खरे सुख कशात आहे?

खरे सुख कशात आहे?

 खरे सुख कशात आहे? 

जगात दुःख कुणाला हवं आहे? कुणालासुद्धा दुःखाची प्राप्ती व्हावी असे वाटत नाही कारण सर्व प्राणी क्षण प्रतिक्षण दुःखच भोगीत आहेत, दुःखाला आपण सर्व कंटाळलो आहोत आणि म्हणून सुखाची अपेक्षा सर्वांना आहे. सदा सुख प्राप्त झाले तर आपण सुखालासुद्धा कंटाळून जाणार नाही हे कशावरून? चव परिवर्तन हा प्राणीस्वभाव आहे. माझ्या एका मित्राला नाटक पहाण्याची खूप आवड आहे. 

मी त्याला म्हटले, "नाटक तुला एवढे का आवडते?" तो म्हणाला, "खूप सुख वाटते." मी एक सप्ताहभर त्याला सतत तेच नाटक पुनःपुनः पहाण्यासाठी पैसे दिले आणि म्हटले तेच नाटक तू जर पन्नास वेळा पाहिले तर मी तुला तिकिटांच्या रकमेच्या दसपट इनाम देईन. सतत नाटके पहाण्याचे सुख आणि बक्षिस वेगळेच मिळणार या लालसेने तो सतत तीन चार वेळा तेच नाटक पाहून एक दिवस मला म्हणाला, "बस्स! नको मला ते नाटक आणि तुमचं बक्षिसही नको, पार वैताग आला. " म्हणे डोकं जाम झाले. 

मंडळी! परिवर्तनात सुख आहे. पदार्थात रस आहे परंतु सतत गोडी आणि सुख देण्याची हमी मात्र नाही. तेव्हा अखंड सुख कशात आहे? हे जाणणे मानवाचे परमकर्तव्य आहे. भौतिक सुख हे शाश्वत नाही हे सांगण्यासाठी धर्मशास्त्रांची रचना झाली. अध्यात्म ज्ञान हे अनुभवाचे, प्रचीतिचे बोल आहेत. ज्ञानीयांची ती आत्मानुभूति आहे.

आपल्याला जी सुखप्राप्तीची साधने माहिती आहेत आणि आपण हे पण जाणतो की त्या त्या साधनांचे सुख कालांतराने विरस होते तरी पण अन्य साधनांच्या शोधात जाण्याची आपली चाड असते. हा अज्ञानाचा परिणाम आहे. आपण चुकलो आणि चुकत आहोत मग मार्गदर्शन घ्यायला काही हरकत आहे का? पुनःपुनः होणाऱ्या चुका पश्चात्तापाला निमंत्रण देतात. पश्चात्ताप नको असेल तर मार्गदर्शक शोधायला काही हरकत नाही.

आनंदकंद भगवंताने आरंभी स्वतः मार्ग दाखवून दिला. आम्ही आमच्या अधमति, अधगति, अधरति दोषांनी अवगाहन केलेच नाही. तरी पण त्या कृपाळु भगवंताने सतत, जन्मोजन्मी ज्ञानदानाची सोय करून ठेवली आहे. आता आपण लाभ घेत नाहीत ही बाब वेगळी आहे. ईश्वराधिष्ठित ज्ञानीयांजवळ परमेश्वर निरोपित ज्ञानमार्ग सुरक्षित ठेवला आहे. तो ज्ञानाचा ठेवा आजच्या क्षणापर्यंत मूळ सृष्टीपासून अव्याहत प्रवाहीत होत आहे. त्या ज्ञानापासून शाश्वत सुखाला प्राप्त करण्याचा मार्ग सापडतो हे सत्य आहे. 

ज्ञानाने प्राप्त सुख ज्याला आनंद म्हणतात. आनंद म्हणजे दुःखाचा लेशमात्र अंशहीन परमसुख. अखंड भोगिता बीट न उपजे ते सुख किंवा आनंद आहे. जीव तमस्वरूपात होता. सुखदुःखाची जाणीव नव्हती. अनादिकाळापासून त्याच अवस्थेत पडलेल्या जीवाला पाहून परमेश्वराला कृपा उपजली. सुसुप्त जीवाला जागृत करावे आणि प्राप्त दशेतून त्याला मुक्त करावे अशी प्रवृत्ति देवाला झाली. प्रश्न असा की तमातील अवस्थेपेक्षा आजची प्राण्यांची अवस्था कशी वाटते? सुखी तर नाहीतच परंतु दुःखी मात्र अवश्य आहेत. तेव्हा तमातील परिस्थिती बरी वाटते. 

सुसुप्तिची दशा सतत दुःखाग्नित होरपळण्यापेक्षा बरी नव्हती का? भगवंताचा हेतु किती अंशी साध्य झाला हे पण पहावे लागेल. ज्याचा स्वभाव दयाळु, कृपाळु आणि कनवाळु आहे ती सत्ता, शांत, स्तब्ध राहूच शकत नाही. तो स्वभाव आहे. एखाद्या बोलक्या माणसाला शांत, अबोल रहाणे अशक्य आहे. उदास व्यक्तिला पाहून हा बोलका गप्प बसणार नाही. उदासाला तो बोलका करणारच, उदार अंतःकरणाचा मनुष्य द्रवणारच. 

कंजूष (चेंगट) व्यक्ति स्वतःचा प्राण गेला तरी चालेल परंतु परोपकार अथवा दान करणारच नाही. सहृदय सज्जनाचे हृदय परपीडापाहून द्रवणारच, हा स्वभावाचा परिणाम आहे. आपल्याजवळ भरपूर साधनसंपत्ती आहे. पडून काय उपयोग ? कुणाच्या तरी उपयोगी जाते ना, जाऊ द्या. दिले तरी संपत नाही. नाही दिले तरी वृद्धि होत नाही. बसून काय उपयोग? अगदी परमेश्वराचीसुद्धा हीच अवस्था झाली असावी असे माझे वैयक्तिक मत आहे. परमेश्वराजवळ अगाध आनंद आहे. आनंद संपत्तीने भरपूर आणि स्वभावसुद्धा कृपाळु आणि दयाळु, तेव्हा दातृत्व भाव उचंबळून येणारच ना? यात शंका घेण्याचं कारण नाही.

भगवंताला देण्याची प्रवृत्ति झाली. मग आनंद द्यावा कुणाला? भूक असेल त्यालाच अन्न देण्यात सार्थकता आहे. देताना पात्रतेची आणि गरजेची जाण असावी म्हणतात. देवाने तेव्हा प्रथम प्रपंचाचा विचार केला असावा परंतु तो जड, उपयोगी नाही. एखाद्या बहिया (बधीर) पुढे मालकंस गाण्यात काय अर्थ आहे? तद्वतच जड प्रपंच्याला आनंद देण्यात अर्थ नाही हे देवाने पाहिले. 

नंतर देवता पदार्थाकडे परमेश्वराचे लक्ष गेले. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश अशा पंचप्रकारे संपन्न देवतांना आनंद द्यावा का नाही? असा प्रश्न पडला. नित्यबद्ध देवतांना आनंद देता येत नाही. त्या मर्यादित बांधल्या आहेत. प्रकार कसा आहे पहा मंजुळाबाई खूप सुरेल गातात. जगात - त्यांच्यासारखी अन्य गायिका नाही. मग म्हटले त्यांना गायन करायला सांगा. नाही हो! त्यांनी मरेपर्यंत मौनव्रत धारण केले आहे. मग त्यांचा तो सुरेख कंठ काय कामाचा, कशाला त्यांच्या गायकीचा पोवाडा गाता? तसा देवतांचा प्रकार आहे. त्या चेतन आहेत, शक्तिसंपन्न आहेत आणि चालतात, बोलतात परंतु नित्यबद्ध आहेत. त्यांच्या स्वरुपात उणे अधिक होणे नाही. परमेश्वराला देवता आनंद देण्यास अपात्र वाटल्या. 

आता होती जीवाची पाळी. संपत्तिहीन, चेतन परंतु अविद्याग्रस्त, अनादि अनंत परंतु शक्तिहीन आणि सुसुप्त परंतु जागृत होण्याची क्षमता असलेला हा जीव एकमात्र परमेश्वराला आनंदास पात्र वाटावा, यात नवल काय? अनादि अविद्यायुक्त जीवाची अवकळा पाहून कृपावंत द्रवला, चार पदार्थात जीव हाच केविलवाणा होता. प्रपंच जड, तो काहीच करू शकत नाही जीवासाठी देवतांची शक्ति मर्यादित जीवाची अविद्या छेद करू शकत नाही. केवळ परमेश्वरच अविद्या छेदनाचे कार्य करू शकतो. सर्वशक्तिमान परमेश्वराची जीवावर कृपा झाली. कृपावशे मायेला प्रवृत्ति जाणविली आणि सृष्टिरचना करावयास लावली. 

या साऱ्या उपद्व्यापात देवाचा हेतु होता जीवाला आनंदास पात्र करावे. परमेश्वराचा हेतु साध्य झाला परंतु संपूर्ण नाही. आणखी अनंत जीव उद्धरणे बाकी आहे. अनंत उद्धरून गेले. म्हणून ईश्वर प्रयास अयशस्वी मुळीच नाही.

आनंद, सुखापेक्षा श्रेष्ठ अनुभूति आहे. दुर्दैवाने जीव आनंद प्राप्तिसाठी प्रयत्न करीत नाही. देणारा आसुसला आहे देण्यासाठी, परंतु घेणारा भौतिक सुखाच्या मागे धावत आहे आणि सुख न पावणारा दोषी जीव सतत दुःखाच्या गर्तेत रुतत चालला आहे. मातेचा एक गुण ईश्वरी म्हणून कृपावशे सृष्टी व्यापार जीवाच्या बंधमुक्ततेसाठी परंतु जीवाने जाणून कर्म करावे आणि कृपा पात्र व्हावे एवढेच.


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post