आपल्या चुकीच्या कृत्यांचा काय परिणाम होतो याचा आपण कधी विचार करतो का?
कोळसा :- दुष्कर्मे
चंदन :- सत्कर्मे
जुनी गोष्ट आहे. एक माणूस आपले संपूर्ण जीवन सुखी समाधानी वृत्ती अंगिकरून आनंदाने जगत होता. पण जेव्हा तो म्हातारा झाला आणि त्याला लक्षात आले की, ही आपली शेवटची वेळ जवळ आली आहे, तेव्हा त्याने आपल्या मुलाला जवळ बोलावले आणि म्हणाले, "मुला, मी माझे संपूर्ण आयुष्य जगाला प्रबोधन करण्यासाठी समर्पित केले आहे. आता, माझ्या शेवटच्या क्षणी मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे.”
हे ऐकून मुलाने वडिलांकडे काळजीपूर्वक पाहिले. तेव्हा त्याचे वडील म्हणाले, "जा आणि सर्वात आधी तू माझ्यासाठी एक कोळशाचा तुकडा आणि एक चंदनाचा तुकडा आण."
मुलाला पित्याची ही मागणी जरा विचित्र वाटली पण वडिलांचा आदेश असल्याने तो कोळसा आणि चंदनाचा तुकडा आणण्यासाठी खोलीबाहेर पडला.
तो स्वयंपाकघरात गेला जिथे त्याला कोळशाचा एक मोठा तुकडा सहज सापडला. त्याने तो एका हातात घेतला. मग तो त्याच्या घराच्या मागे असलेल्या बागेत गेला तिथे चंदनाचे झाड होते. त्याच्या एका हातात कोळसा असल्याने त्याने दुसऱ्या हाताने झाडावरील चंदनाचा तुकडा तोडला. आणि दोन्ही वस्तू घेऊन तो वडिलांकडे परत आला.
मुलाच्या हातातल्या दोन्ही वस्तू पाहून वडील म्हणाले, “आता हे दोन्ही तुकडे जमिनीवर ठेव.” मुलाने वडिलांच्या आज्ञेप्रमाणे केले आणि मग तो हात धुवायला निघाला हे पाहून वडिलांनी त्याला थांबवले आणि म्हणाले, "थांब बेटा, मला तुझे हात दाखव."
मुलाने आपले दोन्ही हात वडिलांसमोर ठेवल्यावर वडिलांनी प्रश्न विचारला, "एका हातात कोळसा आणि दुसऱ्या हातात चंदन घेतल्यावर तुला दोन्ही हातात काही फरक दिसतो का?"
मुलाने उत्तर दिले, "हो, कोळशामुळे एक हात काळा झाला आहे, परंतु दुसरा हात चंदनाचा सुगंध पसरवत आहे."
तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारले, "मग यावरून तुला काय समजले?" पण मुलगा वडिलांच्या बोलण्याला उत्तर देऊ शकला नाही. तो पूर्णपणे हैराण आणि गोंधळून गेला.
तेव्हा त्याचे वडील म्हणाले, "बेटा, हे बघ तू या हाताने कोळसा उचललास, त्यामुळे तो हात काळवंडला. कोळसा फेकूनही काळेपणा हातात राहिला. त्याप्रमाणेच आपण केलेल्या चुकीच्या कृत्यांचा परिणाम असाच असतो, वाईट कृत्यांचा परिणाम आपल्या हृदयावर आणि मनावर नकारात्मक विचार, मत्सर, द्वेष, अहंकार, स्वार्थ, क्रोध, अपराधीपणा इत्यादी स्वरूपात कायमची छाप सोडतो. आणि ती नकारात्मक विचारांची छाप नेहमीच आपल्या सद्विचारांवर मर्यादा घालत राहते. आणि आपले आयुष्य नेहमीच नकारात्मक विचारांभोवती फिरत असते. आणि आपण त्या दोषा दुर्गुणांची कठपुतळी बनून जातो"
आणि दुसऱ्या हातात त्याच्या मुलाने चंदनाचा तुकडा धरला होता, त्या हाताकडे पाहून वडील म्हणाले, "तुझ्या या हाताचा वास अजूनही येतो, त्याप्रमाणे आपण केलेली प्रत्येक चांगली कामे, लहान असो का मोठी असो. ती चंदनाप्रमाणे आपल्या जीवनाला तसेच आपल्या प्रियजनांच्या जीवनाला सतत सुगंध देते.
आपल्या मनात वास करणारा धर्म, आपण अभ्यासलेले शास्त्र, आपले गुरू आणि आपली सद्सद्विवेकबुद्धी हे चार ज्यांच्याकडे आहेत त्यांचे वाईट गोष्टींसाठी कधीच एकमत होत नाही. हीच योग्य आणि अयोग्य कर्माची कसोटी आहे.
श्रीकृष्ण भगवंतांचा जयजयकार असो