श्रीमद्भगवद्गीता चिंतन - दुःखालयम् अशाश्वतम् - geeta chintan marathi

श्रीमद्भगवद्गीता चिंतन - दुःखालयम् अशाश्वतम् - geeta chintan marathi

  श्रीमद्भगवद्गीता चिंतन - दुःखालयम् अशाश्वतम्


मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम्।

नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥

             ~ ८.१५, श्रीमद्भगवद्गीता.

अर्थ :- श्रीकृष्ण भगवंत म्हणतात “हे अर्जुन‍ा! मला शरण येऊन माझी प्राप्ती केलेले महात्मे ह्या दुःखाचे घर, दुःखाचे आगार तसेच अशाश्वत असलेल्या जगात, या संसारात पुन्हा पुन्हा जन्माला येत नाहीत, तर ते महात्मे मला प्राप्त करून परमसिद्धी प्राप्त करतात. या संसार सागरातून कायमस्वरूपी मुक्त होतात. ” 

      श्रीमद्भगवद्गीतेच्या अक्षरब्रह्मयोग या अध्यायात अर्जुनाने विचारलेल्या अध्यात्मविषयक सात प्रश्नांची उत्तरे भगवान श्रीकृष्ण भगवंतांनी दिली आहेत. त्याच अध्यायातील हा एक श्लोक आहे. आपण जिथे जन्माला आलो आहोत ते हे जग म्हणजे दुःखांचे घर आहे दुःखांचे आगार आहे. इथे मनुष्याला दुःखच भोगावे लागते. या अर्थाची दुःखालयम् अशाश्वतम्। ही लोकोक्ती या श्लोकापासूनच प्रसृत झालेली आहे. अध्यात्म काय आहे? आणि ह्या जगातील दुःखापासून स्वतःला कसे मुक्त करून घ्यावे? याचे ज्ञान आठव्या अध्यायात भगवान श्रीकृषणस्वारी अर्जुनाला सांगते.

      यातील आध्यात्म विचारबाजूला ठेऊन जरी दुःखालयम् अशाश्वतम्। चा आपण विचार केला तरी हे जग दुःखाने भरलेले आहे म्हणजे इथे मनुष्याल सतत संकटांचा सामना करावा लागतो ज्यातून केवळ दुःखच प्राप्त होते. इथे हा मनुष्यजन्म दुःख भोगण्यासाठीच आहे हे जरी खरं असलं तरी अनंत अशा आनंदरूपाची प्राप्ती करण्याची मनुष्यजन्म हीच अंतीम पायरी आहे. परमेश्वर परमात्मा श्रीकृष्णस्वारी इथे मला शरण या असे जरी सांगते तरी तो मी म्हणजे आत्माराम. जे या जगातलं प्रवाही कालातीत भवातीत असं चैतन्य आहे. ह्या सच्चिदानंदघन स्वरूपाची प्राप्ती करणे हेच मनुष्यजन्माचं अंतिम ध्येय होय.

       विदुरनितीमध्ये महात्मा विदूर राजा धृतराष्ट्राला सांगतात,

नाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम्।

आपत्सु च न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः॥

                    ~ विदुरनीती.

      उत्तम (विवेक)बुद्धी असलेली ज्ञानी (पंडित) माणसे अप्राप्य म्हणजेच दुर्लभ अशा गोष्टींची इच्छा करीत नाहीत तसेच नष्ट झालेल्या गोष्टींबद्दल शोकही करीत नाहीत तसेच संकटातही त्याची बुद्धी डगमगत नाही. संकटातही ज्ञानी पुरुषांची बुद्धी का डगमगत नाही? याचे उत्तर आपल्याला अशाच एका संस्कृत सुभाषिताधून मिळते,  

आपत्सु  च  न  मुह्यन्ति  नराः पण्डितबुद्धयः।

मनोदेह समुत्थाभ्याम् दुःखाभ्यामर्पितं जगत्॥

                 - महासुभाषितसंग्रह.

        ज्या व्यक्ती विद्वान आणि  बुद्धिमान असतात त्या संकटांना घाबरत नाहीत. कारण त्यांच्या मन व शरीराने त्यांना दृढ जाणीव झालेली असते की हे (सांसारिक/ भौतिक) जीवन   दुःखांनाच अर्पित आहे, दुःखांनीच भरलेले आहे. (इथे सुखाच्या तुलनेत दुःखेच ही अधिक.) 

      या विश्वाला भगवंताने 'दुःखालयम अशाश्वतम्' असं उगाच म्हटलेलं नाहीये मनुष्याला इथे अभावाने आनंद मिळतो. सुखाच्यामागे धावणारी प्रत्येक व्यक्ती इथे दुःखीच असते. या धावण्यात सुख लाभले तरी ते क्षणिकच, पुढच्याच क्षणी अधिक सुखाची ओढ लावणारं दुःख येतं. या सुखाच्या शर्यतीत संकटांना सामोरं जावं लागत. मात्र काटे चघळून स्वतःच्याच जिभेतून येणाऱ्या रक्ताच्या आस्वादाला सुख मानणाऱ्या उंटाप्रमाणे माणूसही ह्या जगात दुःखानंतर लाभणाऱ्या क्षणिक सुखाच्या मोहात गुरफटतो आणि जन्मोजन्मी दुःख भोगत राहातो. 

अशा ह्या जगाला ज्यांनी जाणलं, ते महात्मे अशाश्वत अशी सुखे असलेल्या आणि दुःखाने परिपूर्ण असलेल्या या जगात पुन्हापुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात न अडकता भगवंताला शरण जाऊन परमसिद्धी परमसुख प्राप्त करून घेत मुक्तता पावतात. सामान्यजन मात्र छोट्याछोट्या सुखांनाच परमानंद मानून मोहात पडून पुन्हापुन्हा दुःखाच्या आवर्ती चक्रात आडकतात. अशाश्वत दुःखपूर्ण जगाचीच पुन्हापुन्हा इच्छा धरतात.

       संत कबीर ह्या जन्माचं गुज सांगतात,

जा दिन ये जीव जनमिया, 

कबहू न पाया सुख ।

डाली डाली मै फिरा, 

पातें पातें दुःख ॥

           कबीर म्हणतात माणूस ज्या दिवशी ह्या जगात जन्मलो तेव्हापासून सुख कधी मिळालेच नाही. मी (जीवात्मा) ह्या फांदीवरून त्या फांदीवर (ह्या जन्मातून त्या जन्मात) दुःख भोगतच फिरत राहिलो आहे.  भगवद्गीतेतील आजच्या श्लोकाचाच अर्थ संत तुकारामांनी उपदेशीलेला आहे. ते म्हणतात,

जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून। 

दु:खासी कारण जन्म घ्यावा ॥१॥

पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी।

नरदेही येऊनी हानी केली ॥२॥

रजतमसत्व आहे ज्याचे अंगी। 

याच गुणॆं जगी वाया गेला ॥३॥

तम म्हणिजे काय नर्कचि केवळ। 

रज तो सबळ मायाजाळ ॥४॥

तुका म्हणे येथें सत्याचे सामर्थ्य। 

करावा परमार्थ अहर्निशी ॥५॥

      तुकाराम म्हणतात दुःखाचे घर असलेल्या ह्या जगात सत्यस्वरूप परमात्म्याच्या प्राप्तीकरिता संन्यास घेऊन दिवसरात्र अखंडित परमार्थ साधनेत राहा तरच ह्या दुःखातून सुटण्याला मार्ग आहे.

      भगवद्गीतेचा आठवा अध्याय वाचून हे,  दुःखालयम् अशाश्वतम्। काय आहे? त्यातून सुटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण भगवंत काय सांगतात? हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. यासाठीच तर ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले गेले आहे. खऱ्या ज्ञानाविषयी अनभिज्ञ असल्यानेच योग्य मार्ग मिळण्यापासून आपण वंचित राहातो. आणि दुःखालयम् अशाश्वतम्। चा एक भाग बनून राहातो.

अभिजीत काळे, 

हेही वाचा 👇

श्रीमद्भगवद्गीता की १६ ऐसी बाते जो आपकी जिंदगी बदल देगी

श्रीमद्भगवद्गीता का सिद्धांत


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post