महानुभाव साधूंचे वस्त्र काळे, गुलाबी, निळे का? Mahanubhav history

महानुभाव साधूंचे वस्त्र काळे, गुलाबी, निळे का? Mahanubhav history

 महानुभाव साधूंचे वस्त्र काळे, गुलाबी, निळे का?



परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्रीचक्रधर स्वामींनी महाराष्ट्रभर क्रिडा करत भ्रमण केले. त्यांचा हेतू या अभागी जीवाचा संसारसागरातून उद्धार करावा, जीवांना सन्मार्गास लावावे. माणुसकीची शिकवण द्यावी हा होता. पण एक निराळाच पंथ स्थापन करावा किंवा संन्यास धर्मासाठी कोणते एखादे विशिष्ठ चिन्ह वापरून संन्यास धर्माची प्रौढी मिरवावी असा त्यांचा उद्देशच नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या वस्त्राला भगवा, काळा, निळा यापैकी कोणताही रंग दिला नव्हता. व आपल्या शिष्यांच्या वस्त्रालाही दिला नाही. 

स्वामींच्या सान्निध्यातील सर्व शिष्य परिवार गृहस्थी वेषातच होता असे लिळाचरित्रावरून भासते. पण स्वामींच्या सन्निधानात देखिल एक विशिष्ट महात्म वेष होता असे एका लीळेवरून वाटते. जोगेश्वरी येथे देवाचे अवस्थान असताना आऊसा प्रथमच देवाच्या दर्शनाला येऊन अनुसरल्या. तेव्हा “ब्राह्मणी महात्मी केली” असे एक वाक्य आहे. त्यावरून सन्निधानातही महात्मे वेष होताच. पण त्याला रंग नव्हता. 


श्रीचक्रधर स्वामींनी 'संन्यास तो काई भगव्याचा ऐसा' हे भगवे वस्त्र धारण करणे धौ देणे हा विकार मानला आहे म्हणून स्वामींना भगवे वस्त्र मान्य नव्हते आणि त्यांना भगव्या वस्त्रांना विरोध होता असे मात्र नाही त्यांचा विरोध भगवे वस्त्र परिधान करून द्रव्य आणि स्त्रीयांचा भोग लुटणाऱ्या संन्याशांशी होता. म्हणून त्यांनी धौ विकार हे वाक्य याच अर्थाने वापरले आहे. 

स्वामींच्या विद्यमान काळी अशाप्रकारचे ढोंगी संन्यासी होते. उदाहरणार्थ नृसिंहारण्य सरालेकर, वामदेव पैठणकर, प्रकाशदेव करंजखेडकर आणि उरावर जळती शेगडी ठेवून तोंडाने पैरा गा पैरा गा म्हणणारा तो महात्मा, तसेच डोंगरगण येथील महात्मा. अशा संन्याशांना भुलून त्याच्या पाठीमागे लागल्याने मनुष्याला आत्म कल्याणाचा मार्ग सापडत नाही. या उपदेशार्थी स्वामीनी तसे म्हटले आहे. 

स्वामींची वेशभूषा संन्यास धर्माची! पण ते पांढरेच वस्त्र वापरीत असत. हे त्यांच्या पवित्र पावन लीळा चरित्रावरून समजते. स्वामींच्या उत्तरापथे प्रयाणानंतर व श्रीगोविंदप्रभू महाराजांनी पूरत्याग केल्यानंतर श्रीनागदेवआचार्य गंगातीरास आले. तेव्हाहि श्रीनागदेवाचार्यादि शिष्य परिवाराचा वेष पांढऱ्या वस्त्राचाच होता. पण पुढे चालून एका घटनेवरून तो वर्ण बदलण्यात आला. 

एकदा आचार्यांचे शिष्य काळे कृष्णभट नित्यविधी आचरत, अटन करत असताना एकांकी फिरस्तीवर गेले तेव्हा त्यांना एका गावी न ओळखून चोर म्हणून धरण्यात आले. कृष्णभटांचे मौन होते. ते काहीच बोलले नाहीत, आपली ओळखही दिली नाही त्यामुळे गावातील लोकांना जास्तच संशय आला आणि त्या गावातील प्रमुख मंडळींनी त्यांना ताडन संपादले. तरीही ते काहीच बोलले नाहीत. त्या क्षमाशिल पुरुषाने इतके धैर्य धारण केले. 

मग तेथे पुष्कळ लोक जमा झाले. त्यातील एकाने त्यांना ओळखले व म्हटले, “आरे पापिये हो, हे चोर कै झाले, हे तवं वेधवंती नागदेवभटाचे शिष्य आहेत. यांना तुम्ही का मारत आहात? हे चोर नाहीत यांना सोडा ?" यावरून त्या मारणाऱ्या मंडळींनी कृष्णभटांची क्षमा मागून त्यांना सोडून दिले. 

कृष्णभट तिथून निघाले आचार्यांजवळ आले. ही हकीकत आचार्यांना सांगितली. तेव्हां आचार्य म्हणाले " इतका मार देईपर्यंत तुम्ही मौन का धारण केले? तुझ्यामुळे त्या बिचाऱ्यांना गैरसमजामुळे मोठे पाप लागले" कृष्णभटाला मारल्याबद्दल आचार्यांना वाईट वाटले. ते हळहळले, तळमळले. हे सर्व या पांढऱ्या वेषामुळे घडले. असाच त्रास इतर भिक्षूंनाही होईल म्हणून आचार्यांनी आपल्या शिष्यांसाठी कषाय वस्त्रे नियुक्त करावीत असा विचार केला. 

मग आचार्यांनी आपल्या शिष्य परिवारास संन्यास मार्गाचा कषाय वेष परिधान करावयास लावला. कषाय वेष म्ह. गेरुच्या रंगासारखा रंग लावलेला, पुर्ण भगवा नाही तर पुर्ण गुलाबीही नाही. आणि त्याबरोबर स्वतःही कषाय वस्त्र परिधान केले. गेरुचा रंग सविकार दिसत नाही. 

पुढे १४व्या शतकात श्रीनागराजबास कपाटे यांच्या काळात पंथिय वेष राखाडी रंगाचा झाला तो कसा ते पुढीलप्रमाणे - श्रीनागराजबास कपाटे थोर आचार्य होऊन गेले. त्यांच्या उत्तरकाळात त्यांचे वास्तव्य  वासनिक मुधोपंताच्या विनंतीवरून अहमदनगर येथे होते. 

वासनिक मुधोपंत दररोज त्यांच्याजवळ शास्त्राध्ययन करायचे आणि संसारही चालवावयाचा असे थोर कीर्तिमंत व उदारशील होते. या यजमानाच्या घरी कपाटेबास असताना एक संकट त्यांच्यावर आले. नगर येथील एका ब्राह्मणाने कपाटे महानुभावांच्या नांवे संन्यास घेतला होता. परंतु त्याची द्रव्याभिलाषा न पुरल्याने त्याने संन्यास वेष टाकून गृहस्थाश्रम स्वीकार केला. 

पुढे तो कपटी ब्राह्मण आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी काही द्रव्य कपाटे व्यासांना मागू लागला. पण त्यांनी त्यास दिले नाही, त्यामुळे त्याला राग आला. रागास्तव त्यांचा सूड उगवावा म्हणून त्या द्वेष्ट्या ब्राह्मणाने बादशहाजवळ सांगितले की मुधोपंतांचे गुरू एकांतांत बसून मंत्रसिद्धी करतात, त्या मंत्राच्या बळेकरून तुमचे राज्य मुधोपंताला द्यावे, असा त्यांचा विचार आहे. 

हे ऐकून बादशहा स्वतः त्याच्याबरोबर सत्यासत्याची परीक्षा करण्याकरता मुधोपंतांच्या घराकडे गेला. तेव्हा त्याला मुधोपंत व त्यांचे गुरू एकांतात प्रसादसेवा करत बसलेले आढळले. यावरून गैरसमज वाढून राजाची खात्री झाली की हे खरोखरच माझे राज्य बळकावण्यासाठी एकांतात बसून मंत्रसिद्धी करीत आहेत. 

वस्तुत: जसे दिसते तसे नसते. या गुरू-शिष्याची एकांतात बसून शास्त्रीय चर्चा, प्रसादसेवा चालत असे. परंतु राजास या धर्मपतित ब्राह्मणाने मत्सरापोटी खोटे सांगितले, ते राजास खरे वाटले. मग राजाने आपल्या सेवकास सांगितले की, " मुधोपंतांच्या गुरूला धरून आणावे " त्याप्रमाणे सेवकांनी श्रीकपाटेव्यासांना अटक करून राजाकडे नेले. व त्यांना तापलेल्या लोखंडाचा डाग देण्याची शिक्षा सुनावली. 

नंतर मठात एकच हाहाःकार झाला. तेथे जवळच भिंगार या गावी कुमर आम्नायाचे गोपाळव्यास भिंगारकर राहत होते. त्यांना ती वार्ता कळली व ते तत्काळ ते राजदरबारात गले. तेव्हा कपाटेव्यासांना राजाज्ञेप्रमाणे सेवक डाग देत होते. ते पाहून भिंगारकर महंत कपाटेव्यासांच्या अंगावर पडले, आणि बादशहाला म्हणाले, 

'यांना गरम लोखंडाचा डाग देऊ नका ! यांची शिक्षा मला द्या ! तुम्हाला गैरसमज झाला आहे, तसे आम्ही कार्य केलेले नाही, कुजंत्र, करनीकौटाळ करणे हे आमच्या शास्त्रात नाही, आणि हे आमचे थोर महापात्र महानुभाव आहेत, यांना सोडा” 

आपले म्हणणे पटवून देण्यासाठी भिंगारकरांनी श्रीमत्भागवत व गीताग्रंथ बादशहाला वाचून दाखविले. शिवाय श्रीचक्रधरस्वामींचे लीळाचरित्र, सूत्रपाठही वाचून दाखविला. आपला पंथिय सिद्धांत त्याला समजावून सांगितला. यावरून या महानुभावांनी कुजांत्र केलेच नाही, अशी बादशाहाची खात्री पटली, मग राजाने श्रीकपाटेव्यासांना शिक्षा करण्याचे बंद केले. व मठात जाण्याची परवानगी दिली. यानंतर राजाने खोटे सांगणाऱ्या ब्राह्मणास आपल्या सेवकाद्वारा धरून आणले, व 'श्रीकपाटेव्यासांना जी शिक्षा दिली तीच याला द्या!' अशी राजाने सेवकास आज्ञा केली. तेव्हा श्रीनागराजबासांनी त्याला शिक्षा न करण्याबद्दल राजास विनंती केली. आपण जर असे कराल तर आमचे सर्व तप पाण्यात जाईल. अपराध करणाराला शिक्षा न देता सोडून दिले, तर आमच्यावर तुमचे थोर उपकार होतील. मग त्यांच्या व भिंगरकराच्या विनंतीवरून बादशहाने त्या ब्राह्मणास सोडून दिले.

पण पुढे बादशाहा म्हणाला, “महानुभाव हो हे सर्व तुमच्या या भगव्या वस्त्रांमुळे झाले. तुमच्यासारखे वस्त्र परिधान करून मराठा राज्याचे गुप्तहेर आमच्या राज्यात फिरतात, त्यामुळे माझा असा गैरसमज झाला. आपण वस्त्राचा रंग बदलावा.”

यावर श्रीनागराजबास म्हणाले, “ तुमचे म्हणणे पटले पण मी वस्त्र बदलणार नाही माझ्या शिष्यांना सांगेन” असे म्हणून त्यांनी शिष्यांना राखाडी रंगाचे वस्त्र घालण्याची आज्ञा केली. पुढे त्यांचे प्रमुख शिष्य श्रीमुरारिमल्ल विद्वांसबासांनाही त्यांनी आज्ञा केली की, कषाय भगवे वस्त्र नेसू नकोस, तेव्हापासून विद्वांस महानुभाव राखाडी रंगाचे वस्त्रे परिधान करत असत. ते थोर महापात्र अधिकरण होते त्यांचा शिष्य परिवार ही खूप होता त्यामुळे सर्वच शिष्य परिवाराने राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करण्यास सुरुवात केली आणि तिथुन पुढे पंथात दोन रंगाचे वस्त्र निर्माण झाले एक तर कषाय वस्त्र गेरूसारखे आणि दुसरे राखाडी रंगाचे वस्त्र.

मग निळ्या रंगाचे वस्त्र कसे निर्माण झाले याबद्दल असे अनुमान आहे की, पुढे सर्वच अधिकरण राखाडी रंगाची वस्त्रे परिधान करीत असत. पण त्यांच्या शिष्य परिवाराने अधिकरणाची वस्त्र खोडे व्यवस्थित असावे म्हणून त्यांच्या वस्त्रांना निळ देण्यास प्रारंभ केला. व निळ्या रंगाची वस्त्रे चालती झाली.

पुढे कषाय वस्त्रे गुलाबी वर्णात कशी परिवर्तीत झाली याला मात्र काही इतिहास आढळत नाही. पण आता सांप्रत राखाडी वर्णाची वस्त्रे वैराग्याचे द्योतक आहे.


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post