यः क्रियावान् स पण्डितः
व्हाट्अँपवर आलेला हा लेख कोणाचा आहे माहीत नाही पण छान लिहिले आहे म्हणून ब्लॉगवर टाकत आहोत
म्हणे “वैराग्य करतात त्यांच्याकडे ज्ञान नसते”
किती हास्यास्पद वाक्य आहे हे.
भके पात्र वैरागी मी ज्ञानियाला ।
करी मार्गद्रोह गुरु ईश्वराला ।।
आजकाल असेच २-५ वर्ष गुरूकडे ज्ञान अभ्यासून स्वतःला ज्ञानी समजणारे पोपट पंडित बऱ्याच ठिकाणी ज्ञान पाजळताना दिसतात.
आणि कुणी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे असतिपरीचे आचरण करीत असेल तर त्याची खिल्ली उडवतात आणि यांच्या ठिकाणी फक्त वैराग्य आहे ज्ञान नाही अशा प्रकारचे हास्यास्पद विधाने करताना दिसतात.
त्या सर्वांना एकच सांगावेसे वाटते की, बंधुनो! *अवस्था स्वीकार* या लीळेत चरित्रपाठकारांनी म्हटले आहे की, “ *ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे गोसावी तेही स्वीकरिले”*
साक्षात परमेश्वर अवतार वैराग्याचा स्वीकार करतात आणि आपण त्या वैराग्याची खिल्ली उडवतो हे कितपत योग्य आहे!
स्थळ पोथी भाष्यकारही म्हणतात, “ *नसुद्धे ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करू जाणे तो जाणता”*
नुसते कोरडे शब्द जाणारा पंडित तो ज्ञानी नव्हे, खरा ज्ञानी तोच होय जो त्या ज्ञानाबरहुकुम वर्तन करतो, ज्ञानात सांगितलेले आचरण करण्याचा प्रयत्न करतो तो खरा ज्ञानी होय.
पण आज काल वैरागी लोकांची त्यांना अज्ञान म्हणून हे लावण्याची फॅशनच निघालेली आहे.
यावर आचार्यांचे शिष्य श्रीदामोदर पंडित महानुभाव आपल्या *वच्छाहरण* या ग्रंथात म्हणतात:-
“ आपणेया सारिखें न देखती :
तयाते नष्टा - भ्रष्टा म्हणती :
जैसिया पण्यांगणा हासती :
कुलस्त्रीयेते ।।”
आजच्या परिस्थिती नुसार ही ओवी तंतोतंत घडते.
मग राहिला प्रश्न वैरागी साधकांकडे ज्ञान आहे की नाही याचा?
त्यांच्याकडे ज्ञान आहेच यात काहीही शंका नाही कारण आपण सगळीकडे फिरून, नाना प्रकारचे कार्यक्रम, पंचावतार, उपहार इत्यादी सर्व धर्मकार्य करूनही जर आपल्याजवळ मननाशिवाय ज्ञान नांदते आहे, तर मग जे नेहमी झाडाखाली बसून सतत ब्रह्मविद्या शास्त्राचे चिंतन-मनन करतात, अटन करतानाही त्यांचे ब्रह्मविद्या शास्त्राचे मननच सुरू असते अशा वैराग्य मूर्तींकडे ज्ञान नाही हे म्हणणे बालिशपणाचे ठरेल.
मग त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे ते आपल्याला अनुभवास का येत नाही?
या प्रश्नाची अनेक उत्तरे असू शकतात
१) कथन दोष हा महाभयंकर आहे त्यामुळे अनंता सृष्टी देव होत नाही. “ *कथने अनंता सृष्टी टाकी”* (आचार स्थळ टीका १५७) अपात्र मनुष्यांना शास्त्र सांगितल्याने परमेश्वर तोंड पाहत नाहीत, देवाला खूप खंती येते यामुळे ते शास्त्राची वाच्यता कुठेही करीत नसतील.
२) “आपण जर शास्त्राची वाच्यता केली तर लोक आपल्याला ज्ञानी म्हणून मानतील आणि आपल्याला कीर्ती हेतू संचारेल आपण मान्यतेच्या वाही जाऊन धर्म गमावून बसू” कारण कीर्तीपर क्रिया करणारा पुरुषाची एकही क्रिया देवाच्या लेखी लागत नाही. ही भीती त्यांना असावी म्हणून ते कथन करीत नाहीत. आणि म्हणूनच त्यांच्या ठिकाणचे ज्ञान आपल्याला भासत नाही ते त्यांच्या आचरणातून हेच लक्षात येते.
३) ब्रह्मविद्या शास्त्राची वाचत या केल्याने लोक ज्ञानी म्हणून मानतात पूजा पुरस्कार होतात आणि देवाने पूजा पुरस्कार स्वीकारू नये असे वर्ज केले आहे. या वचनभंगाची अयोग्यता आपल्या माथी लागू नये म्हणून ते शास्त्र बोलत नसतील.
४) ब्रह्मविद्या शास्त्राची वाच्यता अनेक प्रकाराने, अनेक हेतूने केली जाते एक तर पुढीलाची परीक्षा पाहण्याकरता ब्रह्मविद्या बोलली जाते :: दुसरे छळवाद जल्पवाद करण्याकरता :: तिसरे ज्ञान मिरवण्याकरता :: चौथे द्रव्य मिळावे, मान्यताप्राप्त व्हावी याकरिता अशा अनेक हेतूने ब्रह्मविद्या शास्त्राचे कथन घडते आणि या वैराग्य मूर्तींना यातील एकाही हेतूची अपेक्षा नसावी म्हणून ते कथन करीत नसतील. याचे कारणही तसेच आहे ज्यांना फक्त परमेश्वर पाहिजे त्यांना या सगळ्या गोष्टी बालिशपणाच्या वाटतात, आणि यामुळे देव अत्यंत दूर जातो याचीही जाणीव त्यांना सतत असते म्हणून ते कथनाच्या बाबतीत जागृत सावध असतात.
५) कथनाने शब्द ज्ञान निर्बीज होते आणि निर्बीज झालेले ज्ञान धर्म आचरायला बाध्य करीत नाही आणि मनुष्य हळूहळू धर्मापासून दूरावत जातो याची त्यांना पूर्णपणे जाणीव असावी म्हणून ते कथन करीत नाही.
ज्ञान हे सोन्याप्रमाणे आहे वैराग्याच्या भट्टीतून गेल्याशिवाय ते जसे तसे चकाकत नाही.
कर्मरहाटीतही नुसती पोपटपंची करणार्या विद्वानाला कवडी मात्र किंमत नाही. यावर एक सुभाषित काय म्हणतो,
पठकाः पाठकाश्चैव, ये चान्ये शास्त्र चिन्तकाः ।
सर्वे व्यसनिनो मूर्खाः, यः क्रियावान् स पण्डितः॥
अर्थ जो शास्त्राचे नुसते पठण करतो इतरांनाही पठण करायला लावतो आणि जे सतत शास्त्राचे चिंतन करीत असतात पण त्या शास्त्राप्रमाणे वागण्याचा कधीही प्रयत्न करीत नाहीत त्या शास्त्रातील नियम अंगी बाणवण्याचा प्रयत्न करीत नाहीत ते सर्व व्यसनी लोक आहेत आणि मूर्ख आहेत, एवढे बोलून शेवटी सुभाषितकार शेवटी म्हणतो, *यः क्रियावान् स पण्डितः ।* जो शास्त्राप्रमाणे वागतो आचरण करतो त्यालाच पंडित असे म्हणावे आणि तोच खरा ज्ञानी होय.
जर कर्मरहाटीचा अन्यथाज्ञानी सुभाषितकर्त्याला एवढे कळते की वैराग्याशिवायचे ज्ञान निरर्थक आहे तर आपल्याला का कळू नये?
गंमत अशी आहे की फक्त ज्ञानाची प्रतिष्ठा करणारे लोक एक वचन नेहमी प्रमाणाला देतात, “ *ज्ञानेविन वैराग्य ते काई करावे बापेया”*
पण भल्या माणसानो!! ते वैरागी लोक ज्ञानेविन वैराग्य करीत आहेत हे तुम्हाला कोण्या शहाण्याने सांगितले. एकदा त्यांच्यासमोर नम्रतेने पाय मोडून बसून प्रश्न विचारल्यावर आपल्याला कळते की, त्यांचे ज्ञान किती अगाध आहे. ते ज्ञान *खडेया खुबटेयाच्या दृष्टांतीच्या वेडसु वेडसु* मनुष्याला वरवर हातपाय मारल्याने कधीच गवसत नाही म्हणून तो सहजच म्हणून जातो वैरागी लोकांकडे ज्ञान नसते.
आणि वैराग्याची खिल्ली उडवणाऱ्या मानवांनी “ *ज्ञानेविन वैराग्य ते काई करावे बापेया”* या वचनाचा प्रकरणवश पुर्ण वाचावा. मगच बोलावे.
काही असे विचार(?) ऐकायला मिळतात की, काळानुसार असतिपरी बदलत राहते, आता काळ बदलला आहे, असतिपरी जुन्या लोकांसाठी होती, हे असल्या विचारांचा प्रचार करणारे आपल्या अल्पज्ञतेचाच प्रचार करीत आहेत यात काही शंका नाही. कारण असतिपरी ही त्रिकालाबाधित आहे. युग कोणतेही असो, द्वापारयुगात श्रीमद्भगवतद्गीतेतही देवाने वैराग्यच सांगितले आहे, *अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते ।* वैराग्याशिवाय मन स्थीर होतच नाही. आणि ज्याचे मन स्थीर नाही त्याच्या हृदयात परमेश्वर कदापि वास करीत नाही.
त्रेतायुगात श्रीदत्तात्रेयप्रभू महाराजांनीही यदुराजाला ज्ञान दिले तेव्हा २४ गुरूंचे निरूपण केले आहे. तेही भाषाभेदाने वैराग्याचेच निरूपण आहे. कृतयुगी हंसावताराने *गुण चित्ताची वेणी उकलण्यासाठी स्मरण सांगितले आहे.* आणि जसे तसे स्मरण वैराग्याशिवाय कधीच होत नाही. कारण श्रीकेशिराजव्यास सुत्रपाठात लापनिक प्रकरणात म्हणतात, *तेचि स्मरण काइसेनि होअवे पा? ना देहदमने : जैसा बाळविधवेचा ।।*
सांगण्याचे तात्पर्य इतकेच की असतिपरी ही त्रिकालाबाधित आहे. काळ कोणताही असो, युग कोणतेही असो वैराग्य आचरण केल्याशिवाय मुक्ति होणे कदापि शक्य नाही.
*म्हणून ज्या भाग्यवंतांना असे वाटते की, 'वैराग्याशिवाय आपण मुक्त होऊ' ते कागदाच्या नावेने अथांग सागर पार करू इच्छिणाऱ्या बाळकासारखे आहेत.*
हा लेख लिहिण्यामागे कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. पण सध्या जे परमेश्वर मार्गाला, सर्वज्ञांच्या आचार-विचारांना पुढे नेत आहेत त्यांच्याबद्दलच अशी नालस्ती ऐकून वाईट वाटते. म्हणून हे लेखन केले.
सर्व परमार्गाने मला क्षमा करावी.