधूनी शिवोपासना करून शंकराकडून वरदान मिळवून सामर्थ्य प्राप्त करून घेतले. व आसूरवृत्तीने ते संत सज्जनांना ऋषी मुनींना पिडा देऊ लागले.

दंडकारण्यातील ऋषीजनांचे आश्रमात जाळपोळ करून ते उध्वस्त करून टाकले. या कुंभ- निकुंभ आसुराच्या अत्याचाराने प्रजाजन दुःखी झाले. त्यासमयी पांचाळ नावाचा नीतीमान व धर्मवान राजा राज्य करीत होता. त्याच्याकडे सर्व प्रजाजनांनी कुंभ-निकुंभापासून रक्षण करण्याची विनंती केली. आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी पांचाळ राजाने त्या आसुरद्वयांवर आक्रमण केले. परंतु त्या आसुरांपुढे त्याचे बळ कमी पडले व पांचाळ राजाचा पराभव झाला. 

त्या काळात आत्मर्षी नावाचे एक महान तपस्वी ऋषी सदैव श्री दत्तात्रेय प्रभूंच्या जपानुष्ठानात व्यग्र असत. श्रीदत्तात्रेय प्रभूंचे ते सदैव स्मरण करीत असत. पांचाळ राजाने आत्मऋषीच्या आश्रमात येऊन ऋषींचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले. पुन्हा नव्या तयारीने त्या कुंभ आणि निकुंभावर स्वारी केली आणि यावेळी कुंभ-निकुंभाचा पराभव करून या दोन्ही असुरांना ठार केले. त्याच्या सामर्थ्याचा निःपात केला आणि आपल्या राज्यातील ऋषी मुनींचे असुराच्या जाचापासून रक्षण केले...

कुंभ नि निकुंभ हे आसूर ब्राह्मणकुळातील होते. त्यांना ठार केल्यामुळे ब्रह्महत्येचे पातक लागल्याचे शल्य पांचाळ राजाच्या मनाला टोचत होते. तो आत्मऋषीच्या आश्रमांत आला व आत्मऋषीला विनंती केली की मला ब्रह्महत्येचे व युद्धात झालेल्या हिंसेचे पाप नासण्याचा उपाय सांगा. आत्मऋषी सतत श्री दत्तात्रेय प्रभूंच्या नामजपात लीन असायचे. प्रभूंची त्यांच्यावर कृपादृष्टी होती. पांचाळ राजाने प्रजेचे आसुरांच्या जाचातून रक्षण केले होते. त्यामुळे पांचाळ राजाविषयी आत्मऋषींना प्रेम वाटत होते. 

श्रीदत्तात्रेय प्रभूंचे त्याला दर्शन घडवावे या हेतूने त्यांनी श्री दत्तात्रेय प्रभूंचा नाम जप यज्ञ करण्यास राजाला सांगितले. व स्वत:ही त्यांनी विनंतीपूर्वक प्रभूंना प्रार्थना केली. पांचाळ राजाने आरंभलेला जपयज्ञ व आत्मऋषींनी केलेल्या प्रार्थनेने प्रसनन होऊन श्री दत्तात्रेय प्रभू प्रकट झाले. जगद्गुरु श्री दत्तात्रेय प्रभूंचे अमोघ दर्शन झाल्याने दोघांनाही अतिशय आनंद झाला. प्रभूंची षोडषोपचारी महापूजा केली. महापर्व केले. श्रीदत्तात्रेय प्रभूंचे भक्तीभावाने श्रीचरण प्रक्षालन केले व श्री चरण तीर्थ प्राशन केले. 

रणामृताने पांचाळ राजा ब्रह्म हत्येच्या व युद्धात घडलेल्या हिंसा दोषाच्या पापापासून मुक्त झाला. त्यानंतर श्रीदत्तात्रेय प्रभूंना साष्टांग दंडवत घालून ते प्रार्थना करू लागले की हे आनंद दायक विघ्न निवारक श्री दत्तात्रेय महाराज आपण असेच रोज मध्यान्ह काळी या स्थानी आरोगणेला यावे. व आम्हास परम सुख द्यावे. हे प्रभू राया आपल्या श्रीचरण तीर्थाने जीवाचे या ठिकाणी महापातकाचा नाश व्हावा. त्याचे पाप पळून जावे. जो जो दोषी आपल्या नामाचा जप करून या ठिकाणी आपली महापूजा करून महापर्व करेल त्याला सुखप्राप्ती व्हावी. त्याचे मनोरथ पूर्ण व्हावेत - त्याची दुःखातून मुक्तता व्हावी व त्याचे कल्याण व्हावे. 

तसेच श्री दत्तात्रेय महाराज आपण रोज मध्यान्हकाळी या आश्रमात आरोगणेस यावे हीच माझी आपल्या श्रीचरणी प्रार्थना आहे. अशी आत्मऋषींनी श्री दत्तात्रेय प्रभूंना विनंती केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन प्रभूंनी प्रतिदिनी 'आत्मतीर्थ' स्थानी आरोगणेला येण्याचे त्याला वरदान दिले.

तेच हे श्री दत्तात्रेय प्रभूंचे भोजनस्थान ! 'आत्मतीर्थ' या नावाने जगात ओळखल्या जाते. आजही या ठिकाणी नाम जपाचा सतत विधी चाललेला असतो. इथल्या तीर्थाने श्रद्धावानांचे दोष नासून त्यांना सुखाची प्राप्ती होते.

लेखक :- पू.श्री. अर्जुनराजदादा कृ. शेवलीकर

श्रीक्षेत्र खणेपुरी


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post